Translate

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०१५

मरने के बाद आदमी का क्या रह जाता है?

मरने के बाद आदमी का क्या रह जाता है?

मरने के बाद आदमी का क्या रह जाता है? अमृता प्रीतम यांच्या कोरे कागज पुस्तकातली पहिली ओळ.. आर.आर.पाटील अर्थात आबा गेल्यानंतर पहिल्यांदा आठवली.. ‘मरने के बाद आदमी का क्या रह जाता है?’ शांतपणे विचार केल्यानंतर समजलं बरंच काही राहून जातं.

आबा मूळचे अंजनीचे. जन्म 1957 सालचा. 4 एकर शेती. तीसुद्धा त्या काळात कोरडवाहूच. घरची गरीबी. किती टोकाची..?

“तर आबांचा शर्ट फाटला होता. सुई-दोरा घेऊन ते आईकडे गेले, आणि म्हणाले की हा शर्ट कसातरी शिऊन दे. शर्टची अवस्था बघून आई म्हणाली आता कुटं शिवायचा? एकच शर्ट असल्यानं अंगावर काय घालायचं हा प्रश्न होताच. तेवढ्यात सहज आबांची नजर वर गेली. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कपडे गाठोड्यात बांधून ठेवले होते. जुने कपडे आबांनी टेलरकडे नेले. गावातल्या टेलरनंही हे कपडे आबांच्या वडिलांचे असल्याचं लगेच ओऴखलं. त्याच्याकडून आबांनी सगळे कपडे अल्टर करुन घेतले. आपल्याकडे मेलेल्या माणसाचे कपडे खरंतर घालत नाहीत. पण देवाघरी गेलेल्या वडिलांचे कपडे घालून आबा घरात आले, तेव्हा आईला डोळ्यातलं पाणी रोखता आलं नाही. त्याही परिस्थितीत मुलांनी शिकावं म्हणून आई आग्रही होती” ( मी कसा घडलो.. या आबांच्या जीवनचरित्रातून )
इतकी टोकाची गरिबी असतानाही आबा शांतीनिकेतन कॉलेजातून बीए झाले. पुढं एलएलबी झाले. याच काळात म्हणजे वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी आबांनी जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली. त्यावेळी आबांच्या अंगावर ना नीट कपडे होते, ना पायात चप्पल. पण प्रामाणिक स्वभाव, स्वच्छ चारित्र्य आणि गोरगरिबांविषयीची तळमळ या एकाच धाग्यामुळं आबा पुढं 12 वर्ष सावळज गटातून झेडपीवर निवडून जात होते.

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि झेडपी त्यातही सांगली जिल्ह्यातलं पाणीदार राजकारण ज्याला माहिती आहे, त्याला हे किती महाकठीण काम आहे, याची कल्पना येईल.

आबांनी राजकारण केलं, पण तेही घरंदाज पद्धतीनं. छक्केपंजे, काटाकाटी, कटकारस्थानं या मळलेल्या वाटेला न जाता आबा प्रामाणिकपणाला चिटकून राहिले. त्यामुळं वसंतदादांनी आणि त्यांच्या पश्चात शरद पवारांनी आबांना कधीही अंतर दिलं नाही.

पुढं 1990 साली आबा पहिल्यांदा विधानसभेवर गेले. तेव्हाही दोन जोडीपेक्षा जास्त कपडे आबांकडे नव्हते. पण आपण गरीब आहोत, म्हणून आबांनी कधी स्वत:ला कमी लेखलं नाही. गरिबी आणि प्रामाणिकपणा ही आबांची ताकद होती. गमावण्यासारखं काही नसल्यानं आबांवर कधी खजिल होण्याची वेळ आली नाही. पण संधी मिळाली तेव्हाही कधी ओरबाडण्याचा मोह झाला नाही. इथं त्यांच्यावरच्या संस्कारांचा पाया किती मजबूत आहे हे दिसतं.
मुख्यमंत्रीपदावर जोशी असोत की राणे किंवा आणखी कुणी.. आबा सरकारच्या चुकांवर बोट ठेवत राहिले. पण तसं करतानाही कुणाच्या वैयक्तिक आयुष्यावर आबा घसरले नाहीत. विरोधकांवर टीका करणं आणि त्यांना अपमानित करणं यातला फरक त्यांनी कायम राखला.

आजकाल पंचायत समितीवर गेलेल्यांच्या दारात वर्षभरात इनोव्हा आणि फॉर्च्युनर उभी राहते. आणि कालपर्यंत चहाला महाग असलेले नेते करोडोशिवाय बोलत नाहीत त्यांनी जरा आबांकडे बघायला हवं.

