Translate

बुधवार, २२ मार्च, २०१७

भगत सिंह

अस्‍पृश्‍यता समस्‍या
.
.
काकीनाडा येथे १९२३ चे काँग्रेस अधिवेशन झाले. आजच्या अनुसूचित जाती, ज्यांना त्या काळी अस्पृश्य म्हटले जायचे, त्यांना हिंदू आणि मुसलमान संस्थांमध्ये विभागून देण्याची सूचना महंमद अली जीना यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केली. हा वर्गभेद पक्का करण्यासाठी हिंदू आणि मुसलमान श्रीमंत लोक पैसा द्यायला तयार होते.
या मुद्द्यावर सर्वत्र चर्चा होत असतानाच्या त्या काळातच भगतसिंह यांनी अस्पृश्यता समस्या नामक हा लेख लिहिला. या लेखात श्रमिक वर्गाची शक्ती आणि मर्यादा यांचा अंदाज घेऊन त्याच्या प्रगतीसाठी ठोस सूचना करण्यात आल्या आहेत. भगतसिंह यांचा हा लेख जून १९२८ च्या ‘किरती’च्या अंकात विद्रोही या नावाने प्रकाशित झाला होता.
आपल्‍या देशासारखी दुर्दशा इतर कोणत्‍याही देशाची झालेली नाही. इथे अनेक अजब प्रश्‍न निर्माण होत राहतात. यापैकी एक अत्‍यंत महत्त्‍वाचा प्रश्‍न म्‍हणजे अस्‍पृश्‍यता समस्‍या. समस्‍या ही आहे की, 30 कोटी लोकसंख्‍या असलेल्‍या देशात 6 कोटी लोकांना अस्‍पृश्‍य मानले जाते. त्‍यांच्‍या केवळ स्‍पर्शानेदेखील धर्म भ्रष्‍ट होतो. त्‍यांनी मंदिरात प्रवेश केल्‍यास देव-देवता नाराज होतात! त्‍यांनी विहिरीतून पाणी शेंदल्‍यास विहीर अपवित्र होते. हे प्रश्न विसाव्या शतकात उपस्थित होत आहेत, हे ऐकूनदेखील लाज वाटते.
आपला देश खूपच अध्‍यात्‍मवादी आहे, पण माणसाला माणसाचा दर्जा देतानासुद्धा आपण कां कू करतो. दुसरीकडे पूर्णत: भौतिकवादी मानला जाणारा युरोप अनेक शतकांपासून ‘इन्‍कलाब’चा आवाज बुलंद करत आला आहे. त्यांनी अमेरिका आणि फ्रेंच क्रांतीच्या वेळेसच समानतेची घोषणा केली होती. आज रशियानेदेखील सर्व प्रकारच्‍या भेदभावांना तिलांजली देऊन क्रांतीसाठी कंबर कसली आहे. आपण मात्र सतत आत्‍मा-परमात्‍म्‍याच्‍या अस्तित्‍वाची चिंता आणि जोरदार वादविवादात गुरफटून विचारतो आहेत, की अस्‍पृश्‍यांना जानवे दिले जाईल का? त्‍यांना वेदशास्‍त्रे वाचण्‍याचा अधिकार आहे की नाही? आपण अशी तक्रार करतो की, परदेशात आपल्‍याला चांगली वागणूक दिली जात नाही, इंग्रज सरकार आपल्‍याला इंग्रजांप्रमाणे समान वागणूक देत नाहीत; पण अशी तक्रार करण्‍याचा काही अधिकार आपल्‍याला आहे का?
मुंबई कौन्सिलचे सदस्‍य असलेले सिंधमधील एक मुस्‍लीम विद्वान श्री. नूर मोहंमद यांनी 1926 मध्‍ये या संदर्भात म्‍हटले होते – “If the Hindu society refuses to allow other human beings, fellow creatures so that to attend public schools, and if…the president of local board representing so many lakhs of people in this house refuses to allow his fellows and brothers the elementary human right of having water to drink, what right have they to ask for more rights from the bureaucracy? Before we accuse people coming from other lands, we should see how we ourselves behave toward our own people… How can we ask for greater political rights when we ourselves deny elementary rights of human beings.’’
ते म्‍हणतात की, “जेव्‍हा तुम्‍ही एखाद्या माणसाला पिण्‍यासाठी पाणी देण्‍यास नकार देता, जेव्‍हा तुम्‍ही त्‍याला शाळेत प्रवेश नकारता, तेव्‍हा तुम्‍हाला स्‍वत:साठी अधिक अधिकार मागण्‍याचा काय अधिकार आहे? जेव्‍हा तुम्‍ही दुसऱ्या माणसाला समान अधिकार द्यायलाही नकार देता, तेव्‍हा तुम्‍हाला जादा राजकीय अधिकार मागण्‍याचा हक्‍क कसा काय पोचतो?
मुद्दा अगदी योग्‍य आहे. परंतु ही गोष्‍ट एक मुसलमान म्‍हणतो म्‍हणून हिंदु म्‍हणतील की, तो त्‍या अस्‍पृश्‍यांना मुसलमान बनवून आपल्‍यात सामील करून घेऊ पाहतोय!
जर तुम्‍ही त्‍यांना असेच पशूहूनही हीन समजत राहाल, तर ते नक्‍कीच दुसऱ्या धर्मांमध्‍ये सामील होऊन जातील, जिथे त्‍यांना जास्‍त अधिकार मिळतील, जिथे त्‍यांच्‍याशी माणसासारखा व्‍यवहार केला जाईल. मग ख्रिश्‍चन आणि मुसलमान हे हिंदु समाजाची हानी करतात, असे म्‍हणणे निरर्थक ठरेल.
किती स्‍पष्‍ट म्‍हणणे आहे हे, पण ते ऐकून सगळ्यांचा तडफडाट होतो. हिंदूंनाही अगदी हीच काळजी वाटते. सनातनी पंडितसुद्धा या मुद्द्यावर काही ना काही विचार करू लागले आहेत. मोठे युगप्रवर्तक म्‍हणवले जाणारेही यात मधेमधे सामील झाले. पाटण्‍यात लाला लजपतराय यांच्‍या अध्‍यक्षतेखाली हिंदू महासभेचे संमेलन झाले. त्‍या वेळी या विषयावर गरमागरम चर्चा झाली. चांगलीच खडाजंगी झाली. लाला लजपतराय अस्‍पृश्‍यांची बाजू घेणारे जुने समर्थक आहेत. प्रश्‍न हा होता की, अस्‍पृश्‍यांना यज्ञोपवित (जानवे) घालण्‍याचा अधिकार आहे किंवा नाही; तसेच त्‍यांना वेदशास्‍त्रांचा अभ्‍यास करण्‍याचा अधिकार आहे का? मोठमोठे समाजसुधारक यावर रागाने लाल झाले; पण लालाजींनी या दोन गोष्‍टींवर सर्वांची सहमती घडवली व हे मान्‍य करून हिंदू धर्माची लाज राखली. नाही तर विचार करा, किती लाजिरवाणी गोष्‍ट झाली असती ती! कुत्रा आपल्‍या मांडीवर बसू शकतो. आपल्‍या स्‍वयंपाकघरात तो बिनदिक्‍कत फिरू शकतो; पण एका माणसाचा आपल्‍याला स्‍पर्श झाला, की लगेच धर्म भ्रष्‍ट होतो. आज मालवीयजींसारखे मोठे समाजसुधारक, जे स्‍वत:ला अस्‍पृश्‍यांचे कैवारी आणि न जाणो काय काय समजतात; ते आधी एका भंग्‍याच्‍या हस्‍ते गळ्यात हार घलून घेतात, पण नंतर मात्र कपड्यासहित स्‍नान केल्‍याशिवाय स्‍वत:ला अपवित्र समजतात. काय चलाखी आहे! मंदिर हे सर्वांवर प्रेम करणाऱ्या परमेश्‍वराची पूजा करण्‍यासाठी आहे, पण तिथे अस्‍पृश्‍य गेले तर ते अपवित्र होते! परमेश्‍वराचा कोप होतो! घरात जर ही दशा असेल, तर आपण बाहेर समानतेच्‍या नावाने संघर्ष करणे कितपत योग्‍य दिसते? आपली ही वागणूक म्‍हणजे देखील कृतघ्‍नपणाचा कळसच आहे. जे लोक अत्‍यंत कष्‍टाची कामे करून आपल्‍याला सुखसोयी पु‍रवितात, त्‍यांनाच आपण झिडकारतो. पशूंची आपण पूजा करू शकतो, पण माणसाला जवळही बसवू शकत नाही.
आज या प्रश्‍नावर खूप ओरड होते आहे. अशा प्रकारच्‍या विचारांवर आजकाल अधिक लक्ष दिले जात आहे. देशात ज्‍या रीतीने मुक्‍तीची भावना विकसित होत आहे, त्‍यात धर्मवादी राजकारणामुळे इतर कोणता फायदा होवो न होवो; पण एक फायदा असा झाला आहे की अधिक अधिकारांची मागणी करण्यासाठी प्रत्‍येकाला आपापल्‍या समाजाची संख्‍या वाढविण्‍याची चिंता पडली आहे. मुसलमानांनी यावर जरा अधिकच भर दिला आहे. यामुळे हिंदूंच्‍या अहंभावाला धक्‍का बसला आहे. यातूनच स्‍पर्धा वाढली. तंटेबखेडेदेखील झाले. हळूहळू शिखांमध्येसुद्धा दलितांची जानवी उतारण्यासाठी व केस कापण्याच्या प्रश्नावरून तंटे होऊ लागले. आता तिन्‍ही समाज अस्‍पृश्‍यांना आपापल्‍या गोटात ओढू लागले आहेत. त्‍याबद्दल बराच गदारोळ उडतो आहे. इकडे ख्रिस्‍ती मंडळी गुपचूप आपला प्रभाव वाढवत आहेत. चला, या सगळ्या घडामोडींमध्‍ये देशाच्‍या दुर्भाग्‍याचे हे लांच्‍छन मात्र कमी होऊ लागले आहे!
अस्‍पृश्‍यांनी जेव्‍हा हे पाहिले की, त्‍यांच्‍यामुळे यांच्‍यामध्‍ये भांडणे होत आहेत आणि प्रत्‍येक जण त्‍यांना स्‍वत:चा ‘खुराक’ समजत आहे, तेव्‍हा त्‍यांनी विचार केला की त्‍यापेक्षा आपण वेगळेच संघटित का होऊ नये? हा विचार पुढे येण्‍यामागे इंग्रज सरकारचा हात असो वा नसो, पण हे नक्‍की की या प्रचारात सरकारी यंत्रणेचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात हात होता. ‘आद्य धर्म मंडळ’ सारख्‍या संघटना या विचारांच्‍या प्रचाराचाच परिपाक आहेत.
आणखी एक प्रश्‍न असा उपस्थित होतो की, या समस्‍येवर योग्‍य उपाय काय आहे? याचे उत्‍तर अत्‍यंत महत्‍त्‍वाचे आहे. सर्वात अगोदर हे मान्‍य केले पाहिजे की, सर्व माणसे समान आहेत आणि कोणीही जन्‍माने किंवा श्रम-विभागणीमुळे वेगळा नाही. म्‍हणजेच एखादी व्‍यक्‍ती गरीब भंग्‍याच्‍या घरी जन्‍मली आहे म्‍हणून तिने आयुष्‍यभर मैलाच साफ करत राहायचे व विकास होईल असे समाजातील कोणतेही काम करण्‍याचा तिला अधिकार नाही, हे म्‍हणणे निरर्थक आहे. आपल्‍या पूर्वज आर्यांनी त्‍यांच्‍याशी अन्‍यायपूर्ण व्‍यवहार केला. त्‍यांना नीच मानून तिरस्‍कृत केले आणि हलकी कामे करण्‍यास भाग पाडले. याबरोबरच त्‍यांनी या विरोधात बंड करू नये या चिंतेने त्‍यांनी पुनर्जन्‍माच्‍या तत्‍त्वज्ञानाचा प्रचार केला; हे तर तुमच्‍या पूर्वजन्‍मीच्‍या पापाचे फळ आहे, आता काय होऊ शकते? गुपचूप आहेत तसे दिवस कंठा! या पद्धतीने त्‍यांना सहनशीलतेचा उपदेश करून प्रदीर्घकाळ शांत ठेवले. पण त्‍यांनी हे मोठे पाप केले. माणसाच्‍या मनातील मानवतेलाच नष्‍ट केले. आत्मविश्वास आणि स्वावलंबनाची भावनाच नष्ट करून टाकली. अनन्वित दमन आणि अन्‍याय केले. आज त्‍या सर्वांच्‍या प्रायश्चित्ताची वेळ आली आहे.
याबरोबरच दुसरा आणखी एक घोटाळा झाला. लोकांच्‍या मनात आवश्‍यक कामे करण्‍याविषयी घृणा उत्‍पन्‍न झाली. आपण कोष्‍ट्यांना तिरस्कृत केले. आज विणकरांना अस्‍पृश्‍य समजले जाते. यू.पी.कडे तर भोयांनाही अस्‍पृश्‍य मानले जाते. यामुळे मोठी गफलत झाली. त्‍यामुळे विकासाच्‍या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत.
