Translate

सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

पर्यावरणविषयक संशोधन संधी

नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरॉनमेंट हेल्थ, भोपाळ येथे खालीलप्रमाणे संधी उपलब्ध आहेत-
जागांची संख्या व तपशील : तंत्रज्ञ पदाच्या चार जागा. यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव.
आवश्यक पात्रता व अनुभव : उमेदवार शालान्त परीक्षा उत्तीर्ण केलेली असावा. त्यांना वैद्यकीय-तांत्रिक विषयक कामाचा अनुभव असायला हवा.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्यावरून त्यांची निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व फायदे : निवड झालेल्या उमेदवारांची भोपाळच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरॉन्मेंट हेल्थ येथे टेक्निशियन म्हणून दरमहा ५,२००-२०,२००+१,९०० या वेतनश्रेणीत नेमणूक होईल. या वेतनश्रेणीतील मूळ वेतनाशिवाय त्यांना केंद्र सरकारच्या नियमांनुसार इतर भत्ते व लाभही देय असतील.
अधिक माहितीसाठी संपर्क : या संदर्भात अधिक माहितीसाठी भोपाळच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरॉन्मेंट हेल्थच्या www.nireh.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अंतिम मुदत : विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज डायरेक्टर, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन एन्व्हायरॉन्मेंट हेल्थ, गांधी मेडिकल कॉलेज परिसर, ४६२००१ या पत्त्यावर २ जानेवारी २०१५ पर्यंत पाठवावेत.

लष्करी अधिकारी

सामायिक संरक्षण सेवा .परीक्षेद्वारे लष्करी अधिकारी बनण्याची अमोघ संधी युवावर्गाला उपलब्ध आहे. या परीक्षेचे विविध टप्पे आणि उपलब्ध संधींविषयी सविस्तर माहिती-

सामायिक संरक्षण सेवा परीक्षेच्या मार्गाने लष्करी सेवेमध्ये अधिकारपद संपादन करण्याचा राजमार्ग इच्छुक उमेदवारांना उपलब्ध आहे. या परीक्षेद्वारे देहरादूरस्थित इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, एजिमालास्थित इंडियन नॅव्हल अ‍ॅकॅडमी, हैदराबादस्थित एअरफोर्स अ‍ॅकॅडमी, चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीमध्ये प्रवेश मिळवता येतो. विशेषत: ज्या युवतींना लष्करात जाऊन साहस गाजवायचे आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा म्हणजे उत्तम संधी आहे. युवतींना चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकेडमी येथील अतांत्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.
इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीमधील काही जागा एनसीसी- सी प्रमाणपत्र (आर्मी)धारकांसाठी राखीव असतात. इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमीमधील काही जागा एनसीसी- सी प्रमाणपत्र (नेव्ही)धारकांसाठी राखीव असतात. या अ‍ॅकॅडमीत कार्यकारी- सामान्य सेवेसाठीचा अभ्यासक्रम असतो. एअरफोर्स अ‍ॅकॅडमीमध्ये प्री-फ्लाइंग अभ्यासक्रम असतो. चेन्नईस्थित ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीमध्ये महिला आणि पुरुषांसाठी शॉर्ट सव्‍‌र्हिस कमिशन अभ्यासक्रम असतो.

वयोमर्यादा
इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी- (फक्त अविवाहित पुरुषांसाठी) उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९२ च्याआधी आणि १ जानेवारी १९९७ च्यानंतर झालेला नसावा. एअर फोर्स अ‍ॅकॅडमीतील प्रवेशासाठी उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९२ च्याआधी आणि १ जानेवारी १९९६ च्या नंतर झालेला नसावा. ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीतील प्रवेशासाठी (पुरुष) उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९१ च्याआधी आणि १ जानेवारी १९९७ च्या नंतर झालेला नसावा. ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीतील प्रवेशासाठी (महिला) उमेदवाराचा जन्म
२ जानेवारी १९९१ च्याआधी आणि
१ जानेवारी १९९७ च्या नंतर झालेला नसावा. इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीतील प्रवेशासाठी (अविवाहित पुरुष) उमेदवाराचा जन्म २ जानेवारी १९९२ च्याआधी आणि १ जानेवारी १९९७ च्यानंतर झालेला नसावा.

शैक्षणिक अर्हता
* इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी- मान्यताप्राप्त विद्यापीठातील अभियांत्रिकी पदवी.
* एअर फोर्स अ‍ॅकॅडमी- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी. मात्र बारावीमध्ये भौतिकशास्त्र आणि गणित या विषयांचा अभ्यास केलेला असावा किंवा अभियांत्रिकी पदवी.
* ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमी-कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी.
* इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी- कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

परीक्षा प्रक्रिया
ही परीक्षा दरवर्षी दोनदा घेतली जाते. २०१५ साली पहिली परीक्षा १५ फेब्रुवारी २०१५ रोजी देशातील विविध शहरांमध्ये घेतली जाईल. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूर या शहरांचा समावेश आहे.
* लेखी परीक्षा : इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी आणि एअर फोर्स अ‍ॅकॅडमीत प्रवेश मिळण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि मूलभूत अंकगणित या तीन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी १०० गुणांचे तीन पेपर्स असतात.
ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत इंग्रजी आणि सामान्य ज्ञान या दोन विषयांचे प्रत्येकी दोन तासांचे आणि प्रत्येकी १०० गुणांचे दोन पेपर्स असतात. प्रश्न वस्तुनिष्ठ पद्धतीचे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह असतात. ते इंग्रजी आणि िहदी या दोन भाषेत असतात. निगेटिव्ह माìकग आहे. प्रत्येक चुकलेल्या प्रश्नासाठी ०.३३ गुण वजा केले जातात. एकापेक्षा जास्त उत्तरे नोंदवल्यास ०.३३ गुण वजा केले जातात. प्रश्नाचे उत्तर लिहिले नाही तर कोणत्याही प्रकारे गुण वजा केले जात नाहीत.
या पेपरमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक गुणांचे निर्धारण कमिशनच्या वतीने केले जाते. मूलभूत गणिताच्या पेपरचा दर्जा दहावी स्तराचा आणि इंग्रजी व सामान्य अध्ययन पेपरचा दर्जा पदवी स्तराचा असतो. इंग्रजीच्या पेपरमध्ये उमेदवाराचे भाषेवरील सर्वसाधारण प्रभुत्व आणि शब्दांची उपयोगिता तपासली जाते. सामान्य अध्ययनाच्या पेपरमध्ये चालू घडामोडी, दैनंदिन जीवनाशी निगडित सामान्य विज्ञान, भारताचा इतिहास आणि भूगोल इत्यादी घटकांचा समावेश असतो.
* मुलाखत : इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमी, इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी आणि एअर फोर्स अ‍ॅकॅडमीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी मुलाखत ३०० गुणांची तर ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीच्या प्रवेशाकरता घेण्यात येणारी मुलाखत २०० गुणांची असते.
* बुद्धिमता आणि व्यक्तिमत्त्व चाचणी : ही चाचणी द्विस्तरीय असते. पहिल्या टप्प्यात ऑफिसर्स इंटेलिजन्स टेस्टचा समावेश आहे. यामध्ये पिक्चर आकलन चाचणी, डिस्क्रिप्शन टेस्ट यांचा समावेश होतो. या चाचण्यांच्या गुणांवर आधारित दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारांची निवड केली जाते. या टप्प्यात मुलाखत, ग्रुप टेिस्टग ऑफिसर टास्क, मानसशास्त्रीय चाचणी आणि चर्चा यांचा समावेश आहे. ही संपूर्ण प्रक्रिया चार दिवस चालते. उमेदवार मानसिकदृष्टय़ा आणि बौद्धिकदृष्टय़ा लष्करी सेवा करण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याची सखोल तपासणी या चाचण्यांद्वारे केली जाते.
या परीक्षेला अर्ज करू इच्छिणारा उमेदवार शारीरिकदृष्टय़ा सक्षम असणे गरजेचे आहे. उंची, वजन, डोळे याविषयीची मानके (स्टॅण्डर्डस) निश्चित करण्यात आली आहेत. त्यानुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची निवड होऊ शकते.

