Translate

बुधवार, १४ जानेवारी, २०१५

केशर

फुलाच्या आतले केशरी-लाल रंगाचे तंतू म्हणजे केशर. केशराचे फूल दिसायला फारच मनमोहक असते. तसेच केशराचा सुगंधही अप्रतिम असतो. खाद्यपदार्थांना रंग व सुगंध यावा यासाठी केशर उत्तम असतेच, पण ते औषधी गुणांनीही परिपूर्ण असते.

केशर चवीला कडू व तिखट असते, गुणाने स्निग्ध असते, डोकेदुखीसाठी उपयुक्‍त असते, उलटी थांबवते, वर्ण उजळवते व तिन्ही दोषांना संतुलित करते.

केशराचा औषध म्हणून पुढीलप्रमाणे उपयोग करून घेता येतो.
- लहान मुलांसाठी केशर उत्तम असते. कारण त्यामुळे वारंवार सर्दी, ताप, खोकला होणे टळते तसेच जंतांची प्रवृत्तीही कमी होते. यासाठी दोन चमचे दुधामध्ये केशराच्या दोन काड्या बारीक करून देता येतात.
- पित्त वाढल्यामुळे डोके दुखत असल्यास चंदन उगाळून त्यात चिमूटभर केशर मिसळून तयार केलेला लेप लावण्याचा उपयोग होतो.
- हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असेल तर रोज चिमूटभर केशर मधात मिसळून घेण्याचा उपयोग होतो. मात्र, बरोबरीने मूळ कारणावर उपचार होणे आवश्‍यक होय.
- अर्धशिशीचा वारंवार त्रास होत असेल, तर चमचाभर तुपात छोटी चिमूट केशरपूड नीट खलून त्याचे डाव्या व उजव्या नाकपुडीत दोन-तीन थेंब नस्य टाकण्याचा उपयोग होताना दिसतो. जुनाट सर्दी असेल, तर त्यावरही वरील प्रकारे केशरयुक्‍त तुपाचे नस्य करण्याचा उपयोग होतो.
- संपूर्ण गर्भारपणात नियमितपणे केशर घेतले तर बाळाची त्वचा सतेज व निरोगी होण्यास मदत मिळते, तसेच योग्य वेळेला कळा सुरू होऊन प्रसूती होण्यास मदत मिळते असा अनुभव आहे.
- दहा वर्षांपेक्षा छोट्या बालकाला जंत होण्याची प्रवृत्ती असेल, तर छोटी चिमूटभर केशराची पूड व तेवढाच कापूर एकत्र करून पाव चमचा मधाबरोबर देण्याचा उपयोग होतो.
- अशाप्रकारे खाद्यपदार्थांना केवळ रंग येण्यासाठीच केशर वापरले जात नसून, त्याच्या अंगी अनेक उत्तम गुणधर्म आहेत. म्हणूनच प्रत्येक स्वयंपाकघरात केशर असणे आणि ते गरजेनुसार योग्य प्रमाणात वापरले जाणे आरोग्यासाठी आवश्‍यक होय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा