Translate

गुरुवार, ५ ऑक्टोबर, २०१७

गजानन दिगंबर माडगूळकर

1 ऑक्टोबर, साल 1919. माणदेशातील एक दुर्गम, दुष्काळी व दारिद्र्याने पिचलेले एक खेडेगाव शेटफळ गावच्या कुलकर्ण्यांची सून घरी बाळंतपणासाठी आलेली. गावात कुठलीच वैद्यकीय सुविधा असण्याचा प्रश्नच नव्हता. संध्याकाळी गावच्या सुईणीने मोठ्या मुश्किलीने सुनेची सुटका केली. मुलगा झाला म्हणून सर्वांना आनंदही झाला. पण बाळ काही रडेना. सर्वांच्याच चेहऱ्यावर काळजी. कितीतरी वेळ ते बाळ निपचित पडून होते. अनुभवी बायका अनेक प्रकार करून त्या बाळाला जागे करण्याचा प्रयत्न करीत होत्या पण ते बाळ कोणताच प्रतिसाद देत नव्हते. अशा स्थितीतच काही तास गेले. कुणीतरी जवळच्या गावातील वैद्यांना बोलावून आणले. त्यांनी नाडी पाहिली. बाळाचा श्वासोश्वासही त्यांना जाणवेना. त्यांनी त्या दुर्दैवी बालकाला मृत घोषित केले. त्या घरावर दुःखाचा डोंगरच कोसळला. घरामागच्या परसात खड्डा काढला गेला. आई काही आपल्या बाळाला सोडायला तयार नव्हती. पण तिच्या वडिलांनी ते बाळ आपल्या हातात घेतले आणि सर्वजण घरामागे त्या बालकाच्या अंत्यविधीसाठी निघाले. इतक्यात त्या म्हाताऱ्या सुईणीने त्यांना क्षणभर थांबण्याची विनंती केली. ती उठली. बाळंतिणीच्या बाजेखालील कोळश्याच्या शेगडीतला एक रसरसता निखारा तिने हातात घेतला आणि नुकत्याच जन्मलेल्या त्या बाळाच्या बेंबीजवळ चटका दिला. आणि काय आश्चर्य, निखाऱ्याने भाजलेले ते बाळ कळवळून रडले. आईच्या अंगावर तर काटाच आला, काही क्षणांचाच फरक, नाहीतर सारेच संपणार होते. 

त्या बाळाच्या आईइतकीच तमाम मराठी जनताही त्या सुईणीचे ऋण विसरू शकणार नाही. कारण जन्मजात मृत घोषित केलेल्या त्या बाळाने मराठी भाषेलाच नवसंजीवनी दिली. महाराष्ट्र शारदेचा मंडप भान हरपून नाचून गाऊन जगता ठेवणारे ते बाळ म्हणजे महाराष्ट्रवाल्मिकी महाकवी गजानन दिगंबर माडगूळकर...........

आज त्यांच्या जन्मदिनी या महाकवीला शतशः प्रणाम.