आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे.
सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणतात. माई मुळच्या विदर्भातल्या, वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वाळण्याचं काम करायचे. नवरगाव हे अतिशय मागासलेले, शहरी सुविधाचा स्पर्श नसलेले. कुणालाही शिक्षणाचा गंध नाही, अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात आले. चिंधी म्हणजेच सिंधुताई ही त्यांची सर्वात मोठी मुलगी. सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहिण आहे. मुलीनं शिकावे अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती पण आईचा मात्र सक्त विरोध होता म्हणुन माईंना गुर राखायला पाठवत असे. इकडे माई शाळेत जाऊन बसत. माई मुळच्या बुद्धिमान पण जेमतेम मराठीच शिकता आले. अल्पवयात लग्न झाले. चिंधा साठे ची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नाच्या वेळी माईचे वय होते अकरा वर्ष आणि नव-याचे वय तीस वर्ष. घरी प्रचंड सासुरवास आणि ढोर मेहनत करावी लागत असे. अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील पहिला संघर्ष केला. तेव्हा गुर वळणे हा त्यांचा व्यवसाय होता. गुर ही शेकड्याने असायची त्यांचे शेण काढता काढता कंबर मोडायचे. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात. पण त्या बद्दल त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही, म्हणून माईंनी बंड पुकारले. माई हा लढा जिंकल्या पण या लढ्याची किमत त्यांना चुकवावी लागली. बाईच्या या धैर्यामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली आणि गावक-यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले. याचा काटा काढण्यासाठी, माईच्या पोटातील मूल आपल असल्याच खोटा प्रचार दमडाजीने सुरु केला. यामुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. पतीने हकल्यानंतर गावक-यांनीही त्यांना हाकलून दिले. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या पण सख्या आईनेही पाठ फिरवली. पोट भरण्यसाठी भिक मागण्याची वेळ माईवर आली. परभणी-नांदेड-मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. त्या स्मशानात राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचा काय? एक मृत देह आला. अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले, चितेवरच्या निखा-यावर भाजले आणि कडक भाकरी केली व तशीच खाल्ली.
एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले त्यांना भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती.
निराश्रीतांच्या कल्याणसाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले आणि ममता पुण्याच्या सेवासदन मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईंनी काय केल असते ? ज्या मुलांना माई सांभाळणार होते ती मुलं पाणी पिऊन झोपली असती , पण ममताला पाहून माईची माया जागृत झाली असती आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते. पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता म्हणून माईंनी मुलीला दगडूशेट गणपतीच्या पायाशी घातले. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पसाठी स्थान निश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनसाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवाशी लोकांची बाजू शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. माई अजून एक लढाई जिंकल्या. अशा अनेक लढाया माई रोज लढतच असतात.
आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत सगळीच त्यांची मुले आहे. लेकीच्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचा नाव सपकाळ असते. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. ममताने ही एम.एस.डब्लू. केले आहे. ती आता माईचे काम पाहते. माईना आजवर १७२ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे.
माईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे... घेता घेता देणा-याचे हात घ्यावे.