Translate

बुधवार, ३० सप्टेंबर, २०१५

11 जुलैचा बॉम्बस्फोट, रक्ताचे पाट, प्रेतांचे ढीग आणि मी...

11 जुलै 2006 दुपारची शिफ्ट होती, सकाळी TV वर  'पेज 3' मूव्ही पाहत होते. त्यात ती पत्रकार मुलगी बॉम्बस्फोट बघून कशी घाबरते तो सीन पाहिला आणि मनात विचार आला, आपण स्वतः बॉम्बस्फोट झाला तर कसे रिअक्ट होऊ?. आपण अशी कोणती घटना आजपर्यंत रिपोर्टिंग केलेली नाही. हा विचार असाच रेंगाळला. ऑफिसला पोहोचले.

संध्याकाळी 6.30 नंतर ऑफिसमध्ये लँडलाईनवर रिपोर्टर्सना फोन आले. बॉम्बस्फोट झालाय. ऑफिसमधून पहिली  टीम बाहेर निघाली ती आमची.. तेव्हा स्फोट रेल्वेच्या कोणत्या डब्यात झाला. याबाबतची काहीही माहिती नव्हती. माटुंगा आणि माहिम ब्लास्ट इतकंच कळलेलं.

नरीमन पॉइंटवरुन माटुंग्याला पोहचायला 2 तास लागले. ट्रेन ब्लास्ट झाल्यामुळे सगळं ट्रॅफिक रस्त्यावर. काय करायचं समजेना. दादर नंतर बरंच अंतर चालत गेलो.. मध्येच बातमी आली एका फोटोग्राफर मित्राला माहिमला मारहाण झाली. त्यामुळे जे करायचं ते नीट हे स्वतःला बजावून माटुंगाला पोहचलो.

माटुंगा स्टेशन पूर्वेला गेलो. रेल्वेच्या भिंतीवरून उडी मारून ट्रॅकवर आत जाऊन व्हिज्युअल्स घ्यायचे असं ठरलं. कॅमरामन जाताच आसपास उभे असलेले लोक, महिला चिडल्या. आम्हांला खूप ऐकवलं. तरी कॅमरामेन चढला. त्याला कॅमरा दिला तो आत ट्रॅक वर गेला.  पण बाहेरच्या लोकांनी मला घेरलं. सगळ्यांना पुढे हात जोडले. म्हंटलं जे झालं ते दाखवणे आमचं काम आहे. समजून घ्या... ही मोठी बातमी आहे. तेव्हा जे सुचलं ते सांगितलं. थोडा वेळ वाद सुरु होता. मी त्यांना  माझा मोबाईल दिला, कुणाला घरी फोन करायचा तर करा. मेसेज करा. इथे लोकांना मदत करण्यासाठी आलो आहोत. शेवटी सगळे शांत झाले.

कॅमरामेन व्हिज्युअल्स घेऊन परत आला. लोकांच्या बाहेर प्रतिक्रिया घेतल्या. आमचे रनर अण्णा त्यांच्या हातात टेप दिली. महिमच्या दिशेने गेलो. माहिम स्टेशनला आत शिरल्यावर त्या पांढऱ्या फर्शीवर रक्त...काही समजेना. ट्रॅक वर गेलो. फाटलेला आख्खा डब्बा समोर. ट्रॅक वर काही मांस, रक्त, माहिम स्थानकातील जखमी, मृतदेह सगळं गेलेला. पण तरीही मागे खुणा ठसठशीत.

ट्रॅक वर चालताना पाऊस आला. जणू रक्त साफ करून गेला. त्या खुणा मिटवून गेला.. लोकांचे एक एक अनुभव. अंगावर काटे आणत होते. टॅक्सी थांबली नाही. समोरच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांनी चादरी आणल्या. शरीराचे तुकडे उचलून टाकले. काही टॅक्सी वाल्यांनी मार खाल्ला. सीट ख़राब होईल म्हणून जखमींना घ्यायला नाकारत होते.

माहिमला व्हिज्युअल्स, प्रतिक्रिया घेऊन अंधेरीच्या दिशेने निघालो. ऑफिसकडून मेसेज आला, सोनिया गांधी कूपर हॉस्पिटला भेट देऊ शकता तिथे जा.

रस्त्यात ज्यांना जमेल त्यांना लिफ्ट दिली. जगोजगी मुंबईकर उभे राहून बिस्किट, फळं आणि पाणी वाटत होते, जबरदस्ती हातात बिस्किटाचा पुडा कोंबत होते. त्यांनी दिलेलं आम्ही इतरांना वाटत होतो. कूपरला पोहोचलो. कूपर मध्ये सगळ्यात जास्त मृतदेह आले आहेत ते कळलं. जिथे जखमी आणि मृतदेह होते, तिथे पत्रकारांची तपासणी करून पाठवत होते. आतमध्ये गेले. आयुष्यात पहिल्यांदा इतके मृतदेह  पाहिले एकाच वेळी.  काळे...नीळे...केस जळलेले.... कुठे नुसते हात.. तिथून जखमींच्या वॉर्ड मध्ये गेले.  छर्रे डोक्यात गेलेले काही जण....काही बेशुद्ध...काही शुद्धित.... तेवढ्यात एक बाई जोरात किंचळली.. नर्स धावत तिच्याकडे गेली... इंजेक्शन दिलं...झोपवलं तिला.... नर्सने सांगितलं.... शॉक लागला आहे तिला...ती मध्येच उठून ओरडते. 

हे सगळं एकामागून एक घडत होतं. आजपर्यंत असं काहीच पाहिलं नव्हतं. हे सगळं आतमध्ये अजूनsync पण नव्हतं झालं. ह्या सगळ्यात आई नेमकी कुठे आहे ह्याचा पत्ता लागत नव्हता. आई पण त्याचवेळी घरी जायची. फोन लागत नव्हते. पप्पा घरी पोहचले होते इतकं माहित होतं.

