Translate

शनिवार, १८ एप्रिल, २०१५

स्त्री शिक्षणाचे प्रणेते महर्षी धोंडो केशव कर्वे यांची आज (18 April 2015) १५८वी जयंती

महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपलं १०४ वर्षांचं जीवन वाहिलेल्या धोंडो केशव उर्फ अण्णासाहेब उर्फ महर्षी कर्वे यांची आज (18 April 2015) १५८ वी जयंती आहे. त्यांचा जन्म जन्म १८ एप्रिल, इ.स. १८५८ साली रत्नागिरी जिह्याच्या खेड तालुक्यातील शेरावली या गावी एका निम्न मध्यमवर्गीय घरात झाला. ते स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणारे मराठी समाजसुधारक होते. इ.स. १९०७ साली त्यांनीमहाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. त्यांनी एसएनडीटी या महिला महाविद्यालयाचीही स्थापन केली होती. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून १९५८ साली वयाच्या १००व्या वर्षी त्यांना भारतरत्न या सर्वोच्च किताबाने गौरविण्यात आले होते.

बालपण आणि तारूण्य
रत्नागिरी जिल्ह्यातील मुरूड हे अण्णांचे गाव. शिक्षणासाठी त्यांना खूप पायपीट करावी लागली.इ.स. १८८१ मधे मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मुंबईच्या एल्फिन्सटन कॉलेजातून त्यांनी गणिताची पदवी संपादन केली.वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला. राधाबाई त्या वेळी ८ वर्षांच्या होत्या. वयाच्या २७व्या वर्षी, इ.स. १८९१ साली बाळंतपणात राधाबाईंचा मृत्यू झाला.त्याच वर्षी अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजात गणित शिकवायला सुरुवात केली. पुढे इ.स. १९१४पर्यंत त्यांनी ही नोकरी केली. अण्णा गणिती होते. लोकमान्य टिळक हे फर्ग्युसन महाविद्यालयात गणिताचे अध्यापन करीत होते. पण राजकारणाच्या रणधुमाळीत ते उतरल्यानंतर त्यांच्या रिकाम्या जागी गणित विभागाचे प्रमुख असणारे गोपाळ कृष्ण गोखले यांनी अण्णांना बोलावून घेतले. इ.स. १८९१ ते इ.स. १९१४ या प्रदीर्घ कालखंडात अण्णांनी गणित हा विषय शिकवला.

पुनर्विवाह
वयाच्या १४ वर्षीच अण्णांचे लग्न झाले होते. इ.स. १८९१ मध्ये त्यांच्या सहचारिणी राधाबाई कालवश झाल्या. त्या वेळी अण्णांचे वय पंचेचाळीसच्या आसपास होते. प्रौढ वयात विधुर झालेल्या पुरुषानेहीअल्पवयीन कुमारिकेशीच लग्न करण्याची त्या काळात प्रथा होती. लहान वयात मुलींची लग्न होत, पण दुर्दैवाने पती लवकर मरण पावला तर त्या मुलीला मात्र त्याची विधवा म्हणून उर्वरित आयुष्य घालवावे लागे. ही समाज रीत नाकारणाऱ्या अण्णांनी पंडिता रमाबाईंच्या शारदा सदन संस्थेत शिकणाऱ्या गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. ही गोष्ट काळाला मानवणारी नव्हती. अण्णा पत्नीसह मुरूडला गेल्यानंतर अण्णांवर सामाजिक बहिष्कार टाकण्याचा ठराव संमत झाला. याच गोदूबाई पुढे आनंदी कर्वे किंवा बाया कर्वे म्हणून ख्यातनाम झाल्या. अण्णासाहेबांच्या कार्यात बाया कर्वे यांचा सक्रिय वाटा होता.
अण्णांचा पुनर्विवाह ही व्यक्तिगत बाब नव्हती. घातक सामाजिक प्रथांविरुद्ध केलेले ते बंड होते. पुनर्विवाहासाठी लोकमताचे जागरण करावे, या हेतूने २१ मे, इ.स. १८९४ या दिवशी अण्णांनी पुनर्विवाहितांचा एक कुटुंबमेळा घेतला. याच सुमारास अण्णांनी 'विधवा विवाह प्रतिबंध निवारक' मंडळाची स्थापना केली. विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालणे हे या मंडळाचे काम होते. बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यासारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनिकेत स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ.स. १८९६ मध्ये अण्णांनी सहा विधवा महिलांसह 'अनाथ बालिकाश्रम' काढला. 'विधवा विवाहोत्तेजक' मंडळाची स्थापना केली. रावबहादूर गणेश गोविंद गोखले यांनी अण्णांचे हे उदात्त कार्य पाहून हिंगणे येथील आपली सहा एकरांची जागा आणि रु. ७५० संस्थेच्या उभारणीसाठी अण्णांकडे सुपूर्द केले. या उजाड माळरानावर अण्णांनी एक झोपडी बांधली. ही पहिलीवहिली झोपडी ही हिंगणे स्त्रीशिक्षण संस्थेची गंगोत्री. आज अनेक वास्तूंनी गजबजून गेलेल्या या वैभवसमृद्ध परिसरात अण्णांची झोपडी त्यांच्या तपाचे महाभारत जगाला सांगत उभी आहे.