या समाजघटकांना आपल्‍यासोबत ठेवले पाहिजे. आपण त्‍यांना अस्‍पृश्‍य म्‍हणू नये अथवा तसे समजू नये. त्‍यामुळे समस्‍या संपुष्‍टात येईल. याबाबत नौजवान भारत सभेने आणि काँग्रेसने अवलंबिलेली पद्धत प्रशंसनीय आहे. आजपर्यंत ज्‍यांना अस्‍पृश्‍य म्‍हटले गेले त्‍यांच्‍याकडे आपण आपल्‍या या पापांची क्षमा मागितली पाहिजे. आणि त्‍यांना आपल्‍यासारखेच माणूस मानले पाहिजे. त्‍यांच्‍यावर तीर्थ न शिंपडता, त्‍यांच्‍याकडून मंत्रपठण व कलमापठण करवून न घेता, त्‍यांची शुद्धी न करता, त्‍यांना आपल्‍यात सामील करून घेऊन; त्‍यांच्‍या हातून पाणी पिणे हीच योग्‍य पद्धत आहे. आपापसात ओढाओढी करणे आणि प्रत्‍यक्ष व्‍यवहारात त्‍यांना कोणतेही अधिकार न देणे, ही गोष्‍ट योग्‍य नाही.
गावां-गावांत जेव्‍हा मजुरांमध्‍ये प्रचारास सुरुवात झाली, त्‍या वेळी सरकारी लोक ‘हे भंगी – चांभारांना डोक्‍यावर चढवून तुमचे काम बंद पडणार’ असे सांगून शेतकऱ्यांना भडकावत होते. मग शेतकरीही तेवढ्यावर भडकून उठले. त्‍यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, जोवर गरिबांना खालचे व नीच समजून ते पायाखाली दाबून देवू इच्छितात, तोवर त्‍यांची स्थिती सुधारणार नाही. बऱ्याचदा असे म्‍हटले जाते की, ते स्‍वच्‍छ राहत नाहीत. याचे उत्‍तर स्‍पष्‍ट आहे – ते गरीब आहेत. गरिबीवर उपाय शोधा, उच्‍च कुळात जन्‍मलेले गरीब तरी काय कमी घाण राहतात. ते घाण काम करतात ही सबबही चालणार नाही, कारण आया मुलांची ‘शी’ स्‍वच्‍छ करतात म्‍हणून त्‍या थोड्याच भंगी किंवा अस्‍पृश्‍य होतात?
मात्र जोपर्यंत अस्‍पृश्‍य जाती स्‍वत:ला संघटित करणार नाहीत, तोपर्यंत हे काम होणार नाही. आमचे तर असे मत आहे की, त्‍यांनी स्‍वत:ला स्‍वतंत्रपणे संघटित करणे वा लोकसंख्‍येत मुसलमानांच्‍या बरोबरीचे प्रमाण असल्‍याने त्‍यांच्‍यासारखीच अधिकारांची मागणी करणे, हा आशादायी संकेत आहे. एक तर धार्मिक भेदभाव मुळातून नष्‍ट करा, नाहीतर त्‍यांना (अस्‍पृश्‍यांना) त्‍यांचे वेगळे अधिकार द्या. शाळा, कॉलेज, पाणवठे व रस्‍त्‍याचा उपयोग करण्‍याचे त्‍यांना पूर्ण स्‍वातंत्र्य देणे, हे नगरपरिषदा व असेंब्‍लीचे कर्तव्‍य आहे. हे केवळ तोंडी नव्‍हे, तर त्‍यांना सोबत घेऊन विहीरींवर जावे, त्‍यांच्‍या मुलांना शाळेत प्रवेश मिळवून द्यावा. पण ज्‍या असेंब्‍लीत बालविवाहाविरुद्ध सादर केलेल्‍या विधेयकाच्‍या आणि धर्माच्‍या नावावर हलकल्लोळ माजवला जातो, तिथे अस्‍पृश्‍यांना आपल्‍यात सामील करण्‍याचे धाडस कसे केले जाईल?
म्‍हणूनच आमचे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांचे आपले स्‍वत:चे लोकप्रतिनिधी असावेत. त्‍यांनी स्‍वत:साठी जादा अधिकार मागावेत. आमचे तर स्‍पष्‍टच म्‍हणणे आहे की, अस्‍पृश्‍य म्‍हटल्‍या जाणाऱ्या सर्व खऱ्या लोकसेवकांनो आणि बंधुंनो, जागे व्‍हा! उठा! आपल्‍या इतिहासाकडे पहा. गुरू गोविंदसिंहांच्‍या फौजेची खरी शक्‍ती तुम्‍हीच होता! छत्रपती शिवाजी महाराज तुमच्‍या जोरावरच सारे काही करू शकले. त्‍यामुळेच त्‍यांचे नाव आजही घेतले जाते. तुमची बलिदाने सुवर्णाक्षरांमध्‍ये लिहिलेली आहेत. तुम्‍ही सदैव सेवा देऊन व जनतेचे जीवन सुखी आणि सुरक्षित करून जे मोठे उपकार करता आहात, त्‍याची आम्‍हा लोकांना जाणीवदेखील नाही. भूमी हस्‍तांतरणासंबंधी कायद्यामुळे तुम्‍ही धन एकत्र करूनसुद्धा जमीन खरेदी करू शकत नाही. तुमच्‍यावर एवढा अन्‍याय केला जात असल्‍यामुळेच श्रीमती मेयो म्‍हणते, “जागे व्‍हा, आपली शक्‍ती ओळखा आणि संघटित व्‍हा! मुळात स्‍वत: प्रयत्‍न केल्‍याशिवाय काहीच मिळू शकणार नाही. (Those who would be free must themselves strike the blow) स्‍वातंत्र्य मिळवण्‍यासाठी स्‍वातंत्र्याची इच्‍छा असणाऱ्यांनी स्‍वत: प्रयत्‍न केले पाहिजेत.
हळूहळू माणसाची प्रवृत्‍ती अशी बनत चालली आहे, की त्‍याला स्‍वत:साठी जादा अधिकार तर हवे असतात, पण जे आपल्‍यापेक्षा खालच्‍या स्‍थानावर आहेत, त्‍यांना तो आपल्‍या टाचेखाली दाबून ठेवू इच्छितो. ‘नाठाळाच्‍या माथी हाणावी काठी’ असे म्‍हटले जाते. म्‍हणून तुम्‍ही संघटित व्‍हा आणि आपल्‍या पायावर उभे राहून संपूर्ण समाजाला आव्‍हान द्या. मग तुम्‍ही पाहाल की तुम्‍हांला अधिकार देण्‍याला नकार देण्‍याची भाषा करण्‍याची हिंमत कोणी करणार नाही. तुम्‍ही दुसऱ्याच्‍या तोफेचा दारूगोळा बनू नका. दुसऱ्या कोणाच्‍याही तोंडाकडे पाहू नका. पण लक्षात ठेवा, तुम्‍ही नोकरशाहीच्‍या जाळ्यात अडकले जाणार नाही याची खबरदारी घ्‍या. तुम्‍हांला मदत करणे तर दूरच, उलट ती तुम्‍हांला मोहरा बनवू पाहत आहे. तुमच्‍या गुलामीचे आणि गरिबीचे मूळ कारण ही भांडवलवादी नोकरशाहीच आहे. त्‍यामुळे तुम्‍ही कधीही तिच्‍याशी हातमिळवणी करू नका. तिच्‍या कपटी चालींपासून स्‍वत:ला दूर ठेवा, मगच सारे काही ठीक होईल. तुम्‍ही अस्‍सल सर्वहारा आहात… संघटित व्‍हा, तुमचे काही एक नुकसान होणार नाही. उलट गुलामीच्‍या बेड्या मात्र तुटून पडतील. उठा, प्रस्‍थापित व्‍यवस्‍थेच्‍या विरोधात बंड पुकारा. हळूहळू होणाऱ्या सुधारणांमुळे काही एक साध्‍य होणार नाही. सामाजिक आंदोलनातून क्रांती उभी करा आणि राजकीय व आर्थिक क्रांतीसाठी कंबर कसा. तुम्‍हीच तर देशाचे मुख्‍य आधार आहात. त्‍याची खरी ताकद आहात. निद्रिस्‍त सिंहांनो, उठा व बंड पुकारा!

मी नास्तिक का आहे?
भगत सिंह यांनी हा लेख तुरुंगात ५-६ आॅक्टोबर १९३० ला लिहिला होता. सर्वप्रथम लाहोरहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘द पिपुल’ या इंग्रजी पत्राच्या २७ सप्टेंबर १९३१ च्या अंकात प्रकाशित झाला होता. या महत्त्वपूर्ण लेखामध्ये भगत सिंह यांनी सृष्टीचा विकास आणि गतित्वाची भौतिकवादी जाणीव प्रस्तुत करताना त्याच्या मागे कोणत्याही मानवेतर ईश्वरीय सत्तेच्या अस्तित्त्वाच्या संकल्पनेला अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने निराधार सिद्ध केले आहे.
एक नवीनच प्रश्न उभा राहिला आहे : सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, आणि सर्वज्ञ अशा ईश्वराचे अस्तित्व मी केवळ माझ्या अहंमन्यतेमुळे नाकारतो आहे का? ह्या प्रश्नाला तोंड द्यावे लागेल असा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता. पण मी मित्रांशी बोलताना माझ्या असे लक्ष्यात आले की ह्या माझ्या मित्रांना- त्यांना मित्र म्हणून मी त्यांच्यावर अवाजवी अधिकार गाजवीत नाही आहे, असे मी मानतो – माझा जो काही थोडासा सहवास लाभला आहे त्यावरून त्यांनी जवळपास असा निष्कर्ष काढला आहे की देवावरचा अविश्वास हा माझा जरा ‘अति’पणाच आहे आणि माझ्यातील अहंमन्यतेने मला अशी अश्रद्धा बाळगण्यास प्रवृत्त केले आहे.
एकूणच ही समस्या तशी गंभीर आहे. मनुष्य स्वभावातल्या उणीवांपासू मी पूर्णपणे मुक्त आहे अशी बढाई मी मारत नाही. मी माणूस आहे. बस्स, याहून जास्त काही असण्याचा दावा कुणीही करू शकत नाही. स्वाभाविकपणे माझ्यातही ही उणीव आहे. खरोखर, अहंमन्यता हा माझ्या स्वभावाचा एक भाग आहे. माझे सहकारी मला निरंकुश म्हणायचे. माझे स्नेही बी.के.दत्त हेसुद्धा कधी कधी मला तसे म्हणत. अनेकदा हुकूमशहा म्हणूनही माझी संभावना करण्यात आली. काही मित्रांची अशी तक्रार आहे, आणि गंभीर तक्रार आहे की मी माझ्या नकळत माझी मते दुसऱ्यांवर लादतो व माझे निर्णय मान्य करवून घेतो. त्यात काही अंशी तथ्य आहे हे मी नाकारत नाही. याला अहंमन्यता म्हटले जाऊ शकते. इतर लोकप्रिय मतप्रवाहांच्या तुलनेत आमच्या विचारांत जेवढी अहंमन्यता आहे, तेवढीच माझ्यातही आहे. परंतु ती व्यक्तिगत स्वरूपाची नाही. कदाचित तो आपल्या श्रद्धेविषयीचा सार्थ अभिमान असेल व त्याला अहंमन्यता मानले जात नसेल. अहंमन्यता किंवा अगदी काटेकोरपणे सांगायचे झाले तर ‘अहंकार’ म्हणजे स्वतःबद्दलचा गैरवाजवी अभिमान असतो. या गैरवाजवी अभिमानामुळे मी नास्तिकतेकडे वळलो आहे का? की या विषयाचा काळजीपूर्वक अभ्यास व बरेचसे चिंतन केल्यानंतर मी देवावरच्या अश्रद्धेपर्यंत येऊन पोहोचलो आहे? या प्रश्नाची मी येथे चर्चा करू इच्छितो. सर्वप्रथम मला हे स्पष्ट करावेसे वाटते की अहंमन्यता आणि अहंकार या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे गैरवाजवी अभिमान किंवा फुकटचा गर्विष्ठपणा आस्तिक होण्यात कसा काय अडथळा निर्माण करू शकतात, हे मला खरोखरच उमजत नाही. लायकी नसूनही, किंवा मुलभूतरित्या आवश्यक असणारे गुण अंगी नसूनही, जर मला काही प्रमाणात एखाद्या खऱ्याखुऱ्या महान माणसासारखी प्रसिद्धी मिळालेली असेल तर त्या माणसाची थोरवी मी नाकारू शकतो. एवढे समजण्या सारखे आहे. परंतु देवावर विश्वास ठेवणारा एखादा मनुष्य व्यक्तिगत अहंमन्यतेमुळे देवावर श्रद्धा ठेवणे कसे काय थांबवू शकतो? हे दोनच प्रकारे होऊ शकते. तो मनुष्य स्वतःला ईश्वराचा प्रतिस्पर्धी मानू लागला तर, अथवा तो स्वतःलाच ईश्वर मानू लागला तर. पण दोन्ही प्रकरणी तो खराखुरा नास्तिक होऊ शकत नाही. पहिल्या प्रकारात तो प्रतिस्पर्ध्याचे अस्तित्व नाकारतही नसतो. दुसऱ्या प्रकारातही निसर्गातल्या घडामोडींचे नियंत्रण करणाऱ्या अदृश्य शक्तीचे अस्तिव तो मान्य करतोच. तो स्वतःलाच ही श्रेष्ठ शक्ती समजतो कि अशी शक्ती स्वतःपेक्षा वेगळी कुणी आहे असे मानतो, हे आपल्या दृष्टीने महत्वाचे नाही. मूळ मुद्दा तसाच राहतो. त्याची श्रद्धा तशीच टिकून आहे, तो कोणत्याही प्रकारे नास्तिक नाही.
