Translate

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

मराठी कोश

ज्ञान संपादन करण्याचे असंख्य पर्याय आज वेगवेगळ्या संकेतस्थळांवर आणि अ‍ॅप्स स्वरूपात उपलब्ध आहेत. अभ्यासासाठी आणि करिअरच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या विविध वेबसाइट्सची माहिती देणारे पाक्षिक सदर..
आपल्याला एखादा इंग्रजी शब्द अडला की, आपण त्याचा मराठीत अर्थ पाहितो खरा, पण कधीकधी डिक्शनरीत दिलेला अर्थ हा शब्दश: असतो. त्यामुळे तो शब्द अधिक नेमका व मुळातून समजण्यासाठी त्या शब्दाशी जोडलेले संदर्भ किंवा इतर अर्थ शोधावे लागतात. त्यासाठी वेगवेगळे जाडजूड कोश पालथे घालण्यावाचून गत्यंतर नसते. पण हे कोश तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवरच - ऑनलाइन वापरायला मिळाले तर..? 
अर्थातच, हे शक्य आहे. कारण आज मराठी विश्वकोश, केतकर ज्ञानकोश, परिभाषा कोश यांसारखे महत्त्वाचे मराठी कोश संकेतस्थळांवर मोफत उपलब्ध आहेत. 
विश्वकोशाची marathivishwakosh.in अशी वेबसाइट असून त्यावर सध्या २० खंड उपलब्ध आहेत. ते सीडी स्वरूपातही मिळतात. मराठी माणसाला मराठीतून विविध संज्ञांची माहिती व्हावी या हेतूने महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाने तयार केलेले हे खंड सीडॅक संस्थेच्या मदतीने युनिकोड स्वरूपात या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपल्याला हवा असलेला शब्द या संकेतस्थळावर सर्च करता येतो. शब्द टाइप करण्यासाठी तिथे की-बोर्डही देण्यात आलेला आहे. शब्द सर्च केल्यानंतर आपल्याला त्या शब्दाबद्दलची नोंद दिसते, ज्यात तो शब्द किंवा संकल्पना म्हणजे काय, त्याचा इतिहास आदी गोष्टी संक्षिप्त स्वरूपात पाहता येतात. उदा. आग किंवा अग्नी असा शब्द आपण शोधल्यास सर्च केलेल्या नोंदीत अग्नीचा शोध कसा लागला, त्यामुळे मानवी जीवन कसे बदलले यापासून पोटातला अग्नी म्हणजे काय इत्यादी माहिती मिळते.
मराठीतून माहिती मिळवण्याचा आणखी एक स्रोत म्हणजे ज्ञानकोशकार केतकर यांचा कोश. डॉ. श्री. व्यं. केतकर यांनी १९१६ ते १९२८ या काळात ज्ञानकोशाच्या 
२३ खंडांचे काम केले होते. हे सगळे खंड ketkardnyankosh.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने या संकेतस्थळाची निर्मिती केली असून त्याचे रूपही देखणे व अधिक यूजर फ्रेंडली आहे. यामध्येही सर्चचा पर्याय दिला आहे, पण विश्वकोशापेक्षा येथे सर्च अधिक जलद गतीने होतो. यावर तुम्ही एखादा शब्द शोधल्यास तुम्हाला तो शब्द ज्या ज्या खंडात, ज्या ज्या संदर्भात आलेला आहे ते सगळे येथे दिसते. उदा. सफरचंद असा शब्द शोधल्यास वनस्पतीशास्त्रापासून काबूल-कंदाहार यांसारखी शहरं, अशा ज्या ज्या नोंदींत किंवा लेखांत सफरचंदाचा उल्लेख आला असेल त्या नोंदीची िलक तुम्हाला दिसते. तुम्हाला हव्या असलेल्या संदर्भानुसार तुम्ही ती िलक उघडून माहिती मिळवू शकता. बऱ्याच वेळा आपल्याला इंग्रजीतला एखादा शब्द माहिती असतो, त्याचा अर्थही माहिती असतो, पण त्या शब्दाला मराठी पर्यायी शब्द काय हे ठाऊक नसते किंवा माहीत असला तरी त्याबाबत खात्री नसते. अशा वेळी तुम्हाला 
coe.maharashtra.gov.in/index.php?option=com_content&view=article&id=116&Itemid=586&lang=mr या िलकवर असलेल्या ४६ मराठी परिभाषा कोशांची मदत घेता येईल. यावर अर्थशास्त्र, औषधशास्त्र, धातूशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल व भूशास्त्र, वित्तीयशास्त्र, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांचे पारिभाषा कोश आहेत. हे कोश मूळ छापील गं्रथांची पाने स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात देण्यात आले आहेत. त्यामुळे आवश्यक त्या कोशाची पीडीएफ तुम्ही कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून त्यात शब्द शोधू शकता. फक्त यात सर्च देऊन शब्द शोधता येत नाही, तर तो छापील पुस्तकाप्रमाणेच शोधावा लागतो. 
मराठी भाषेत झालेले ज्ञान-संपादनाचे कार्य आजच्या आधुनिक युगातल्या इंटरनेटसारख्या माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे काम वर उल्लेखलेल्या संस्थांनी केले आहे आणि त्या यापुढेही ते करत राहतील. आता जबाबदारी आहे ती आपली, शब्द अडला की, तो शोधण्याची! 
संस्कृत भाषेचा ऑनलाइन कोश
मराठी शब्दाचा अर्थ शोधताना तो शब्द ज्या संस्कृत शब्दापासून तयार झाला असेल त्या शब्दाचा अर्थ शोधावा लागतो. अशा वेळी ऑनलाइन संस्कृत कोशासाठी andhrabharati.com या संकेतस्थळाचा वापर करता येईल. Monier William's Sanskrit-English Dictionary आणि Wilson Sanskrit-English Dictionary या कोशांचा उत्तम डेटाबेस या संकेतस्थळासाठी वापरण्यात आला असून हा कोश संस्कृत-इंग्रजी असा आहे. यात त्या शब्दात उपसर्ग असेल किंवा इतर शब्द संधी-समास होऊन जोडलेले असतील तर त्या शब्दांच्या अर्थाच्या िलकही दिल्या जातात.