'लग्न'

'लग्न' हा आयुष्यात येणारा मोठा बदल! जोडीदाराबरोबर नवं आयुष्य सुरू करणं मनाला जितकं सुखावणारं असतं तितकाच 'लग्न' हा शब्द अनेकांचं आणि अनेकींचं मन चिंतेनं भरुन टाकतो. प्रत्येकाचं असणारं स्वतंत्र अस्तित्व लग्नानंतरही तसंच अबाधित राहील का, हा त्यातला पहिला प्रश्न..
प्रश्न - मी सध्या उच्चशिक्षण घेत आहे. माझ्या एका मित्राला मी आवडते असं त्यानं नुकतंच मला सांगितलं. त्यानं त्याच्या मनातली गोष्ट सांगितल्यावर मी त्याचा जोडीदार म्हणून विचार करून पाहिला. जोडीदाराबद्दलच्या माझ्या अपेक्षांमध्येही तो बसतो. खरा प्रश्न पुढेच आहे! लग्नानंतर त्या जोडीदाराबरोबर, त्याच्या घरच्यांबरोबर माझं आयुष्य कायमसाठी जोडलं जाणार, आयुष्य पूर्वीसारखे राहणारच नाही या कल्पनेनंच मला कसंतरी वाटू लागलं. लग्न झाल्यावर माणसं बदलून जातात, मला बदलायचं नाहीये. लग्नाबरोबर येणाऱ्या 'कमिटमेंट्स' पाळता पाळता माझं 'मी' म्हणून असलेले अस्तित्वच नाहीसं होईल की काय याची भीती वाटते.
उत्तर- लग्नाबरोबर काय-काय बदल होणार याची तुम्हाला जाणीव होऊ लागलीय. भारतात तरी आपली ओळख ही कुटुंबाशी घट्ट जोडलेली असते, हे सत्य आहे; त्यामुळं असं कुणाशी, त्याच्या कुटुंबाशी कायमचं जोडलं जायला नको वाटत असेल, तर अजुन आपला लग्नाबद्दलचा विचार परिपक्व झालाय असं दिसत नाही. कदाचित तुम्ही या तुमच्या मित्राशी लग्न करु शकलात, तर पुढे ही गोष्ट उलगडत जाईलही. तो आणि त्याचं कुटुंब तुमच्याशी किती जुळवून घेतात, किती तयारी दाखवतात, यावरही ते अवलंबून असेल. पण मुख्य प्रश्न असा आहे की या बदलाला आपण तयार आहोत का, असलो तरी ते आपल्याला उमगतंय का? आणि जर ते सहज, हळू-हळू घडत जाणार असेल, तर त्या भावना अन् प्रसंग अनुभवताना दरवेळी आपली बुद्धी आपल्याला वाईट 'स्पीड ब्रेकर'वरून नेणार का? त्यामुळं आपला आनंदाचा प्रत्येक क्षण हा 'कोई लौटा दे मेरे बीते हुए दिन'ची धून ऐकवणाऱ्या अस्मितेचा डंख होऊन तुम्हाला दु:ख देणार का? आणि तुम्ही तुमच्या जवळच्या मैत्रिणीला 'लग्न?, अजिबात करू नकोस!' किंवा 'आधी गोड-गोड बोलणारा मित्र नवरा म्हणून कसा भयंकर प्राणी असतो, अन् त्याच्या घरच्यांना कसं वेळेवरच दूर ठेवलंच पाहिजे,' असे सल्ले देणार का?
