8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्रच पालटले. देशातील सर्वच शहरी भागात पैसे काढण्यासाठी बँक आणि एटीएम सेंटरबाहेर लांबच लाब रांगा लागल्या. नोटाबंदीचा निर्णय मोठा असला, तरी या आधीही अशाच पद्धतीने विविध रुपयांच्या चलनी नोटा आणि नाणी रोजच्या व्यवहारातून बाद करण्यात आले आहेत. यामध्ये 1 आण्यापासून 25 पैशांपर्यंची अनेक नाणी आता इतिहास जमा झाली आहेत.
देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 पर्यंत ब्रिटीशकालीन नाणी दैनंदिन व्यापारात वापरली जात. यातील 1 रुपयाचे नाणे 1950 मध्ये तत्कालिन भारत सरकारने चलनातून रद्द केले.
1 रुपया, 16 आणे किंवा 64 पैसे मिळून 1 आणा बनत असते. 1957 मध्ये डेसिमल सिस्टीम अंतर्गत ही नाणी बंदी झाली. पण तरीही काही काळापर्यंत डेसिमल आणि नॉन डेसिमल नाणी दोन्हीही व्यवहारात वापरात होती.
काही काळासाठी भारतात चलनातील आणा हे मूल्य वापरात होतं. यामध्ये 1 आणा, 2 आणे, 1/2 आण्याची नाणी चलनात होती. या चलनी मूल्याला प्री-डेसिमल कॉईनस सीरीजही म्हणले जात होते.
भारतीय रुपयांमधील सर्वात कमी मूल्य असलेले 1/2 पैशांचे नाणे 1947 मध्ये चलनातून रद्द करण्यात आले.
यानंतर 1 पैसा, 2 पैसा, 3 पैसा, 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 25 पैसे, 50 पैशांची नाणी प्रदीर्घ काळापासून चलनात होती.
1957-1972 पर्यंत 1 पैशांची नाणी टाकसाळीत तयार करुन चलनात वापरली जात होती. ही नाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 30 जून 2011 मध्ये चलनातून बाद केली असली तरी दैनंदिन व्यवहारातून खूपच आधी चलनातून नाहीशी झाली होती.
याचप्रमाणे 1/2 आणा म्हणजेच 2 पैसे: 1957-1979 मधील ही नाणी देखील 30 जून 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने अधिकृत मोडीत काढली. पण दैनंदिन वापरातून खूपच आधी हद्दपार झाली होती.
1964-1972 मधील तयार केलेली 3 पैशांची नाणीही 30 जून 2011 मध्ये अधिकृतपणे चलनातून पूर्णपणे हद्दपार झाली.
1957-1994 मधील 5 पैशांची नाणीही 30 जून 2011 मध्ये चलनातून अधिकृत बाद करण्यात आली.
1957-1998 मधील 10 पैशांची नाणीही 30 जून 2011 नंतर चलनातून अधिकृत नोटीफिकेशनने हद्दपार करण्यात आली.
1968-1994 मधील 20 पैशांची नाणीही 30 जून 2011 मध्ये चलनातून अधिकृत बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
1957-2002 पर्यंत चार आणे म्हणजेच 25 पैसे चलनात होते. पण युपीए सरकारने 25 पैशांची नाणी चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. याचे नोटीफिकेशन 30 जून 2011 रोजी काढण्यात आले.
1960 पासून आजपर्यंत 50 पैशांची नाणी टाकसाळीत तयार केली जातात. ही नाणी अधिकृत रितीने चलनातून बाद केली गेली नसली,तरी याचा दौनंदिन व्यवहारातील वापर कमी झाला आहे. सध्या क्वचितच व्यक्ती 50 पैशांची नाणी स्वीकारण्यास तयार होतात.
1962 साली चलनात आलेले 1 रुपयांच्या नाण्यांचे आज विविध प्रकार पाहायला मिळते.
याशिवाय 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपयांच्या नाण्याचा आज सर्रास वापर होतो. यातील 2 रुपयांचे नाणे 1982 मध्ये, तर 5 रुपयांचे नाणे 1992 मध्ये चलनात आले. यानंतर 2006 मध्ये 10 रुपयांची नाणी सरकारने चलनात आणली. यातील 10 रुपयांची नाणीही काही दिवासांपूर्वी चलनातून रद्द केल्याची आफवा सर्वत्र पसरली होती. (स्त्रोत- RBI)