माझे म्हणणे सध्या ऐकून घ्या. मी ना यापैकी पहिल्या प्रकारात मोडतो, ना दुसऱ्या. सर्वश्रेष्ठ ईश्वराचे अस्तित्वच मी मुळात नाकारतो. मी ते का नाकारतो हे नंतर बघू. येथे मला फक्त एवढेच स्पष्ट करायचे आहे की नास्तिकतेची शिकवण अंगीकारण्यास मला माझ्या अहंमन्यतेने उद्युक्त केलेले नाही. मी स्वतःच ती सर्वश्रेष्ठ शक्ती किंवा तिचा प्रतिस्पर्धी वा अवतार नाही. एक गोष्ट आता निश्चित आहे की अशा प्रकारच्या विचारसरणीकडे वळण्यास मला अहंमन्यतेने प्रवृत्त केलेले नाही. हा आरोप खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी वस्तुस्थिती पडताळून पाहण्याची मला परवानगी द्यावी. या माझ्या मित्रांच्या म्हणण्यानुसार दिल्ली बॉम्ब प्रकरण व लाहोर कट खटल्याच्या सुनावणीच्या वेळी मला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे कदाचित मी गर्विष्ठ झालो आहे. त्यांचे म्हणे बरोबर आहे का ते आपण पाहूया.
माझ्या नास्तिकतेचा उगम इतक्या अलीकडचा नाही. माझ्या या वरील मित्रांना ज्याच्या अस्तित्वाची जाणीवही नव्हती असा एक अप्रसिद्ध तरुण मी होतो तेव्हापासूनच मी देवावर विश्वास ठेवणे थांबविले होते. नास्तिकतेकडे वळवू शकेल असा कोणताही स्वतःबद्दलचा गैरवाजवी अभिमान निदान महाविद्यालयातल्या एका विद्यार्थ्यात निर्माण होण्याचे काहीच कारण असू शकत नाही. काही प्राध्यापकांचा मी आवडता आणि इतरांचा नावडता होतो, तरी मी कधीच अभ्यासू किंवा मेहनती मुलगा नव्हतो. गर्विष्ठपणासारखी भावना बाळगण्याची संधी मला कधीच मिळाली नाही. मी एक बुजरा मुलगा होतो व आपल्या भविष्याबाबत काही निराशावादी विचारांत हरवलेला असायचो आणि त्या काळात मी संपूर्णपणे नास्तिक नव्हतो. ज्यांच्या देखरेखीखाली मी वाढलो ते माझे आजोबा कर्मठ आर्यसमाजी होते. आर्यसमाजी हा बाकी काहीही असो पण तो नास्तिक नसतो. माझे प्राथमिक शिक्षण संपल्यानंतर मी लाहोरच्या डी. ए. व्ही. शाळेत दाखल झालो आणि एक वर्ष मी तिथल्या वसतीगृहात राहिलो. तिथे सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेव्यातिरिक्त मी तासनतास गायत्री मंत्र पठण करीत असे. त्या काळात मी पूर्णपणे श्रद्धाळू होतो. नंतर मी माझ्या वडिलांसोबत राहू लागलो. धार्मिक कर्मठतेचा विचार केल्यास ते उदारमतवादी आहेत. स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचण्याची आकांक्षा माझ्यात त्यांच्या शिकवणीमुळेच उत्पन्न झाली. पण ते नास्तिक नाहीत. रोज प्रार्थना म्हणण्यास ते मला प्रोत्साहन देत असत. अशा प्रकारे मी लहानाचा मोठा झालो. असहकाराच्या दिवसात मी नॅशनल कॉलेजात जाऊ लागलो. उदारमतवादी पद्धतीने विचार करणे, धार्मिक प्रश्नांबाबत तसेच देवाविषयी चर्चा करणे व त्यांच्यावर टीका करणे हे मी तेथेच सुरू केले. पण अजूनही ईश्वरावर माझी श्रद्धा होती. त्या वेळेपर्यंत मी केस न कापता ते लांब राखण्यास सुरुवात केली होती, परंतु शीख व इतर कोणत्याही धर्माच्या पुराणकथांवर व सिद्धांतांवर मी कधीच विश्वास ठेवू शकलो नाही. पण देवाच्या अस्तित्वावर माझा पक्का विश्वास होता.
पुढे मी क्रांतिकारी पक्षात सामील झालो. सर्वांत आधी मी ज्यांच्या संपर्कात आलो त्यांची ईश्वरावर श्रद्धा नव्हती, परंतु त्याचे अस्तित्त्व नाकारण्याचे धैर्य त्यांच्यापाशी नव्हते. माझ्या देवाविषयीच्या सततच्या चौकाशांवर ते म्हणत असत, ‘जेव्हा इच्छा होईल तेव्हा प्रार्थना करत जा.’  हे म्हणजे, नास्तिक व्हायला निघायचे, पण नास्तिक होण्यासाठी लागणारे धैर्य मात्र अंगी नाही, असाच प्रकार झाला. मी ज्यांच्या सहवासात आलो ते दुसरे नेते कट्टर आस्तिक होते. त्यांचा नामोल्लेख करायचा तर ते म्हणजे कराची कटासंबंधी आता जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले आदरणीय सहकारी सचिंद्रनाथ संन्याल. ‘बंदिजीवन’ या त्यांच्या सुप्रसिद्ध व एकमेव पुस्तकाच्या अगदी पहिल्या पानापासून देवाची थोरवी आवेशाने गायलेली आहे. त्या सुंदर पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या शेवटच्या पानावर वेदांतनिष्ठेशी सुसंगत अशा स्तुतीसुमनांचा देवावर केलेला वर्षाव हा त्यांच्या गूढवादी विचारांचा एक विचित्र भाग आहे. २८ जानेवारी १९२५ रोजी हिंदुस्तानभर वाटली गेलेली ‘क्रांतिकारी पुस्तिका’ हीसुद्धा त्यांच्याच लेखणीतून उतरलेली आहे असे सरकारी बाजूचे म्हणणे आहे. गुप्त संघटनेच्या कामात प्रमुख नेता स्वतःला व्यक्तिगत पातळीवर प्रिय असलेली मते मांडतो आणि मतभेद असूनही इतरांना ती मान्य करावी लागतात, ही एक सामान्य बाब आहे. त्या पुस्तिकेतील एक संपूर्ण परिच्छेद सर्वशक्तीमान देवाची थोरवी, आणि त्याच्या अगाध लीला यांवर आहे. तो सगळा गूढवाद आहे.
क्रांतिकारी पक्षातसुद्धा नास्तिकतेचा विचार रूजलेला नव्हता, हेच मला दाखवायचे होते. काकोरी कांडातील चारही विख्यात हुतात्म्यांनी आपला शेवटचा दिवस ईश्वराच्या प्रार्थनेत घालवला होता. राम प्रसाद बिस्मिल कर्मठ आर्यसमाजी होते. समाजवाद आणि साम्यवादाच्या क्षेत्रात खूप अभ्यास असूनही राजेंद्र लाहिडी उपनिषदे व गीतेतील स्तोत्रांचे पठन करण्याची आपली इच्छा आवरु शकले नाहीत. त्यांच्यात एकच मनुष्य मी असा पहिला जो कधीच प्रार्थना करीत नसे, आणि ‘तत्वज्ञान ही माणसातला दुबळेपणा व त्याच्या ज्ञानाची मर्यादा यांची निष्पत्ती आहे, असे तो म्हणत असे. हा माणूससुद्धा आज आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा भोगत आहे. परंतु तोसुद्धा देवाचे अस्तित्व नाकारण्याचे धैर्य कधी दाखवू शकला नाही.
तोपर्यंत मी फक्त एक स्वप्नाळू आदर्शवादी क्रांतिकारक होतो. त्या वेळेपर्यंत आम्ही फक्त अनुयायी होतो. पुढे सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर पेलण्याची वेळ आली. अटळपणे प्रतिक्रिया एवढी जबरदस्त होती की पक्षाचे अस्तित्त्वच काही काळ अशक्य वाटू लागले. उत्साही सहकारी – नव्हे, नेते – आमची हेटाळणी करू लागले. एखाद्या दिवशी मलासुद्धा आमचा कार्यक्रम व्यर्थ वाटू लागेल, असे मला वाटू लागले. हे माझ्या क्रांतिकारक जीवनातील एक वळण होते. माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात एकच हाक निनादू लागली – “अभ्यास कर. विरोधकांच्या तर्काला तोंड देण्यासाठी स्वतःला सुसज्ज बनवण्यासाठी अभ्यास कर.” “तुझ्या निष्ठेच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी भरभक्कम तर्क उभारण्यासाठी अभ्यास कर.”
मी अभ्यासाला सुरुवात केली. माझ्या पूर्वीच्या श्रद्धा आणि ठाम मते यात त्यानंतर ठळक बदल झाले. आमच्या अधीच्या लोकांमध्ये प्रभावी असलेला फक्त हिंसात्मक कृतीवर भर देणारा स्वप्नाळूपणा दूर झाला आणि त्याची जागा आता गंभीर विचारांनी घेतली. गूढवाद आणि अंधविश्वासाला आता वाव राहिला नाही. वास्तववाद ही आमची निष्ठा बनली. अत्यंत आवश्य़क असेल तेव्हाच बळाचा वापर करणे योग्य ठरेल व अहिंसा हे लोकचळवळीसाठी अपरिहार्य धोरण आहे, हे लक्षात आले. हे सर्व कार्यपद्धतीविषयी झाले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या आदर्शांसाठी आम्ही लढत होतो त्यांची आम्हाला स्पष्ट कल्पना आली. त्या काळात प्रत्यक्ष कृतीच्या क्षेत्रात फारसे काम नसल्यामुळे जगातल्या इतर क्रांत्यांमधल्या आदर्शांचा अभ्यास करायला भरपूर वेळ मिळाला. अराजकतावादी नेता बाकुनीन यांच्याबद्दल मी वाचले. साम्यवादाचा जनक मार्क्स यांच्याबद्दल काही वाचले; स्वतःच्या देशात यशस्वीपणे क्रांती घडवणारे लेनिन, ट्राटस्की व इतर यांच्याबद्दल बरेचसे वाचले. ते सर्व नास्तिक होते. सलग ग्रंथाच्या रुपात लिहिलेले नसले तरी बाकुनिनचे ‘ईश्वर आणि राज्य’ हे पुस्तक म्हणजे या विषयावरचा उद्बोधक अभ्यास आहे. त्यानंतर निर्लंबस्वामींचे ‘कॉमन सेन्स’ या नावाचे पुस्तक माझ्या वाचण्यात आले. ते पुस्तक फक्त गूढवादी नास्तिकतेच्या प्रकारात मोडणारे आहे. या विषयात मला सर्वांत जास्त आस्था वाटू लागली. १९२६ साली शेवटी विश्व निर्माण करणाऱ्या, चालवणाऱ्या व त्याचे नियंत्रण करणाऱ्या सर्वश्रेष्ठ ईश्वराच्या अस्तित्वाच्या सिद्धांताच्या फोलपणाविषयी माझी खात्री झाली. मी माझ्या अश्रद्धेविषयी इतरांना बोलूनही दाखविले. माझ्या मित्रांशी या विषयावर चर्चा करायला सुरुवात केली. मी खुलेआम नास्तिक झालो. पण त्या सर्वाचा नेमका अर्थ काय याची चर्चा पुढे केली जाईल.
मे १९२६ मध्ये मला लाहोर येथे अटक झाली. अटक अचानक झाली. पोलिस माझ्या मागे आहेत याची मला बिलकुल कल्पना नव्हती. एका बागेतून जाताना अचानकपणे पोलिसांनी मला घेरल्याचे माझ्या ध्यानात आहे. त्याप्रसंगी मी अत्यंत शांत होतो याचे मला स्वतःलाच आश्चर्य वाटते. कसलीही भीती किंवा चलबिचल मला जाणवली नाही. मला ताब्यात घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी मला रेल्वे पोलिस कोठडीत नेण्यात आले. तेथे मी एक महिना काढला.