तुमच्या मनासारखा सल्ला मी देत नाहीये ना? धक्काच बसला असेल कदाचित तुमच्या वैचारिक अन् बौद्धिक भूमिकेला. पण फक्त लेखी, तेही एकाच भेटीत सांगायचं, तर मलाही थोडीशी रिस्क घ्यायलाच हवी.
लग्नाविषयीच्या तुमच्या भावनांवर जसं तुमचं आयुष्य अवलंबून आहे, तसं तुमच्या होणाऱ्या नवऱ्याचंही आहे, त्यांच्या कुटुंबाचंही आहे, अन् होणाऱ्या मुलाबाळांचं, त्यांच्या विकासाचंही आहे. म्हणजे बघा हं, एक हुशार, विचारी, पुरोगामी अन् स्वतंत्र मुलगी ही आपली आताची ओळख. त्यात आता इतक्या इतर सुप्त ओळख असतील, अशी कल्पना तुम्ही बहुतेक केली नसेल. तुम्ही समंजस, खुल्या विचारांच्या, बुद्धिमान, पुरोगामी, हक्कांविषयी जागरूक अशा पत्नी पण व्हाल. जशी पत्नी व्हाल, त्यातून पुढे कशी आई व्हाल, या भूमिका अन् ओळख याविषयीच्या शक्यता उलगडणार आहेत. चालू सेमिस्टरचे पेपर बरोबर सोडवले, तर पुढचे बरोबर सुटण्याची शक्यता जास्त, हे तर तुम्हाला अनुभवातून मान्य व्हायला हरकत नसावी. त्यामुळं थोडा जास्त विचार करु या, आणि तो दुसऱ्याशी ताडून बघू या.
तसं पण तुमच्या मित्रानं तुम्हाला फक्त तुम्ही आवडता इतकंच सांगितलंय. लग्नाबद्दल अजुन कुणीच बोललेलं नाही. तरी पण तुम्ही मनातल्या मनात तसा विचार करुन ठेवणं वाईट नाही किंबहुना आवश्यकच आहे. पण हातातलं सेमिस्टर सोडून याच्यामागे धावावं का, हा पण एक विचार केला पाहिजे. किंवा आपली फसरत होत नाहीये ना, ही पण शंका ठेवली पाहिजे. पण मला बदलायचंच नाहीये, असं म्हणणं म्हणजे, ''दात येणं ही फारच त्रासदायक गोष्ट आहे, बाई! त्यापेक्षा मी आयुष्यभर बाटलीनंच दूध पिईन की,'' असं म्हणण्यासारखं आहे. 
लग्नाबरोबर येणाऱ्या 'कमिटमेंटस्' पाळता पाळता आपली ओळख अजुन वेगवेगळ्या मितींमध्ये उलगडत जाईल, अस्तित्व नाहीसं वगैरे काही होणार नाही, हे पटतंय उमगतंय का बघा. सगळं कदाचित तुम्हाला पटणारही नाही अन् तशी गरजही नाही. पण तुमचा तुम्हाला योग्य निर्णय योग्य वेळी घेता आला की झालं!