विद्यावेतन आणि पदोन्नती
आर्मी आणि नेव्ही सेवांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षण काळात २१ हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षणाचा कालावधी १८ महिने असतो. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर कायमस्वरूपी कमिशनद्वारे सेवेत सामावून घेतले जाते. या सेवेत येणाऱ्या उमेदवारांना दोन वर्षांत लेफ्टनंट, सहा वर्षांनंतर मेजर आणि १३ वर्षांनंतर लेफ्टनंट कर्नल, २६ वर्षांनंतर कर्नल या पदावर पदोन्नतीची संधी मिळू शकते. निवड पद्धतीने उमेदवारांना १५ वर्षांत कर्नल, २३ वर्षांत ब्रिगेडियर आणि २५ वर्षांत मेजर जनरल, २८ वर्षांत लेफ्टनंट जनरल या पदावर नियुक्तीची संधी मिळू शकते.
एअर फोर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीमध्ये ७४ आठवडय़ांचे प्रशिक्षण दिले जाते. यशस्वी प्रशिक्षणानंतर उमेदवारांना फ्लाइंग ऑफिसर म्हणून सामावून घेतले जाते. त्यानंतर कालबद्धरीत्या फ्लाइट लेफ्टनंट, स्क्वॉड्रन लीडर, िवग कमांडर, ग्रुप कॅप्टन अशी पदान्नती अनुक्रमे दोन, सहा, १३ आणि २६ वर्षांनंतर दिली जाते. निवड पद्धतीने एअर कमांडर, एअर व्हाइस मार्शल, एअर मार्शल या पदांवर नियुक्ती होण्याचीही संधी मिळू शकते.
ऑफिसर्स ट्रेिनग अ‍ॅकॅडमीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना १० हजार महिना विद्यावेतन दिले जाते. हे प्रशिक्षण ४९ आठवडय़ांचे असते. हे प्रशिक्षण संपले की लघुसेवा कमिशनद्वारे लेफ्टनंटच्या रँकमध्ये सामावून घेतले जाते. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मद्रास विद्यापीठाची डिफेन्स मॅनेजमेंट अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज ही पदविका प्रदान केली जाते. प्रशिक्षणानंतर प्रारंभी १० वर्षांसाठी सामावून घेतले जाते. त्यानंतर उमेदवारांची कार्यक्षमता बघून चार वर्षांसाठी ही सेवा वाढवली जाऊ शकते. या सेवेत येणाऱ्या उमेदवारांना दोन वर्षांत कॅप्टन, सहा वर्षांनंतर मेजर आणि १३ वर्षांनंतर लेफ्टनंट या पदावर पदोन्नतीची संधी
मिळू शकते.

परीक्षा शुल्क
महिला आणि अनुसूचित जाती व जमाती संवर्गातील उमेदवारांना या परीक्षेची फी भरावी लागत नाही. खुल्या आणि इतर मागासवर्ग संवर्गातील उमेदवारांना २०० रुपये फी आहे. ही फी नेटबँकिंगद्वारे भरता येते.
www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करावा. उमेदवारांनी एकदाच अर्ज करणे आवश्यक आहे. अन्यथा अर्ज रद्द केला जातो. शासकीय सेवेत वा खासगी सेवेत असणारे उमेदवार थेट अर्ज करू शकतात. मात्र त्यांनी असा अर्ज केल्याची माहिती आपल्या सध्याच्या कंपनीला वा आस्थापनेला देणे गरजेचे आहे. मुलाखतीच्या वेळी संबंधितांचे 'ना हरकत प्रमाणपत्र' सादर करावे लागते.
परीक्षेच्या तीन आठवडे आधी ई-अ‍ॅडमिट कार्ड पाठवले जाते. हे प्रवेशपत्र यूपीएससीच्या www.upsc,gov.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येते.
संपर्क :
* फॅसिलिटेशन काऊंटर, दूरध्वनी- ०११-२३३८११२५/ २३३८५२७१
* इंडियन मिलिटरी अ‍ॅकॅडमीसाठी- joinidianarmy.nic.in
* रिक्रूटमेंट डायरेक्टोरेट- दूरध्वनी- ०११-२६१७३२१५
फॅक्स- २६१९६२०५
* हवाई दलासाठी- पीओ३ -ए/एअर हेडक्वार्टर्स, जे ब्लॉक, रूम नंबर- १७, वायू भवनसमोर, मोतीलाल नेहरू मार्ग, नवी दिल्ली- ११००११
* नौदलासाठी- रूम नंबर-२०४, सी िवग, सेना भवन नवी दिल्ली- ११००११. नौदलासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी त्याचे नियुक्तीपत्र www.nausena-bhati.nic.in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करावे.

वन-व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदविका

केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयांतर्गत भोपाळ येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेत वन-व्यवस्थापन विषयातील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम
उपलब्ध आहे.
या अभ्यासक्रमाच्या २०१५-१७ या शैक्षणिक सत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश पात्रता परीक्षेसाठी उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक पात्रता
अर्जदार सर्वसाधारण गटातील असल्यास त्यांनी कुठल्याही विषयातील पदवी परीक्षा कमीतकमी ५० टक्के गुणांसह (राखीव गटातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के गुणांसह) उत्तीर्ण केलेली असावी. त्याशिवाय त्यांनी सीएटी-२०१४ अथवा व्यवस्थापन अभ्यासक्रम विषयक प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी.
जे विद्यार्थी यंदा नमूद केलेल्या पात्रता परीक्षांना बसले असतील, तेही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा देण्यास पात्र आहेत.
निवड पद्धती
अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना त्यांची पदवी परीक्षेतील गुणांची टक्केवारी व प्रवेश पात्रता परीक्षेतील गुणांकाच्या आधारे समूहचर्चा व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. त्यातील कामगिरीच्या आधारे त्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
निवड प्रक्रिया भोपाळ शिवाय बंगळुरू, नवी दिल्ली आणि कोलकाता या शहरांत पार पडेल.
शिष्यवृत्ती
अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी निवडक २० टक्के विद्यार्थ्यांना दरमहा पाच हजार रुपयांची शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाईल.
अर्ज व माहितीपत्रक
अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटातील विद्यार्थ्यांनी एक हजार रु.चा (राखीव गटातील विद्यार्थ्यांना ५०० रु.चा) डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा.
अधिक माहिती
अभ्यासक्रमाच्या संदर्भात अधिक माहितीसाठी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, भोपाळच्या www.iifm.ac.in / pgdfm अथवा www.mponline.gov.in / Portal /service / IIFM / FRMHome Page या संकेतस्थळांना भेट द्यावी.
अंतिम मुदत
विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले व आवश्यक तो तपशील आणि कागदपत्रांसह असणारे प्रवेश अर्ज इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट, नेहरू नगर, भोपाळ- ४६२००३ या पत्त्यावर २ फेब्रुवारी २०१५ पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