बरेच दिवस पोलिस अधिकाऱ्यांशी झालेल्या बोलण्या-चालण्यावरून मी अंदाज लावला की काकोरी पक्षाशी आणि इतर क्रांतिकारक कार्याशी असलेल्या माझ्या संबंधांविषयी त्यांना काही माहीती मिळाली होती. त्यांनी मला सांगितले की (काकोरी) खटल्याची सुनावणी चालू असताना मी लखनौला गेलो होतो, त्यांच्या सुटकेसाठी सल्लामसलत करून मी एक योजना आखली होती, त्यांची संमती मिळाल्यावर आम्ही बॉम्ब हस्तगत केले आणि चाचणी घेण्यासाठी १९२६ साली दसऱ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीत त्यातला एक बॉम्ब फेकला. त्यांनी मला हेसुद्धा सांगितले की क्रांतिकारी पक्षाच्या हालचालींवर प्रकाश टाकणारे काही निवेदन देणे माझ्या फायद्याचे आहे, व तसे केल्यास मला तुरुंगात डांबले जाणार नाही. उलट, कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणून उभेदेखील न करता सोडून दिले जाईल. त्यांच्या या प्रस्तावावर मी हसलो. तो सगळा भंपकपणा होता. आमच्यासारखे विचार बाळगणारी माणसे आपल्याच निष्पाप जनतेवर बॉम्ब फेकत नसतात. एक दिवस सकाळीच त्या वेळचे गुप्तचर खात्याचे प्रमुख अधीक्षक न्यूमन माझ्याकडे आले. बराच वेळ सहानुभूतीपूर्वक बोलल्यानंतर त्यांनी – त्यांच्या  दृष्टीने अत्यंत दु:खद अशी –  एक बातमी मला सांगीतली की ‘मी जर त्यांनी मागितल्या प्रमाणे निवेदन दिले नाही तर काकोरी प्रकरणात शासनाविरुद्ध युद्ध पुकारण्याच्या कटाबद्दल आणि दसरा बॉम्बस्फोटातल्या निर्घृण हत्यांबद्दल माझ्यावर खटला भरणे त्यांना भाग पडेल.’ मला शिक्षा फर्मावण्यासाठी व  फाशी देण्यासाठी आवश्यक पुरावा त्यांच्यापाशी आहे,  असेही त्यांनी मला सांगितले.  जरी मी निरपराध होतो तरी पोलिस त्यांना हवे असल्यास तसे करू शकतात, असेच मी त्यावेळी मानीत होतो. त्याच दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे सकाळ संध्याकाळ दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो. फक्त शांततेच्या व आनंदाच्या काळातच मी नास्तिक असल्याची बढाई मारू शकतो, की अशा कठीण प्रसंगीदेखील मी माझ्या तत्त्वांना चिकटून राहू शकतो, याची माझ्यापुरती तरी मला कसोटी घ्यावयाची होती. बऱ्याच विचारांती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे मला जमायचे नाही. आणि मी प्रार्थना केली नाही. एकदासुद्धा नाही. ती खरी परीक्षा होती आणि मी परिक्षेत उत्तीर्ण झालो. अन्य काही गोष्टीच्या बदल्यात स्वत:चा जीव वाचवण्याची इच्छा मला एकदासुद्धा झाली नाही. अशा प्रकारे मी कट्टर नास्तिक होतो, आणि आजपर्यंत नास्तिकच राहिलो आहे. त्या कसोटीला उतरणे ही काही साधी गोष्ट नव्हती. आस्तिकता संकटांची तीव्रता कमी करते, किंबहुना या गोष्टी ती सुखावहसुद्धा करू शकते. देवावरच्या विश्वासात माणसाला सांत्वन व बळकट आधार मिळतो. देवाशिवाय माणसाला स्वत:वरच अवलंबून राहावे लागते. वादळ आणि तुफानांमध्ये फक्त स्वत:च्या पायावरच उभे राहणे हा काही पोरखेळ नव्हे. अशा कसोटीच्या क्षणी गर्व, जर असलाच तर, कापरासारखा उडून जातो व माणूस प्रस्थापित विचारांना झिडकारण्याची  हिम्मत दाखवू शकत नाही, आणि त्याने जर असे केलेच तर आपण असाच निष्कर्ष काढला पाहिजे की त्याच्याकडे केवळ पोकळ अहंमन्यतेहून जास्त अशी काही शक्ती असली पाहिजे.
आजही हीच स्थिती आहे. न्यायालयाचा निकाल काय असेल ते सर्वांनाच चांगले माहीत आहे. आठवड्याभरात तो जाहीर होईल. मी माझ्या ध्येयासाठी प्राणांचा त्याग करत आहे, याखेरीज दुसरे कोणते सांत्वन माझ्याकरता असू शकते? एखादा देवावर विश्वास ठेवणारा हिंदु आपण पुढच्या जन्मी राजा म्हणून जन्मेन अशी आशा करू शकतो.  एखादा मुस्लिम किंवा ख्रिस्ती स्वर्गात भोगायला मिळणाऱ्या ऐश्वर्याची आणि आपल्या हाल-अपेष्टांच्या व त्यागाच्या बदल्यात मिळणाऱ्या बक्षीसाची स्वप्ने पाहू शकेल. पण मी कशाची अपेक्षा करावी? ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल त्या क्षणी सारे संपून जाईल, हे मला माहीत आहे. तोच अंतिम क्षण असेल. माझा, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेत बोलायचे झाले तर माझ्या आत्म्याचा तेथेच संपूर्ण अंत होईल. त्यानंतर काही शिल्लक राहणार नाही. जर असे मानायचे धैर्य माझ्यात असेल तर कोणताही भव्यदिव्य शेवट नसलेले, एक लहानसे संघर्षमय जीवन हेच माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. कसलाच स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परालोकी कसल्याच बक्षिसाची इच्छा न बाळगता, अगदी अनासक्त भावाने मी माझे आयुष्य स्वातंत्रयाच्या ध्येयसाठी वाहिले, कारण तसे केल्यावाचून मी राहूच शकलो नाही.
मानव जातीची सेवा व यातनाग्रस्त मानवतेच्या मुक्तीला इतर कोणत्याही गोष्टीहून उच्च मानून तिच्यासाठी स्वतःला समर्पित करण्याची मानसिकता बाळगणारे अगणित स्त्रीपुरुष ज्या दिवशी आपल्याला आढळतील, त्या दिवशी स्वातंत्र्याचे युग सुरू होईल. पुढच्या जन्मी राजा होण्यासाठी किंवा पुढच्या जन्मी वा मृत्यूनंतर स्वर्गात जाऊन काही बक्षीस मिळवण्यासाठी नाही तर मानवजातीच्या मानेवरील गुलामगिरीचे जू उलथून टाकून स्वातंत्र्य व शांतता प्रस्थापित करण्यासाठी, जुलमी सत्ताधीश, शोषक आणि अत्याचार करणाऱ्यांना आव्हान देण्याची प्रेरणा त्यांना मिळेल, तेव्हाच ते या मार्गावरून चालू शकतील. व्यक्तिगत पातळीवर हा मार्ग त्यांच्यासाठी धोकादायक असू शकतो, परंतु त्यांच्या महान आत्म्यांसाठी हाच एकमेव गौरवपूर्ण मार्ग आहे.
या महान ध्येयासाठी स्वतःला समर्पित करण्यात त्यांना जो अभिमान वाटेल, त्याला गर्विष्ठपणा म्हणता येईल काय? त्यांना असा घृणास्पद कलंक लावण्याचे धाडस कोण करू धजेल? कोणी केलेच तर तो मूर्ख तरी असला पाहिजे किंवा लबाड तरी, असेच मी म्हणेन. पण त्याला आपण क्षमा करू, कारण माणसाच्या हृदयाची खोली आणि आवेग, त्यात उसळणाऱ्या भावना व उदात्त अनुभूती तो समजूच शकत नाही. त्याचे हृदय म्हणजे मांसाचा एक निर्जीव गोळ आहे. त्यांच्या दृष्टीवर अन्य स्वार्थांचा पडदा पडलेला आहे, म्हणून ती चांगल्या प्रकारे पाहू शकत नाही.
स्वावंलंबनाला अहंमन्यतेच्या रूपात पाहिले जाण्याची नेहमीच शक्यता असते. हे दु;खद अन् कीव येण्यासारखे आहे, पण त्याला इलाज नाही. तुम्ही एखाद्या प्रचलित श्रद्धेला विरोध करून पाहा, जो कधीही चूक करूच शकत नाही असे मानले जाणाऱ्या एखाद्या नायकावर किंवा थोर विभूतीवर तुम्ही टीका करून पाहा, तुमच्या तर्काच्या सामर्थ्यामुळे अनेक जण अहंकारी म्हणून तुमची टवाळी करू लागतील. मानसिक जडत्व हेच याचे कारण आहे. टीकात्मक दृष्टी आणि स्वतंत्र विचार हे क्रांतिकारकाचे दोन अनिवार्य गुण आहेत. महात्माजी थोर आहेत म्हणून त्यांच्यावर कोणी टीका करू नये; ते उच्चस्थानी पोचले आहेत म्हणून ते जे म्हणतील – मग ते राजकारण किंवा धर्माच्या बाबतीत असो किंवा अर्थशास्त्र अन् नीतिशास्त्राबाबत असो – ते बरोबरच आहे; तुम्हांला पटो अगर न पटो, तुम्ही म्हणायला हवे, ‘होय, होय, हेच सत्य आहे,’ असे होऊ शकत नाही. ही मानसिकता प्रगतीच्या दिशेने घेऊन जाणारी नाही. उघडच ती प्रतिगामी आहे.
आपल्या वाडवडिलांनी एखाद्या परमसत्तेवर,  सर्वशक्तिमान ईश्वरावर श्रद्धा निर्माण करून, जोपासून ठेवली आहे, म्हणून जो कोणी या श्रद्धेच्या खरेपणाला आव्हान देईल किंवा त्या सर्वश्रेष्ठ शक्तीच्या अस्तित्वाबद्दल शंका घेईल तो धर्मभ्रष्ट, द्रोही गणला जाईल, जर प्रतिवाद करून खोडून न काढता येण्याइतका त्याचा युक्तिवाद भक्कम असेल, आणि ईश्वराच्या कोपाने त्याच्यावर काही आपत्ती कोसळेल अशी धमकी देऊनही घाबरवता न येण्याइतके त्याचे मन खंबीर असेल, म्हणून मग त्याची गर्विष्ठ आणि अहंमन्य म्हणून नालस्ती केली जात असेल तर मग या निष्फळ चर्चेत वेळ का दवडायचा? या सर्व गोष्ठींसंबंधी वादविवाद का करायचा? हा प्रश्न सर्वसामानरू जनतेपुढे आज प्रथमच उपस्थित झाला आहे, आणि प्रथमच इतक्या सेडेतोडपणे हाताळला जात आहे, म्हणून मी ही विस्तृत चर्चा करीत आहे.
पहिल्या प्रश्चाचा विचार करता, अहंमन्यतेमुळे मी नास्तिकतेकडे वळलो नाही, हे माझे म्हणणे स्पष्ट केले आहे. माझा युक्तिवाद पटणारा आहे किंवा नाही हे वाचकांनीच ठरवायचे आहे, मी नव्हे. मला ठाऊक आहे की सध्याच्या माझ्या परिस्थितीत जर मी आस्तिक झालो असतो तर माझे आयुष्य सुसह्य झाले असते, माझ्या मनावरचा भार कमी झाला असता. उलट देवावर विश्वास नसल्याने माझी परिस्थिती जास्तच बिकट, रुक्ष झाली आहे व ती अधिक वाईटही होऊ शकते. थोड्याशा गूढवादाच्या स्पर्शाने ती सुसह्य झाली असती. पण माझ्या प्राक्तनाला सामोरे जाताना अशा प्रकारच्या कोणत्याही मादक कैफाची मदत मला नको आहे. मी वास्तववादी आहे. विवेकाच्या जोरावर माझ्यातल्या नैसर्गिक प्रवृत्तींवर मात करायचा माझा प्रयत्न आहे. हे करण्यात मला नेहमीच यश मिळाले आहे असे नाही. पण प्रयत्न करणे, धडपडणे हे माणसाचे कर्तव्य आहे. यश हे योगायोगावर व आजूबाजूची परिस्थिती यावर अवलंबून असते.
दुसरा प्रश्न असा की जर तो पोकळ गर्व नसेल, तर पूर्वापार चालत आलेली जुनी धार्मिक श्रद्धा नाकारायला दुसरे काही तरी कारण असलेच पाहिजे. मला सांगायचे आहे की होय, कारण आहे. माझ्या मते ज्या माणसाकडे काहीएक किमान विवेकबुद्धी असते तो मनुष्य नेहमी आपल्या भोवतालची परिस्थिती तर्कसंगत पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करीत असतो. जेव्हा स्पष्ट पुरावा उपलब्ध नसतो तेव्हा तत्त्वज्ञान प्रभावी ठरते. मी आधीच सांगितल्याप्रमाणे माझे एक क्रांतिकारक मित्र म्हणत असे, की माणसाच्या दुबळेपणातून तत्त्वज्ञान निर्माण होते. या जगाचे रहस्य, त्याचा भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ, जगासंबंधीचे का व कसे हे प्रश्न यांचा शोध घेण्याचा प्रयत्न जेव्हा आपले पूर्वज करीत होते तेव्हा त्यांच्याकडे वेळेची कमतरता नव्हती, परंतु प्रत्यक्ष पुरावे फारच कमी होते. त्यामुळे प्रत्येक जण स्वत:ला सुचेल त्या मार्गाने विश्वरहस्याचे आकलन करत गेला. आणि म्हणूनच आपल्याला वेगवेगळ्या धर्मपंथांच्या मूलभूत तत्त्वांमध्ये बराच फरक आढळतो. कधी कधी हा फरक अत्यंत परस्परविरोधी व शत्रूत्वपूर्ण स्वरूप धारण करतो.
पौर्वात्य, आणि पाश्चिमात्य तत्त्वज्ञानांमध्येही भेद आहेच, विश्वाच्या प्रत्येक भूभागाच्या आपल्या विचारप्रणालींमध्येसुद्धा भेद आहेत. पौर्वात्य धर्मात मुस्लीम श्रद्धा ही हिंदू श्रद्धेशी मुळीच जुळणारी नाही. खुद्द हिंदुस्थानातदेखील बुद्धवाद व जैनवाद हे ब्राह्मणवादाहून खूपच वेगळे आढळतात. पुन्हा ब्राह्मणवादसुद्धा आर्य समाज आणि सनातन धर्म इत्यादी अंतर्विरोधी प्रवाहांमध्ये विभागला गेला आहे. चार्वाक हे या सर्वांहून भिन्न असे प्राचीन काळातील आणखी एक स्वतंत्र तत्त्वज्ञान होय. प्राचीन काळातही त्याने ईश्वराच्या अस्तित्वाला आव्हान दिले. हे सर्व पंथ जीवन आणि जगतासंबंधीच्या मूलभूत प्रश्नांबाबत एकमेकांपासून भिन्न आहेत आणि प्रत्येकाला वाटते की आपलेच बरोबर आहे. हेच सगळ्या अपप्रवृत्तींचे कारण आहे.