आबा पहिल्यापासून व्याप असलेला माणूस, कलंदर, डोक्यात कायम चक्री चालू. त्यामुळंच ग्रामविकास मंत्री झाल्यानंतर आबांनी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु केलं. म्हणजे 1999 साली. मोदींच्या आधी जवळपास 15 वर्ष. त्यातून आबांचा गाढा अभ्यास आणि व्हिजन दिसलं. गावागावात चैतन्य संचारलं. गावं हागणदारीमुक्त झाली. उकीरडे गावाबाहेर गेले. रोगराई हद्दपार झाली. बिडी-काडी-दारु बंद झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकीचं बळ गावांमध्ये दिसू लागलं. महाराष्ट्रात जे गेल्या 50 वर्षात झालं नव्हतं ते आबांनी करुन दाखवलं. केंद्रानंही ही योजना पुढं उचलून धरली.

2004 ला आबांवर पवारांनी उपमुख्यमंत्री आणि गृहखात्याची जबाबदारी टाकली. त्या काळात डान्सबार अर्थात छमछम जोरात सुरु होती. सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, नाशिकवरुन तरुण पोरं संध्याकाळी गाड्या करुन पनवेल, मुंबईला यायची. रात्रभर धुडगूस घालून, पैसे उधळून सकाळी पुन्हा गावात. यामुळं कित्येकवेळा अपघात व्हायचे. पोरं अकाली जायची. बारमधल्या पोरींच्या नादी लागून अनेकांचे संसार उध्वस्त व्हायचे. आबांकडे शेकडो तक्रारी आल्या. शेवटी आबांनी सगळा विरोध झुगारुन डान्सबारबंदीचा कायदाच केला. जीवानिशी मारण्याच्या धमक्या आल्या. कोर्टकचेऱ्या झाल्या. पण आबा बधले नाहीत. महाराष्ट्रातल्या हजारो आया-बायांचे संसार आबांनी वाचवले. 
राजकारण म्हटलं की उन्नीस-बीस, थोडं खाली थोडं वर आलंच. त्यामुळंच सर्वात वजनदार खात्यावर (गृह) आल्यावर आबांना पक्षातल्या मित्रांनीही बराच त्रास दिला. सांगली जिल्ह्यातही आबांना खाली खेचण्याचे, त्यांचं राजकारण धोक्यात आणण्याचे प्रयत्न झाले. पण आबांनी त्याला कधीही आक्रस्ताळेपणानं उत्तर दिलं नाही. ना कधी आदळआपट केली अथवा मीडियासमोर भडक विधानं करुन ड्रामा केला. आबा शांत राहिले. लोकांमध्ये राहिले. ज्यांच्यामुळं ते इतक्या मोठ्या पदावर पोहोचले त्यांच्याच हातात आबांनी स्वत:ला सोपवलं. त्यामुळंच विरोधकांनी पैशाचा पाऊस पाडला, स्वकियांनी हातमिळवणी केली, तरी आबांना पाडणं काही त्यांना जमलं नाही.

मधल्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस मराठ्यांचा, सरंजामशाही नेत्यांचा, पैशेवाल्यांचा, भ्रष्टाचाऱ्यांचा, कंत्राटदारांचा, गुंडांचा पक्ष अशी प्रतिमा तयार झाल्यानंतरही आबा मात्र त्या चिखलात कमळासारखे वेगळे राहिले. अगदी बाबा आमटेंनीही आबांची स्तुती केली. अण्णा हजारेंनी तर आबांचा जाहीर प्रचार केला. तो आबांच्या स्वच्छ, पारदर्शी, प्रामाणिक प्रतिमेचा गौरव होता.  

“मुंबई हल्ल्यानंतर बडे बडे शहरो में छोटी छोटी बाते होती रहती है” या वादग्रस्त वक्तव्यानं संताप उसळला. आबांना राजीनामा द्यावा लागला. त्याच दिवशी आबा सरकारी बंगला सोडून थेट अंजनीला आले. 15 वर्षात आबांनी कधीही आपल्या कुटुंबाला मलबार हिलची हवा लागू दिली नाही. आबा लोकांसाठी मुंबईत झटत राहिले. आणि त्यांची आई-पत्नी शेतात राबत राहिल्या. मुलं झेडपीच्या शाळेत शिकत होती. ठरवलं असतं तर मुंबईत कुठंही सी-फेसला वगैरे आबांना टोलेजंग फ्लॅट-बंगला घेणं शक्य होतं. पण तो मोहसुद्धा आबांना झाला नाही. 
आबांनी ना कुठला कारखाना विकत घेतला, ना कुठली शिक्षण संस्था काढली, ना कुठं कंत्राटं घेतली. ना बिल्डरांसोबत पार्टनरशिप केली. नाही म्हणायला तासगावात एक सूतगिरणी सुरु केली. तीसुद्धा लोकांना रोजगार मिळावा म्हणून.