तयारी एमपीएससीची: मुलाखतीची तयारी

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल अलीकडेच जाहीर झाला. यशस्वी उमेदवारांचे मनापासून अभिनंदन! मुलाखतीतले गुण हे अंतिम यादीत स्थान प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे ठरतात, हे लक्षात असू द्या.
मुलाखतीच्या संदर्भात उमेदवारांमध्ये अनेक गैरसमज असतात- उदा. उमेदवाराचे दिसणे महत्त्वाचे ठरते, अमूक एका पद्धतीचा पेहराव केलेला असावा, पाठ केल्यासारखी उत्तरे देणे योग्य, उत्तरे सरकारी धोरणांनाच अनुकूल होती अशी द्यावीत.. हे सारे तद्दन गैरसमज आहेत. एक मात्र नक्की की, मुलाखतीची नीट तयारी करणे आवश्यक आहे. तसेच मुलाखतीला जाताना नेटकेपणाने, टापटीपीने जाणे आवश्यक असते.
मुलाखतीला सामोरे जाताना आपण आहोत त्याहून वेगळे आहोत असा न दाखवता, जसे आहोत तसे पॅनलला सामोरे गेलेले उत्तम! त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना आतापर्यंत संपादन केलेल्या ज्ञानाच्या आधारावर, खोटेपणाचा आव न आणता, प्रामाणिकपणे उत्तर देणे म्हणजे मुलाखत. मुलाखत म्हणजे ज्ञानाची परीक्षा नव्हे, कारण तुमच्या ज्ञानाची परीक्षा ही मुख्य परीक्षेतच झालेली असते. मुलाखतीत उमेदवाराच्या व्यक्तिमत्त्वाची चाचणी होत असते. आपल्याला एखादी गोष्ट माहीत असण्यापेक्षा आपले ज्ञान इतरांसमोर कसे मांडता याला जास्त महत्त्व असते.
मुलाखत म्हणजे खेळाचा अंतिम सामना! मागच्या काही वर्षांचा आणि विद्यार्थिसंख्येचा अंदाज पाहता साधारणत: ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेतली जाते. (अर्थात असा काही नियम नाही) यापकी, पॅनलने आपल्याला प्रश्न विचारायचा वेळ वजा केल्यास उमेदवाराच्या वाटय़ाला फक्त २०-२५ मिनिटे येतात. या २०-२५ मिनिटांत उमेदवाराला स्वत:ला सिद्ध 
करायचे असते. 
प्रत्येकाची मुलाखत वेळेनुसार, प्रसंगानुसार वेगवेगळी असते. मात्र तयारी करताना खालील गोष्टी लक्षात ठेवल्यास उपयोग होईल.
* वैयक्तिक माहिती- आपले नाव, नावाचा अर्थ, ते नाव इतिहासाशी संबंधित असेल तर त्या संदर्भाबद्दल थोडी माहिती, उदा. एखाद्याचे नाव शिवाजी असेल किंवा एखाद्याचे नाव सचिन असेल तर त्याबाबतचे संदर्भ तयार करून ठेवावेत. वडिलांचे नाव, आडनाव, आडनावाचा इतिहास, आईचे नाव, जन्मतारीख, जन्मतारखेचा ऐतिहासिक संदर्भ, आपले गाव, गावाची माहिती, शाळा, महाविद्यालयाची माहिती, त्या शाळेतून एखादे विशेष व्यक्तिमत्त्व घडले असेल तर त्यांची माहिती, आपण शिकत असलेल्या संस्थेची माहिती, वडिलांच्या व्यवसायाची माहिती.
* शैक्षणिक पाश्र्वभूमी- आपण पदवी ज्या विद्याशाखेत घेतली असेल, त्यासंबंधी प्रश्न नक्की विचारले जातात. तयारीत असावे. पदवी परीक्षेत किंवा त्याआधी आपल्याला किती गुण मिळाले आहेत, याचा परिणाम मुलाखतीवर होत नाही, हेही लक्षात घ्या. समजा, शिक्षण घेताना एखाद्या वर्षी गॅप असेल किंवा नापास झालेले असाल तरी त्याचा परिणाम होत नाही. मात्र, उमेदवार त्या प्रश्नांची उत्तरे कशी देतो यावर बरेचसे 
अवलंबून असते. कुठे नोकरीला असाल किंवा प्रशासनात काम करत असाल तर त्या विभागाची माहिती नक्की मिळवा.
* वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच शेतकी विद्याशाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी- जे विद्यार्थी व्यावसायिक महाविद्यालयांत शिक्षण घेतात, त्यांनी- आपण ते क्षेत्र सोडून प्रशासनात का येऊ इच्छितो, याचे व्यवस्थित उत्तर तयार करावे. उत्तर सकारात्मक असावे. अभियांत्रिकीला सध्या वाव नाही, अनेक विद्यार्थी बेरोजगार आहेत, आयुष्याला स्थिरता मिळावी, यासाठी प्रशासनात येऊ इच्छितो.. असे उत्तर देऊ नये. डॉक्टर्स, तसेच शेतकी विद्याशाखेतील विद्यार्थ्यांवर खर्च केलेला सरकारचा पसा वाया जातो, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, (कोणत्याही शाखेचे शिक्षण वाया जात नाही. घेतलेल्या शिक्षणाचा फायदा नक्कीच प्रशासनात होऊ शकतो. या आशयाचे उत्तर तयार करावे.)
* आपण प्रशासनात का येऊ इच्छिता?
या प्रश्नाचे उत्तर सर्वानीच तयार करून ठेवावे, उत्तर प्रामाणिक असावे. जरी आपल्याला भ्रष्टाचाराची चीड असेल, प्रशासनातील कामांबाबत तुमच्या मनात नाराजी असेल तरी शक्यतो टोकाचे उत्तर देणे टाळावे. देश बदलायचा आहे. प्रशासनात खूप सुधारणा घडवून आणावयाच्या आहेत, महाराष्ट्रातील भ्रष्टाचार संपवून टाकायचा आहे असे म्हणण्याऐवजी प्रशासनात नवीन आव्हाने पेलण्याची संधी मिळते, मानसन्मान मिळतो, स्थिरता मिळते या आशयाचे तुमचे स्वत:चे उत्तर तयार करा.
* आपले गाव, तालुका, प्रशासकीय विभाग यासंदर्भात प्रश्न- आपण ज्या ठिकाणहून आला आहात- उदा. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण इ. या भागांच्या समस्या उदा. पाण्याची समस्या अवकाळी पावसाची समस्या इ. या प्रदेशातील लोकप्रतिनिधी, मंत्री याची माहिती या प्रदेशातील व्यवसाय, पेहराव या प्रदेशाचे किंवा गावाचे, ऐतिहासिक महत्त्व इ. विषयांची तयारी करून ठेवावी.
* सेवा प्राधान्यक्रमाची माहिती- पसंतीक्रमावर असलेल्या कमीत कमी पहिल्या पाच सेवांची माहिती, त्या खात्याची रचना, ती सेवा नेमकी काय आहे? इ. घटकांची तयारी करावी.
* केस स्टडी संदर्भात प्रश्न- बऱ्याच वेळा मुलाखतीदरम्यान, एखादी परिस्थिती देऊन त्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदा. िहदू, मुस्लीम दंगल उसळली तर..? एखाद्या प्रदेशात प्रंचड गारपीठ झाली. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अशा वेळी आपण काय कराल? आपण ज्या ठिकाणी नेमणुकीवर आहात तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्या रोखण्यासाठी आपण काय प्रयत्न कराल? इ. अनेक प्रश्न विचारले जाऊ शकतात. अशा प्रश्नांची यादी तयार करून सकारात्मक उत्तरे 
तयार ठेवावीत.
* छंदांविषयी प्रश्न- तुमचा छंद, तुमची आवड यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात. प्रत्येकाला छंद असेलच असे नाही. परंतु, एखादा छंद आपण नमूद केलेला असेल तर त्यासंबंधित तयारी करा. उदा. विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहणे हा छंद नमूद केलेला असतो. अलीकडेच पाहिलेल्या चित्रपटाविषयी त्याला काहीच माहीत नसते, एवढी वरवरची तयारी करून जाऊ नये. चित्रपटातील दिग्दर्शक, अभिनेते, आपण पाहिलेले काही चित्रपट, त्यातील संगीतकार इत्यादी माहिती तयार करावी. काही विद्यार्थ्यांचा छंद वाचणे हा असतो- त्यावेळी आपण अलीकडेच वाचलेली पुस्तके, त्यांचे लेखक, साहित्याचा प्रकार, साहित्य संमेलने इ. विषयी माहिती असणे आवश्यक आहे.
* महिला उमेदवारांसाठी- उमेदवार जर महिला असेल तर काही प्रश्न नक्की विचारले जाण्याची शक्यता आहे. उदा. महिलांच्या समस्या, महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी महिला अधिकारी म्हणून आपण कसे काम कराल? आपल्या घरापासून दूर बदली झाली तर आपण काम 
कराल का? असे काही प्रश्न विचारण्याची शक्यता असते. या प्रश्नांचे तुमचे उत्तर 
प्रामाणिक असावे.
* चालू घडामोडींविषयी प्रश्न- मुलाखतीला जाताना आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घटनांची माहिती आपल्याला असणे अपेक्षित आहे. त्यांची एक यादी तयार करून उत्तरे तयार ठेवा. मुलाखतीच्या दिवशी वृत्तपत्रांतील महत्त्वाच्या बातम्या- किमान ठळक मथळे तरी नक्की वाचा.
मुलाखतीची तयारी कशी कराल? 
व्यक्तिमत्त्व काही एका दिवसात घडत नाही. त्यासाठी वर्षांनुवर्षांची तपश्चर्या आवश्यक असते. कोणत्याही प्रश्नासाठी सज्ज राहा. आपली मुलाखत चांगलीच होणार आहे, आपल्याला मिळालेल्या वेळात आपण सर्वोत्तम कामगिरी करणार आहोत, असा सकारात्मक विचार करूनच मुलाखतीला सामोरे जा.
* तीन-चार मित्रांचा ग्रुप तयार करून त्यांना पॅनल समजून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी करा. सध्या मोबाइलमध्येच व्हिडिओचित्रण करण्याची सुविधा आहे. त्याचा वापर करून आपण बोलतो कसे, आपण कुठे चुकलो, याचा विचार करून तयारी करा.
* जर आपण अभिरूप मुलाखती (Mock Interview) देणार असाल तर वरिष्ठांनी किंवा प्रशिक्षकांनी सांगितलेल्या सूचनांचे नक्कीच पालन करा. मात्र त्यांनी सांगितलेली उत्तरेच तुम्ही सांगायला हवीत, असे नाही आणि तशीच उत्तरे सांगून तुम्हाला जास्त गुण मिळतील असेही मुळीच नाही. कारण त्या दिवशी वरिष्ठांनी सांगितलेली उत्तरेच जर इतर विद्यार्थी देत असतील तर आपण कोणीतरी उत्तरे तयार करून दिलेली आहेत व तशीच उत्तरे तुम्ही देत आहात, याचा चुकीचा प्रभाव पॅनलवर पडून कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची स्वत:ची उत्तरे स्वत: तयार करा. असे केल्यास आपल्याला जास्त गुण मिळण्याची शक्यता आहे.
मुलाखतीला जाताना..
* वेळेच्या अगोदर पोहोचा. 
* मुलाखतकाराने प्रश्नांनी सुरुवात केली तरी त्या प्रश्नाचे उत्तर देऊन झाल्यावर अधुनमधून मुलाखतीचे वातावरण हलकेफुलके राहील याची काळजी घ्या. त्याकरता चेहऱ्यावर स्मित असणे आवश्यक आहे.
* मुलाखत सुरू असताना स्वत:कडे लक्ष असू द्या. नकळत कोणत्याही हालचाली अथवा कृत्य करू नका. जसे पाय हलवणे, पेनाचा सारखा कट कट असा आवाज करीत राहणे, प्रश्न विचारणाऱ्याकडे न पाहता शून्यात बघणे, चेहऱ्यावर प्रसन्न भाव नसणे, खूप आरामशीर बसणे या सगळ्या छोटय़ा छोटय़ा हालचालींचा अनेकदा विपरीत परिणाम होऊ शकतो.
* खूप सहज आणि रिलॅक्स आहोत असे दाखविण्यासाठी जाणूनबुजून विनोदी बोलण्यासारखे कृत्य टाळा. 
* प्रश्न काय विचारला आहे ते नीट समजून घ्या. तो समजून घेण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्यात गर काहीही नाही. प्रश्न न समजता हवेत उत्तरे देऊ नका. 
* मुलाखतीदरम्यान स्वत:शी ठाम असणे फार महत्त्वाचे आहे. कधी तरी मुलाखत ही अचानक एकदम मोकळ्या वातावरणात होऊ लागते तर कधी काहीही कारण नसताना एकदम तणाव उत्पन्न होतो. प्रश्नांचे सूर बदलतात, पण तुम्ही मात्र कायम स्वत:बरोबर राहा. त्यातून तुम्हाला स्वत:चा ठामपणा सिद्ध करता येतो.

