Translate

सोमवार, ६ एप्रिल, २०१५

नामदेव महाराज का मेला !

घुमान. संत नामदेवजींचे गाव. मराठीशी असलेला या गावाचा संबंध बस एवढाच. नाही म्हणायला या गावातील काही लोक मराठवाडय़ात नरसीबामणीला नामदेवांच्या दर्शनासाठी येतात. पण ते तेवढेच. तेव्हा त्यांना मराठी साहित्याशी परिचय असण्याचे काहीच कारण नाही. आपल्या मराठी मातीतल्या अनेकांना त्याचा गंध नसतो म्हटल्यावर पंजाबातल्या शिखांकडून तशी अपेक्षा करणेही चूकच. तेव्हा या संमेलनातग्रंथविक्रीचे काय होणार हा मोठाच औत्सुक्याचा आणि प्रकाशक, ग्रंथविक्रेते यांच्या काळजीचा प्रश्न होता. त्यामुळेच मराठी प्रकाशक संघटनेने अगोदर घुमान साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. नंतर तो मागे घेण्यात आला. पण फारसे प्रकाशक काही इकडे फिरकलेच नाहीत. एरवी महाराष्ट्रात होणाऱ्या साहित्य संमेलनांमध्ये पुस्तकांची विक्री काही कोटी रुपयांच्या घरात जाते. तेथे प्रकाशकांची संख्याही २५०-३०० एवढी असते. या संमेलनात पुस्तकांची अवघी ४० दालने आहेत. 
साहित्य संमेलनांस जाणाऱ्या हौशा-नवशांना तसा एरवीही मुख्य मंडपांतील साहित्यिक परिसंवादांमध्ये तसा रस नसतो. जरा बडी नावे असतील, त्यात कुठे करमणूक होणार असेल तर मंडळी मंडपात थांबतात. नाही तर मग सरळ ग्रंथ प्रदर्शनास जातात. घुमानमध्येही काहीसे असेच वातावरण होते. बरेचसे लोक दुसऱ्या दिवशीचे कार्यक्रम टाळून अमृतसर, वाघा सीमा अशा ठिकाणी दर्शनास गेले होते. त्यामुळे ग्रंथ प्रदर्शनात गर्दी तशी कमीच होती. पण त्या गर्दीचे एक वैशिष्टय़ होते. त्यात मोठय़ा प्रमाणावर घुमान पंचक्रोशीतले शीख बांधव दिसत होते. त्यांच्यासाठी हा नामदेव महाराज का मेला आहे. तेव्हा घुमान में नामदेव महाराज का मेला लगा है, चलो चलते है, देखते है, असे म्हणत विद्यार्थी आणि युवक मोठय़ा संख्येने येथे आल्याचे दिसते आहे. 
आता या शिखांना मराठी साहित्यातले काय कळणार असा प्रश्न कोणासही पडेल. पण ते पुस्तके चाळत होते, हाताळत होते. वध्र्यातल्या सेवाग्राम आश्रमाच्या सर्वसेवा संघ प्रकाशनचे शक्तीचरण सिंह यदू हे त्या प्रकाशनाच्या दालनात भेटले. ते म्हणाले, आम्ही संत नामदेव यांचे चरित्र, भजने, गुरूग्रंथसाहेबमधील पदे अशा विषयांवरची िहदी पुस्तकं घेऊन आलो आहोत. शीख वाचकांकडून त्यांना चांगली मागणी आहे. माशेल-गोव्याहून नार्वेकर एजन्सीचे नारायण नार्वेकर यांनीही येथे स्टॉल लावला आहे. ते म्हणाले, संत नामदेव, भगतसिंह, गुरू नानकदेव, संत मीराबाई ही मंडळी शिखांच्या परिचयाची. त्यामुळे आम्ही मुद्दाम त्यांच्यावरील िहदी आणि इंग्रजी पुस्तकं घेऊन आलो आहोत. शीख वाचकांकडून ही पुस्तके आवर्जून विकत घेतली जात आहेत. सत्संग प्रकाशन हे रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्यावरील पुस्तके मराठी, िहदी, इंग्रजी भाषेत प्रकाशित करते. त्यांचाही असाच अनुभव आहे. संस्थेचे भालचंद्र राव म्हणाले, आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पहिल्यांदाच आमचं ग्रंथप्रदर्शन लावलं आहे. िहदी, इंग्रजी पुस्तकांची चांगली विक्री होत आहे. 
पण मराठीतील पुस्तकांचे काय? 
नार्वेकर सांगतात, शिख वाचकांमध्ये त्याबाबत उत्सुकता दिसते. स्टॉलवर येऊन ते मराठी पुस्तके हाताळून, उघडून व चाळून पाहात आहेत. चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील येथे भेटले. ते सांगत होते, आम्ही आमच्या प्रकाशनाची दोन मराठी पुस्तकं आणली आहेत. त्यांची चांगली विक्री होतेय. आधी लोकांच्या मनात शंका होती, की इथं कोण येणार, मराठी पुस्तकांची विक्री कशी होणाऱ? पण आमचा अनुभव चांगला आहे. ठाण्याच्या विद्याधर ठाणेकर प्रतिष्ठानचे विद्याधर ठाणेकर यांचा अनुभव मात्र नेमका याच्या उलट होता. प्रतिसाद उत्साहवर्धक नाही, असे ते म्हणत होते. तसा हा प्रतिसाद स्वाभाविकच म्हणावयास हवा. पण या निमित्ताने मराठी साहित्य या लोकांच्या नजरेस पडले हेही काही कमी नाही. याबाबतचे एक उदाहरण उत्साहवर्धक म्हणावे असेच आहे. या ग्रंथप्रदर्शनात फिरताना एक शीख गृहस्थ दिसले. अगदी मन लावून मराठी पुस्तके चाळत होते. तेव्हा त्यांच्याशी बोलणे काढले. त्यांचे नाव इंद्रजीतसिंग. ते मूळचे चंदिगढचे. लिहितात वगैरे. शिवाय शिखांचा इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय. त्यांना विचारले, की तुम्ही इकडं कसे आलात? तर ते म्हणाले, मला साहित्य संमेलनाविषयी तशी काहीही माहिती नव्हती. पण उत्सुकतेने आलो. येथे फिरलो. मराठी पुस्तकं चाळली, पाहिली. हे सगळं साहित्याचं वातावरण पाहून मला आता मराठी शिकावंसं वाटू लागलं आहे. मराठी शिकवणारं पुस्तक मिळालं, तर तुम्हांला सांगतो ,काही दिवसांतच मी मराठी शिकेन. 
या संमेलनाच्या निमित्ताने घुमान मराठी साहित्याच्या रंगात रंगले आहे हे मात्र खरे. ग्रंथ प्रदर्शनात पंजाब राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक आणि प्रकाशन विभागानेही एक दालन लावले आहे. या विभागाचे उपसंचालक बलराज सिंह यांचीही अगदी अशीच भावना होती. संमेलनस्थळी झालेली गर्दी पाहून ते म्हणत होते, आम्हाला आम्ही पंजाबमध्ये आहोत असं वाटतंच नाही. वाटतंय, महाराष्ट्रातच आहोत. 
इंद्रजीत यांच्यासारख्या पंजाबी लेखकालाही या वातावरणाने मोहून टाकल्याचे दिसत होते. 
जाता जाता ते म्हणाले, यापुढच्या मराठी साहित्य संमेलनालाही उपस्थित राहण्याचा मी विचार करतोय.

