विनोदवीर कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ आणि त्याआधीच्या ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या दोन कार्यक्रमांना मिळालेली लोकप्रियता पाहता अनेकांनाच या कार्यक्रमांच्या यशाचा हेवा वाटत असणार यात शंकाच नाही. कपिलच्या कार्यक्रमांना मिळणाऱ्या या यशामध्ये त्याच्या संपूर्ण टीमचाही मोलाचा वाटा आहे. त्याच्या याच टीममधील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे सुनिल ग्रोवर आहे. कॉमेडी नाइट्समध्ये त्याने साकारलेली गुत्थी आणि आता तो साकारत असलेली भाभी या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर एक प्रकारची छाप सोडली आहे. आपल्या अनोख्या अंदाजाने सर्वांना खळखळून हसवणाऱ्या सुनिल ग्रोवरचा आज वाढदिवस आहे. रंगमंचावर सुनिलचा वावर, त्याचा पेहराव, बोलण्या-चालण्याचा विनोदी अंदाज आणि एकंदर त्या पात्रावर, भूमिकेवर असणारी त्याची पकड पाहता सुनिल ग्रोवरच्या अभिनयाला प्रेक्षकांनी नेहमीच दाद दिली आहे. सुनिल ग्रोवरच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा..
सुनिल ग्रोवर हे नाव सध्या जरी सर्वज्ञात असले तरीही बराच काळ टेलिव्हिजन आणि चित्रपट विश्वात काम करुनही त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. यश संपादन करण्यासाठी आणि स्वत:ची ओळख प्रस्थापित करण्यासाठी त्याला फार मेहनत करावी लागली होती. सुनिल मूळचा हरियाणातील सिरसा या भागाती असून चंडीगढ येथून त्याने नाट्यशास्त्रातील पदव्यु्तर शिक्षण घेतले आहे. सुनिल ग्रोवरला त्याच्या सुरुवातीच्या दिवसांत जसपाल भट्टी यांच्यामुळे ओळख निर्माण करुन दिली होती. विनोदवीर म्हणून सध्या असंख्य प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या सुनिलच्या सुरुवातीच्या काळातील एकमेव प्रेक्षक म्हणजे त्याची पत्नी, आरती.
टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणाऱ्या सुनिलने आरजेचीही भूमिका बजावली होती. रेडिओ मिर्चीवरील ‘हँसी के फँवारे’ या प्रसिद्ध रेडिओ शो ला इतर कोणाचा नाही तर, सुनिल ग्रोवरचाच आवाज होता. या शोद्वारे तो सुदर्शन म्हणजेच आरजे ‘सुद’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यासोबतच त्याने काही चित्रपटांमध्ये छोटेखानी भूमिकाही साकारल्या होत्या. ‘प्यार तो होना ही था’, ‘द लेजेंड ऑफ भगत सिंग’, ‘जिला गाजियाबाद’, ‘गब्बर इज बॅक’, ‘बाघी’ या चित्रपटांमध्ये सुनिलने काही भूमिका साकारल्या आहेत. इतकेच नव्हे तर आमिर खानच्या ‘गजनी’ या चित्रपटातही त्याने आमिरचीच नक्कल करत अनेकांचे लक्ष वेधले होते. हिंदी चित्रपटांसोबतच २०१६ मध्ये त्याने ‘बैसाखी लिस्ट’ या चित्रपटाद्वारे पंजाबी चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले.
सुनिल ग्रोवरला खऱ्या अर्थाने घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळाले ते म्हणजे त्याने साकारलेल्या ‘गुत्थी’च्या भूमिकेमुळे. ‘आप आएं है हमारे दरपे..’, असे म्हणत कलाकारांचे स्वागत करणाऱ्या ‘गुत्थी’ या पात्राची प्रेरणा सुनिलला त्याच्या महाविद्यालयीन दिवसांपासून मिळाली होती. रंगमंचावर स्त्री पात्राला इतक्या सहजतेनं निभावणं ही खरंच एक कौतुकास्पद बाब आहे. कपिल शर्माच्या कार्यक्रमातील यशात सुनिल ग्रोवरचाही मोलाचा वाटा आहे हे नाकारता येणार नाही.