Translate

सोमवार, १ ऑगस्ट, २०१६

दुरितांचे तिमिर जावो.....

जातिव्यवस्थेची आग जी हजारो वर्षं जळतेच आहे, ती अजूनही आपला सर्वांचा बळी घेतेय. कधी मुलगी दलित, बलात्कारी मराठा. किंवा कधी मुलगी मराठा, मुलं दलित. किंवा कधी सर्व जातीपातींची कोणतीही उलटसुलट रचना. पण सोसते आहे, ती स्त्री. ज्या दिवशी मनातून जातपात संपेल आणि स्त्री-पुरुष समता स्थापित होईल, त्या दिवशी संस्कृतीच जाळून टाकणारी ही आग विझून त्या जागी दुरितांचे तिमिर जाळून टाकणारी होळी पेटेल.
सतरा वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची बातमी पसरली अन् भडका उडाला. गावभर. मग तालुकाभर. आणि मग राज्यभर.
चार मुलांनी ट्रकमध्ये घालून पळवून नेलं. मुलगी शाळेतून घरी परतताना. चल तुला घरी सोडतो म्हणून. मुलगी ओळखीची. मुलंही ओळखीची. शाळेत जा-ये करण्याची रोजची वाटही ओळखीची. म्हणून मुलगी ट्रकमध्ये बसली. पण ट्रकमध्ये त्या दिवशीची नेहमीची गाववाली 4 पोरं नव्हती, 4 सैतान, 4 राक्षस होते. जे पुरुषी अहंकारी मनांमध्ये कुठेतरी सतत खदखदत असतातच. जरा संधी सापडली की ते राक्षस थैमान करतात.
तसं घडलं. या पोरांनी ट्रक आडवाटेला नेला. पोरीवर आलटून पालटून दिवसभर पुन्हा पुन्हा बलात्कार केला. संध्याकाळी आणून घरी सोडलं. तोंड उघडशील तर मुडदा पाडू असं सांगून.
पोरगी सर्वस्वी विझलीच. विस्कटली, चोळामोळा झाली. नजर शून्यातून वर उठेना. घराबाहेर जायला घाबरायला लागली. आई-वडील विचारून विचारून दमले. 3 दिवसांनी मुलीचा लोंढा फुटला. धाय मोकलून रडत तिनं आईवडिलांना सगळा प्रकार सांगितला.
प्रकरणाला वाचा फुटली. उद्ध्वस्त झालेले आई-वडील तरी काय करणार. त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. बलात्कार करणारी पोरं परागंदा झाली. चौकशी चालू आहे, तपास चालू आहे... करत करत पुढे काही घडतच नव्हतं. त्यातनं सगळं पेटत गेलं. आधी गाव. मग तालुका. बघता बघता वणवा राज्यभर पसरला.
मुलगी दलित. बलात्कार करणारी पोरं मराठा.
इथे मुळात जातिव्यवस्थेचा वणवा हजारो वर्षं पेटलेला आहेच. त्यात बलात्काराचं भीषण तेल. सर्व राज्यात भडका उडालाच.
त्यातून तालुक्याच्या राजकारणात पक्ष एकच. पण एक पाटील गट, एक देशमुख गट. दोघांमधून विस्तव जायचा नाही. तूर्तास आमदार पाटील गटाचा. तर गाव देशमुखाचं होतं. प्रकार करणारी पोरं सुद्धा देशमुखाचीच होती. पाटीलदेशमुख वैर सर्व पातळ्यांवर व्यक्त होत होतं. गावागावातलं प्राथमिक विविध कार्यकारी सोसायट्या, कृषि उत्पन्न बाजार समिती, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक... आता बलात्कार. पाटील गटाच्या हातात आयतंच कोलीत सापडलं. आमदारानं विधानसभा दणाणून सोडली.
सरकारी पातळीवरनं हुकूम सुटले. दलित पँथरची पोरं पार मुंबईहून तालुक्यात, गावात आली. पाठोपाठ गुप्त वार्ता विभागाकडून माहिती येत राहिली की गावात, तालुक्यात ट्रक भरभरून माणसं, तलवारी, चॉपर्स येतायत. सरकारी यंत्रणेनं राज्य राखीव पोलीस दल बोलावलं. गावात, तालुक्यात तैनात केलं. गावाचं लष्करी छावणीत रूपांतर झालं.