साहित्य संमेलनात शनिवारी पंजाबच्या लोककलावंतांनी रसिकांची दाद मिळवली. ग्रंथ विक्रीच्या दालनांवर बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. सर्व माजी संमेलनाध्यक्षांच्या अर्कचित्रांच्या प्रदर्शनास पंजाबी तरुणांनीही हजेरी लावून कलाकाराचे कौतुक केले.

नामदेव बाबांची समाधी
घुमान गावात संत नामदेव बाबा यांची समाधी आणि गुरुद्वारा यांची रचना मंदिर, मशीद आणि गुरुद्वारा अशी एकत्र स्वरूपाची आहे. मोहम्मद तुघलक याच्या काळात त्याच्या अत्याचाराच्या विरोधात नामदेवांनी जनजागृती केली. तसेच तुघलकाच्या लोकांनी नामदेवांना त्रासही दिला. त्याचे प्रायश्चित्त म्हणून तुघलक याचा नातू फिरोज याने ही समाधी बांधल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर / गुरुद्वारा सन १७७० मध्ये सरदार जस्सासिंह राम-दिया यांनी बांधल्याचा / नूतनीकरण केल्याचा संदर्भ लेखक भाईसाहब कानसिंह नाथा यांनी त्यांच्या कोशात दिला आहे. शिखांच्या 'गुरुविलास' व अन्य ग्रंथांतूनही या समाधिस्थळाचे उल्लेख आहेत.

विद्युत घट



आधुनिक उपकरणाचा प्राण बनलेला ऊर्जास्रोत म्हणजे बॅटरी किंवा सेल. समानार्थी नसलेले
हे दोन शब्द आपण इतक्या सर्रासपणे एकाच वस्तूकरिता वापरतो, की आता ते वेगळे काढणे मुश्कील आहे. त्याचे मराठी रूपांतर विद्युत घट असे आहे. एक घट म्हणजे सेल आणि अनेक घटांचा संच म्हणजे बॅटरी.

विविध प्रकारचे विद्युत घट (cell)
१७४८ मध्ये बेन्जामिन फ्रँकलीनने लष्करी संज्ञेतून हा शब्द उचलला. एकाच वेळी चालणाऱ्या शस्त्रांना तिथे बॅटरी म्हणायची पद्धत होती. फ्रँकलीनने एकाच वेळी जोडलेल्या घटांच्या संचाला बॅटरी म्हणून हा शब्द रूढ केला. विद्युत घटसंच (Battery) म्हणजे रासायनिक ऊर्जेचे विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करणारे एक किंवा अनेक विद्युत घट (Cell). प्रत्येक घटामध्ये एक घन भार (+ve) असलेली दांडी (cathode) आणि एक ऋणभार (-ve) असलेली दांडी (anode) असते. घटातील रासायनिक द्रव्याबरोबर होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेत मूलद्रव्यातून आयन (ion) मोकळे होतात आणि विजातीय ध्रुवातील आकर्षणामुळे होणाऱ्या त्यांच्या हालचालीमुळे, दोन दांडय़ांमध्ये त्यांचा प्रवाह सुरू होतो आणि विद्युत घटातून वीज निर्मिती सुरू होते.१७४८ मध्ये बेन्जामिन फ्रँकलीनने सुरू केलेल्या या प्रवासात १८०० मध्ये आलेसांद्रो व्होल्टाने तांबे (copper-Cu) आणि जस्त (Zinc-Zn) या धातूंचे पत्रे मध्ये कागद घालून एकत्र ठेवले असता वीजप्रवाह होतो असे निदर्शनात आणून दिले, पण हा परिणाम त्यातील रासायनिक प्रक्रियेमुळे होतो हे १८३४ मध्ये मायकेल फॅरेडेने केलेल्या प्रयोगात सिद्ध झाले. १८३६ मध्ये इंग्रज रसायनशास्त्रज्ञ डॅनियलने रोजच्या वापरास उपयुक्त असा विद्युत घट तयार केला. १९व्या शतकाच्या अखेरीस कोरडी रासायनिक पूड वापरून काम करणाऱ्या विद्युत घटाचा शोध लागेपर्यंत, अशा प्रकारचे रासायनिक द्रावण वापरून काम करणारे विद्युत घट अस्तित्वात होते. 