आम्हांला जखमींची किंवा मृतांची जी नावं हॉस्पिटलमध्ये मिळतील ती ऑफिसला द्यायला सांगितली. कारण अनेकजण एका हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये वेड्या सारखे फिरत होते. आपला माणूस कुठे आहे..जिवंत आहे की मेला, जिवंत आहे तर काय अवस्था,  मेला तर मृतदेह कुठे?  हॉस्पिटलमध्ये इतका गोंधळ. नातेवाईकांची रडारड, कोणी अस्वस्थ मनाने कुणाला तरी शोधत होतं. आसपासची लोक पाणी, जेवनच सामान घेऊन आले होते. प्रत्येकाला आस्थेने विचारत होते. त्यात काही राजकारणी पण पांढरे शुभ्र कपडे घालून आले. काही चॅनेलवाल्यांना बाईट दिला. की मी कशी मदत करतोय. खाण्याचं सामान दिलं... त्यांचं बोलणं ऐकून लोक चिडले. आरडा ओरडा झाला...नेता गुपचुप निघून गेला.

ह्या सगळ्या गडबडीत एक काका भेटले.. ते त्यांच्या मुलाला शोधत होते. त्यांचे इतर कुटुंबातील सदस्य दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शोधत होते. त्यांनी मला पण विचारलं... ह्या नावच कुठे कोणी दिसलं, भेटलं का... ते अस्वस्थ होऊन फिरत होते. ते एकटेच फिरत होते. आम्ही बातम्या करत फिरत होतो. काही वेळाने ते काका एका कोपऱ्यात रडत असताना दिसले. ते इतकंच म्हणाले बॉडी यही है.

गेले चार-पाच तास ज्या मुलाला शोधत होते, त्याचा मृतदेह तिथेच होता. इतर कुटुंबियांना कळवलं होतं. पण आता बंध तुटला. एकटे रडत होते.. त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला.... पाणी दिल..... गप्प रडत होते.... थोड्या वेळाने काही कुटुंबातील सदस्य आले... आम्ही परत बातम्यांच्या मागे..

हॉस्पिटल मध्ये रक्तदान करा.. असा बोर्ड लावला होता... मी आणि कॅमरामेन दोघं रक्तदान करायला गेलो... तर तिथे कळलं की आसपासच्या इतक्या लोकांनी रक्तदान केलं की हॉस्पिटलने सांगितलं आता रक्ताची गरज नाही.... गरज पडल्यास संपर्क करू... नाव आणि फोन नंबर दया.... आम्ही नाव नोंदवलं.... अंधेरी ऑफिसला जाऊन फिड, बातम्या दिल्या.

मध्यरात्री कधी तरी आईशी बोलण झालं.. ती सुरक्षित होती.. बोरिवालीला आईच्या ट्रेनमध्ये ब्लास्ट झालेला... आई बोरीवली वरुन बस, रिक्षा, टेंपो... असा प्रवास करत विरारला पोहोचली होती..

रात्री 3.30 च्या सुमारास पुन्हा नरीमन पॉइंट ऑफिसच्या दिशेने निघालो....आता जाणवलं की आपण आज जेवलोच नाही आहोत... दादरच्या जवळ कोणत्या तरी हॉटेलच शेल्टर खाली खेचलेलं..पण पोलिस बाहेर खात उभे होते. तिथेच मी, कॅमेरामन आणि ड्राईवरने पाव भाजी खाल्ली..

नरीमन पॉइंट ऑफिसला आलो.. काही रिपोर्टर सकाळी पुन्हा लोकल ट्रेन सुरु झाल्या ती बातमी करायला गेले..मी घरी आले.. फ्रेश होऊन पुन्हा ऑफिसला गेले... या बॉम्बस्फोटात अनेक जखमीचे अनुभव  त्यांच्या बातम्या करायला..

ह्या बोम्बस्फोटच्या वेळी मराठी न्यूज चॅनेल्स 24 तास नव्हते.. ई टीव्ही मराठीला तर काही तासांनी बातमीपत्र होतं. संध्याकाळी 7 चे 'महाराष्ट्र माझा',  रात्री आपली मुंबई ही बातमीपत्रं सगळ्यात जास्त पाहिली जात होती. संध्याकाळी 6.25 ला ब्लास्ट झाले तरी एवढ्या कमी वेळात 7 वाजता बातमी गेली. बातमीपत्रांमध्ये खाली टिकरवर हॉस्पिटल आणि रुग्णांची नावं द्यायला सुरुवात केली. आम्ही सगळे रिपोर्टर्स ही नावं अपडेट करत होतो. बातमीपत्र नसतानाही माहिती देणारे टिकर सुरु होते.

पत्रकारितेत आल्यावर पाहिलेला , रिपोर्टिंग केलेला हा पहिला दहशतवादी हल्ला होता. तेव्हा मीडियाकडे स्मार्ट फोन नव्हते. शूट केलेला फिड पाठवण्याची साधनं कमी होती.. आणि  इलेक्ट्रॉनिक मीडिया रांगत असताना झालेला हा हल्ला होता.

बातम्या कशा करायच्या काय करायचं. हे सगळं आम्ही तेव्हा शिकलो. अशा घटनांच्या वेळी डोकं शांत ठेवून काय टाळायचं. नेमके काय करायचं. ही घडण झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशा वेळी पत्रकार असलो तरी माणूस म्हणून काही गोष्टी केल्या पाहिजे हा धडा ह्या रेल्वे बॉम्बस्फोटाने दिला.

-- रश्मी पुराणिक, एबीपी माझा, मुंबई