होळीचे दिवस होते. गावात, तालुक्यात पँथरचे पेटलेले सैनिकही जमा झालेले होते आणि प्रतिकारासाठी सशस्त्र विरुद्ध गटसुद्धा. जातीय तणावांनी उभ्या चिरफाळ्या उडालेल्या. गाव गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर.
तेव्हा उच्च पातळीला सरकारी बैठक झाली. सारा प्रकार माझ्या अधिकार क्षेत्रात घडत होता. बैठकीत चर्चा झाली, आता लष्कर बोलावण्याची. मी सौम्यपणे, नम्रपणे सांगितलं की हा प्रकार कायदा-सुव्यवस्थेचा नाही, आपणही तो कायदासुव्यवस्थेचा विषय म्हणून हाताळू नये. हा प्रकार जातींचाही नाही. राजकारणाचा तर त्याहूनही नाही. एका स्त्रीवर बलात्कार झाला, तो आपण कणखरपणे आणि संवेदनशीलतेनं हाताळूया. असं सगळं काही भाषण दिलं नाही. पण चर्चेतल्या माझ्या मुद्द्यांचा हा सारांश होता. काही वरिष्ठांना हा अ‍ॅप्रोच पसंत पडताना दिसत नव्हता. मुद्दा छान आहे पण त्याची ही वेळ नाही, आता प्रथम कायदा-सुव्यवस्था सांभाळायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. ते बरोबरच होतं. मला आपलं वाटत होतं की हा ‘सामाजिक न्याया’चा विषय आहे, या अंगानं हाताळला तर कायदा-सुव्यवस्था सुद्धा सुरळितपणे ताळ्यावर येईल, केवळ पोलिसी खाक्यानं हे होणार नाही.
शेवटी चर्चेअंती ठरलं की तुझं कार्यक्षेत्र - अधिकार क्षेत्र आहे, तुझ्या जबाबदारीवर काय ते कर. जिल्हा पोलीस अधीक्षक होते दत्ता पडसलगीकर - स्वातंत्र्य सैनिकाच्या घराण्याचा वारसा लाभलेले, शांत, संयमी, संवेदनशील. त्यांच्याशी बोलून एक दिशा ठरवली.
बैठकीतून सरकारनं - म्हणजे समाजानं - दिलेल्या गाडीतून थेट त्या मुलीच्या घरात. अठरा विश्व दारिद्र्य हे शब्दसुद्धा फिके पडतील अशा भयानक गरीबीतलं एक छोटं खोपटं. त्यात सुद्धा शेणानं लिंपून दोन भाग केलेले. त्या भिंतीपलिकडे ही 17 वर्षांची पार चोळामोळा झालेली पोर मुटकुळं होऊन पडून होती. गावाची दलित वस्ती अजूनही गावाबाहेर एका बाजूला होती.
तिच्याजवळ बसलो. तिच्याशी, तितक्याच भेदरलेल्या तिच्या आई-वडिलांशी बोलत राहिलो. कायदा तुझ्या बाजूनं आहे, आम्ही सुद्धा तुझ्या बाजूनं आहोत, तू नावं सांगितलीस तर निश्चितपणे कठोर कारवाई करूच... असं सगळं सांगितलं. तेही एकदम भाषण नाही. हळू हळू. तिच्याशी, आईवडिलांशी बोलत. मुलीनं नावं सांगितली.
एवढं होईपर्यंत गावभर पसरलेलंच होतं की अधिकारी स्वत: आलाय. त्या मुलीशी बोलून झाल्यावर मी वस्तीतल्या बुद्ध विहारात जाऊन बसलो. बुद्ध विहार म्हणजे काय, चार लोखंडी खांबांवर टाकलेलं गंजलेल्या पत्र्याचं छत. शोषण आणि दारिद्र्यामधून सुबक वास्तू उभी करण्याची साधनसंपत्ती कुठून येणार? त्या बुद्ध विहारात मांडी घालून बसलो, गावातल्या जाणत्या ज्येष्ठांना तिथे बोलावलं. सरकारी अधिकाऱ्यानं बोलावलं की जातपात सगळं बाजूला ठेवून जाणती माणसं येतात. त्यासाठी आधी त्या सरकारी अधिकाऱ्याच्या मनातून, जीवनातून, जातपात बाजूला झालेली असायला हवी.