या प्रकारच्या घटांच्या प्रातिनिधिक चित्रात दाखवल्याप्रमाणे एकाच विद्युत घटामध्ये असलेल्या, एकमेकांना स्पर्श न करणाऱ्या दोन विजातीय ध्रुवांमध्ये रसायनाच्या माध्यमातून आयन प्रवाह चालू होतो.
रासायनिक प्रक्रियेमुळे मूलद्रव्यांचे आयोनायझेशन (Ionisation) होते. म्हणजे अणू, त्याचा इलेक्ट्रॉन सोडल्यामुळे घनभारित होतो (cation) किंवा इलेक्ट्रोन मिळाल्यामुळे ऋणभारित होतो. (Anion). या भारित (charged) अणूंना आयन म्हणतात. 
या प्रक्रियेत मुक्त झालेले इलेक्ट्रॉन ध्रुवांमध्ये जोडलेल्या तारेतून प्रवाहित होतात आणि विद्युतप्रवाह सुरू होतो.

विद्युत घटांचे प्रकार
१. प्राथमिक विद्युत घट- हे घट एकदा वापरले की पुन्हा वापरण्यायोग्य नसतात, कारण त्यातील रसायने भारित होण्याची क्षमता संपते आणि त्यांना पुन्हा प्रभारित करता येत नाही. उदा.- विजेरीत वापरत असलेले कोरडे घट. (Zn-C / Alkaline Batteries)
यातील जस्ताच्या पत्र्याचा डबा ऋणभारित अ‍ॅनोडचे काम करतो, तर कार्बनची दांडी घनभारित कॅथोडचे काम करते. आतील रासायनिक पूड म्हणजे अमोनियम क्लोराइडचा लगदा (paste) असतो. रासायनिक प्रक्रिया वर सांगितलेल्या द्रवरूप घटासारखीच होते आणि आपल्याला हवी तेव्हा विद्युत ऊर्जा उपलब्ध होते. या घटांची क्षमता अँप-तास (amp-hour/Ah) मध्ये मोजतात. विद्युतप्रवाह (Current) अँपीअरमध्ये मोजतात. म्हणजे १०० अँपीअर क्षमतेचा घट आपल्याला २० सें. तापमानाला

५ अँपीअरचा पुरवठा २० तास करू शकतो. २०१३ पर्यंत जगातील सगळ्यात मोठा विद्युत घटसंच चीनमधल्या हेबी प्रांतात होता. त्याची क्षमता ३६ मेगा वॅट तास इतकी आहे.
माध्यमिक घट 
(पुन:पुन्हा प्रभारित करता येणारे घट)
१. माध्यमिक घट- हे घट पुन:पुन्हा प्रभारित (Recharge) करता येतात. उदा.गाडीमध्ये वापरले जाणारे आम्लद्रवयुक्त घटसंच ( Acid Battery) किंवा भ्रमणध्वनी/कॅमेरा/गणकयंत्र यासारख्या उपकरणात वापरले जाणारे घट ( Ni-cd/Ni-Zn Cell). गाडीमध्ये वापरत असलेल्या या प्रकारचे घटसंच पुन:पुन्हा प्रभारित करता येतात. यात द्रवरूप इलेक्ट्रोलाइट वापरलेले असते. पुन:प्रभारित होणाऱ्या घटांचा मोठय़ा प्रमाणातला वापर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये केला जातो. अतिशय छोटय़ा आकारात उपलब्ध असलेल्या या प्रकारच्या घटांमध्ये निकेल (Ni), कॅडमीयम (Cd), लिथियम (Li), मेटल हायड्राईड (MH) यासारखी मूलद्रव्ये/ भेसळयुक्त धातू वापरलेले असतात. घट/डब्या/बटणाच्या आकाराचे हे सेल पाचशे ते हजार वेळा प्रभारित करता येतात.
विद्युत ऊर्जा मिळण्याचे नवनवीन स्रोत या शतकात शोधले गेले आहेत. आणि ते मार्ग आहेत, वाऱ्याची ऊर्जा (Wind Energy), सूर्यप्रकाशातील ऊर्जा (Solar Energy), समुद्राच्या लाटांमधील ऊर्जा (Hydel Energy) आणि अणुऊर्जा (Atomic Energy). निसर्गात मुबलक उपलब्ध असलेली ही ऊर्जा, विद्युतऊर्जेमध्ये रूपांतरित करून, आधुनिक मानवाची जीवनावश्यक गरज असलेली विद्युतऊर्जा तयार करण्याचे अथक प्रयत्न चालूच राहणार आहेत.