माणसाने निर्मिले देव, ईश्वर आणि धर्म

आज जगात लोकसंख्येच्या मापाने सगळ्यात मोठे असलेले दोन धर्म म्हणजे अनुक्रमे 'ख्रिश्चन' व 'मुसलमान' हे होत. यांचा जगभर प्रसार मुख्यत्वे तलवार आणि आक्रमणांच्या जोरावर झालेला आहे. हे दोन्ही धर्म ज्या ज्यू धर्मातून निर्माण झाले तो ज्यू धर्म मूलत: आशिया खंडाच्या पश्चिम टोकाला पॅलेस्टाइनमधील सेमिटिक वंशाच्या हिब्रुभाषिक इस्रायली किंवा ज्यू लोकांचा धर्म होय.

मानवजात आफ्रिका खंडात एका विशिष्ट मर्कट जातीमधून केव्हा आणि कशी उत्क्रांत झाली व तिथून बाहेर पडून जगभर वेगवेगळ्या खंडांमध्ये माणूस केव्हा व कसा पसरला, हे पहिल्या दोन प्रकरणांत आपण अगदी थोडक्यात पाहिले. अनेक अडचणींना तोंड देत देत मानवजात जगभरच्या अनेक भूखंडांतील जमिनींवर 

पोहोचली, पसरली. ही मानव-विजयाची पहिली पायरी होती. जग व्यापताना जिथे जिथे पिण्याच्या पाण्याची व सुपीक जमिनीची-जंगलांची भरपूर उपलब्धता होती तिथे तिथे स्थायिक होऊन मानवजातीने त्या त्या भूखंडातील सूर्यप्रकाश आणि हवा, वारा, पाऊस, वनस्पती इत्यादींच्या दृष्टीने 'सर्वाना सोयीस्कर अशा जीवनपद्धती' म्हणजे 'संस्कृती' स्थापित केल्या व ते तिथे तिथे सुस्थापित, सामाजिक, सुसंस्कृत जीवन जगू लागले. ही मानव-विजयाची दुसरी पायरी होय. जगातील या प्राचीन मानवी संस्कृती मूलत: आफ्रिकेत जन्मलेल्या मानवाने 'ज्या मार्गाने' जगभर पसरायला सुरुवात केली, त्याच मार्गावरील मुख्यत्वे मोठमोठय़ा नैसर्गिक नद्यांच्या काठी निर्माण झाल्या. त्यात आफ्रिकेतील इजिप्तमधील नाईल नदीनंतर मध्यपूर्वेतील इराकच्या आसपासच्या टायग्रिस व युफ्रेटिस या नद्या व त्यानंतर भारतातील सिंधू नदी येथपर्यंतचा सर्व परिसर आधी येतो आणि याच भूभागात जगातील प्राचीनतम मानवी संस्कृती पाच ते आठ हजार वर्षांपूर्वी निर्माण झाल्या असाव्यात, असे मानववंशशास्त्रज्ञ व इतिहास संशोधक सांगतात.
या प्राचीनतम संस्कृती निर्माण होण्यापूर्वी भूपृष्ठावरील अनेक भूभागांत असाही काळ येऊन गेला, की तिथे त्यावेळी मनुष्य अर्धरानटी अवस्थेत जीवन जगत होता. निसर्गातील ऊन, वारा, पाऊस, ढगांचा गडगडाट, वीज इत्यादींना भीत होता. भीतीपोटी डोंगर, नदी, वृक्ष इत्यादींना तो संरक्षक देव मानीत होता. देव हे कुणी जादूगार आहेत व ते निसर्गनियमांच्या पलीकडे असून ते निसर्गावर प्रभुत्व गाजवू शकतात, असे त्यांना वाटत होते. निसर्गपूजेनंतर बहुदेवता पूजा आल्या व त्याच्या पुढील पायरीवर माणूस जातीला त्याच्या सांस्कृतिक वाटचालीत एकेश्वरवाद सुचलेला आहे असे म्हणता येईल.