प्राचीन काळचे ऋषी व विचारवंत यांनी केलेले प्रयोग व मांडलेली तत्त्वज्ञाने यांचा अज्ञानाविरूद्ध चाललेल्या आपल्या पुढच्या लढ्यासाठी उपयोग करून घेऊन, या गहन प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी आपण नालायक लोक – आपण सिद्ध केले आहे की आपण नालायक आहोत – आपापल्या धर्ममतांवर अभंग आणि अखंड विश्वास असल्याच्या कर्कश किंकाळ्या फोडत असतो. अशा प्रकारे आपण मानवी विकास अवरूद्ध करण्याचे गुन्हेगार आहोत.
प्रगती घडवायला सज्ज ठाकलेल्या माणसाला जुन्या श्रद्धेतील प्रत्येक बाबीबद्दल टीका करावी लागते, अविश्वास दाखवावा लागतो व तिला आव्हान द्यावे लागते. प्रचलित श्रद्धेचा कानाकोपरा धुंडाळून त्याने प्रत्येक लहानसहान बाबीची विवेकनिष्ठ चिकित्सा करावी लागते. अशा बऱ्याच विचारांती जर त्याला एखाद्या सिद्धान्तावर किंवा तत्त्वज्ञानावर विश्वास ठेवणे योग्य  वाटले, तर त्याच्या विश्वासाचे आपण स्वागत करू. त्याची विचारपद्धती चूक असू शकते, चुकीच्या मार्गाने गेलेली असू शकते किंवा खोटी व फसवी असू शकते. पण त्याच्या विचारांमध्ये सुधारणा होऊन तो योग्य मार्गावर येऊ शकतो, कारण विवेकबुद्धी हा त्याच्या जीवनाचा दिशादर्शक ध्रुवतारा असतो. पण केवळ श्रद्धा या अंधश्रद्धा धोकादायक आहे. ती मेंदू शिथिल करते आणि माणसाला प्रतिगामी बनवते.
जो मनुष्य स्वत:ला वास्तववादी म्हणतो त्याने संपूर्ण सनातन धर्मश्रद्धेला आव्हान दिले पाहिजे. जर विवेकबुद्धीच्या प्रखर हल्ल्याला ती अंधश्रद्धा तोंड देऊ शकली नाही तर, ती कोसळून पडेल. तेव्हा वास्तववादी मनुष्याने सर्वप्रथम सर्व पुरातन श्रद्धांचा संपूर्ण नि:पात करून नव्या तत्त्वज्ञानाच्या उभारणीसाठी जागा मोकळी केली पाहिजे.
ही नकारात्मक बाजू झाली. यानंतर सकारात्मक बांधणीच्या कामाला सुरुवात होते, तेव्हा कधीकधी जुन्या श्रद्धांमधल्या काही बाबी नव्या श्रद्धांच्या पुनर्बांधणीसाठी वापरात आणल्या जाऊ शकतात. माझ्यापुरते म्हणाल तर मी हे प्रारंभीच मान्य करतो, की या मुद्द्यांसंबंधी मी जास्त अभ्यास करू शकलेलो नाही. पौर्वात्य तत्त्वज्ञान अभ्यासायची माझी फार इच्छा होती, पण मला तशी संधी व वाव कधी मिळाला नाही. पण जोवर नकारात्मक बाजूने अभ्यासासाठीची चर्चा आपण करत आहोत, तोपर्यंत मला वाटते की जुन्या श्रद्धांच्या सत्यतेविषयी गंभीर शंका उत्पन्न करण्याइतपत तरी माझी खात्री झाली आहे. निसर्गातील घडामोडीचे नियंत्रण व मार्गदर्शन करणारी कोणतीही सर्वश्रेष्ठ चैतन्यमय शक्ती अस्तित्वात नाही, याबद्दल माझी पक्की खात्री झाली आहे. आमचा निसर्गावर विश्वास आहे आणि आपल्या सेवेखातर माणसाने निसर्ग काबूत आणणे ही एकंदर पुरोगामी चळवळीची दिशा आहे. या सर्व सृष्टीला चालवणारी एखादी चैतन्यमय शक्ती तिच्यामागे नाही, हेच आमचे तत्त्वज्ञान आहे.
नकारात्मक बाजूकडून आम्ही धर्मश्रद्धेच्या सत्यतेबद्दल आस्तिक लोकांना आम्ही काही प्रश्न विचारतो- तुमच्या श्रद्धेनुसार जर ही पृथ्वी किंवा हे विश्व त्या सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्वशक्तिमान अशा विधात्याने निर्माण केले असेल; तर त्याने मुळात हे सर्व का निर्माण केले, हे मला कृपया सांगाल काय? दैन्य आणि यातनांनी भरलेले हे जग, लाखो शोकान्तिकांची ही सतत बदलती पण चिरंतन गुंफण, ज्यात एकही प्राणिमात्र सर्वार्थाने समाधानी नाही, हे सर्व त्याने का निर्माण केले?
कृपा करून हाच त्याचा कायदा आहे असे म्हणू नका. जर तो नियमांनी व कायद्यांनी बांधलेला असेल तर तो सर्वशक्तिमान नाही, तो आपल्यासारखाच गुलाम आहे. कृपा करून ही त्याची लीला आहे, व यात त्याला आनंद मिळतो, असे म्हणू नका. नीरोने फक्त एक रोम जाळले, त्याने तशी अगदी थोडीच माणसे मारली. त्याने फारच थोड्या शोकान्तिका निर्माण केल्या. त्याने हे सर्व केले ते त्याच्या आनंदोपभोगासाठी. पण इतिहासात त्याचे स्थान काय आहे? इतिहासकार त्याचा कोणत्या नावाने उल्लेख करतात? सगळ्या जहरी विशेषणांचा त्याच्यावर वर्षाव होत असतो. जुलुमी, हृदयशून्य, विकृत व दुष्ट नीरोचा निषेध करून त्याची निंदा करणाऱ्या लिखाणाने पानेच्या पाने भरली गेली आहेत. स्वत:च्या सुखासाठी काही हजारोंचे प्राण घेणारा एक चंगेजखान होता, व आपण त्याच्या नावाचादेखील तिरस्कार करतो. तर मग प्रत्येक दिवशी, प्रत्येक घटकेला, प्रत्येक क्षणाला असंख्य शोकान्तिका घडवत आलेल्या व अजूनही घडवत असलेल्या तुमच्या अनादी अनंत नीरोचे-त्या सर्वशक्तिमान ईश्वराचे – समर्थन तुम्ही कसे करणार आहात? प्रत्येक क्षणी चेंगिजखानालाही मागे टाकणाऱ्या त्याच्या दुष्कृत्यांची तुम्ही कशी काय पाठराखण करणार आहात?
मी विचारतो, खरोखरच नरक असणाऱे, चिरंतनपणे असंतोषाने धगधगणारे हे जग त्याने निर्माणच का केले? अशी सृष्टी निर्माण न करण्याचे सामर्थ्य जर त्याच्यापाशी होते तर त्याने मनुष्याची ही सृष्टी निर्माणच कां केली?  या सगळ्याचे काय औचित्य आहे? काय म्हणालात? यातना भोगणाऱ्या निष्पाप माणसांना पुढे बक्षीस देण्यासाठी, आणि पापी लोकांना पुढे शिक्षा करण्यासाठी त्याने हे सर्व निर्माण केले. वा, वा! तर मग एक सांगा, नंतर एक मुलायम, सुखकारक मलम चोळायचे म्हणून जर एखाद्या माणसाने तुमच्या अंगावर असंख्य जखमा केल्या तर तुम्ही त्याचे कोठवर समर्थन करणार आहात? भुकेल्या, चवताळलेल्या सिंहापुढे माणसे फेकायची आणि त्या हिंस्त्र पशूच्या तावडीतून, मृत्यूपासून जर ते वाचलेच तर त्यांची काळजी घ्यायची व शुश्रूषा करायची, असा खेळ करणारेरोममधील ग्लॅडिएटर संस्थेच्या पाठिराख्यांचे हे आचरण कुठवर समर्थनीय होते? आणि म्हणून मी विचारतो, ‘त्या जाणत्या सर्वोच्च विधात्याने हे जग आणि त्यातला हा मानव का निर्माण केला? स्वतःच्या मौजेसाठी? तर मग नीरो आणि तो विधाता यात फरक काय?
हिंदू तत्त्वज्ञानाकडे यावरसुद्धा काही ना काही उत्तर असेल, परंतु मुसलमान आणि खिस्ती बांधवांनो! मी तुम्हांला विचारू इच्छितो, की वरील प्रश्नाला तुमचे उत्तर काय? तुम्ही पूर्वजन्मावर विश्वास ठेवत नाही. उघडपणे निर्दोष दिसणारी माणसे दुःख भोगत असतात ती त्यांच्या गेल्या जन्मातील पापांमुळे, असे तुम्ही हिंदूंप्रमाणे म्हणू शकणार नाही. मी असे विचारतो की शब्दांतून जग साकार करायला सहा दिवसांचा हा खटाटोप त्या सर्वशक्तिमान ईश्वराने का केला आणि वर दररोज ‘सर्व काही ठीक आहे’ असे तो का म्हणाला? त्या विधात्याला आज बोलवा, मागील इतिहास त्याला दाखवा. वर्तमान परिस्थितीविषयी त्याला विचार करायला लावा. आणि मग पाहू, ‘सर्व काही ठीक आहे’ असे म्हणायचे धाडस त्याला होते का? कैदखान्यातील कोठड्या, अस्वच्छ वस्त्या आणि झोपडपट्ट्यांत उपाशीपोटी झिजत पडलेले लाखो जीव; भांडवली राक्षसांद्वारे आपले रक्त शोषले जाण्याची प्रक्रिया धैर्यपूर्वक किंवा उदासीनतेने पाहणारे शोषित कामगारांपासून जेमतेम समज असलेल्या माणसालासुद्धा हादरवून टाकणारा मानवी ऊर्जेचा अपव्यय, गरजू श्रमिक लोकांना वाटण्याऐवजी समुद्रात फेकून दिले जाणारे जास्तीचे उत्पादन, आणि मानवी सापळ्यांच्या पायांवर उभे असलेले राजवाडे – हे सर्व त्याला पहू दे, आणि मग म्हणू दे, ‘सर्व काही ठीक आहे.’ हे सगळे का आणि कशासाठी? हा माझा प्रश्न आहे. तुम्ही गप्प आहात. ठीक आहे. मी पुढे जातो.
बरं, हिंदूंनो, तुम्ही मानता की या जन्मी कष्ट सोसणारे हे गेल्या जन्माचे पापी आहेत. ठीक. तुम्ही म्हणता की या जन्मी जुलूम करणारे हे त्यांच्या पूर्वजन्मात महात्मे होते, म्हणून ते आज सत्तासुख उपभोगत आहेत. मान्य करावेच लागेल की तुमचे पूर्वज फार बिलंदर होते. विवेकनिष्ठ विचार करण्याचे व देवधर्मावरील अविश्वासासंबंधी चालणारे सर्व प्रयत्न हाणून पाडता यावीत यासाठी त्यांनी भक्कम शास्त्रे घडवण्याचा प्रयास केला. या तर्कामध्ये वास्तविक कितीसा दम आहे त्याचे आपण परीक्षण करू या.
सर्वात प्रसिद्ध व मान्यवर अशा कायदेपंडितांच्या दृष्टिकोनातून गुन्हेगाराला शिक्षा देण्याचे समर्थन फक्त तीन किंवा चार उद्देश्यांच्या आधारेच होऊ शकते. मुख्य तीन प्रकार म्हणजे प्रतिकार किंवा सूड घेणे , सुधारणा म्हणजेच दोषी व्यक्तीला योग्य मार्गावर आणणे व दंडाचे भय दाखवून दुष्कर्म करण्यापासून परावृत्त करणे. सूडासाठी शिक्षा या सिद्धांताचा बहुतेक आधुनिक व प्रगतिशील विचारवंतांनी निषेध केला आहे. गुन्ह्याचा प्रतिबंध करण्याकरता शिक्षा, या सिद्धांताचीसुद्धा हीच गत होणार आहे. सुधारणेसाठी शिक्षा हाच एकमेव सिद्धांत अर्थपूर्ण व मानवी प्रगतीसाठी अपरिहार्य आहे. दोषी व्यक्तीला अत्यंत सुयोग्य व शांतताप्रिय नागरिक म्हणून समाजामध्ये परत येता यावे, हा त्याचा उद्देश्य आहे. परंतु आपण घटकाभर माणसांना गतजन्मीचे गुन्हेगा मानले तरी अशांना देवाने दिलेली शिक्षा कशा प्रकारची असते? तुम्ही म्हणता की तो त्यांना गाय, मांजर, झाड, झुडपे, पशू वगैरे जन्म देऊन जगात पाठवतो. तुम्ही या शिक्षांची संख्या ८४ लक्ष असल्याचे सांगता. मी तुम्हांला असे विचारतो की माणसामध्ये सुधरणा होण्याच्या दृष्टीने याचा काय परिणाम होतो? पाप केल्यामुळे पूर्वीच्या जन्मी मी गाढव म्हणून जन्मलो होतो असे सांगणारी किती माणसे तुम्हांला भेटली आहेत? एकही नाही. तुमच्या पुराणातले दाखले देऊ नका. तुमच्या पुराणकथांचा परामर्श घ्यायला मला आता सवड नाही. तुम्हालां हे ठाऊक आहे का, की गरीब असणे हे या जगातले सर्वांत मोठे पाप आहे, परंतु तुमच्या म्हणण्यानुसार ती देवाने दिलेली शिक्षा आहे. आणखी जास्त गुन्हे करण्यास प्रवृत करणारी शिक्षा सुचवणाऱ्या त्या कायदेपंडिताला, विधिज्ञाला किंवा विधिवेत्त्याला तुम्ही कसे काय योग्य ठरवणार? तुमच्या ईश्वराने हा विचार आधी केला नव्हता का? की त्यालाही अशा गोष्टी अनुभवातून शिकाव्या लागतात? परंतु मानवजातीला त्यासाठी किती अपरंपार यातना, कष्ट सोसावे लागतात?
