मुंबई : सहमतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतर बलात्काराचा आरोप अयोग्य असल्याचं मत मुंबई सत्र न्यायालयानं नोंदवलं आहे. सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये गोरेगावमध्ये राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेनं एका इसमावर बलात्काराचा आरोप केला होता. शेजारीच राहणाऱ्या इसमाने आपल्याला लग्नाचं आमिष दाखवून आपल्याशी सात वर्ष शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप महिलेनं केला.
खरं तर गेल्या सात वर्षांपासून या दोघांमध्ये शारीरिक संबंध होते. याच प्रकरणावरून त्या महिलेचं आणि पतीचं भांडण झाल्यानंतर ते विभक्तही राहात होते. या महिलेला दोन मुले असून दोघेही सज्ञान आहेत.
पण गेल्या 7 वर्षांपासून शरीरसंबंध ठेवणारी ही महिला सज्ञान असून योग्य आणि अयोग्य यातला फरक तिला कळण्याइतपत ती सज्ञान असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. शरीर संबंध ठेवताना जर आक्षेप नव्हता, तर आता आक्षेप का? असा सवालही कोर्टानं विचारला. त्यामुळे संबंधित आरोपीला न्यायालयानं दोषमुक्त केलं.
त्यामुळं केवळ त्रास देण्याच्या हेतूनं दाखल होणारे बलात्काराच्या गुन्ह्यांना चपराक लावणार हा निर्णय ठरला आहे. अत्याचाराच्या घटनांमध्ये दोषींना शिक्षा झालीच पाहिजे. पण, केवळ बदला म्हणून कोणाला शिक्षा देण्याच्या प्रयत्नात असलेल्यांसाठी दणका आणि पीडित पुरुषांना या निर्णयानं दिलासा मिळाला आहे.