उन्हाळा आणि लघवीचा त्रास

'उन्हाळ्यात मुतखडय़ाचा त्रास अनेकांना उद्भवतो. लघवीतले क्षारांचे घटक, खर निघून जाण्यासाठी पुरेशा पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे मूत्रनलिकेत खडा अडकून पोट दुखण्याचा त्रास होऊ शकतो. २५ ते ५० वयोगटातल्या पुरूषांमध्ये प्रॉस्टेट ग्रंथींना सूज येऊन लघवीला आग आणि जळजळ होण्याची तक्रार दिसते. स्त्रियांमध्ये लघवीला आग होण्याबरोबरच ठणका लागणे, कळ येणे, क्वचित लघवीतून रक्त जाणे अशी लक्षणेही दिसू शकतात. याला बोली भाषेत 'उन्हाळी लागणे' असे म्हणतात. त्याबरोबर मूत्रमार्गाचा संसर्गही होऊ शकतो. लहान मुलांनाही 'शू'च्या जागी आग होण्याचा त्रास होतो. 
'उन्हाळ्याच्या दिवसांत पचनशक्ती थोडीशी मंद झालेली असल्यामुळे भूक कमी होते. खाण्यात काही अबरचबर आले की पोट बिघडते. पोट बिघडले की लघवीच्या तक्रारीही वाढतात. आतडय़ात ई- कोलाय नावाचे जीवाणू असतात. पोट बिघडते तेव्हा हे जीवाणू उपद्रवी बनतात. या जीवाणूंनी उत्सर्जित केलेल्या विषारी द्रव्यांचा मूत्रसंस्थेवरही परिणाम होतो. मूत्रमार्गाला सूज आलेली असली तर त्या ठिकाणी जीवाणूंना वाढण्याची संधीच मिळते आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासाठीही ते कारणीभूत ठरतात. 
प्रतिबंधासाठी- 
* पुरेसे पाणी पिणे अर्थातच गरजेचे. काहींना घाम अधिक येतो तर काहींना कमी. पण सर्वसाधारणपणे चोवीस तासांत शरीरात तयार होणाऱ्या मूत्राचे प्रमाण कमीत कमी दोन ते अडीच लिटर असावे या हिशेबाने द्रवपदार्थ घ्यावेत. 
* माठातले वाळ्याचे पाणी प्यायले तरी चांगले. 
* शहाळ्याचे पाणी उत्तम
* नीरा देखील लघवी वाढवणारी असते परंतु ती शुद्ध असावी.
* कलिंगडाचा रस

डॉक्टरांकडे केव्हा जावे-
लघवीला होणारा त्रास अंगावर न काढता डॉक्टरांना दाखवलेले चांगले. उन्हाळी लागल्यावर काहींना लघवीतून रक्त जाण्यासारखे लक्षण दिसत असले तरी लघवीतून रक्त जाण्याची इतर कारणेही असू शकतात. त्रास नेमका कशामुळे होतो आहे याबद्दलची शंका दूर करण्यासाठी डॉक्टरांकडे जावे. मूत्रमार्गाचा संसर्ग असल्यास त्यावर वेळीच उपचार होऊ शकतील.

जगातील पहिला स्वयंचलित व्हिडीओ कॅमेरा

भारतीय वंशाचे संगणक वैज्ञानिक श्री के. नायर यांनी कोलंबिया विद्यापीठातील संशोधन संस्थेत स्वयंचलित व्हिडीओ कॅमेऱ्याचा शोध लावला आहे. हा कॅमेरा स्वयंचलित असून तो वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाह्य़ विजेची गरज लागत नाही. अंतर्गत व्यवस्थेमध्ये देण्यात आलेल्या प्रणालीमधूनच ऊर्जानिर्मिती होऊन कॅमेरा काम करतो. 
सध्या आपण डिजिटल छायाचित्रण क्रांतीच्या मध्य युगात आहोत. स्वयंसिद्ध कॅमेरा विकसित करण्याचे आमचे ध्येय होते. कॅमेऱ्यामधून छायाचित्र काढणे हे जसे स्वयंचलित प्रणालीद्वारे होऊ शकते तशीच कॅमेरा वापरण्यासाठीची ऊर्जाही अंतर्गत प्रणालीद्वारे निर्माण होणे गरजेचे होते, असे मत नायर यांनी व्यक्त केले. नायर हे कोलंबिया विद्यापीठाच्या संगणक विभागातील प्रयोगशाळेचे प्रमुख आहेत. या कॅमेऱ्यामध्ये इमेज सेंसर वापरण्यात आला आहे. तसेच पिक्सेल्सची चीपही वापरण्यात आली आहे. यातील पिक्सेल हे फोटोडिओडचे असल्यामुळे ज्या वेळेस उजेड पडतो तेव्हा त्यात विद्युतप्रवाह निर्माण होतो. यामध्ये जे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे त्यामध्ये कॅमेऱ्यामध्ये पडणाऱ्या उजेडाची घनता मोजण्याचीही क्षमता आहे. या प्रकल्पाचे ह्य़ुस्टन येथील राइस विद्यापीठात २४ ते २६ एप्रिलदरम्यान प्रथम सादरीकरण करण्यात येणार आहे.