एखाद्या चांभाराच्या किंवा मेहतराच्या गरीब व अशिक्षित कुटुंबात जन्माला येणाऱ्या माणसाच्या नशिबी काय लिहिलेले असते असे तुम्हांला वाटते? तो गरीब असल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही. तथाकथित उच्च जातीत जन्मल्यामुळे स्वत:ला श्रेष्ठ मानणाऱ्या इतर माणसांकडून त्याचा द्वेष केला जातो,  अस्पृश्य मानून त्याला दूर ठेवले जाते. त्याच्या नशिबी आलेले अज्ञान, गरिबी आणि त्याला मिळणारी अपमानाची वागणूक, यामुळे त्याच्या मनात समाजाविषयी कटुता निर्माण होते. समजा, त्याने एखादे पाप केले तर त्याचे प्रायश्चित कुणी भोगायला हवे? देवाने, त्याने स्वत: की समाजातल्या ज्ञानवंतांनी? मग्रूर व स्वार्थी ब्राह्मणांकडून जाणीवपूर्वक ज्यांना अज्ञानी ठेवण्यात आले, व तुमच्या पवित्र वेदग्रंथातील थोडीशी वाक्ये कानावर पडली म्हणून ज्यांना वितळलेले शिसे कानात ओतण्याची शिक्षा मिळत असे, अशा माणसांना मिळणाऱ्या शिक्षेबद्दल आपण काय म्हणाल? त्यांनी जर काही गुन्हा केला असेल तर त्यासाठी कोणाला जबाबदार धरले जावे आणि कोणी त्याचे दुष्परिणाम सहन करावे?
माझ्या प्रिय मित्रांनो, हे सिद्धान्त म्हणजे विशेषाधिकार मिळालेल्या लोकांनी शोधलेल्या युक्त्या आहेत. या सिद्धान्ताच्या आधारे त्यांनी बळकावलेल्या सत्तेचे, संपत्तीचे आणि श्रेष्ठत्वाचे ते समर्थन करतात. होय, बहुधा अप्टन सिंक्लेअरने कुठे तरी असे लिहिले आहे, ‘माणसाला फक्त अमरत्वावर विश्वास ठेवायला लावा आणि मग त्याची संपत्ती व मालमत्ता खुशाल लुबाडा! तो हूं की चू करणार नाही, कदाचित तो स्वतः त्यामध्ये तुम्हांला मदतही करील. धर्मोपदेशक आणि सत्ताधारी यांच्यातल्या युतीमुळेच तुरुंग, वधस्तंभ, चाबकाचे फटके आणि हे धार्मिक विचार जन्माला आलेले आहेत.
मी तुम्हांला असे विचारतो की जेव्हा एखादा माणूस पाप किंवा गुन्हा करण्याचा विचार करतो; तेव्हाच अशा माणसाला तुमचा तो सर्वशक्तिमान ईश्वर परावृत्त का करीत नाही? असे करणे त्याला सहज शक्य आहे. युद्ध पेटवणाऱ्या सत्ताधीशांना त्याने ठार का मारले नाही किंवा त्यांच्यातील युद्धोन्माद नाहीसा करून मानवतेला महायुद्धाच्या संकटापासून का वाचवले नाही? हिंदुस्तानला स्वतंत्र करण्याची भावना तो ब्रिटिशांच्या मनात का निर्माण करत नाही? उत्पादनाच्या साधनांवरचा आपला वैयक्तिक मालकी हक्क सोडावा अशी उदात्त परोपकारी भावना तो सगळ्या भांडवलदारांच्या मनात का रुजवत नाही? अशा मार्गाने सर्व श्रमिक जनतेचीच नव्हे, तर संपूर्ण मानवी समाजाची भांडवलशाहीच्या दास्यातून मुक्तता तो का करत नाही? समाजवादी सिद्धान्ताच्या व्यवहार्यतेविषयी तुम्हांला चिकित्सा करायची आहे ना? त्याला व्यवहार्य बनवण्याची जबाबदारी मी तुमच्या देवावरच सोपवतो. सर्वसामान्य माणसाच्या भल्यासाठी समाजवाद ही चांगली गोष्ट आहे, एवढे तरी लोक मान्य करतात. त्याचा विरोध करण्यासाठी त्यांच्यापाशी एकच कारण असते, की तो व्यवहार्य नाही. मग तुमच्या सर्वशक्तीमान देवाला बोलवा आणि सांगा की त्याने उभ्या जगात समाजवाद स्थापित करावा. आता उगाच गुळमुळीत आक्षेप पुढे करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांचा काही उपयोग नाही.
मला तुम्हांला असे सांगायचे आहे, की ईश्वराची तशी इच्छा आहे म्हणून इंग्रजांचे राज्य आपल्यावर नाही; तर त्यांच्याकडे सत्ता आहे आणि आपण त्यांचा विरोध करीत नाही, म्हणून ते आहे. त्यांनी देवाच्या साहाय्याने नाही तर बंदुका, तोफा, दारुगोळा, पोलीस, सैन्य तसेच आपल्या उदासीनतेच्या साहाय्याने आपल्याला गुलाम बनवले आहे व एका राष्ट्राची दुसऱ्या राष्ट्राकडून राक्षसी पिळवणूक करण्यासारखे मानवी समाजाच्या दृष्टीने एक घृणास्पद पाप ते अत्यंत यशस्वीपणे करीत आहेत. कुठे आहे देव? काय करतोय तो? मानववंशाच्या या यातनांमुळे त्याला अत्यानंद होतो आहे का? तर मग तो नीरो आहे, चंगेझखान आहे. त्याचा नाश होवो नीरो! जर मी देव मानत नसेन तर या विश्वाची आणि मानवाची उत्पत्ती कशी झाल्याचे मी मानतो हे तुम्हांला जाणून घ्यायचे आहे का? ठीक आहे, सांगतो. चार्ल्स् डार्विनने या विषयावर प्रकाश टाकायचा प्रयत्न केला आहे. त्याचा अभ्यास करा. निरलंब स्वामी यांचे ‘कॉमन सेन्स’ हे पुस्तक वाचा. काही प्रमाणात ते तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. ही एक नैसर्गिक घडामोड आहे. तारकामंडळातील वेगवेगळ्या पदार्थांच्या अपघाती मिश्रणाने ही पृथ्वी तयार झाली. कधी? इतिहासात शोधा. त्याच प्रक्रियेतून प्राणी निर्माण झाले आणि दीर्घ काळानंतर त्यांच्यातून शेवटी मानव तयार झाला. ‘सजीवांची उत्पत्ती’ हा डार्विनचा ग्रंथ वाचा. आणि त्यानंतरची सर्व प्रगती ही मानवाचा निसर्गाशी सतत चालणारा संघर्ष व त्याचा निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न यामुळे झाली आहे. या प्रक्रियेचे अगदी थोडक्यात स्पष्टीकरण द्यायचे, तर ते असे आहे.
तुमचा पुढचा युक्तिवाद बहुतेक असा असेल की पूर्वजन्मी केलेल्या पापांमुळे नाही तर मग कशामुळे एखादे मूल जन्मत:च आंधळे किंवा पांगळे निपजते? जीवशास्त्रज्ञांनी या प्रश्नाचे स्पष्टीकरण असे दिले आहे, की ती जीवशास्त्रीय अशी घडामोड आहे. त्यांच्या मते यासाठी मुलाचे आईवडीलच जबाबदार असतात, मग गर्भावस्थेतच मुलामध्ये निर्माण होणाऱ्या विकृतींना कारणीभूत ठरणाऱ्या आपल्या कृतींच त्यांना जाणीव असो व नसो.
बालीश असला तरी तुम्ही आणखी एक प्रश्न अर्थातच मला विचारणार – जर देव अस्तित्वात नाही, तर त्याच्यावर विश्वास ठेवण्यास लोकांनी सुरुवात तरी कशी केली? माझे स्पष्ट आणि थोडक्यात उत्तर असे : जसा ते भूतपिशाच्चांवर विश्वास ठेवायला लागले तसेच हेसुद्धा झाले; फरक इतकाच की ईश्वराची श्रद्धा ही जवळवजळ सार्वत्रिक पातळीवरची आहे आणि त्यासंबंधीचे तत्त्वज्ञानही चांगले प्रगत आहे. ईश्वराच्या परमसत्तेच्या अस्तित्त्वाचा प्रचार करून आणि त्याच्याकडून आपल्याला सत्ता आणि विशेषाधिकार मिळाल्याचा दावा करून लोकांना गुलाम बनवू पाहणाऱ्या शोषकांच्या कारस्थानांतून ईश्वराची उत्पत्ती झाली, असे काही परिवर्तनवादी मानतात. अशा शोषकांनीच ईश्वराला जन्म दिला असे मी मानत नाही, मात्र सर्व श्रद्धा, धर्म व अशा प्रकारच्या इतर संस्था शेवटी दमन आणि शोषण करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि वर्गांच्या समर्थक झाल्या, या म्हणण्याशी मी सहमत आहे. राजाच्या विरुद्ध विद्रोह करणे हे सर्वच धर्मांच्या दृष्टीने एक पातक आहे.
देवाचा उगम कसा झाला या बद्दल माझी स्वत:चे मत असे आहे, की माणसाला जेव्हा त्याच्या मर्यादा, दुबळेपणा, त्रुटी यांची झालेली जाणीव झाली, तेव्हा सर्व परिस्थितींना धैर्याने तोंड देण्यासाठी; सर्व प्रकारच्या संकटांना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी; भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसाला उच्छृंखल होण्यापासून रोखण्याऱ्या व नियंत्रित करणाऱ्या सत्तेच्या रूपात देवाचे काल्पनिक अस्तित्त्व निर्माण करण्यात आले. स्वत:चे खास असे नियम व आईबापांची उदार सहृदयता या दोहोंनी परिपूर्ण अशा देवाची अतिशयोक्तीपूर्ण अशी कल्पना जास्त तपशिलवारपणे पुढे रंगवली गेली. माणूस समाजाला विघातक ठरू नये यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून देवाचा उपयोगा व्हावा, ह्या हेतूने दैवी कोप व नियम या कल्पना मांडल्या गेल्या. देवाची दयाळू व वात्सल्य वृत्ती वर्णिल्याने तो पिता, माता, भगिनी, बंधू, मित्र, मदतनीस अशा रूपात उपयोगी वाटू लागला. विश्वासघात झाल्यामुळे किंवा आप्तस्वकीयांनी दूर केल्यामुळे मनुष्य जेव्हा अत्यंत निराश अवस्थेत असेल, तेव्हा आपल्या मदतीला व आधार द्यायला आपला एक सच्चा मित्र अजूनही आहे आणि तो विधाता आहे,  काहीही करण्याइतपत तो सर्वशक्तिमान आहे या कल्पनेमुळे त्याचे सांत्वन होते. समाजाच्या आदिम अवस्थेच्या काळात ही गोष्ट खरोखरच उपयोगी होती. अडचणीत सापडलेल्या माणसाला ईश्वराच्या संकल्पनेचे फार साहाय्य होत होते.
मूर्तिपूजा, धर्मांच्या कोत्या समजुतींविरूद्ध समाजाने ज्या प्रकारे संघर्ष केला आहे, त्याचप्रकारे ईश्वरावरच्या या श्रद्धेविरुद्धही समाजाने लढा द्यायला हवा. तसेच, मनुष्य जेव्हा स्वत:च्या पायावर उभा राहून वास्तववादी बनू पाहतो, तेव्हा त्याने आपली आस्तिकतासुद्धा झटकून टाकली पाहिजे व त्याला कोणत्याही निराशेत किंवा संकटात ढकलणाऱ्या परिस्थितीचा समर्थपणे मुकाबला करण्याचा पुरुषार्थ त्याने दाखवायला हवा. माझी अवस्था नेमकी अशीच आहे.
मित्रांनो, हा माझा गर्विष्ठपणा नाही. माझ्या या विचारपद्धतीमुळे मी नास्तिक बनलो आहे. देवावर विश्वास ठेवल्यामुळे व रोज पूजाप्रार्थना केल्यामुळे – जी माणसाची सर्वाधिक स्वार्थपूर्ण आणि घाणेरडी कृती आहे असे मी मानतो – मी थोडा सुखावलो असतो की माझी अवस्था अधिक बिकट झाली असती, ते मला माहीत नाही. सर्व प्रकारच्या संकटांना धैर्याने तोंड देणाऱ्या नास्तिकांबद्दल मी वाचले आहे, आणि त्याप्रमाणे शेवटपर्यंत म्हणजे अगदी वधस्तंभापर्यंत मान ताठ ठेवून ठाम उभे राहणाऱ्या माणसासारखे वागण्याचा मी प्रयत्न करतो आहे.