आबा राजकारणात UNFIT होते. त्यांनी राजकारण केलं ते गरजेपुरतं. एरवी कार्यकर्त्यासारखे राहिले.

आज आबा गेल्यानंतर अर्थात ‘मरने के बाद’ काय शिल्लक राहिलं..? तर साधेपणा हा यूएसपी असू शकतो हा विश्वास, गरिबी कमजोरी नव्हे तर ताकद आहे याची जाणीव, प्रामाणिकपणाचा दर्जा पैसा-पदापेक्षा मोठा आहे यातलं सच्चेपण ग्रामीण भागातील लाखो गोरगरीब कुटुंबातील तरुणांच्या मनावर कायमचं ठसलं. स्विस बँकेतल्या वजनदार बँक अकाऊंटपेक्षा आबांचं अकाऊंट मरने के बाद जास्त आबाद आहे, यापेक्षा आणखी काय राहायला हवं?

अँड्रॉईड हॅकर्स

सध्या जगभरात अँड्रॉईड फोन युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र त्याचवेळी हॅकर्सची संख्याही वाढतानाच दिसत आहे.

2014 पर्यंत जगभरात विक्री झालेल्या मोबाईल्सपैकी 80 टक्के मोबाईल अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे होते असं समोर आलं आहे. जगभरात अँड्रॉईड मोबाईल्सना ग्राहकांची पसंती असतानाच, हॅकर्सही या संख्येने मोठ्या असलेल्या युझर्सना गंडा घालण्याच्या तयारीत  आहेत.

तुम्हीही अँड्रॉईड फोन वापरत असाल, तर तुमचा फोन आणि डेटा हॅकर्सपासून कसा सुरक्षित ठेवायचा? त्याबाबत काही टिप्स

हॅकर्सची अँड्रॉईडलाच पसंती का?

रशियाच्या एका सायबर सुरक्षा कंपनीच्या मते, हॅकर्स हॅकिंगबाबत विचार करताना तीन बाबींकडे लक्ष देतो

1 – सर्वाधिक मोबाईल युझर्स कोणती ऑपरेटिंग सिस्टिम (ओएस) वापरतात
2 – ओएसच्या प्रोग्रामबाबत दस्ताऐवज उपलब्ध आहेत की नाही.
3 -  यामध्ये काही त्रुटी, कमतरता आहे की नाही.

अँड्रॉईड मोबाईलमध्ये सर्वाधिक अॅप डाऊनलोड आणि इंस्टॉल करता येतात. त्यामुळेही हॅकर्सनी अँड्रॉईड मोबाईल्सना लक्ष्य केलं आहे.

अँड्रॉईड मोबाईल अॅप


काळजीचं कारण का?

बँक अकाऊंटमधून पैसे चोरी, पर्सनल डेटा, फोटो, व्हिडीओ यांची चोरी करण्याचा हॅकर्सचा हेतू असतो. त्यामुळेच सायबर सुरक्षा तज्ज्ञांसाठी ही डोकीदुखी ठरली आहे.

कॅमेरा आणि माईकद्वारेही हॅकिंग?

कॅमेरा, माईक यासारख्या फिचर्सद्वारेही अँड्रॉईड मोबाईल हॅक केले जाऊ शकतात, असं मोबाईल सुरक्षा कंपनी कूलस्पॅनचे सीईओ ग्रेग स्मिथ यांनी 2013 मध्ये फोर्ब्सला सांगितलं होतं. चिंतेची बाब म्हणजे यासारखे हॅकिंग टूल सहजासहजी ऑनलाईन उपलब्ध आहेत.

काही सॉफ्टवेअर जे अॅपसारखी दिसतात, त्याद्वारे अनेक अँड्रॉईड युझर्सना गंडा घालण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे असे सॉफ्टवेअर्सही मोफत उपलब्ध आहेत.

कोणत्या अॅपचा धोका?

तुमचे SMS वाचणारे, तुमच्या खर्चाच्या हप्त्यांचे SMS पाठवणारे अॅप धोकादायक आहेत.  त्यांची संख्या सध्या वाढत आहे. मात्र आता हॅकर्स तुमच्या फोनमधील बँक पासवर्ड चोरणारे बँकिंग अॅपही बनवत असल्याचं समोर आलं आहे.

हॅकर्स हे युझर्सना व्हायरसवाले अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळेच हॅकर्सचं काम सोपं होतं.

फ्री आणि अश्लिल व्हिडीओ अॅप

प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या फ्री आणि अश्लिल व्हिडीओसारख्या अॅपद्वारे हॅकर्स युझर्सना सहज गंडवू शकतात. यासारखे अॅप हे हॅकिंगसाठीच बनवले जात असल्याचंही सायबर सुरक्षा तज्ज्ञ सांगतात.