बुद्ध विहारात गावातल्या वडीलधाऱ्या मंडळींची बैठक घेतली. गुन्हेगार पोरं पोलिसांच्या ताब्यात सापडली पाहिजेत असं सांगितलं. पोरांना देशमुख मंडळींनीच लपवून ठेवलेलं होतं. त्यांना काळजी होती की आपल्या पोरांवर पोलीस ‘थर्ड डिग्री’ वापरतील. मी त्यांना शब्द दिला की कायदा यंत्रणेशी तुम्ही, त्या पोरांनी सहकार्य करा, तर यत्किंचितही ‘थर्ड डिग्री’चा वापर होणार नाही याची मी हमी घेतो. दलित आणि मराठा - दोन्ही बाजूंची वडीलधारी मंडळी पूर्वी मुंबईत गिरणी कामगार होते, युनियनमध्ये काम केलेलं होतं. बोलणी सामंजस्यानं झाली. देशमुख मंडळींनी गुन्हेगार पोरं पोलिसांच्या हवाली केली, कोर्टानं आवश्यक ती पोलीस कस्टडी मान्य केली. गावातून SRPF चा तळ उठवून थोडा लांब नेऊन ठेवला.
गावातली भडकलेली मनं जराशी जागेवर यायला लागली. लष्करी छावणी झालेलं गाव जरा माणसात यायला लागलं.
* * *
होळी दोन दिवसांवर होती.
गावात, तालुक्यात अजून मुंबईहून आलेले ‘पँथर्स’ होते. होळीच्या दिवशी गावात रामदास आठवले यायचे होते.
मी पँथरच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याला कार्यालयात बोलावून घेतलं. त्यांच्या संपूर्ण चेहऱ्यावर एक चेहराभर उतरत गेलेल्या तलवारीच्या घावाची रेष होती, पूर्वी केव्हा तरी मुंबईत झालेल्या कुठल्यातरी दंगलीतली निशाणी. उरलेला बाकीचा चेहरा हसरा. निश्चयी, की कुठलाच अन्याय आता आम्ही गप्प बसून ऐकून घेणार नाही. त्याला मी उचललेल्या पावलांची माहिती देऊन सांगितलं की एकदम आठवलेंना गावात जाण्यापूर्वी आधी मला भेटायचं आहे.
मग परत गावात गेलो. बुद्ध विहारातच गावाची परत बैठक घेतली, एकत्र. आत्तापर्यंत गावात होळीनिमित्त 2 वेगवेगळ्या मिरवणुका निघून 2 वेगवेगळ्या होळ्या पेटायच्या. एक गावभर, सवर्ण समाजाची. ती होळी गावातल्या मध्यवर्ती, वडाच्या पारासमोर पेटायची. त्याच वेळी दुसरी मिरवणूक दलित वस्तीत, होळी पेटायची बुद्ध विहाराशेजारी. मी गावाला सुचवलं, या वर्षी आणि खरंतर यापुढे कायमच, संपूर्ण गावाची एक मिरवणूक निघावी आणि गावाची मिळून एक होळी पेटावी. गावानं कल्पना मान्य केली.
होळीच्या दिवशी पँथरला गावात रामदास आठवलेंची सभा घ्यायची होती, तिला मी मान्यता दिली आणि कायद्यातले अधिकार आणि कलमं वापरून सांगितलं की सभा कोणत्याही परिस्थितीत सायंकाळी 6 वाजता संपली पाहिजे, न संपल्यास 6 वाजता सभा आहे त्या स्थितीत बंद केली जाईल, कारण गावाची होळीची मिरवणूक 6 वाजता सुरू होणार आहे.
सभेला जाण्यापूर्वी रामदास आठवले भेटावेत असं मी पँथरच्या पदाधिकाऱ्याला सांगितलं होतं. मला वायरलेसवर रामदास आठवलेंच्या वाटचालीचा अहवाल तासातासाला येतच होता. तालुका मुख्यालयातल्या लॉजवर ते पोचल्याचंही समजलं. पण ते भेटायला येण्याची काही लक्षणं दिसेनात. तेव्हा पँथरच्या पदाधिकाऱ्याला मी सांगितलं की मी येतो लॉजवर भेटायला. सभेला जाण्यापूर्वी, सरकारी यंत्रणेनं उचललेल्या पावलांबाबत त्यांना ‘ब्रीफिंग’ देणं आवश्यक आहे. लॉजवर पोचलो तर तिथून रामदास आठवले आधीच बाहेर पडलेले होते.
