Translate

गुरुवार, १६ एप्रिल, २०१५

चॅप्लिनविषयी, त्याच्या सिनेमातील तसेच त्याने मानवजातीला दिलेल्या योगदानाबद्दलचे विशेष लेख..

१६ एप्रिल रोजी जगप्रसिद्ध अभिनेता चार्ली चॅप्लिन यांची १२५ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने चॅप्लिनविषयी, त्याच्या सिनेमातील तसेच त्याने मानवजातीला दिलेल्या योगदानाबद्दलचे विशेष लेख..
जागतिक रंगभूमीवर शेक्सपीअरचं जे स्थान आहे तेच जागतिक सिनेमात चार्ली चॅप्लिनचं आहे. चॅप्लिनने आपल्या सिनेमांच्या माध्यमातून एका नव्या युगाची, वास्तववादाची सुरुवात केली. त्यातही वैशिष्टय़पूर्ण असं की, चॅप्लिनने त्याच्या आधीच्या कुणाचीही नक्कल केली नाही की कुणाचा कित्ता गिरवला नाही. त्यानं आपली शैली पूर्णपणे स्वतंत्ररीतीनं घडवली. त्याची सिनेमॅटिक भाषा कुठल्याही संस्कृतीतल्या आणि कुठल्याही काळातील लोकांना आवडेल, त्यांच्या हृदयाला भिडेल अशीच होती.. आहे. शेक्सपीअरचं मोठंपण असं सांगितलं जातं की, त्याची नाटकं कुठल्याही संस्कृतीतल्या आणि कुठल्याही काळातल्या लोकांना आवडतात, भावतात; तसंच चॅप्लिनच्या सिनेमांचंही आहे. बरेच महान फिल्ममेकर्स हे शब्दांवर अवलंबून असतात. पण शब्दांशिवायही सिनेमा किती प्रभावी आणि उत्कृष्ट असू शकतो याचं अगदी टोकाचं उदाहरण म्हणजे चॅप्लिनचे सिनेमे. चॅप्लिनची त्याच्या काळातल्या समाजाची व तत्कालीन राजकारणाची समज व्युत्पन्न अन् व्यामिश्र होती. कमालीचा समजूतदारपणा त्याच्याकडे होता. त्याचं यश हे सामान्य हीरो-हीरोइन्ससारखं नसून ते त्यानं अत्यंत कष्टानं, खूप मेहनतीनं मिळवलं होतं. त्यासाठी त्याला स्वत:च्या मूळ रूपाचा संपूर्ण कायापालट करावा लागला. चॅप्लिनचं वास्तव जीवन आणि सिनेमातील चॅप्लिन हे पूर्णपणे वेगळे होते.
आणखीन एक विलक्षण गोष्ट. चॅप्लिनची नक्कल आजवर अनेकांनी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यापैकी कुणीही त्याच्या जवळपासही पोहोचू शकलेलं नाही. दुसरा चॅप्लिन अजून जगात निर्माण झालेला नाही.. यापुढेही होईल असं वाटत नाही. चॅप्लिन उत्कृष्ट नकलाकार होता. पण त्याची नक्कल मात्र कुणालाही करणं शक्य झालं नाही. ती साधी असती तर ते शक्य झालं असतं. पण ती तशी नाही. त्याकाळच्या प्राचीन फॉर्ममधून चॅप्लिननं आपली सिनेमाची भाषा घडविली. फोटोग्राफी आणि व्हिडीओच्या माध्यमातून घडत असलेल्या भाषेपेक्षा ती पूर्णपणे वेगळी होती. स्वयंभू होती. सिनेमाची भाषा कॅमेऱ्यातून घडते, पण चॅप्लिनने आपल्या शरीराचा वापर करून आपल्या सिनेमाची भाषा घडविली. नाटकाचे जे जे क्लासिकल फॉर्मस् मानले जातात, त्या सर्वाचा चॅप्लिनच्या सिनेमात सुरेखपणे वापर केलेला दिसून येतो. 