ईशान्य आफ्रिकेत नाईल नदी असलेल्या इजिप्तमधील प्राचीन पिरॅमिड्सचे पुरावे हे सुमारे इ.स.पू. ३-४ हजार म्हणजे आजपासून पाच-सहा हजार वर्षांच्या पूर्वीचे आहेत. इजिप्तच्या राजाला फॅरोह म्हणत व त्यालाच देव म्हणजे रक्षणकर्ता मानीत असत. परंतु देवाधिदेव म्हणजे परमोच्च देव म्हणून 'री' या सूर्यदेवतेला तेथील लोक मानीत असत. ते लोक केवळ फॅरोहच नव्हे तर इतरही पुष्कळ लहान देवदेवता मानीत असत. उदाहरणार्थ, वनस्पती व धनधान्याची देवता 'ओसिरिस' ही होती. नंतर आजपासून सुमारे चार हजार वर्षांपूर्वी म्हणजे इ.स.पू. २०००च्या आसपास बॅबिलॉन-टिग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यात वसलेला भूभाग- येथे एक संस्कृती निर्माण झाली होती. या संस्कृतीला काही इतिहासतज्ज्ञ, मानवी संस्कृतींची जननी मानतात. येथील एक राजा हम्मुराबी (इ.स.पू. १८वे शतक) याची इतिहासाने नोंद घेतलेली आहे. त्याच्या राज्यात काही टोळीप्रमुख, उच्चभ्रू समाज आणि विविध देवतांचे पुजारी, दीनदुबळ्या प्रजेच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेऊन त्यांना लुटत व छळत होते. त्याबाबत असे समजले जाते की हम्मुराबीने ईश्वराज्ञेने उपद्रवी उच्चभ्रूंच्या विरोधात सामान्य जनतेची बाजू घेतली व लोकांनी बहुदेवतांची पूजा न करता 'मर्डूक' या एकाच सर्वश्रेष्ठ ईश्वराची पूजा करावी असे सांगितले. त्याने त्या मर्डूक या आद्य ईश्वराचे भव्य मंदिर बांधले व त्याच्या पूजेला प्राधान्य दिले. पण इतर देवांच्या पूजाही लोकांमध्ये चालू राहिल्या. हम्मुराबीच्या एकेश्वरपूजनाचा व इतर कायदे जे त्याने दगडी खांबांवर कोरून ठेवले होते ते शिलालेख उत्खननात १९०२ साली सापडले आहेत.
बॅबिलोनच्या हम्मुराबीनंतर सुमारे एक हजार वर्षांनी असेल, एका वेगळ्याच ठिकाणी 'इराणमध्ये', कदाचित मध्य आशियातून येऊन तिथे स्थिर झालेल्या, आर्याच्या एका शाखेतील 'झरथ्रुष्ट' या प्रेषिताने 'अहुरमज्द' हा एकमेव आणि सर्वथा चांगला असा ईश्वर असून 'अहरीमन' हा दुष्ट वृत्तीचा त्याचा विरोधक आहे व या दोघांमध्ये जगभर सतत युद्ध चालू असते असे सांगितले. त्यानंतर फार पुढील काळात मुसलमान धर्म स्थापन होऊन त्यांची आक्रमणे सुरू झाल्यानंतर