पाहू या, माझा प्रयत्न कितीसा यशस्वी होतो. माझ्या एका मित्राने मला प्रार्थना करायला सांगितले. मी जेव्हा माझ्या नास्तिकतेविषयी त्याला सांगितले, तेव्हा तो म्हणाला, “तुझ्या अखेरच्या दिवसात तू देवावर विश्वास ठेवू लागशील.” मी म्हणालो, “नाही महाशय, असे कधीही होणार नाही. तसे करणे म्हणजे माझ्यासाठी अपमानास्पद आणि भ्याडपणाचे ठरेल, असे मी समजेन. स्वार्थी हेतूंसाठी मी प्रार्थना करणार नाही.” वाचक हो आणि मित्र हो, “याला तुम्ही अहंमन्यता म्हणाल काय?” जर तसे असेल तर मला त्याचा अभिमानाच आहे!

शहीदे आजम भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या 86 व्या शहीद दिनानिमीत्त 15 दिवसीय शहीद स्मृती अभियान

शहीदों के जो ख़्वाब अधूरे, इसी सदी में होंगे पूरे!
इसी सदी में नये वेग से, परिवर्तन का ज्वार उठेगा!!
हम समय के युद्धबन्दी हैं
युद्ध तो लेकिन अभी हारे नहीं हैं हम।
लालिमा है क्षीण पूरब की
पर सुबह के बुझते हुए तारे नहीं हैं हम।
————————-
चलो, अब समय के इस लौह कारागार को तोड़ें
चलो, फि़र ज़ि‍न्दगी की धार अपनी शक्ति से मोड़ें
पराजय से सबक लें, फि़र जुटें, आगे बढ़ें फि़र हम!
-शशिप्रकाश
मित्रांनो, आज आपण अशा काळात,अशा परिस्थितीत जगत आहोत जिथं प्रतिक्रियावादी शक्ती चहू बाजूंनी हल्ले करताहेत.निराशेच्या अंधारानं अनेकांच्या मनाचा जणू ताबा घेतलाय. जनतेच्‍या हाल-अपेष्‍टांना पारावार उरला नाही. लोकांनी संघटीत होऊन संघर्ष करू नए यासाठी अगदी पद्धतशीरपणे धार्मीक कट्टरता, सांप्रदायिकता व “अंधराष्‍ट्रवादाच्‍या’’ रूपानं लोकांच्‍या मन आणि मेंदूमध्‍ये विष कालवलं जात आहे. वैज्ञानिक, तार्कीक, प्रगतीशील विचार व मानवतेला पुढे घेऊन जाणाऱ्या विचारांवर संघटीत हल्‍ल्‍यांची जणू मालिकाच सुरू आहे. दुसरीकडे, हर तऱ्हेच्‍या अन्‍यायाविरुद्ध लढणाऱ्या तरुणांची हृदय मात्र यावेळी बर्फासारखी थंड आहेत. उज्‍वल भविष्‍यासाठी उच्‍च भरारी घेणारे पंख चिखलान माखले आहेत. अशावेळी भगतसिंहाच्‍या शब्‍दांत, “क्रांतीची स्पिरीट ताजा करण्‍यासाठी, मानवतेच्या अंतरात्म्यात हालचाल पैदा व्हावी’’ म्‍हणून आपण शहीदे-आजम भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्‍या शहीद दिनी त्‍यांच्‍या स्‍वप्‍नांना स्‍मरून त्‍यांना पूर्ण करण्‍यासाठी तरुणांचे आवाह्न करत आहोत.
भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव यांच काय स्वप्न होत?
भगतसिंहाच स्‍वप्‍न फक्‍त इंग्रजांना भारतातून पळवून लावणे इतकं  मर्यादीत नव्‍हत. तर हजारो वर्षांपासून चालत आलेली गरीब-श्रीमंताची व्‍यवस्‍थाच इतिहासाच्‍या कचरापेटीत फेकून देउन, समता आणि न्‍यायावर आधारीत समाज बनवून, एका नव्‍या युगाची सुरूवात करने होत. 1930 सालीच  भगतसिंह म्‍हणाला होता की ‘आम्‍ही एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे शोषण व एका राष्‍ट्राकडून दुसऱ्या राष्‍ट्राच्‍या शोषणाच्‍या विरोधांत आहोत.’ कांग्रेस आणि गांधीजे वर्ग चरित्र आणि धनिक-जमिनदारांवरील त्‍यांच्‍या अवलंबनामुळे भगतसिंहाने पूर्वीच इशारा दिला होता की त्‍यांचा उद्देश ‘लुट करण्‍याची ताकद गोऱ्या इंग्रजांकडून मुठभर भारतीय लुटारूकडे सोपवणे आहे. त्‍यामुळे यांच्‍या लढ्याचा अंत कुठल्‍या ना कुठल्‍या सांमजस्‍यात, तडजोडीच्‍या रुपांत होईल’. भगतसिंहाने 1926, जून 6 रोजी दिल्‍ली सेशन जज लिओनार्डो मिडिलटनच्‍या न्‍यायालयांत ऐतिहासिक शब्‍दांत सांगितल की “क्रांतीचा आमच्‍या अर्थ मुठभर एैतखाउद्वारे सामान्य जनतेच्या मेहनतीच्या लुटीवर आधारीत,अन्‍यायपुर्ण प्रस्थापित समाजव्‍यवस्‍थेत आमूलाग्र परिवर्तन होय. समाजाचे प्रमुख अंग असूनही आज कामगारांना त्यांच्या प्राथमिक हक्कांपासून वंचित ठेवले जाते. शोषण करणारे भांडवलदार त्यांच्या निढळाच्या कमाईतून निर्माण होणारी सर्व संपत्ती हडपून टाकतात. दुसऱ्याचे अन्नदाते असणारे शेतकरी आज त्यांच्या कुटुंबासह एकेका दाण्यासाठी मोताद बनले आहेत. जगभरच्या बाजारपेठांसाठी कपडे उपलब्ध करून देणाऱ्या विणकऱ्याला आपले व पोराबाळांचे शरीर झाकण्या इतके देखील कापड मिळत नाही. सुंदर महाल निर्माण करणारे गवंडी, लोहार, सुतार स्वत: मात्र घाणेरड्या वस्त्यांत राहून आपली जीवनयात्रा समाप्त करतात. या विपरित समाजातील शोषक भांडवलदार त्यांच्या छोट्यामोठ्या लहरींखातर लाखो-कोट्यावधींची उधळपट्टी करतात.” भगतसिंहाने पूर्वीच्‍या एच.आर.ए. संघटनेला फिरोजशहा कोटला मैदानात झालेल्‍या क्रांतीकारकांच्‍या बैठकीत, 1928 मध्‍ये, संघटनेच्‍या नावात   “सोशालिस्‍ट’’ शब्‍द जोडून एका समतामूलक समाज निर्मीतीला संघटनेचा उद्देश म्‍हणून घोषित केले.
भगतसिंह व त्‍याचे सहकारी असा समाज बनवू इच्छित होते, ज्‍याच्यात धर्माच्‍या नावावर झगडे होणार नाहीत. भगतसिंहाने जेव्‍हा देशांतील युवकांना संघटीत करण्‍यासाठी ‘नौजवान भारत सभा’ सुरू केली होती, तेव्‍हा या गोष्‍टी बाबत विशेष लक्ष दिले होते. भगतसिंहाची संघटना तीच्या जन्मापासूनच धर्मनिरपेक्ष संघटना  होती. तरुणांमध्‍ये जातीय आणि धार्मिक फूट पडू नए म्‍हणून विचारांच्‍या प्रचार,प्रसारा सोबतच सहभोजनाचेही कार्यक्रम नेहमी आयोजित केले जात. इंग्रज एका बाजूला स्‍वातंत्र्याची लढाई कमजोर करण्‍यासाठी हिंदू-मुस्लिमांना परस्‍परांशी लढवत होते, तर दुसऱ्या बाजूला ‘हिंदू महासभा’ आणि ‘तबलीगी जमात’ सारख्या कट्टरपंथी संगठना सुद्धा हिन्‍दू-मुस्लिम वाद उभे करून इंग्रजांना मदतच करत होत्या. भगतसिंह मात्र लोकांनी परस्‍परांशी लढू नए म्‍हणून लोकांमध्‍ये वर्गचेतना निर्माण करण्‍यावर अधिक भर देण्‍याची गरज प्रतिपादन करतात. ते म्‍हणत होते की – “गरीब, कष्टकरी व शेतकरी यांना हे स्पष्टपणे समजावून सांगितले पाहिजे, की तुमचे खरे शत्रू भांडवलदार आहेत. म्हणून तुम्ही त्यांच्या कावेबाजी पासून स्वतःला शाबूत ठेवले पाहिजे. त्यांच्या तावडीत अडकून काहीही करता कामा नये.” भगतसिंहासारख्‍या क्रांतीकारकाच्‍या विचारांना भारतीय शासक वर्गाने नुसतं धुळीत आणि राखेखाली गाडून टाकण्‍याचा कट रचला एवढच नव्हे तर त्‍यांना बंदूक पिस्‍तुलवाल्‍या तरुणांच्‍या रूपांत जनतेमध्‍ये प्रस्‍थापित केलं. खरंतर त्‍यांच्‍या आरंभीच्‍या काही दिवसांना सोडलं, तर भगतसिंह जनतेला जागृत करून तीच्‍या व्‍यापक संघटनेच्‍या जोरावरच क्रांती करण्‍याचे समर्थक होते. जेलमधून विद्यार्थांच्‍या नावे पाठवलेला पत्रांत भगतसिंह लिहतात “सद्यःस्थितीत आम्ही तरुणांना असे सांगू शकत नाही, की त्यांनी बाॅम्ब आणि पिस्तुले हातात घ्यावीत. आज विद्यार्थ्यांसमोर यापेक्षाही अधिक महत्‍त्‍वाची कामे आहेत… क्रांतीचा हा संदेश तरुणांनी देशाच्या कानाकोपऱ्यात पोचवायचा आहे. गिरण्या कारखान्यांची क्षेत्रे, शहरातील बकाल वस्त्या आणि खेड्यातील जीर्ण झोपड्या यामध्ये राहणाऱ्या कोट्यावधी लोकांमध्ये तरुणांनी क्रांतीची चेतना जागवली पाहिजे. त्यातूनच स्वातंत्र्यप्राप्ती होईल आणि मग एका माणसाकडून दुसऱ्या माणसाचे होणारे शोषण अशक्य होऊन जाईल.”
भगतसिंहाने देशी-विदेशी लूटीला संपवणे आपलं उद्दीष्‍ट बनवलं होत. फाशी जाण्‍यापूर्वी तीन दिवस, पंजाब गवर्नरला लिहीलेल्‍या पत्रांत त्यांनी म्‍हटलं की, “साम्राज्यवाद आणि भांडवलशाहीचे दिवस भरले आहेत.थोड्या दिवसांत हे युध्‍द अंतिम स्वरूपात लढवलं जाइल.याच युद्धात आम्ही प्रत्यक्ष भाग घेतला आहे. या युद्धाची ना सुरूवात आम्ही केली, ना आमच्या जीवनाबरोबर ते संपणार आहे.” 