चीता, चेतकची चिंता!

गेल्या तीन वर्षांत १५ लष्करी हेलिकॉप्टर्स अपघातग्रस्त झाली. त्यात वैमानिकांसह काही 
अधिकाऱ्यांना नाहक प्राण गमवावे लागले. त्यातील बहुतांश अपघातांच्या चौकशीत पुढे येणारे कारण म्हणजे मानवी दोष. आयुर्मान संपुष्टात आलेल्या आणि तंत्रज्ञानदृष्टय़ा कालबाह्य़ ठरलेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीत काढला जाणारा हा निष्कर्ष धक्कादायक आहे.

आकाशात मार्गक्रमण करताना समोर अचानक मोठा ढग आल्यास दिशादर्शनाची व्यवस्था नसल्यामुळे दिशाच समजत नाही. 
हिमालय पर्वतरांगांमधून मार्ग काढताना कशाला तरी धडकून अपघात होऊ शकतो याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा नाही. उड्डाणाआधी सर्व यंत्रणा व्यवस्थित आहेत की नाही हे सांगणारी काही व्यवस्था नाही. 
सीमावर्ती भागात मार्गक्रमण करताना हवामानातील बदल, धोके समजतील याची कोणतीही सोय नाही..
भारतीय लष्करातील हवाई दलाच्या (आर्मी एव्हिएशन) ताफ्यात असणाऱ्या १७५ चीता व चेतक हेलिकॉप्टर्सच्या या काही उणिवा. कोणत्याही हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपरोक्त व्यवस्था महत्त्वपूर्ण ठरतात. तथापि, तब्बल ४० वर्षांपासून सेवेत असणाऱ्या चीता व चेतकमध्ये त्या नाहीत. अर्थात, जुनाट हेलिकॉप्टरमध्ये प्रगत तंत्रज्ञानाची अपेक्षाही करता येणार नाही. त्यांचे आयुष्य पंधरा वर्षांपूर्वीच संपुष्टात आले आहे. उत्पादन प्रक्रिया १९९० मध्ये पूर्णपणे बंद झाली. आज त्यांचे सुटे भागही मिळणे दुष्कर झाले आहे. हेलिकॉप्टर इंजिनच्या दुरुस्तीची परिसीमा गाठली गेली आहे. या परिस्थितीत आधुनिक हेलिकॉप्टर मिळत नसल्याने धोकादायक असूनही तीच हेलिकॉप्टर घेऊन वैमानिकांना दररोज उड्डाण करावे लागत आहे. मागील तीन वर्षांत १५ लष्करी हेलिकॉप्टर्स अपघातग्रस्त झाली. त्यात वैमानिकांसह काही अधिकाऱ्यांना नाहक प्राण गमवावे लागले. त्यातील बहुतांश अपघातांच्या चौकशीत पुढे येणारे कारण म्हणजे मानवी दोष. आयुर्मान संपुष्टात आलेले आणि तंत्रज्ञानदृष्टय़ा कालबाह्य़ ठरलेल्या हेलिकॉप्टर अपघाताच्या चौकशीत काढला जाणारा हा निष्कर्ष आश्चर्यचकित आणि धक्कादायक आहे.
वैमानिकांचे नाहक जाणारे बळी रोखण्यासाठी चीता व चेतकचा वापर त्वरित थांबवावा या मागणीकरिता लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींनी आक्रमक भूमिका घेतली आहे. लष्करात विविध पदांवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पत्नी अशा गंभीर विषयावर एकत्रित येण्याची ही पहिलीच वेळ. नाशिकच्या अ‍ॅड. मीनल वाघ-भोसले यांनी 'इंडियन आर्मी वाइव्ज एजिटेशन ग्रुप'ची स्थापना करून देशभरातील इतर अधिकाऱ्यांच्या पत्नींना एकत्र आणले. हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेल्या अधिकाऱ्यांच्या पत्नीदेखील या गटाच्या सदस्य आहेत. अलीकडेच गटाच्या संस्थापिका अ‍ॅड. मीनल यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेतली. जुनाट हेलिकॉप्टर्समुळे आजवर झालेली मनुष्यहानी आणि नुकसानीचा अहवाल त्यांच्यासमोर मांडला. लष्करी अधिकाऱ्याशी विवाहबद्ध होताना समरप्रसंगात पतीला देशासाठी वीरमरण पत्करावे लागू शकते याची मानसिक तयारी कोणतीही पत्नी करते. युद्धात वीरमरण पत्करणे समजता येईल, पण जुनाट लष्करी सामग्रीमुळे जीव गमवावा लागणे हे पत्नींसाठी वेदनादायी ठरते. अपघातांमध्ये ज्या अधिकाऱ्यांनी प्राण गमावले, त्यातील काहींचा वर्षभरापूर्वी विवाह झाला होता, काहींना अवघ्या सहा महिन्यांचे बाळ आहे, काहींच्या पत्नी गरोदर होत्या. पतीच्या अकस्मात मृत्यूच्या