Translate

बुधवार, २९ एप्रिल, २०१५

मोटार वाहन कायदा-१९८८ रद्द ????

मोटार वाहन कायदा-१९८८ रद्द करून त्या जागी रस्ते वाहतूक व सुरक्षा विधेयक केंद्र आणणार आहे. यामुळे एस.टी., बेस्ट बस आदी सार्वजनिक वाहतूक उपक्रम तसेच रिक्षा व टॅक्सी व्यवसायाचे खासगीकरण होणार आहे. तसेच यातील जाचक तरतुदींमुळे सर्वसामान्य नागरिकही भरडला जाणार आहे. त्याविरोधात उद्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. 
रिक्षा, टॅक्सी, एस.टी, बेस्ट बस बंद राहणार असल्याची माहिती 'नॅशनल फेडेरशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स आणि महाराष्ट्र राज्य परिवहन कामगार, अधिकारी, स्वयंरोजगारी चालक-मालक संघटना फेडरेशन'चे निमंत्रक अ‍ॅड. उदयकुमार आंबोणकर यांनी सोमवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली होती. मात्र, बुधवारी बेस्टच्या महासंचालकांनी दिलेल्या माहितीनूसार बेस्ट या संपात सहभागी होणार नाही. बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही महासंचालकांकडून देण्यात आला आहे. 
कोणताही नवीन कायदा आणायचा असेल तर त्याविषयी हरकती, सूचना मागविल्या जातात. त्यावर चर्चा होते. मात्र हा प्रस्तावित कायदा फक्त संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे, असे सांगून आंबोणकर म्हणाले, बंदमध्ये भारतीय मजदूर संघासह हिंद मजदूर सभा, इंटक, सीटू, आयटक, कामगार आघाडी तसेच देशभरातील कामगार संघटना सहभागी होणार आहेत. 'मनसे'ने या बंद आंदोलनाला पाठिंबा दिला असून शिवसेनेच्या सर्व परिवहन कामगार संघटनांनी यात सहभागी व्हावे यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे.
संपूर्ण देशभरातील वाहतूक व परिवहन क्षेत्रातील ४० लाख कामगार या बंदमध्ये सहभागी होणार असून महाराष्ट्रातील एक लाख एसटी कर्मचारी, ५ लाख रिक्षाचालक, तसेच 'बेस्ट'कर्मचारी असे सुमारे ७ लाख कामगार-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

रिक्षा, टॅक्सी, एस.टी. बेस्ट बंद

* ६ ते १२ आसनी गाडय़ांना वाहतुकीसाठी परवानगी
* एसटी किंवा बसचे फायद्यातील मार्ग खासगी मालक विकत घेऊ शकतील
* एसटी व बेस्टकडे असलेल्या जमीनी भूमी अधिग्रहण कायद्याखाली ताब्यात घेतल्या जातील
* एसटी बसमध्ये वाहक असणार नाही. देशभरातील १० ते १२ लाख वाहकांचे काय होणार हा प्रश्न
* वाहन अपघातात माणूस दगावला तर चालकाला सक्तमजुरीची शिक्षा
* एक वर्ष 'कम्युनिटी सव्‍‌र्हिस' करावी लागेल, ती कशा स्वरुपाची हे स्पष्ट नाही