आरोग्य विभागाला महागाईचा सोस!

बाजारात चांगल्या प्रतीची केळी ४० रुपये डझन दराने उपलब्ध असताना राज्याच्या आरोग्य विभागाचे मनोरुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच ईएसआयएसच्या रुग्णालयांतील हजारो गरीब रुग्ण ५१ रुपये डझन या दराची केळी खात आहेत. केळीच नव्हे तर, या रुग्णांच्या जेवणासाठी खरेदी करण्यात येणारा तांदूळ, डाळ, साखर, गोडेतेल, मीठ, हळद, मिरची पावडर यांचे दर पाहिले तर श्रीमंतांनाही या गरिबांचा हेवा वाटेल, असे चित्र आहे. आरोग्य विभागाच्या मुंबई आणि ठाणे परिक्षेत्रातील रुग्णालयांत गेल्या पाच वर्षांपासूनबाजारभावापेक्षाही चढय़ा दराने अन्नधान्याचा पुरवठा सुरू आहे. विशेष म्हणजे, राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी माहितीच्या अधिकाराखाली या खरेदीचा तपशील मागवूनदेखील आजतागायत त्यांना याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. 
राज्याच्या आरोग्य विभागाच्या मुंबई व ठाणे जिल्ह्य़ातील रुग्णालये तसेच ईएसआयएसच्या रुग्णालयांमध्ये तसेच अकोला विभागात गेली पाच वर्षे रुग्णांसाठी तांदूळ, गहू, साखर, डाळी, तेल, मसाले, मीठ, अंडी, केळी तसेच मोसंबी यांचा पुरवठा करण्याचे काम मुंबईतील दीक्षा सामाजिक संस्था आणि गीताई महिला बचत गटाला देण्यात आलेले आहे. शासकीय आदेशानुसार २००९पासून सुरू असलेल्या या पुरवठय़ाचे कंत्राट दरवर्षी या दोनच संस्थांना देण्यात येत आहे. मात्र कंत्राटदार संस्थांनी लावलेल्या अन्नधान्याच्या किमती आजवर रुग्णालयांचे सिव्हिल सर्जन अथवा तत्सम दर्जाच्या अधिकाऱ्यांना खटकलेल्या नाहीत. आरोग्य विभागाकडून वर्षांकाठी सुमारे १० कोटी रुपयांची अन्नधान्य खरेदी होत असल्याचा अंदाज आहे. याबाबत ठाणे जिल्ह्य़ाचे आरोग्य उपसंचालक डॉ. रावखंडे यांच्याशी संपर्क साधला असता ठाणे येथील मनोरुग्णालय व जिल्हा रु ग्णालयातील खरेदीची माहिती त्यांनी दिली. मनोरुग्णालयात गेल्या महिन्यात ४६ रुपये डझन या दराने ५४,१२४ केळी खरेदी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, राज्याच्या आदिवासी विभागाकडून निविदा प्रक्रियेने दरवर्षी खरेदी करण्यात येणाऱ्या धान्याचे दर आणि आरोग्य विभागाच्या खरेदी दरांत प्रचंड तफावत आहे. अर्थात, घाऊक खरेदीच्या दरांचा विचार करता या दोन्ही विभागांना पुरवण्यात येणाऱ्या धान्याचे दर जास्त असल्याचे दिसून येते, असे आरोग्य विभागाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या संदर्भात विचारणा केली असता आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी या खरेदीबाबत आपल्याकडे नेमकी माहिती नसल्याचे सांगितले. मात्र ही बाब गंभीर असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असे ते म्हणाले. तसेच दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

माहितीची लपवाछपवी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी माहितीच्या अधिकारान्वये राज्य कामागार योजना व आरोग्य विभागाने केलेल्या अन्नधान्य खरेदी व दरांची माहिती विचारली होती. त्यांना केवळ शासनाचे खरेदीबाबतचे आदेश (जी माहिती त्यांनी विचारलीच नव्हती) पाठविण्यात आले. मात्र आजपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना कोणत्या वस्तू खरेदी केल्या जातात व कोणत्या दराने त्या घेतल्या याची माहिती दिलेली नाही.

अ‍ॅक्युप्रेशर - डोकेदुखी / कपाळ उपचार पद्धती

अ‍ॅक्युप्रेशर पद्धतीचे मूळ अत्यंत प्राचीन काळात आहे. प्राचीन काळात डोकेदुखीवर उपाय करण्यासाठी कपाळ किंवा डोक्यावर दाब दिला जाई. आजही आपण आपल्या हातांनी एकाच वेळेस किंवा आलटून पालटून दुखापत झालेल्या भागावर दाब देत असतो. अ‍ॅक्युप्रेशर कपाळ पद्धतीमुळे चेहरा व त्याचा वरील भागात प्रभावी कायाकल्प सुधार होतो. डोकेदुखी, रक्ताधिक्य, ताण हे सहसा कवटीच्या खालच्या बाजूस (बिंदु जीबी २० येथे) निर्माण होत असतो. यांवर नियंत्रणासाठी याजागांना दोन मिनिटांकरीता अंगठे व बोटांच्या मदतीने दाब देऊन पसरावे. तसेच कपाळाच्या मध्यभागी व दोन्ही भुवयांच्या मधोमध असलेले "yintang" बिंदु शोधुन त्यावरही तशीच प्रक्रिया करावी.
कपाळ पद्धती 
डोकेदुखी कमी करण्यासाठी व मनःशांतीसाठी कपाळावर हलका दाब देऊन पसरवत जावे. पूर्ण चेहरा पद्धतीमध्ये पुर्ण चेहरा उचलुन खालच्या जबड्यापासून, हनुवटी, तोंडाच्या बाजुने वरच्या दिशेने दाब देत जावे व हा हलका दाब कपाळाच्या मध्यभागापर्यंत क्रमा क्रमाने देते रहावा. वरील उल्लेख केलेल्या भागात हळूहळू रक्त व प्रणवायु एकत्र येऊ लागतो. यामुळे ताण कमी होत जातो, रेषा पातळ होत जातात तसेच त्वचा मऊ व मजबूत होते. ज्यामुळे आणखी काही आरोग्यासाठी चांगले फायदे होतात.