चॅप्लिनची प्रश्न विचारण्याची, अर्थपूर्ण प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उभे करण्याची आणि त्यांना अस्वस्थ करण्याची क्षमता अफलातून होती, आहे. मार्क ट्वेनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे- 'द मोस्ट सिव्हिलाइज्ड वे टु बीकम सॅड इज टू लाफ.' ते चॅप्लिनच्या सिनेमांतून पूर्णत: उतरलेलं आहे. 
गुरुदत्त म्हटलं की 'कागज के फूल' आठवतो, तसा चॅप्लिनचा 'द ग्रेट डिक्टेटर' आठवतोच आठवतो. चॅप्लिनचे अनेक सिनेमे मी पाहिले. त्यातून मला बरंच शिकायला मिळालं. हुकूमशाहीविषयी मनात घृणा निर्माण झाली. हा चॅप्लिनच्या सिनेमाचा परिणाम आहे. पोटात काहीच नसेल तर बूट उकळून ते काटय़ा-चमच्यानं खाणं.. या दृश्यातून अंगावर शहारे येतात. गरीबांविषयीची आस्था आणि कणव चॅप्लिनच्या सिनेमातून सतत दृग्गोचर होते. चॅप्लिनने त्याच्या प्रत्येक सिनेमात मुखवटे फाडून टाकण्याचं काम केलं आहे. 
१९७५ च्या सुमाराची गोष्ट. मी तेव्हा इंग्लंडमधील लीड्स विद्यापीठात होतो. तिथे फिल्म क्लब होता. त्यात सतत सिनेमे दाखवले जात. या विद्यापीठात जगभरातून आलेले विद्यार्थी होते. रशियन, जपानी, चिनी, भारतीय.. या सर्व विद्यार्थ्यांचा आवडता हीरो होता चॅप्लिन. हे विद्यापीठ टेक्स्टाइल कामगारांचं होतं. लीड्स हे गिरणगाव होतं. गिरणी कामगारांनीच स्थापन केलं होतं. या विद्यापीठात स्टुडंट्स युनियनचा एक मोठा हॉल होता. त्याची ५० फूट लांबलचक भिंत होती. त्या भिंतीवर विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी काढलेली चॅप्लिनची वेगवेगळी चित्रं होती. दरवर्षी मुलं त्यात नवीन चित्रं काढत आणि त्यावर आपली सही करत. ही सर्व चित्रं काळ्या रंगानं काढलेली होती. प्रागतिक, डावे, गरीबांचे सहानुभूतीदार आणि हुकूमशाहीच्या विरुद्ध असलेल्या या विद्यार्थ्यांचं चॅप्लिन हे दैवत होतं. 
जगभरच्या सिनेमाप्रेमींचा आवडता हीरो जेम्स बाँड आहे; पण खऱ्या अर्थानं जगभरच्या सिनेमाप्रेमींच्या मनावर राज्य मात्र चॅप्लिननंच केलं. त्याला अजूनपर्यंत तरी कुणीही आव्हान देऊ शकलेलं नाही. चॅप्लिन सिनेमाप्रेमींच्या मनाचा अनभिषिक्त राजा, सम्राट आहे. चॅप्लिनला मी शेक्सपीअर, डान्टे, ज्ञानेश्वर यांच्या मालिकेत बघतो. 
लॉरेल हार्डी आणि चॅप्लिनच्या विनोदात मूलभूत फरक आहे. हार्डीचा विनोद हा गमतीशीर, हलकाफुलका आणि थोडासा शरीरत्वावर आधारलेला आहे. याउलट, चॅप्लिनचं आहे. त्याचा विनोद हा विनोद नाही, तो उपहास आहे.. विडंबन आहे. वेदना आणि विनोद चॅप्लिनच्या सिनेमांतून वेगळे करताच येत नाहीत. हार्डीने कॉमेडी सादर केली, तर चॅप्लिनने वास्तववाद सादर केला. ती कॉमेडी नाही की गंमत नाही.