अंतराळात वस्ती करण्याची स्टीफन हॉकिंग यांची सूचना

आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून अंतराळ संशोधनात व भौतिकशास्त्रात महत्त्वाचे योगदान देणारे शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी मानवजातीला शक्य तितक्या लवकर अंतराळात वस्ती करण्याचा इशारा दिला आहे.
हॉकिंग यांनी शनिवारी होलोग्राफिक तंत्रज्ञान वापरून केंब्रिज येथील आपल्या कार्यालयातून ऑस्ट्रेलियातील सिडनी ऑपेरा हाऊस येथील श्रोत्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला. 
पृथ्वीवरील वातावरण दिवसेंदिवस बिघडत आहे. त्यातच कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स), मानवी स्वभावातील आक्रमकता आणि क्रौर्य यामुळे मानवजातीपुढील आव्हाने वाढत आहेत. त्यामुळे पुढील १००० वर्षांत येथील वातावरण मानवजातीच्या अस्तित्वाला पोषक राहणार नाही. मानवजातीचे अस्तित्व टिकवायचे असेल तर आपण शेजारील ग्रहांवर आणि अंतराळात तातडीने वस्ती करण्यास सुरुवात केली पाहिजे. त्याकडे मानवजातीच्या अस्तित्वाचा विमा अशा अर्थाने पाहिले पाहिजे, असे हॉकिंग म्हणाले. आपले विश्व कसे अस्तित्वात आले, विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपली नेमकी काय भूमिका आहे, येथील घटकांचा परस्परसंबंध काय आहे, अंतराळातील विविध घटनांचा कार्यकारणभाव काय आहे, या सर्वाचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे. आपले लक्ष आपल्या पायांकडे नाही तर आकाशातील ताऱ्यांवर असले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. 
सैद्धांतिक भौतिकशास्त्राविषयीच्या प्रश्नांना उत्तरे देताना हॉकिंग यांनी सध्याच्या करमणूक क्षेत्रातील उदाहरणे देऊन श्रोत्यांशी जवळीक साधली. जगभरच्या तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेला इंग्रजी गायक झायन मलिक याने 'वन डायरेक्शन' हा बँड सोडून 'द एक्स फॅक्टर' या मालिकेत प्रवेश केल्याने लाखो तरुणींची मने दुखावली आहेत. त्याचा वैश्विक शास्त्रावर कसा परिणाम होईल, असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर हॉकिंग यांनी सांगितले की, सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास असे शक्य आहे की झायन एका विश्वात अजूनही 'वन डायरेक्शन'मध्ये काम करत आहे आणि दुसऱ्या समांतर विश्वात तो हा प्रश्न विचारणाऱ्या महिलेचा पती आहे. 
कार्यक्रमाच्या शेवटी हॉकिंग यांनी स्टार ट्रेक मालिकेतील संदर्भ घेत 'बीम मी अप स्कॉटी' असे म्हटले. त्यानंतर त्यांची सभागृहातील आभासी प्रतिमा दिसेनाशी झाली.

नेपाळचा भूकंप

प्रलंयकारी भूकंपाने नेपाळचा अक्षरश: कणाच मोडला आहे. मात्र, नेपाळ सारख्या छोट्या देशाला सावरण्यासाठी अख्खं जग धावून आलं आहे. या भूकंपानंतर काय-काय घडलं यावर टाकूया एक नजर:

1. नेपाळमधील महाभयंकर भूकंपमध्ये आतापर्यंत तब्बल 5 हजार नागरिकांचे जीव गेले आहे. मात्र हा आकडा 10 हजारांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

2. नेपाळमधील भूंकपाने भारतातील काही भाग देखील प्रभावित झाला आहे. भारतातही आतापर्यंत 70 जण मृत्युमुखी पडले आहेत. यात सर्वाधिक बळी हे बिहारमध्ये गेले.

3. नेपाळमध्ये आलेला भूकंप हा गेल्या 80 वर्षातील जगामधील सर्वात मोठा भूकंप आहे. 1934 साली प. बंगाल आणि राजस्थानमध्ये अशाप्रकारचा भूकंप आला होता.


4. या भूकंपामुळे पृथ्वीच्या 7200 किमी भाग जवळपास 3 मीटरने सरकला आहे. तर 7.9 एवढ्या तीव्रतेचा भूंकप हा 79 लाख टन टीएनटी उर्जेच्या बरोबरीचा आहे.


5. हिरोशिमावर करण्यात आलेल्या अणू हल्लाऐवढीच या भूकंपाची तीव्रता आहे. हिरोशिमामध्ये अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतर 90,000 ते 1,66,000 जणांचे बळी गेले होते.

6. नेपाळमध्ये आलेल्या भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. तर दुसरीकडे या धक्क्यामुळे काठमांडू हे शहर 10 फुटांनी सरकले आहे.


7. भारतीय वायुसेनेने नुकतेच 2246 भारतीयांना सुखरुपपणे मायदेशी आणलं आहे. एकूण 5,600 भारतीयांना नेपाळमधून मायदेशी आणण्यात वायुसेनेला यश आलं आहे.


8. हजारो ब्लँकेट, अन्न आणि पाणी, तंबू, डॉक्टरांच्या टीम, आपत्कालीन व्यवस्थापनचे जवान यासारख्या अनेक गोष्टी म्हणजे भारताला जेवढं  शक्य आहे ते नेपाळच्या मदतीसाठी तातडीने रवाना करण्यात आल्या आहेत.


9. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील आपल्या एक महिन्याचा पगार नेपाळमधील भूकंपग्रस्ताच्या मदतीसाठी देऊ केला आहे.

10. शीख समाजाने देखील मोठ्या प्रमाणात नेपाळच्या नागरिकांसाठी मदत देऊ केली आहे. दिल्लीच्या दोन शीख संस्थांनी जवळपास दररोज 25 हजार खाण्याचे पॅकेट नेपाळमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली आहे.