कपाळ उपचार पद्धती 
कपाळ उपचार पद्धतीडोकेदुखीपासून सुटका मिळण्या आधी आपण भुवयांच्या बिंदुबर हलकी थाप मारावी, त्याच्प्रमाणे आजुबाजूस, कपाळावरही हलकी थाप मारावी. भुवयांचा (acupoint)

अ‍ॅक्युपॉईंट हा भुवयांच्या सुरवातीला, मध्यभागाजवळच असतो. जर आपण अचुकपणे मध्यभागी थाप दिली नाही तर पुन्हा पुन्हा त्याच प्रक्रियेची गरज असते आणि मग चांगले परीणाम दिसू लागतात.
चेहरा वाचणे ही अ‍ॅक्युप्रेशर पद्धती नाही पण ते समस्यांचे निदान करण्यासाठी मदत करतात. अ‍ॅक्युप्रेशर पद्धतीमध्ये चेहरा वाचणे हे अध्यात्मिक किंवा चमत्कार नाहीत. याला शास्त्रिय समर्थन दिले गेले आहे. मानवी चेहरा अनेक संकेत दर्शवू शकतो त्यावरूनच त्या व्यक्तीला नेमका आरोग्य विषयक समस्या आहेत याचे संकेत मिळु शकतात. प्रत्येक संकेतावरुन वेगळी समस्या दिसून येते. कपळावर आठया असणे हे तो व्यक्ती बराच निराश असल्यचे दर्शवते. तुमची बोटे कपाळावर आणा आणि वर खाली बोटांनी रगडायला सुरवात करा. हळुहळू केसांच्या रेषेपासून भुवयांपर्यंत घासा. कपाळाच्या मध्यभागापासून सुरवात करुन डोक्याच्या मध्यभागापर्यंत आराम मिळेपर्यंत ही प्रक्रिया करावी.
दाबतंत्राद्वारे डोक्याचे व्यायाम

या पद्धतीमुळे पाचनक्रिया व पित्ताशय यांना उत्तेजना मिळते. बिंदुंवर दाब दिल्यामुळे भावनिक अडथळे दुर होतात तसेच शरिरामध्ये धरुन ठेवलेले ताणही दुर होतात. त्याचप्रमाणे अध्यत्मिक अडथळे, एकाग्रता न येणे ह्या समस्या देखिल दाबतंत्राने दुर होतात. हळुवारपणे आपल्या कपाळाच्या मध्यभागी नाकाच्या रेषेवर असलेला बिंदु डोळेबंद करुन धरून ठेवल्याने ध्यान सम्राज्यात प्रवेश करण्यास मदत होते. यात काही जलद आणि सध्या सोप्या मार्गाने ताण कमी करता येतो. दाबतंत्राने वाहिन्यांना उर्जा मिळवून दिली जाते.
दाबतंत्राने डोळ्याच्या आजुबाजूला मसाज केल्याने संगणकासमोर सतत काम केल्याने किंवा रात्री जगरणामुळे डोळ्यांवर येणारा थकवा, ताण कमी होतो. त्यामुळे येणारी डोकेदुखीही कमी होते. कपाळावर तसेच भुवयांच्या मध्यभागी, डव्या व उअजव्या बाजूला हलकी थाप मारत राहील्यामुळे भरपूर आराम मिळतो. दाब बिंदुचे फायदे विशेषतः डोक, डोळे आणि चेहरा यांना होतो.
फोरहेड रिलीज
सावकाश व हळुवारपणे बोटांनी व तळहातांनी कपाळावरील जागेवर ताबा मिळवा. खोल आणि हळू श्वसनक्रिया चालू ठेवा. ज्या करणामुळे ताण वाटत आहे त्याजागेवर लक्ष केंद्रित करा. तिन ते पाच मिनिटांसाठी आपले हात कपाळावरच ठेवा.

भारतीय संस्कृतीत अत्यंत जुन्या व सर्वसाधारण दाबतंत्रापद्धती आहेत. कपाळावरील टिकली किंवा कुंकू देखिल महत्त्वाच्या बिंदुशी संबंधित आहे. ते उर्जावर्धक जागा दर्शवतात. ही जागा सहा उर्जा चक्रापैकी एक मानली जाते. याच जागेला अंतःदृष्टि व बौद्धिक विकासाचे ठिकाण म्हणजेच तिसरा डोळा असे मानले जाते. दैनंदिन वापरामुळे एका मधून दुसरा अंतर्गत मार्ग जागृत होत जातो असा वैचारिक दृष्टिकोन त्यात होता.
काही घरगुती उपाय
तीव्र डोकेदुखी असता वेदनाशामक औषधांचा भडिमार न करता डोक्यावर वाटलेल्या
आल्याची पेस्ट लावा. यामुळे थोडी आग होईल मात्र डोकेदुखी थांबेल. ताण आल्यानं डोकं दुखत असेल तर फ्रिजरमधील फ्रोजन मटारची बॅग १0 ते १५ मिनिटं डोक्यावर ठेवा यामुळेही डोकेदुखी कमी होईल. एक चमचा ओवा चांगला भाजून सुती कपड्यामध्ये बांधा या पुरचुंडीतून निघणार्याध वाफा हुंगल्यास
डोकेदुखी कमी होईल. बर्फानं शेकल्यानेही डोकेदुखी कमी होते. वारंवार डोकेदुखी उद्भवत असल्यास अनशापोटी रोज एक सफरचंद खावे. यामुळेही सततच्या
डोकेदुखीची तक्रार कमी होते. एक चिमूट खायचा सोडा, एक चमचा जिरेपूड, आठ थेंब लिंबाचा रस आणि मीठ मिसळलेलं पाणी पिण्यानं अँसिडिटी कमी होते.

आपण मृत्यू पावल्यावर आपल्याबद्दल लोक मनातल्या मनात काय म्हणतील? याचा विचार केल्यावर जे हाती येईल ते फक्त सत्य. आणि सत्याच्या शोधाची सुरुवात आत्मशोधापासून होते. निदान या निमित्ताने तुमचाही प्रवास सत्याकडे सुरू व्हावा..