माझी चॅप्लिनभक्ती आंधळी आहे. तो माझ्यासाठी कायमच 'आयडल', हीरो राहिलेला आहे. चॅप्लिनच्या या वास्तववादाचा मला मराठी-हिंदीमधील साहित्य आणि सिनेमामध्ये प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षही प्रभाव दिसत नाही. आणि हे माझ्यासाठी कायम कोडं बनून राहिलेलं आहे. दुर्दैवानं आपल्या देशात चॅप्लिनच्या वास्तववादाचा स्वीकार केला गेला नाही. इटालियन सिनेमावर चॅप्लिनचा मोठा प्रभाव आहे. काही प्रमाणात फ्रेंचवरही आहे. काही वर्षांपूर्वी मराठीतील प्रख्यात कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी एका परिसंवादात म्हटलं होतं की, 'चॅप्लिनचा वास्तववाद आपल्याला परवडत नाही. कारण भावनिकतेशिवाय सिनेमा बघणं आपल्याला आवडत नाही.' खरं तर चॅप्लिनचा वास्तववाद आपल्याला पेलवत नाही. कथा, कादंबरी, कविता, नाटक कुठलाही प्रकार घ्या, त्यातून हेच दिसून येतं. शेक्सपीअर जसा नाटकातला देव आहे, तसाच चॅप्लिन सिनेमातल्या वास्तववादाचा देव आहे.
चॅप्लिन ज्या काळात कलाकार म्हणून उदयाला येत होता, त्या काळात रशियन, फ्रेंच आणि इंग्रजी साहित्य खूप संपन्न होतं. या भाषांतील नाटकही संपन्न होतं. चॅप्लिनची पाळंमुळं त्यात रुजलेली आहेत. त्याला या साहित्य-नाटकांतून खतपाणी मिळालं आहे. त्यातून चॅप्लिननं स्वत:ला घडवलं. रशियन राज्यक्रांतीचा प्रभाव तत्कालीन आणि त्यानंतरच्या सर्वावर पडला. तो कुणालाच टाळणं शक्य नव्हतं. कारण त्यातून राज्यव्यवस्थेत मोठा बदल झाला. तो बदल, संघर्ष आणि तणाव यांतून चॅप्लिननं आपल्या कलेचं रसायन घडवलं. त्यावेळच्या परिस्थितीत मानवतावादी, पण प्रगतिशील; स्वप्नाळू, पण अहिंसक विचार जगभर निर्माण होत होता. त्यामुळेच तो चॅप्लिनने आपल्या सिनेमातून पुढे आणला. हे चॅप्लिनसारख्या थोर कलाकारालाच शक्य होतं.
चॅप्लिनचा सिनेमा विधानांचा नाही; तो सादरीकरणाचा आहे. तो 'इंडिव्हिज्युअल्स'चा नाही, तर संपूर्ण समाजाचा आहे. अनेक बाजूंनी एका वस्तुस्थितीकडे पाहून प्रश्न विचारण्याची कला चॅप्लिननं आत्मसात केली होती. 
मानवतावाद, प्रश्न विचारणं, व्यंग आणि उपहास ही चॅप्लिनची हत्यारं भविष्यात आपल्या खूप उपयोगी पडणार आहेत. येत्या काही दिवसांत आपल्या देशात हुकूमशाही येऊ घातली आहे. त्या काळात चॅप्लिनच्या हत्यारांचा प्रभावीपणे वापर केला तर आपण त्याचा योग्य प्रकारे सामना करू शकू. कारण शोषित व दडपले गेलेल्यांना जगण्यासाठी सगळ्यात मोठी कोणती शक्ती उपयोगी पडते, तर ती रेवडी उडवणं! ती असेल तर तलवारीचीही गरज राहत नाही. हुकूमशाही सत्तेशी झगडायचं असेल तर त्या सत्तेची रेवडी उडवत राहणं, हा सर्वोत्तम पर्याय असतो. चॅप्लिन इज ग्रेट पोलिटिकल वेपन फॉर द ऑप्रेस्ड पीपल