धक्क्यातून त्या अजून सावरल्या नसल्याची व्यथा त्यांनी संरक्षणमंत्र्यांसमोर मांडली. जुनाट सामग्रीमुळे हे घडत असल्याने लष्करी कुटुंबीयांमध्ये संतप्त भावना आहे. अपघातांच्या मालिकेमुळे वैमानिकांच्या मनोधैर्यावर परिणाम होत आहे. चिता व चेतकच्या जागी आधुनिक हेलिकॉप्टर समाविष्ट केली जाणार आहेत. दहा वर्षांपासून हा विषय रखडला असून दुसरीकडे कालबाह्य़ हेलिकॉप्टरचे अपघात वाढत असल्याकडे गटाने लक्ष वेधले. लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींची भावना जाणून घेतल्यावर संरक्षणमंत्री पर्रिकर यांनी हा विषय केंद्र सरकारने गांभीर्याने घेतला असल्याचे सांगितले. ताफ्यातील १७५ चीता व चेतकचे उड्डाण लगेच कायमस्वरूपी थांबविणे शक्य नाही. कारण त्याचा लष्करी सज्जता व समतोलावर परिणाम होईल. यामुळे टप्प्याटप्प्याने नवीन हेलिकॉप्टर्स समाविष्ट करून चीता आणि चेतकला निरोप देण्याचे नियोजन असल्याचे पर्रिकर यांनी नमूद केले.
वास्तविक, लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या गटाला संरक्षणमंत्र्यांनी दिलेले हे आश्वासन आठ वर्षांपूर्वी म्हणजे २००७ मध्ये तत्कालीन संरक्षणमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या उत्तरापेक्षा वेगळे नाही. तेव्हापासून आजतागायत आधुनिक हेलिकॉप्टर्स खरेदीचा विषय भरारी घेऊ शकलेला नाही. दुसरीकडे जुन्या हेलिकॉप्टरच्या अपघातांची मालिका कायम आहे. सीमावर्ती भागात टेहळणी, हवाई निरीक्षण कक्ष स्थापून तोफखान्याच्या माऱ्याचे नियंत्रण, जखमी सैनिकांना युद्धभूमीवरून वाहून नेणे, लढाऊ सैनिकांच्या तुकडय़ांना जलदपणे आघाडीवर पोहोचविणे, आघाडीवरील तळांना रसद पुरवठा याची संपूर्ण जबाबदारी लष्कराच्या हवाई दलावर आहे. शांतता काळात त्यांचे दैनंदिन काम अव्याहतपणे सुरू असते. देशांतर्गत पूर, भूकंप, 
सुनामी आदी नैसर्गिक संकटांत ही हेलिकॉप्टर्स बचावकार्यात आघाडीवर असतात. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाकडे (एनडीआरएफ) स्वत:ची हेलिकॉप्टर्स नाहीत. त्यांची संपूर्ण भिस्त याच दलाच्या हेलिकॉप्टर्सवर आहे. या दलाच्या कामाचा आवाका लक्षात घेतल्यास आयुर्मान संपलेल्या चीता व चेतकचा वापर वैमानिकांबरोबर लष्करी अधिकारी, जवान तसेच नागरी भागातील बचावकार्यावेळी नागरिकांचा जीव धोक्यात टाकणारा ठरला आहे. अपघात रोखण्यासाठी साहाय्यभूत ठरणारी आवश्यक ती यंत्रणा, व्यवस्था या दोन्ही हेलिकॉप्टरमध्ये नसताना वैमानिक हिमालयाच्या डोंगररांगांमधून कसे मार्गक्रमण करीत असेल याचा विचार करता येईल. जम्मू-काश्मीरमध्ये बहुतांश सीमारेषा निश्चित नाही. डोंगररांगेच्या सीमावर्ती भागात दिशादर्शन यंत्रणेअभावी हेलिकॉप्टर भरकटण्याची शक्यता असते. मध्यंतरी याच पद्धतीने भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर थेट पाकिस्तानच्या हद्दीत गेले होते. उड्डाणाआधी परिसरात हवामानाची माहिती उपलब्ध होण्याची व्यवस्था नाही. आघाडीवरील तळांवर संपर्क साधून तोंडी मिळालेल्या माहितीच्या आधारे हेलिकॉप्टर उड्डाण करते. मार्गक्रमणादरम्यान वादळ, ढग, पाऊस तत्सम बाबींची पूर्वसूचना देणारी यंत्रणा हेलिकॉप्टरमध्ये नसल्यामुळे वैमानिक दैवाच्या भरवशावर असतो. 'अ‍ॅटो पायलट' आणि 'ग्राऊंड प्रॉक्झिमिटी वॉर्निग सिस्टीम' या सुविधा हेलिकॉप्टर अपघाताची शक्यता कमी करणाऱ्या. यामुळे हेलिकॉप्टर वैमानिकाच्या हस्तक्षेपाशिवाय सुरक्षित अंतर राखून मार्गक्रमण करते. उंच-सखल भागात त्याचा लाभ होतो. मात्र चीता व चेतकमध्ये वैमानिकाला अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यात कशाला धडकून अपघात झाला तर चौकशीत मानवी दोष हे कारण पुढे येते. अपघात झाला की लष्कर चौकशी करते. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरचे भाग तपासणीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) प्रयोगशाळेत पाठविले जातात. एचएएल हेलिकॉप्टरसाठी वेळोवेळी लागणारे सुटे भाग परदेशातून आयात करून लष्कराला पुरवठा करते. म्हणजे जे मालाचा पुरवठा करतात. त्यांच्याच प्रयोगशाळेत अपघातानंतर तपासणी होते. एचएएल प्रयोगशाळेच्या अहवालावरून चौकशीचा अंतिम निष्कर्ष काढला जातो. त्यातून तांत्रिक दोषांची स्पष्टता होत नसल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता राहत नाही. बहुतांश अपघातात मानवी दोष हा एकमेव निष्कर्ष आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील एचएएल त्यांच्या बाजूने काही चुकीचे नसल्याचे दर्शविते. हेलिकॉप्टरमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आहे याचा विचारही केला जात नाही. 'चोर सोडून संन्यासाला फाशी' असाच हा प्रकार. जागतिक निकषानुसार अशा अपघातांच्या चौकशीसाठी एक स्वतंत्र त्रयस्थ यंत्रणा कार्यरत असणे आवश्यक आहे. देशात सद्य:स्थितीत तशी व्यवस्था अस्तित्वात नाही. नव्या केंद्र सरकारने संरक्षण सामग्रीत स्वयंपूर्णता आणण्याचे सूतोवाच केले आहे. तथापि, विद्यमान स्थिती लक्षात घेतल्यास अतिशय किरकोळ साहित्यासाठी आपण परदेशांवर अवलंबून असल्याचे लक्षात येते. हेलिकॉप्टरपुरता विचार केल्यास 'पिन्स, वायर, वॉशर, होजेस, प्लास्टिक कंटेनर' अशा लहानसहान बाबी महागडय़ा दराने परदेशातून खरेदी कराव्या लागतात हे वास्तव आहे. त्यात एचएएल परदेशातील उत्पादकांकडून जे काही सुटे भाग मागविते, त्यात काही दोष उद्भवल्यास विक्रीपश्चातसेवेची शाश्वती मिळत नाही. देशातील लघू व मध्यम उद्योगांकडून विविध प्रकारचे सुटे भाग स्थानिक पातळीवर तयार करता येऊ शकतात. केंद्र सरकारच्या संबंधित विभागाने लघू व मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण ठेवले आहे. कुशल मनुष्यबळ, ज्ञानाधारित कौशल्य उपलब्ध असूनही त्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. परदेशातील पुरवठादारांवर विसंबून राहणे युद्धकाळात आर्थिक भार आणि चिंताही वाढविणारे आहे.
अपघातांची शृंखला कायम असल्याने खुद्द लष्कराने चिता व चेतक बदलण्यासाठी चौदा वर्षांत आतापर्यंत तीन वेळा संरक्षण मंत्रालयाकडे लेखी मागणी केली. पण लालफितीचा कारभार, तत्कालीन सरकारचे धोरण या प्रक्रियेत अडथळा ठरले. ही दिरंगाई वैमानिकांच्या जिवावर बेतत आहे. शेजारील चीन आणि पाकिस्तानकडे देखील तंत्रज्ञानदृष्टय़ा सरस हेलिकॉप्टर्स आहेत. तंत्रज्ञानात मागास हेलिकॉप्टरचा वापर समरप्रसंगात भारतीय लष्कराला अडचणीचा ठरू शकतो. या सर्व बाबींची जाणीव लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या गटाने संरक्षण मंत्रालयास करून दिली आहे. वैमानिकांची कमतरता भासत असल्याने लष्करी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन वैमानिक करण्यासाठी खास नाशिक येथे कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. वर्षभरात कोटय़वधी रुपये खर्च करून या स्कूलमधून ५० ते ६० वैमानिक तयार केले जातात. प्रत्येक तुकडीच्या दीक्षान्त सोहळ्यात नवोदित वैमानिकांना आकाशातील लढाऊ सैनिक म्हणून काम करताना सुरक्षित उड्डाणाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले जाते. असुरक्षित हेलिकॉप्टर हाती देऊन त्यांच्याकडून बाळगली जाणारी सुरक्षित उड्डाणाची अपेक्षा कितपत योग्य आहे?