उद्धरावा स्वयें आत्मा,
खचू देऊ नये कधी
आत्मा चि आपला बंधु
आत्मा चि रिपु आपुला -गीताई ६ -५
भगवद्गीतेतील हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे, भगवान सांगतात, आपल्यात बदल करायचा असेल तर तो आपण स्वत:च करायला हवा, कारण आपण स्वत:च आपले सर्वात जवळचे मित्र असतो आणि आपले स्वत:चे शत्रूही. बदल घडवून आणण्याची, स्वत:च्या उद्धाराची, प्रगतीची अंतिम जबाबदारी आपली स्वत:चीच असते आणि आपल्यात बदल करण्यात रोखणारा अडथळा आणणारा सर्वात मोठा शत्रू आपण स्वत:च असतो.
जिंकुनि घेतला आत्मा
बंधु तो होय आपुला
सोडिला जरी तो स्वैर
शत्रुत्व करितो स्वयें गीताई ।। ६.६
म्हणजेच आपण आपल्या स्वत:च्या आंतरिक नैसर्गिक ऊर्मीवर नियंत्रण राखत, ती ऊर्जा योग्य मार्गाने सामाजिक/नैतिक बंधनात ठेवली तर आपण आपले स्वत:चे मित्र होतो नाही तर त्या ऊर्मीना स्वैर सोडले, मोकाट सोडले तर आपल्यासारखा शत्रू आपणच!
मला नेहमीच आधुनिक मानसशास्त्राची, विशेषत: समुपदेशनाची बीजं भगवद्गीतेत आणि संतसाहित्यात असल्याचं जाणवतं. गीतेत अनेक सर्वकालीन सत्य सांगितलेली आहेत, आणि यातच गीतेची शाश्वतता आहे. स्वत:चा उद्धार म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपल्याच मनाशी संवाद साधत त्या मनाला प्रगल्भ बनवण्याची प्रेरणा देणारा ग्रंथराज आहे ही गोष्ट नक्की! आपण आपला मित्र बनण्यासाठी आणि स्वत:चाच उद्धार करण्यासाठी काही सोपी वाटणारी सूत्रं आहेत. त्यातलं पहिलं सूत्र म्हणजे सतत भानावर राहत जगणं. आपल्या अवतीभवती अनेक लोभाचं-मोहाचं जाळं पसरलेलं असतं. आपण बेसावध असलो तर अजाणतेपणी त्या मोहात पडू शकतो. माझा एक मित्र दारूच्या व्यसनापासून तब्बल एकोणीस वर्षे दूर होता. व्यसनाच्या काळात त्याने जितकं काही गमावलं होतं त्याच्या दुप्पट त्याने कमावलं होतं. एकदा तो मित्रांबरोबर मायानगरी थायलंडला, पटाया इथं गेला, मौज करायची, इतकंच त्याने ठरवलं होतं. तिथले काही खास शोज पाहून झाल्यावर तो उत्तेजित झाला. बाकीच्या सगळ्या मित्रांनी बीअरच्या बाटल्या उघडल्या. आणि त्याने ग्लास कधी तोंडाला लावला ते त्याला कळलंच नाही. आजपर्यंत म्हणजे एकोणीस वर्षे अकरा महिने अकरा दिवस 'पहिला घोटच घातक' हे ब्रीदवाक्य मनाशी घोळवणारा माणूस त्या दिवशी विसरला. आणि त्या दिवशी तो किती बाटल्या प्यायला तेसुद्धा त्याला आठवेना. सकाळी उठताच हात थरथरू लागले. तत्क्षणी फोन उचलला आणि दारूची ऑर्डर दिली. आणि तेव्हा जे सुरू झालं ते त्याचं पिणं अखंड चालू आहे. तीन महिने त्याच्या बायकोने वाट पाहिली आणि नंतर ती वैतागून माहेरी निघून गेली. सध्या त्याला मोकळं रान आहे. पैसे आहेत तोपर्यंत तो असाच पीत राहणार.
असे असतात बेसावध राहण्याचे परिणाम. प्रत्येकाच्या जीवनात असे घडतेच असे नाही. पण वाहन चालवताना वाळू होती हे कळलेच नाही, इतकंच काय जेवण करताना भाताची वाफ अशी भाजून काढणारी असेल असं वाटलं नव्हतं असं म्हणणारे असतातच की! स्वहितासाठी पहिली जरुरी असते ती सावधानतेने आणि सुरक्षितपणे जगण्याची.
स्वहित जपणं हे खरं तर जगण्याचं पाहिलं उद्दिष्टं असायला हवं, पण आपल्याकडे त्याग त्याग खेळण्याची, विशेषत: महिलावर्गाची परंपरा आहे. शिळी, कच्ची, डाग असलेली पोळी असू दे वा माश्याची शेपटी ती नेहमी आई किंवा पत्नीच्या वाटय़ाला. कितीही भूक लागो पतिराजांच्या आधी जेवण? अरे बापरे! ते तर वज्र्यच, अजूनही कित्येक घरात हे दृश्य आहे. या सगळ्यातून आपल्याला दोन गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे असं बघा -मी जसाही आहे गुणदोषांसकटच आहे हे सत्य आहे. मी आहे त्यापेक्षा अधिक चांगला होऊ शकतो, ते हेही मर्यादित अर्थानं खरं आहे. ज्या गोष्टी माझ्यात बदलायला हव्या आहेत त्या बदलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय. बस्स. इतकंच पुरेसं आहे. आणि आपल्यातील दोष कमी करत गुणांचा विकास करण्याची, ज्याच्या-त्याच्या मर्यादेनुसार जबाबदारी आहे. याउपर जर कोणी नावं ठेवत असेल तर ठेवू दे. तो आपला प्रश्न आहे.
जयश्रीचं उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर घडलेलं आहे. लहानपणी तिला विशिष्ट प्रकारचा संधिवाताचा आजार झाला होता. त्या आजाराने तिची संपूर्ण हालचाल जवळजवळ बंद झाली होती. कितीही वेदनाशामक औषधं दिली तरी वेदनेने ती विव्हळत असायची. तिच्या आई-वडिलांचा कल अ‍ॅलोपथिक औषधांकडे नव्हता. पण अखेर ते संधिवाततज्ज्ञ डॉक्टरकडे गेलेच. त्यांनी सांगितले, 'आपण तिला, शरीरात आपोआप निर्माण होणाऱ्या रसायनासारखे तीव्र गुणधर्म असलेले कृत्रिम औषधांचे डोस देऊ शकतो. एका आठवडय़ात तिच्या वेदना कमी होतील आणि महिनाभरात ती अगदी नेहमीसारखी शाळेत जायला लागेल.''
तिची आई म्हणाली,''डॉक्टर, लगेच सुरू करा ते औषध.''
डॉक्टर म्हणाले, ''ते कधीही सुरू करता येईल, पण त्या औषधाचे दीर्घकालीन काही परिणाम होतील. तिच्या स्नायूंची अवास्तव वाढ होऊ शकते आणि ती फारच जाड होईल. तिला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून सांगतो, विचार करून निर्णय घ्या.'' आई म्हणाली, 'पुढचे पुढे बघू.' म्हणता म्हणता जयश्री मोठी झाली. हाडापेराने मजबूत. उंचीही सर्वसामान्य मुलींपेक्षा दोन-तीन इंच जास्त. बोली भाषेत उभी-आडवी वाढली. तरी तिची एक सवय चांगली होती. ती भरपूर व्यायाम करायची. स्वत:च्या ताकदीच्या बळावर कबड्डीमध्ये इतकं प्रावीण्य मिळवलं की सरकारतर्फे तिचा गौरव केला गेला. पण स्थळ मिळेना. आता आईबापाला चिंता वाटायला लागली, हिला अनुरूप नवरा आणायचा तरी कुठून ? हे सगळं फक्त आपण औषधांबाबत घेतलेल्या निर्णयामुळेच ही टोचणी त्यांना छळू लागली.
याबाबत जेव्हा जयश्रीला कळलं तेव्हा जयश्री त्यांना जे म्हणाली ऐकून मी त्या मुलीला साष्टांग दंडवत घालायचाच तेवढा बाकी होतो. ''आज तुम्हाला जो प्रश्न वाटतो तो प्रश्न ना तुमचा आहे ना माझा. त्या वेळी जे तुम्ही केलंत ते मला लवकर बरं वाटावं म्हणूनच. त्याबद्दल खंत बाळगायचं काहीच कारण नाही. आज मी जाड असले तरी स्थूल नाही. स्थूलता हा माझा प्रश्न नसून बांधा हा प्रश्न आहे. अत्यंत नियमित व्यायाम करून मी तो सुडौल राखते आहे. जर काही मुलांना मी जाड वाटली असेल तर असू दे. मी कशी आहे, काय आहे आणि का आहे याचे संपूर्ण भान मला आहे. मी आहे तशी उत्तम आहे. आणि मला आहे तशी स्वीकारणारा मुलगा मिळेलच. कदाचित थोडा जास्त वेळ लागेल. पण मी सर्व प्रयत्न करून अशीच राहणार आहे, हे सत्य आहे आणि ते मला कळून चुकले आहे की आडव्या बांध्यानेच मला जगावे लागणार आहे.''
पुढची कहाणीही रंजक आहे. तिचे लग्न अत्यंत हुशार, देखण्या मुलाशी झाले. त्याच्यावर फक्त एक ठपका होता. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी त्याची पत्नी तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती. ती पळून जाणार आहे हे पहिल्याच दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले होते. पण तरीही त्याच्यावर 'घटस्फोटित' हा छापा पडलाच. जयश्री म्हणाली, 'माझ्या शरीरयष्टीत माझा असा काहीच दोष नाही त्याचप्रमाणे त्याची पत्नी पळून गेली तर यात त्याचा तरी काय दोष?' हे सगळं घडू शकतं जर माणसानं स्वत:चा विनाशर्त स्वीकार केला आणि आपल्या निर्णयांची जबाबदारी घेतली तर आणि तरच.
आपण मृत्यू पावल्यावर आपल्याबद्दल लोक मनातल्या मनात काय म्हणतील? याचा विचार केल्यावर जे हाती येईल ते फक्त सत्य. आणि सत्याच्या शोधाची सुरुवात आत्मशोधापासून होते हे विसरून चालत नाही. निदान या निमित्ताने सत्याकडे प्रवास सुरू व्हावा. मीही तुमच्यासारखा यात्रिक आहे. कदाचित तुमच्या आधी, प्रवासाच्या दिशेचा नकाशा मिळवण्यात यशस्वी झालो असेन इतकंच. पण हाच नकाशा अंतिम नाही. कोणी अन्य मार्ग शोधून काढेल. कदाचित तो या मार्गापेक्षा सोपाही असेल. प्रत्येकाला निवडीचे स्वातंत्र्य असतेच.
या लेखमालेचा शेवट करताना, ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाची फक्त आठवण होते आहे -
जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात

शेरू या श्वानाचा अखेर मृत्यू झाला..........

1) 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा उल्लेख करताच तो थरार अनेकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. दहशतवाद्यांनी केलेला अंदाधुंद गोळीबार आणि त्यात जखमी झालेलं असंख्य मुंबईकरांसाठी आजही त्या आठवणी अंगावर काटा आणतात. याच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार असलेला आणि गेली सहा वर्ष या हल्ल्याची जखम सांभाळत मृत्यूशी झुंज देणाऱ्या शेरू या श्वानाचा अखेर मृत्यू झाला.

हृदयविकाराच्या झटक्यानं शेरूची शनिवारी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राणज्योत मालावली. 26/11 च्या मुंबई हल्ल्यावेळी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर शेरू दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात जखमी झाला होता. तेव्हापासूनच तो परळच्या या रुग्णालयात उपचार घेत होता. पण, काल अखेर त्यानं जगाचा निरोप घेतला.

सीएसटी स्टेशनवर अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारावेळी शेरू देखील रेल्वे स्थानकात होता. दहशतवाद्यांच्या तीन गोळ्या शेरूला लागल्या होत्या. स्थानकात विव्हळत पडलेल्या या श्वानाला फोटोग्राफर श्रीपाद नाईक यांनी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं होतं.

डॉक्टरांनी त्याच्या शरिरातील दोन गोळ्या काढल्या, श्वसननलिकेत एक गोळी तशीच अडकून होती. तेव्हापासून तो याच रुग्णालयात उपचार घेत होता.  शेरुबद्दल कळल्यानंतर एका पारशी कुटुंबानं या बहाद्दर श्वानाला दत्तक घेतलं. त्याच्या उपचारासाठी लागणारा दर महिन्याचा सर्व खर्च हे कुटुंब करत होतं.