मग मात्र मी गाडी सुसाटवली ते थेट गावात, पँथरच्या सभा स्थानावर, व्यासपीठापासून लांब, पण समक्ष ‘मॅजिस्ट्रेट’ उपस्थित हवा, म्हणून छातीशी हात बांधून उभा राहिलो. सहा वाजता सभा न संपल्यास ती बंद करायला आवश्यक तो पोलीस बंदोबस्त होता. रामदास आठवले 5.55 ला सभास्थानावर पोचले. माईकच्या मागे असलेल्या वक्त्याकडून माईक काढून घेऊन, माझ्याकडे बोट दाखवून म्हणाले -
सरकारी यंत्रणेनं योग्य पावलं उचलली आहेत, याविषयी मला सांगण्यात आलं आहे, आमच्यावर अन्याय होणार नाही याची मला खात्री आहे. आपणही शब्द दिलाय की सभा 6 वाजता संपवूच.’
असं सांगून, आठवले म्हणाले,
‘आम्ही दलित पँथर चळवळ सुरू केली तेव्हा दलितांनी दलितांसाठी चालवलेली दलितांची चळवळ अशी आमची भूमिका होती. पण काळाबरोबर आम्ही सुद्धा वाढलो आहोत. आता समताधिष्ठित भारतीय राष्ट्रविचार मानणाऱ्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची आमची भूमिका आहे.’
ठीक 6 वाजता रामदास आठवलेंनी भाषण आणि सभा संपवली.
गावाची एकच मिरवणूक, ठीक 6 वाजता बुद्ध विहारावरून सुरू झाली.
आणि गावाची एकच होळी गावातल्या मध्यवर्ती वडाच्या पारापाशी पेटली,
दलित दांपत्याच्या हस्ते.
होळीमध्ये दुरितांचे तिमिर जळाले असावेत, त्या वर्षी तरी.
* * *
पुढे कायद्यानुसार सर्व चौकशी, तपास, जबाब, साक्षी-पुरावे गोळा करण्यात काही काळ गेला. आता तपास पूर्ण करून केस कोर्टात दाखल करणार, तेवढ्यात मुलीचे वडील मला भेटायला आले.
म्हणाले, मुलीचं लग्न ठरलंय. सासरकडच्यांनी समजावून घेतलंय. पण कोर्टकचेर्‍या, जबान्या चालू राहिल्या तर दोन्ही घरांची बेअब्रू होत राहणार. काही करता येईल का?
ही एक भयंकर मुस्कटबादी आहे. बलात्कार होतो मुलीवरच. बेअब्रू सुद्धा होते मुलीचीच. धैर्यानं सामोरं जात गुन्हेगारांना कायदेशीर मार्गानं अद्दल घडवायची म्हटली तरी शर्मनाक जबाब, उलटतपासणीला मुलीलाच सामोरं जावं लागतं. बलात्काऱ्यांची फारतर 7 वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका होते. मुलीसाठी सोसावी लागते आयुष्यभरासाठी ‘घोर नाकेबंदी’ - (नामदेव ढसाळांचे शब्द)
माझ्यासमोर धर्मसंकट.
मुलीचं आयुष्य मार्गी लागतंय.
पण बलात्काऱ्यांना जरब बसणारं शासन होणंही आवश्यक आहे.
पण म्हणून केसचे कायदेशीर सोपस्कार चालू ठेवावेत तर दोन्ही व्याही मंडळींची समाजात बेअब्रू होत राहणार, हेही खरंच.
काय करावं... चार्जशीट तयार होतं, पण खटला अजून ‘सेशन कमिट’ झालेला नव्हता. आम्ही न्यायालयासमोर सर्व कागदपत्रांसहित वस्तुस्थिती मांडली. न्यायालयानं गुन्हेगार पोरांचा आजीवन जातमुचलका (बाँड) लिहून घेतला, पोलीस ठाण्यावर हजेरी नेमून दिली.
मुलीचं लग्न लागलं. बहुधा एक आयुष्य मार्गी लागलं.
* * *
त्याला आज पाव शतकापेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. पण जातिव्यवस्थेची आग जी हजारो वर्षं जळतेच आहे, ती अजूनही आपला सर्वांचा बळी घेतेय. कधी मुलगी दलित, बलात्कारी मराठा. किंवा कधी मुलगी मराठा, मुलं दलित. किंवा कधी सर्व जातीपातींची कोणतीही उलटसुलट रचना. पण सोसते आहे, ती स्त्री. ज्या दिवशी मनातून जातपात संपेल आणि स्त्री-पुरुष समता स्थापित होईल, त्या दिवशी संस्कृतीच जाळून टाकणारी ही आग विझून त्या जागी दुरितांचे तिमिर जाळून टाकणारी होळी पेटेल.
-- अविनाश धर्माधिकारी