'मनीऑर्डर' इतिहासजमा

ग्रामीण भागातील चाकरमानी कुटुंबांच्या अर्थकारणाशी जोडलेली आणि निरोपाबरोबरच पसे देण्यासाठी धावणारी 'मनीऑर्डर सेवा' नुकतीच १ एप्रिलपासून बंद करण्यात आली आहे. 
या पारंपरिक सेवेची जागा आता ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या 'पेपरलेस सेवा' योजनेने घेतली आहे.
ब्रिटिशांच्या काळात १८६४ मध्ये सुरू झालेल्या या मनीऑर्डर सेवेने नुकताच ३१ मार्च रोजी आपला शेवटचा व्यवहार केला आणि दीडशे वर्षांच्या अविरत आनंद वर्षांवानंतर ती कायमची बंद झाली.
ब्रिटिशांनी प्रशासकीय आणि लष्करी सेवेसाठी स्थानिक लोकांना मोठय़ा प्रमाणात भरती करून घेतले होते. हे नोक रदार देशभर कुठेही काम करत असत. अशा वेळी त्यांच्या कुटुंबीयांना पसे पाठविणे सोयीचे जावे यातून १८६४ मध्ये 'मनीऑर्डर सेवे'चा जन्म झाला. त्या वेळी देशातील ३२१ जिल्हा कोषागारांमार्फत ही सुविधा चालवली जात होती. जिल्हा कोषागारात 'मनीऑर्डर' आली की, संबंधित व्यक्तीला लेखी सूचना दिली जात असे. त्यानंतर ओळखीसाठी एखादा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती घेऊन गेले, की त्याला जिल्हा कोषागार कार्यालयातून रक्कम मिळत असे. मात्र या पध्दतीने पसे पाठविण्यासाठी १५० रुपयांची कमाल मर्यादा होती. अशा पध्दतीने १८७८ -७९ या आíथक वर्षांत ७ लाख ४० हजार रुपयांची उलाढाल झाल्याची देखील इतिहासात एक नोंद आहे.
पुढे या सेवेचा वाढता व्याप लक्षात घेऊन १ जानेवारी १८८० पासून 'मनीऑर्डर सेवा' भारतीय पोस्ट खात्याकडे वर्ग करण्यात आली. यावेळी मनीऑर्डर पाठविण्यासाठी अर्ज तयार करण्यात आले. पहिल्यांदा छपाई करण्यात आलेले कोरे ५० अर्ज आजही मिरज इतिहास संशोधन मंडळाकडे उपलब्ध असल्याचे संशोधक मानसिंग कुमठेकर यांनी सांगितले.
या 'मनीऑर्डर' सोबत मजकूर लिहिण्यासाठी जागा सोडण्यात आलेली होती. तसेच पसे पोहोचल्याची पोचपावतीही पाठविणाऱ्याला मिळत होती. या 'मनीऑर्डर'चा उपयोग प्रामुख्याने चाकरमान्यांना व लष्करातील जवानांना कालपरवापर्यंत होत होता. याशिवाय गावाकडून मुलांना शहरात शिक्षणासाठी पसे पाठविण्यासाठीही या सेवेचा लाभ होत होता. आता टपाल खात्याने ही सेवा बंद करत त्या जागी 'पेपरलेस मनीऑर्डर 'अशी सेवा अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या या व्यवहारात दोन्हीकडील खात्यांमार्फत यापुढे पैसे देवाण-घेवाणीचा व्यवहार पूर्ण केले जाणार आहे. १ एप्रिलपासून ही सेवा सुरू झाली आणि पारंपरिक 'मनीऑर्डर' सेवा संपुष्टात आली.

मोबाइलची काय काळजी.......

तातडीने कोणाला तरी अत्यंत महत्त्वाचा निरोप द्यायचा आहे आणि नेमका मोबाइल बंद पडतो . बटणं डायल होत नाहीत , स्क्रीन निकामी होते किंवा आवाजच यायचा बंद होतो . वारंवार असं घडायला लागलं की आपण थेट मोबाइल बदलण्याच्या निर्णयापर्यंत येतो. पुन्हा आपण नवीन मोबाइलची काळजी न घेतल्याने घटनेची पुनरावृत्ती होते. याला हॅण्डसेट नाही तर आपण जबाबदार असतो हे लक्षात घ्यायला हवं .
आपल्याकडील ऋतुमानानुसार मोबाइलचे आजारही बदलत असतात . उन्हाळ्यात बहुतांश वेळा मोबाइलची बॅटरी निकामी होण्याचे प्रकार घडतात . तर पावसाळ्यात डिस्प्ले बिघडतो. हिवाळा आपल्या आरोग्याप्रमाणोच मोबाइलच्या आरोग्यासही फारसा त्रास देत नाही . आपल्या मोबाइलची काळजी घेणं ही अतिशय सोपी बाब आहे . त्यासाठी आपल्याला काही

खास वेळ बाजूला काढण्याची गरज भासत नाही . फक्त काही गोष्टींची गरज पूर्ण करणं गरजेचं असतं .


पाणी आणि मोबाइल :
पाणी आणि मोबाइल या परस्पर विरुद्ध गोष्टी आहेत , ही बाब मनावर चांगली ठसवून घ्या . मोबाइलमध्ये चुकूनही पाणी जाऊ देऊ नका . विशेषत : पावसाळ्यात आपल्याला ही गोष्ट जपावी लागते . यासाठी पावसाळ्यात प्लास्टिकच्या कव्हरमध्ये जरी आपण मोबाइल ठेवला तरी तो सुरक्षित राहू शकतो . पाणी पितानाही मोबाइल लांब ठेवावा . नंबर डायल करताना किंवा मोबाइल हाताळताना हात कोरडे असल्याची खात्री करून घ्या. तसंच , मोबाइल वाळू पासूनही सुरक्षित ठेवा . मोबाइल पाडू नका : तुमचा मोबाइल चुकून किंवा इतर कुठल्याही कारणाने पडू देऊ नका . मोबाइलसारखा पडल्याने त्याची बॉडी लूज होतात . यानंतर मोबाइल पाडत राहिल्यास बॅटरी आणि बॉडी वेगवेगळे पडायला लागतात . यामुळे मोबाइलच्या व्हॉइस क्वालिटीवर खूप परिणाम होतो. आपल्याला ऐकावयास त्रास होता किंवा समोरच्याला आपला आवाज खूप कमी ऐकू जातो .

यामुळे शक्यतो मोबाइल कव्हरचा वापर करावा . जेणे करून मोबाइल पडलाच तर , किमान त्याचे दोन वेगळे भाग तरी होणार नाहीत .


अति चार्जिंग नको :
मोबाइलची बॅटरी नेहमी फूलच असावा असा अनेकांचा अट्टाहास असतो . यामुळे ते सतत आपला फोन चार्जिंगला लावून ठेवतात . उन्हाळ्यात याची विशेष काळजी घ्यावी . १२ तासांच्यावर आपला मोबाइल कधीही चार्जिंगला ठेऊ नये . तसंच , तो ७० टक्के डिस्चार्ज झाल्याशिवाय चार्जिंगला लावणं टाळा . कार चाजर्सपासून विशेषत : मोबाइल गरम होण्याची शक्यता जास्त असते . यामुळे अगदी आवश्यक असल्यासच कार चार्जिंगचा वापर करावा . जर फोन अधिक गरम झाला तर , फोनवर येणारे रेडिओ सिग्नल तसेच त्याचे आवाजात रूपांतर करणारी यंत्रणा निकामी होऊ शकते . 