पण, गेल्या काही दिवसांपासून शेरूची प्रकृती खालावत होती. त्यात त्यानं अन्नही सोडलं. अखेर शनिवारी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात रुग्णालयाच्या आवारातच शेरूवर अंत्यसंस्कार करण्यात आले



2) मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील पार्सल रूमबाहेरचा कोपरा सहा वर्षांनंतर शनिवारी पुन्हा हळहळला. तेथून ये-जा करणाऱ्या आणि थोडीशी उसंत मिळाल्यानंतर पाठ टेकणाऱ्या अनेक हमालांना या कोपऱ्याकडे पाहाताना त्याची आठवण यायची. एखादा कुणी तरी सवड काढून परळच्या पेटिट पशुरुग्णालयात चक्कर मारूनही यायचा.. आता त्या आठवणी पुसट होणार आहेत. स्टेशनच्या आवारातच राहणारा एक भटका कुत्रा मुंबईला चटका लावून दोन दिवसांपूर्वी काळाआड गेला. सहा वर्षांपूर्वीच्या, २६ नोव्हेंबर २००८ या दिवशीच्या भीषण अतिरेकी हल्ल्यातील एक मूक साक्षीदार हरपला. टर्मिनसवरील गर्दीतच तो पंधरा वर्षांपूर्वी कधी तरी जन्मला, तिथेच तो वाढला. त्या दिवशी, छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आवारात कसाब आणि त्याच्या साथीदारांनी अचानक सुरू केलेल्या बेछूट गोळीबारामुळे रेल्वे स्टेशन भयाने थरारून गेले. शेराच्या थाटात त्या परिसरात वावरणारा तो कुत्राही घाबरला; पण त्याही स्थितीत त्याने आपले राखणदाराचे कर्तव्य बजावले. हल्लेखोरांच्या दिशेने पाहात तो भुंकला; पण दुसऱ्याच क्षणाला बंदुकीच्या सुसाट गोळ्यांनी जखमी होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. कसाबसा, खुरडत खुरडत तो पार्सल रूमजवळील कोपऱ्यात येऊन निपचित पडला.. आजूबाजूला सुरू असलेला भीषण रक्तपात आणि बंदुकीच्या गोळ्या, बॉम्बस्फोटांच्या आवाजाने त्याच्या हृदयात धडकी भरली होती.. अर्धवट बेशुद्धावस्थेत तो अखेरचे क्षण मोजत होता. रक्तपात थांबल्यानंतर स्टेशनवर पसरलेल्या स्मशानकळेतच, एका वृत्तछायाचित्रकाराने या जखमी कुत्र्याला पाहिले आणि एक तरी जीव वाचवावा या जाणिवेतून तातडीने त्याला परळच्या पेटिट पशुवैद्यकीय इस्पितळात दाखल केले.
..तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शरीरात शिरलेल्या दोन गोळ्यांपैकी एक बाहेर काढण्यात आली, पण दुसऱ्या गोळीने मात्र त्याच्या श्वसनमार्गातच घर केले होते. डॉक्टरांनी जोखीम घेतली नाही. तो हळूहळू बरा झाला. सहा महिन्यांच्या उपचारानंतर परळच्या पेटिट इस्पितळात त्याच्यासाठी छोटेखानी पिंजरा तयार करण्यात आला आणि '२६-११ च्या हल्ल्यातील जखमी कुत्रा' असा एक फलकही त्या पिंजऱ्यावर लटकावला गेला. २६ नोव्हेंबरच्या त्या हल्ल्याचा तो एक जिवंत, पण मूक साक्षीदार बनून राहिला. त्याच्या डोळ्यांत नंतरही बहुधा त्या हल्ल्याच्या भयखुणा उमटत होत्या. मानसिक आघातातून पुढे तो सावरला, कर्मचाऱ्यांच्या प्रेमामुळे तेथे रुळला. एका पारशी महिलेने तर त्याला अखेरच्या श्वासापर्यंत अपार प्रेम दिले. दाखल झाल्यानंतर तेथेच त्याचे नामकरण झाले- 'शेरू'!..
मुंबईवरील त्या हल्ल्यातून शेरू सुदैवाने बचावला; पण त्या क्रूर दहशतवाद्यांनी त्या दिवशी प्राण्यांनाही दया दाखविली नव्हती. ताजमहाल हॉटेलवरील हल्ल्यात त्यांनी तेथे असलेल्या लॅबड्रॉर जातीच्या दोन कुत्र्यांना गोळ्या घालून ठार मारले होते. नरिमन हाऊसजवळ थैमान असहय़ झाल्याने मोती नावाची एक रस्त्यावरची कुत्री पुढे कित्येक दिवस भयाच्या छायेतून बाहेरच पडली नव्हती. भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने तिच्यावर उपचार केले आणि ती सावरली. पोलिसांची गाडी ताब्यात घेऊन नरिमन पॉइंटच्या रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या अतिरेक्यांचा हैदोस असहय़ होऊन याच परिसरातील काळू नावाचा एक कुत्रा गाडीचा पाठलाग करीत गाडीसोबत पळताना भुंकू लागला. अतिरेक्यांच्या बंदुकीतून सुटलेल्या एका गोळीने त्याचा वेध घेतला आणि पळता पळता एक क्षीण किंकाळी मारून काळूने प्राण सोडला..
बॉम्बस्फोटाच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने घाबरून त्या दिवशी शेकडो कबुतरे मरून पडली होती..
शेरू हा त्या साऱ्या घटनेचा साक्षीदार बनून पुढे सहा वर्षे जगला. तो मूक होता. त्या दिवसाच्या आठवणी त्याच्या मनात कशा घर करून राहिल्या असतील, ते कुणालाच कळले नाही. परळच्या पेटिट रुग्णालयातील तो रिकामा पिंजरा अस्वस्थ आहे!

निद्रेबद्दलचे गैरसमज..

वर्षभराच्या लेखमालिकेतील हा शेवटचा लेख. निद्राविज्ञान हा विषयच मुळी नावीन्यपूर्ण आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे. त्यामुळे असे कितीही लेख लिहिले, तरी मला वाटते काहीतरी राहून जाईलच. वर्षभर लोकसत्ता-चतुरंगच्या वाचकांनी मात्र तुडुंब प्रतिसाद दिला. सर्वच वाचकांना इंटरनेट आणि ई-मेल उपलब्ध असतीलच असे नाही त्यामुळे सगळ्यांच्याच प्रतिक्रिया पोहोचल्या नसतील. पण, वाचकहो तुमच्या प्रश्नांमुळे, कुतूहलामुळे माझा एक फायदा असा झाला की एकंदरीतच लिखाणाचा कंटाळा (आणि गप्पांची तल्लफ) असलेल्या मला आळस झटकून लिहावे लागले आणि पुढेही लिहीत राहीन असो.. या सदरातून गेले वर्षभर ज्या विषयांची चर्चा आपण केली त्यांची उजळणी या लेखात करणे महत्त्वाचे वाटते.
'झोप' प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असली तरी ही देणगी 'फुकट' मिळाल्याने आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतो. जशी विकत घेतलेली गाडी 'मेन्टेन' करायला आपण प्रचंड उत्सुक असतो, पण 'शरीर' नावाच्या गाडीची देखभाल सर्वच जण करतातच असे नाही. 'उत्तम झोप' हा या देखभालीचाच एक महत्त्वाचा भाग आहे. का बरे आपण दुर्लक्ष करतो? याची कारणे निद्रेबद्दलच्या गैरसमजात आहेत.
गैरसमज
१) झोप म्हणजे 'काही न करणे', मेंदूची निष्क्रिय अवस्था आहे. गाढ झोपेत मेंदू अगदी शून्य झालेला असतो वगरे. यावर हे समजून घ्यायला हवं की झोप हीसुद्धा जागेपणाइतकीच सचेतन अवस्था आहे. तुमच्या मेंदूतील काही भागांना मेहनत करावीच लागते आणि तरच तुम्हाला झोप येऊ शकते आणि टिकते. किंबहुना ज्याला आपण 'साखरझोप' समजतो, त्या वेळेला मेंदू रेमझोपेत असतो. अशा वेळी जागेपणापेक्षा दीडपटीने जास्त जोरात मेंदूचे काम चालू असते. आपल्याला ते समजत नाही याचे कारण मी, माझे वगरे समजण्याचे काम हा मोठय़ा मेंदूचा केवळ एक भाग (प्रीफ्रंटल लोब) करत असतो. बाकी मेंदूचे भाग (जसे ऐकणे, पाहणे वगरे) हे त्यापेक्षा वेगळे असतात. जागेपणी हे भाग प्रीफ्रंटल लोबकडून सूचना घेत असतात. झोपेमध्ये हा संवाद कमी होतो अथवा पूर्णपणे थांबतो. या पहिल्या चुकीच्या समजुतीमुळे दुसऱ्या गैरसमजाचा आरंभ होतो.