हे कसलं स्‍वातंत्र्य, हे कुठलं स्‍वातंत्र्य
जनतेसाठी लूट अन् बरबादीचं षडयंत्र
स्‍वातंत्र्याच्‍या इतक्‍या वर्षांत शासक वर्गाने जनतेला हळूहळू दारिद्रयाच्‍या खाणीत ढकललं  आहे. तथाकथित ‘विकास’ असा आहे की देशांतल्‍या वरच्‍या 1 टक्‍के लोकांकडे देशाच्‍या एकूण संपत्‍तीचा 58.4 टक्‍के हिस्‍सा केंद्रित झालाय तर, वरच्‍या 10 टक्‍के लोकसंख्‍येकडे हा आकडा 80.7 टक्‍के पर्यंत पोहचलाय. दुसऱ्या बाजूला खालच्‍या 50 टक्‍केे लोकसंख्‍येकडं एकुण संपत्‍तीच्‍या फक्‍त 1 टक्‍के संपदा आहे. देशांतील गोदामांत अन्‍न सडत आहे आणि तरीही प्रतीदिनी जवळ जवळ 9000 मुलं कुपोषण आणि इतर आरोग्‍या संबंधी समस्‍येमुळं जीव गमावत आहेत. युनीसेफच्‍या अहवालानुसार कुपोषणाचा बळी असलेलं जगातील प्रत्‍येक तीसरं मुलं हे भारतीय आहे. 50 टक्‍के स्‍त्रीया रक्‍ताच्‍या कमतरतेच्‍या बळी आहेत. ‘जनसंख्‍या स्थिरता कोष’ नुसार 100000 मध्‍ये 167 महीलांचा प्रसुती दरम्‍यान मृत्‍यु होतो. सरकारी धोरणापायी होणारा मृत्‍यु आतंकवादी घटनांत होणाऱ्या मृत्‍युच्‍या तुलनेत कैक हजार पट जास्त आहेत. पण या मृत्‍युवर मीडिया आणि नेत्‍यांद्वारे मौनाचा कट केला जातो. 1 फेब्रुवारीला बजेट सादर होण्‍यापूर्वी असं सांगण्‍यात आलं की दरवर्षी सरासरी 90 लाख लोक पोटापाण्‍यासाठी घर सोडून प्रवासी बनताहेत. ज्‍यातले बहुतकरून मुंबई, तिरूपूर, दिल्‍ली, बंगलुरू, लुधियाना इत्‍यादीतील गलीच्‍छ आणि आजारानी गच्‍च भरलेल्‍या झोपडपट्टयांमध्‍ये सामावले जातात. आकड्यांनुसार देशांतली जवळजवळ 36 कोटी लोकसंख्‍या झोपड़पट्टयां आणि फुटपाथवर राहायला मजबूर आहे. मोदी सरकारने 2014 मध्‍ये 6 कोटी स्‍वस्‍त घरे बनवण्‍याची घोषण केली.पण जून 2015 मध्‍ये यांतून मागे फिरत 2022 पर्यंत 2 कोटी घरे बनवण्‍याची घोषणा केली, म्‍हणजेच दरवर्षी 30 लाख घरे बनवणे होय. पण लगेच जूलै 2016 मध्‍ये लक्षात आलं की 1 वर्षात फक्‍त 19255 घरेच बनलीत. अशाच तऱ्हेने दरवर्षी 2 कोटी नवे रोजगार निर्माण करण्‍याचा दावा सुद्धा उघडा पडतो. बेरोजगारीचा दर मागच्‍या वर्षीच्‍या तुलनेत सतत वाढत जाऊन 2015-16 मध्‍ये 7.3 टक्‍के पर्यंत पोहचला. देशांतील तब्‍बल 30 कोटी लोकं बेरोजगारीचे धक्‍के खातं आहेत. जनतेच्‍या सोयी-सुविधांमध्‍ये सातत्‍यानं कपात केली जात आहे, तर बड्या श्रीमंताचे अरबो रूपयांचे कर्ज ‘राइट ऑफ’ (वास्‍तवत: माफ) केले जात आहेत. जनतेला भटकवण्‍यासाठी तमाम तऱ्हेची नाटकं केली जात आहेत. नोटबंदीच नाटक अगदीच ताज आहे. बिकावू मीडियाने याचे खुप कौतुक सोहळे केले पण ‘ऑल इंडिया मॅनुफैक्‍चरींग आर्गनायझेशनच्‍या’ सर्वेनुसार नोटबंदीनंतर लगेच 34 दिवसांमध्‍येच जवळजवळ 35 टक्‍के श्रमिकांना आपली उपजिवीका गमवावी लागली होती. मार्च 2017 पर्यंत तर हा आकडा 60 टक्‍के पर्यंत पोहचला असणार असा अंदाज आहे. नव्‍या नोटा छापण्‍यासाठी तब्‍बल 15 ते 20 हजार कोटी रू. खर्च येणार. जगजाहीर आहे की जनतेलाच हा भार सोसावा लागणार. मोदीने सत्‍तेवर येताच, उरल्‍यासुरल्‍या पब्लिक सेक्‍टरलाही लुटारूंना विकायला सुरूवात केली. (अर्थात स्‍वातंत्र्यनंतर जसा आर्थिक विकासाचा मार्ग आपण स्विकारला , त्‍याची हिच परिणीती होणार होती). स्‍टेशनवर चहा विकायच सोंग रचून आता स्‍टेशनच खाजगी क्षेत्रांत विकूण टाकले आहे. त्‍याची सुरुवात हबीबगंज रेल्‍वे स्‍टेशन (मध्‍यप्रदेश) पासून करण्‍यात आली आहेपुढे अजून 400 रेल्‍वे स्‍टेशन PPP (प्राइव्‍हेट पब्लिक पार्टनरशीप) च्‍या हवाली करण्‍याचा बेत आहे. 
भगतसिंहाच स्‍वप्‍न, इलेक्‍शन नव्‍हे इंकलाब 
साथीनो, निवडणूकींतून ही परिस्थिती बदलणार नाही. गेल्‍या 65-66 वर्षांमध्‍ये आपण सतत या ना त्‍या सोंगाड्यांना निवडत आलोत. पण पळसाला पानं तीनच. सापनाथ जातो आणि नागनाथ येतो. जर निवडणूकीतून काही बदलणार असतं तर इतकी वर्षे खुप होती. वास्‍तवत: संपूर्ण व्‍यवस्‍थाच अशी आहे की जिच्‍यात सामान्‍य माणसाचं भलं कधीच होऊ शकत नाही. हे एका उदाहरणांतून समजून घेऊयात. आताच उत्‍तर प्रदेशच्या निवडणूकां झाल्‍या आणि भाजपा सर्वात मोठी पार्टी म्‍हणून समोर आली. निवडूण आलेल्‍या पैकी जवळ जवळ 116 जणं हे गुन्‍हेगार पार्श्वभूमीचे आहेत. सोबत 253 जण करोडपती आहेत. खरंतर प्रत्‍येक विधानसभा परिक्षेत्रात लाखो लोक असतात, तरी इच्‍छा असूनही एक ही सामान्‍य माणूस निवडणूक लढवू शकत नाही. निवडणूक लढवतात ते फक्त पैसेवाले, गुण्‍ड, माफिया आणि त्‍यांना मदत करतात भांडवलदार, ठेकेदार, मोठे व्‍यापारी. त्‍यामुळे कुठलीही पार्टी असो, अशी अपेक्षाच व्‍यर्थ आहे की ती सामान्‍य लोकाचं काम करेल. ती सर्वप्रथम अशाचं लोकांसाठी काम करेल ज्‍यांनी निवडणूकींत त्‍यांच्‍यासाठी पैसा ओतला होता. मग जर अशी माणसं निवडून जातील तर मग नियम-कायदे सुद्धा श्रीमंतांच्‍याच हीताचे बनवतील. हेच कारण आहे की श्रीमंत अजून श्रीमंत होतोय तर गरीब अजून गरीब होत चाललाय. ही नोकरशाही, न्‍यायालये, नेताशाही सगळे श्रीमंतांच्‍या हीतासाठी काम करत असतात. त्‍यामुळे या यंत्रणेकडून जनतेनं काही अपेक्षा करने निरर्थक आहे. भगतसिंह म्‍हणाला होता, “प्रत्‍येक माणसाला आपल्‍या श्रमाचे फळ उपभोगण्‍याचा पूर्ण अधिकार आहे आणि प्रत्‍येक राष्‍ट्र आपल्‍या नैसर्गिक साधनसंपत्‍तीचे पूर्ण मालक आहे. जर कोणतेही सरकार जनतेला तिच्‍या या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवत असेल, तर असे सरकार नष्‍ट करणे हा जनतेचा केवळ अधिकारच नव्‍हे, तर तिचे ते आवश्‍यक कर्तव्‍यदेखील बनते.”
मीडियाला लोकशाहीचा चौथा खांब म्‍हटले जाते. पण मीडिया लूटीच्‍या तंत्राचा चौथा खांब बनुन काम करत आहे. याचा अर्थ असा आहे की मीडिया बड्या  श्रीमंताच्‍या ताब्‍यात आहे. जसे, झी न्‍यूज भाजपाचा राज्‍यसभा सदस्‍य सुभाष चंद्राचा आहे, हिंदुस्‍तान पेपर बिरलाचा आहे, राष्‍ट्रीय सहारा सुब्रत रॉय चा आहे इत्‍यादी. या चॅनल आणि पेपर कडून काय अपेक्षा ठेवणार, काय ही माध्‍यमे जनतेला सत्‍य सांगतील? वस्‍तुंच्‍या जाहीरांतीसाठी अश्‍लीलता, उथळपणा, चित्रपटांच्‍या नावाने मारामारी, कार्य्रकमांच्‍या नावाखाली पुढाऱ्याची प्रतिमा  उजळवून घेणं, सांप्रदायिक घटनांना असे दाखवणे कि जणू जनतेमध्‍ये वाढती द्वेष भावना एक सामान्य बाब झाली आहे. मीडियाची काही एक विश्‍वासार्हता आज शिल्‍लक राहीली नाही. 
फासीवादाचा उन्‍मा
आज सारी दुनिया आर्थिक संकटातून जात आहे. या संकटाच्‍या पायावरच सर्व जगभरात व आपल्‍या देशांतही फासीवादाचे संकट जोरावर आहे. हिटलर आणि मुसोलिनीने रचलेल्‍या विनाशलीले नंतर पहील्‍यांदाच सगळं जग फासीवाद व त्‍याची भयावहता अनुभव आहे. खरं तरं भांडवलदारांद्वारे निर्माण केले गेलेल्‍या आर्थिक संकटांतून जेव्‍हा कष्‍टकऱ्यांच्‍या कष्‍टाच्‍या लूटीचा दर घसरू लागतो तेव्‍हा, लुटीला कायम ठेवण्‍यासाठी ते अशा शकतीला मजबूत करतात जी जनतेच्‍या शोषणासाठी अगदी निर्ल्लज्‍जपणे त्‍यांची मदत करू शकतील.
जनतेच्‍या असंतोषाला गाडून टाकण्‍यासाठी फासीस्‍ट अनेक हातखंडे वापरतात. ते भांडवली शोषणाला लपवण्‍यासाठी ‘विकासा’चा ढोल बडवतात, ‘चांगले दिवस आणण्‍या’ सारखा जोरदार प्रसार करतात. सोबत जनतेपुढं वंश, धर्म आणि “राष्‍ट्र” आदींच्‍या नावावर एक ‘खोटा शत्रु’ उभा करतात. जसा हिटलरने भांडवली लूटीमुळं बरबाद झालेले बेरोजगार युवक,निम्‍न मध्‍यमवर्ग, छोटे व्‍यापारी-उद्योगपती इतकच नव्‍हे तर कामगार-शेतकऱ्यांच्या एका मोठ्या संख्‍येच्‍या मागास जाणीवांचा फायदा घेत, त्‍यांना या आधारावर संघटीत करण्‍यात यश मिळवलं की सगळ्या संकटांचे मूळ यहुदी लोक आहेत. हिटलर सत्‍तेच्‍या प्रत्‍येक भागावर नियंत्रण मिळवायला यशस्‍वी झाला होता. त्‍यानंतर फासीस्‍टांनी विनाशाचा तांडव करायला सुरुवात केली तेव्हा सुशिक्षीत वर्गाच्‍या एका विभागाला, निम्‍न मध्‍यमवर्गाला आणि छोट्या व्‍यापाऱ्यांना हे कळून चूकलं की हिटलर फक्‍त बड्या उद्योगपतींची सेवा करत आहे. पण तोवर खुप उशीर झाला होता. भारतात हेच काम संघ परिवार करत आहे. संघ परिवाराच्‍या संस्‍थापक सदस्‍यांपैकी एक मुंजे,  फासीवादी कार्यपद्धती शिकण्‍यासाठी इटलीचा फासीवादी नेता मुसोलीनीला भेटला होता. संघाच्‍या गोळवळकर ने आपले पुस्‍तक ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्‍ये हिटलरची चांगलीच प्रशंसा केली आहे. संघ परिवार येणकेन प्रकारे मुस्‍लीमांना हिंदूच्या शत्रूच्‍या रूपात सादर करत असतो. युद्धोन्‍माद भडकवत राहतो. समाजातील तथाकथित शिक्षीत वर्गाचा एक मोठा विभाग भरकटलेल्या अवस्थ्‍ोत आहे. तो इतिहासानं दिलेली ही शिकवण विसरलाय की युद्धांत नेहमी जनताच बरबाद होते. संघ परिवाराचे राजकीय संघटन भाजपा, मोदीच्‍या नेतृत्‍वांत, जेव्‍हा श्रीमंताचा फायदा सुरक्षित ठेवण्‍यासाठी जनतेला मिळणाऱ्या सबसिडीला एक एक करत बंद करत आहे आणि त्‍याचा विरोध करणाऱ्या संघटनांना देशद्रोही, आईएसआई एजंट इत्‍यादी ठरवल जातय. या कामी मीडियासुद्धा जोरदार साथ देत आहे. त्‍यांच्‍याशी संबधीत संघटना प्रगतीशील विद्यार्थी व बुद्धीजीवींवर हल्‍ले करत आहेत. मात्र आताच मध्‍यप्रदेशांत भाजपाच्‍या आयटी सेलचा सदस्‍य आईएसआईशी संबंध असल्‍यामूळे पकडला गेला, पण यावर मीडिया आणि सर्व “देशप्रेमी” गप्‍प आहेत. अनेक पाठ्यक्रमात ब्राम्हण्‍यवादी विचारांना खतपाणी घातलं जातय. तरुणांना याच्‍या विरोधात आता लढावच लागेल, नाहीतर देश एका भयानकतेच्‍या दिशेने पूढे जात राहील.

मित्रांनो, भगतसिंह आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांकडून प्रेरणा घेऊन आपण उठून उभं रहायला हवं. आम्‍ही सर्व न्‍यायप्रिय नागरीक, कष्‍टकऱी आणि विद्यार्थी-युवकांकडे  हात  पुढे करत आहोत. देशांत एक नवी सुरुवात झाली आहे, भगतसिंहानी सुरू केलेल्या’’नौजवान भारत सभेला’ पुन्‍हा जीवंत केलं गेलय. देशांतील कित्‍येक विश्‍वविद्यालये, कॉलेजमध्‍ये आम्‍ही याच आदर्शांना घेऊन क्रांतीकारी विद्यार्थी संघठना बनवत आहोत. कष्‍टकऱ्यांमधेही काम सुरु केल आहे. स्‍त्रीयां व जागरूक नागरिकाचे मंच व संघटना प्रत्‍येक ठिकाणी संगठीत करत आहेत. दिशा जर योग्‍य असेल, संकल्‍प मजबूत असतील आणि विचार विज्ञाननिष्‍ठ असतील तर हवेची झुळूक वादळात परावर्तीत व्‍हायला वेळ लागत नाही. जर तुम्‍ही अजून मुर्दाड झाले नसाल ,जगणं आणि लढणं ही जगण्‍याची रीत बनवण्‍याची तयारी असेल ,तर आमच्‍याशी जरूर संपर्क करा