चोरांपासून सावध :

मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला असे आपण वारंवार ऐकत असतो . पण मोबाइल चोरी होऊ नये म्हणून आपण फारसे कष्टही घेत नाही . तसंच आपला मोबाइल हरवला तर , तो शोधण्यासाठीही आपण प्रयत्न करत नाही . यासाठी एक छोटी क्लुप्ती आहे . जर तुमच्याकडे तुमच्या मोबाइलचा आयएमइआय नंबर असेल तर मोबाइल सापडणं सोपं होतं . मोबाइलमध्ये जर कोणी दुसरे कार्ड घातल्यावर ताबडतोब आपल्याला आपला मोबाइल कोणत्या भागात आहे हे समजू शकते . आयएमइआय नंबरसाठी जर तुम्ही * टाइप केले की, नंबर मिळतो . तो आपण आपल्याकडे कुठेतरी नोंद करून ठेवावा .


मोबाइलच्या हृदयाची काळजी :
मोबाइलचे हृदय म्हणजे तुम्हाला कळलेच असेल अर्थात बॅटरी . या बॅटरीशिवाय मोबाइल वापरणे व्यर्थ आहे . यावेळेस आपल्याला नेटवर्क नसते त्यावेळेस मॅन्युअली नेटवर्क शोधण्याचा प्रयत्न करू नये . तसेच आपण जर एखाद्या ग्रामीण भागात गेलो असू आणि आपल्याला रेंज येत नसेल तर मोबाइल स्विच्ड ऑफ करून ठेवा . कारण नेटवर्क शोधण्यासाठी मोबाइलची बॅटरी सर्वाधिक खर्च होत असते . शक्यतो वायब्रेशन बंद ठेवणं , बॅकलाइटचा वापर टाळणं , ब्लूट्यूथ , वायफाय , इन्फ्रारेड यासारखे फिचर्स गरज नसताना बंद करणं यामुळे बॅटरी कमी डिस्चार्ज होईल आणि त्याला चार्जिंग कमी लागेल . यामुळे बॅटरीचे आयुष्य वाढेल . बॅटरीला अति चार्जिंग देऊ नका . त्याचबरोबर बॅटरी पूर्ण संपेपर्यंत शक्यतो चार्जिंग करायचंही थांबू नका . बॅटरीत पाणी जाऊ देऊ नका , आपल्या मोबाइलची बटणे बिघडली असतील तर ती दुरूस्त करा . कारण अनेकदा
ती बटनं दाबली गेलेली असतात यामुळे बॅटरी न कळतपणे डिस्चार्ज होते .

केस गळतीवर हे करून बघा

जर तुम्ही केस गळतीच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर तुम्हाला तुमच्या भोजनावर लक्ष्य देणे फारच गरजेचे आहे. पौष्टिक आहाराच्या मदतीने केस गळतीच्या समस्येपासून सुटकारा मिळू शकतो. पहा त्या पाच भोज्य पदार्थांबद्दल ज्यांचे सेवन केल्याने तुमचे केस गळण्याच्या समस्येवर रोख लागू शकते.

अंडा: बायोटिन आणि विटॅमिनहून भरपूर अंडा केसांच्या विकास आणि आरोग्यासाठी उत्तम असतो. अंड्याचे सेवन केल्याशिवाय याला ऑलिव्ह ऑइल सोबत मिक्स करून केसांना लावू शकता. 2 अंडींसोबत 4 चमचे ऑलिव्ह प्रयोग करावा. पातळ पेस्ट बनवून डोक्यावर ती पेस्ट लावावी.
पालक: आयरन आणि फोलेटचा उत्तम स्रोत असून केसांच्या विकासासाठी पालक फारच फायदेशीर असतो. त्याच बरोबर फोलेट लाल रक्त कौशिकांचा निर्माण करण्यास मदत करतो, जो केसांपर्यंत जाऊन केसांना ऑक्सिजन पोहोचवतो. जेवणात पालकाला सॅलाडच्या रूपात देखील घेऊ शकता.
शिमला मिरची : लाल, पिवळी आणि हिरव्या रंगांमध्ये मिळणारा शिमला मिरच्या विटॅमिन सी ने भरपूर असतात, जे केसांच्या आरोग्यासाठी फार जरूरी आहे. विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे केसांमध्ये कोरडेपणा येतो आणि लवकरच ते तुटू लागतात.
मसुराची डाळ : टोफू, सोयाबीन, स्टार्चयुक्त बीन्स आणि मटार शाकाहारी लोकांसाठी आयरनाने भरपूर प्रोटिनाचे महत्त्वपूर्ण सोर्स आहे. ये सर्व पदार्थ केसांच्या आरोग्यासाठी फारच गरजेचे आहे.
रताळू (शकरकंद) : विटॅमिन आणि बीटा कॅरोटिनने भरपूर रताळू हे केसांच्या आरोग्यासाठी सर्वात उत्तम पर्याय आहे. बीटा कॅरोटिनचे दुसरे इतर स्रोतांमध्ये गाजर आणि कोहळा हे उत्तम पर्याय आहे.