काय काळजी घ्यावी?

1. ‘काहीही’ डाऊनलोड करू नका

तुमच्या मोबाईलवरून कोणतंही अॅप डाऊनलोड करताना योग्य कंपनी आणि वेबसाईटवरूनच डाऊन करा. काही विशेष अॅप लाँच झाल्यानंतर आपल्यापैकी बहुतेकजण ते अॅप त्वरीत डाऊनलोड करतात. मात्र काही वेळा हॅकर्सनी रचलेली ती चाल असते. त्या अॅपद्वारे तुमचा फोन आणखी कोणी व्यक्ती वापरत असल्याचं तुम्हाला माहितही होणार नाही.

2. परमिशन/ परवानगी पेज लक्ष देऊन वाचा

कोणतंही अॅप डाऊनलोड करताना आपण बेधडक YES म्हणून अॅक्सेप्ट करतो. मात्र त्याआधी अॅपबाबत देण्यात आलेली पॉलिसी आपण अजिबात वाचत नाही.

काही अॅप तुमचं फोनबुक वाचण्याची परवानगी मागतं, मात्र आपण ते न वाचता YES म्हणतो, आणि तिथे फसवणूक होते. त्यामुळे असे अॅप इन्स्टॉल करू नका.

3. बॅकअप जरूर ठेवा

तुमच्या फोनमधील डाटाची जबाबदारी तुमचीच असते. त्यामुळे हा डाटा सांभाळून ठेवणे गरजेचं आहे. म्हणूनच या डाटाचा बॅकअप घेऊन ठेवा.

4. गुगल –फ्री अँड्रॉईडबाबत विचार करा

अँड्रॉईड फोन खरेदी केल्यानंतर ते गुगलसोबत करारबद्ध होतात, याची माहिती ग्राहकाला नसते.
कोणतंही त्रयस्त अॅप इन्स्टॉल न करणं हे ग्राहक/युझर्सच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. मात्र थर्ड पार्टी अॅप/ त्रयस्त अॅप इन्स्टॉल करणे अँड्रॅईडमध्ये सहज सोपं असतं.

5. अपडेट करत राहा

कोणतंही एक सॉफ्टवेअर, अॅप हे एका दिवसात तयार होत नाही. त्याची सातत्याने चाचणी घ्यावी लागते. त्यामध्ये अनेकवेळा त्रुटीही असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही एखादं अॅप इन्स्टॉल केलं असेल,  आणि काही काळानंतर कंपनीला त्या अॅपबाबत त्रुटी आढळल्यास, कंपनी अपडेट जारी करतं.

हे अपडेट करणं आवश्यक आहे. अॅप अपडेट करणं मोफत आहे.

अँड्रॉईडचे विविध व्हर्जन पाहता, जुन्या ओएसच्या तुलनेत गुगलचं सध्याचं 5.0 लॉलीपॉप सर्वात सुरक्षित आहे. काही अँड्रॉईड कंपन्या अपडेट जारी करत नाहीत. त्यामुळे युझर्सना धोका असतो.

6. इन्क्रिप्शनचा वापर करा

तुमच्या फोनवर पूर्ण डिव्हाईस इन्क्रिप्शनचा वापर करा. सध्याच लाँच झालेल्या सॅमसंग, एलजी, एचटीसी, अॅपल आणि ब्लॅकबेरी स्मार्टफोनमध्ये (अॅपल आणि ब्लॅकबेरी अँड्रॉईडचा वापर करत नाही) याप्रकारची सुविधा आहे.

जर तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये अशी सुविधा नसेल तर इन्क्रिप्शन अॅपचा वापर करा.

7. असुरक्षित वाय-फायपासून सावधान

सध्या अनेक ठिकाणी वाय-फाय नेटवर्क उपलब्ध आहे. मात्र म्हणून त्याचा बेधडक वापर करू नका. त्याच्या सुरक्षिततेबाबतची योग्य माहिती तुम्हाला नसेल, तर फुकटचं वाय-फाय वापरू नका.

तसंच बँक अकाऊंट नंबर, क्रेडिट/डेबिट कार्ड पासवर्ड याबाबतची माहिती सार्वजनिक वाय-फायवर शेअर करू नका.

8. अँटी व्हायरस आवश्य ठेवा

इंटरनेटचा वापर करताना फोन सुरक्षित ठेवण्यासाठी अँटी व्हायरस असणं आवश्यक आहे, याबाबतची माहिती सर्वांनाच आहे. हा अँटी व्हायरस वेळो-वेळी अपडेट करणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे नव्या धोक्यांना सामोरं जाण्यास तुमचा अँटी व्हायरस सज्ज असेल.