गैरसमज २) मला झोपेची समस्या नाही. कारण मी दिवसा कधीही, कुठेही झोपू शकतो. यामुळे परिचित लोक काय 'सुखी माणूस' आहे असेही म्हणतात. या एका गैरसमजामुळे जागेपणीचे काही सुवर्णक्षण आपण गमावतो आणि सृजनशीलता कितीपटीने कमी होते. मागे सांगितल्याप्रमाणे निद्रेची केंद्रे अॅक्टिव्ह झाल्याखेरीज तुम्हाला झोपच येणार नाही. म्हणजे रात्री झोप झाल्यावरही जर दिवसा झोप येत असेल तर ही केंद्रे उगीचच ओव्हरटाइम करत आहेत. तुमच्या नकळत जर हे होत असेल तर जागेपणीच्या कुठल्याही कामामध्ये त्यांचा अडथळा येणारच. हळूहळू आज करे सो कल, कल करे सो परसो अशी टाळाटाळीची वृत्ती निर्माण होते. अगदी आणीबाणीची वेळ नसेल तर 'घरचे काम नंतर करतो' असा कंटाळा येतो.
गैरसमज ३) मी एकदा झोपलो की क्वचितच उठतो. माझी झोप अगदी सलग आहे. त्यामुळे मला निद्राविकार असणे शक्यच नाही. वास्तविक आपल्या कुणाचीच झोपही सातत्याची (कंटिन्युअस) नसते. दरतासाला कमीतकमी चार-पाच वेळेला जाग येतेच. आपल्याला या जाग येण्याची स्मृती नसते, कारण ही बाब लक्षात राहण्यासाठी कमीतकमी ती जाग साठ सेकंदांची तरी असली पाहिजे. तर तुमची जाग वीस, तीस सेकंदांची असेल तर तुमच्या हे लक्षात राहणार नाही. परिणामी रात्री शंभर वेळेला जाग आली तरी सकाळी उठल्यावर त्याचे स्मरण होणार नाही. एवढे झोपलो तरी फ्रेश का नाही वाटत? असा प्रश्न मात्र पडेल. याचे उत्तर झोपेतच आहे हे लक्षात घ्या! तंत्रज्ञानाशिवाय ही बाब उघडकीस आलीच नसती. निद्राविकारांबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्याला ते असतात त्याला त्याची जाणीव असेलच असे नाही. यामुळे ही वैद्यकीय गोष्ट असून, डॉक्टरचा सल्ला घ्यावा हे त्या व्यक्तीला कसे सुचणार? बरे डॉक्टरकडे गेल्यावर त्याला याची काही माहितीच नसेल तर तोदेखील काय सल्ला देणार? याच कारणामुळे निद्राविज्ञानाचा विकास हा इतर वैद्यकीय शास्त्रांपेक्षा (कार्डियोलॉजी, नेफ्रॉलॉजी वगरे) खूपच उशिरा झाला. आजही आपल्या वैद्यकीय शिक्षणात एक टक्क्यापेक्षा कमी वेळ याला दिला जातो. (आपण आयुष्याच्या एकतृतीयांश भाग झोपेत घालवतो.)
गैरसमज ४) एक-दीड तासाची झोप कमी झाली तरी काय फरक पडतो? किंबहुना कमी झोप घेणारा माणूस हा कामसू आणि सात तास झोप घेणारा आळशी असतो, असे मानले जाते.
पण ते चुकीचे आहे, झोपेमध्ये दिवसभर शिकलेल्या गोष्टी आणि झालेले शारीरिक तसेच भावनिक आघात यांवर दुरुस्तीचे काम चालू असते. मुंबई लोकल्स ट्रेनमध्ये मेगा ब्लॉक हे गरसोयीचे वाटले तरी दुरुस्ती झाली नाही तर प्राणघातक अपघात होतातच हे सत्य सर्वाना माहीत आहे. कमी झोप म्हणजे दुरुस्तीला कमी वेळ. आत्तापर्यंतच्या संशोधनात कमी झोपेने जाडी वाढते, वजन कमी करण्याच्या प्रयत्नात अडथळे येतात. पोटाचा घेर वाढतो हे संशयातीत सिद्ध झाले आहे. आपल्या देशात याचे महत्त्व विशेष आहे कारण जितका पोटाचा घेर वाढला तितके डायबिटिसचे प्रमाण जास्त! आहार, व्यायाम याच्याइतकेच पुरेशा झोपेचे महत्त्व ओळखूनच 'अमेरिकन डायबिटिस असोसिएशन'ने कमी झोप, स्लीप अॅप्निया आदी निद्रेसंदर्भातील त्रुटी एक स्वतंत्र धोकादायक गोष्टी मानल्या आहेत. रोज एक तास कमी झोप घेतल्याने तुमच्या गुणसूत्रांवरदेखील परिणाम होतो. यावर आमच्या संस्थेमधून एक आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे जगामध्ये सर्वात पहिल्यांदा प्रत्यक्षरीत्या (डायरेक्ट इंटरव्हेंशन करून) कमी झोपेचे आपल्या गुणसूत्रांवर होणारे परिणाम यावरचे संशोधन आमच्या संस्थेने केले आहे. आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेले याबाबतचे संशोधन हे अप्रत्यक्ष रीतीने केलेले समूहाचे निरीक्षण आहे. ज्यांना या संशोधनाबद्दल उत्सुकता आहे त्यांनी ६६६.२'ीस्र्२्रूील्लूी२.्रल्ल या वेबसाइटला भेट द्यावी.
गैरसमज ५) घोरणे हे गाढ झोपेचे लक्षण आहे. याबद्दल सविस्तर माहिती मागील लेखांमध्ये आली आहेच. हे सगळे लेख इंटरनेटवर उपलब्ध आहेत. घोरणाऱ्या व्यक्तीला बऱ्याच वेळेला आपल्या घोरण्याबद्दल फारशी माहिती नसते हे विशेष! अगदी नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात घोरणे आणि स्लीप अॅप्नियामुळे आपण वृद्धत्वाकडे किती लवकर झुकतो हे प्रसिद्ध झाले आहे. घोरणे आणि विशेष करून त्याबरोबर असलेला स्लीप अॅप्निया यामुळे वजनवाढ, मधुमेह, रक्तदाब, ब्लडप्रेशर, हृदयविकार आणि पक्षाघात, प्रसंगी अकाली मृत्यू इतके भयंकर विकार होऊ शकतात. आशादायी बाब म्हणजे ह्य़ांच्यावरती शंभर टक्के यशस्वी उपाय आहेत.
गैरसमज ६) माझे वय झाले आहे, त्यामुळे माझी झोपेची निकड आणि वेळ कमी झाली आहे. या एका गैरसमजामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आपल्या दिवसाचे नुकसान करून घेतात. वास्तविकता आपल्या झोपेची गरज अजिबात कमी होत नाही. एकगठ्ठा रात्रीची झोप येण्याची क्षमता मात्र कमी होते. म्हणजे रात्री सात ते आठ तास झोप येण्याऐवजी चार ते पाच तास झोप लागते. पण मग दिवसभरात अनेक वेळेला पेंग येते. या बाबींकडे नीट लक्ष देऊन, व्यवस्थित नियमन केले नाही तर मात्र अनेक समस्या उद्भवतात. एक तर रात्री दोन, तीन वाजताच जाग येते. इतर लोक गाढ झोपेत असल्याने काही खुडबुड करता येत नाही, मग अंथरुणावरच पडून राहावे लागते आणि निद्रेची आराधना करावी लागते. इथेच पहिली चूक होते! त्यानंतर दिवसा पेपर वाचताना, टीव्ही बघताना झोप येते, थकवा जाणवतो. त्यामुळे चीडचीड, व्यायाम न होणे अशा नकारात्मक गोष्टी घडतात. यशस्वीरीत्या पॉलिफेजिक झाल्यास तुमच्या निद्रासमस्या सुटतात. तंत्रज्ञानाच्या मदतीने हे करता येणे शक्य आहे.
गैरसमज ७)- तुम्हाला निद्रानाश (इनसॉम्निया) आहे म्हणजे तुम्ही उगाच फार विचार करता अथवा चिंतातुर जंतू आहात - पन्नास ते साठ टक्के लोकांमधला निद्रानाश (इनसॉम्निया) हा कुठल्याही मानसिक विकारांमुळे झालेला नसतो. उलट निद्रानाशामुळे अनेकजणांना चिंता (अँग्झायटी) असते. त्यामुळे ट्रेक्विलायझर गोळ्या घेणे हा दूरदर्शी उपाय ठरू शकत नाही.
हे सदर इथेच थांबतंय, परंतु तुमचे झोपेचे प्रश्न सुटून शांत झोप लागो, हीच प्रार्थना.(समाप्त)