झरथ्रुष्टाचे अनुयायी इराण सोडून इतर देशांत गेले. भारतात आलेल्या त्याच्या अनुयायांना 'पारशी' म्हणतात. हे लोक अग्नीपूजक आहेत. अवेस्ता हा त्यांचा धर्मग्रंथ मूळ स्वरूपात उपलब्ध नसून तो आठवणीने पुनर्लिखित केलेला आहे. आज जगात लोकसंख्येच्या मापाने सगळ्यात मोठे असलेले दोन धर्म म्हणजे अनुक्रमे 'ख्रिश्चन' व 'मुसलमान' हे होत. यांचा जगभर प्रसार मुख्यत्वे तलवार आणि आक्रमणांच्या जोरावर झालेला आहे. हे दोन्ही धर्म ज्या ज्यू धर्मातून निर्माण झाले तो ज्यू धर्म मूलत: आशिया खंडाच्या पश्चिम टोकाला पॅलेस्टाइनमधील सेमिटिक वंशाच्या हिब्रुभाषिक इस्रायली किंवा ज्यू लोकांचा धर्म होय. यांचा एक मोठा ईश्वरनिष्ठ प्रेषित (ईश्वरी हुकूम व देणगी प्राप्त झालेला अपवादात्मक पण माणूसच) आब्राहम हा होऊन गेला. 
बायबल (जुना करार) मधील जेनेसिसप्रमाणे आधी 'आदम', नंतर 'नोहा', नंतर आब्राहम यांच्यानंतर 'मोझेस' हा ज्यूंचा फार मोठा प्रेषित, येशू ख्रिस्ताच्या तेरा शतके आधी होऊन गेला. मोझेस ईश्वराला याहवेह (किंवा जेहोव्हा) म्हणत असे. इजिप्तमध्ये स्थलांतरित झालेले हिब्रू लोक, ज्यांचा तेथील राजाने अतोनात छळ केला होता त्यांना मोझेसने वाचविले. जेहोव्हा हाच साऱ्या जगाचा-विश्वाचा निर्माता आहे व त्याच सर्वश्रेष्ठ ईश्वराने, मानवाच्या कल्याणासाठी त्याला दहा धर्माज्ञा दिलेल्या आहेत असे त्याने सांगितले. जेहोव्हाने ज्यू या त्याच्या आवडत्या लोकांसाठी, व्यक्तीप्रमाणे बोलून स्वत: प्रकट केलेला हा धर्म आहे असे सांगितले. ज्यू, ख्रिश्चन व मुसलमान या तीन धर्माना सेमिटिक परंपरेतले धर्म असे मानले जाते; पण पुढील काळात यांच्यात आपापसात हेवेदावे, दुष्टावे, युद्धे आणि कत्तलीसुद्धा झालेल्या आहेत.
ज्यू धर्मानंतर आजपासून सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी पश्चिम आशियातच 'येशू ख्रिस्त' होऊन गेला. तो स्वत:ला आकाशातील प्रेमळ बापाचा एकमेव पुत्र म्हणवीत असे. त्यानंतर अरबस्तानातील टोळ्यांमध्ये इ.सनाच्या सहाव्या शतकात 'महम्मद पैगंबर' या प्रेषिताचा जन्म झाला. त्याने स्थापन केलेला धर्म हा मुसलमान (इस्लाम) धर्म होय. तो स्वत:ला एकमेव ईश्वर अल्लाचा 'शेवटचा प्रेषित' म्हणवीत असे. ज्यूंच्या प्रेषितांना ख्रिश्चन व मुसलमान धर्मीय लोक प्रेषितच मानतात. महम्मद यांच्या मते 'येशू ख्रिस्त हा ईश्वराचा प्रेषितच होय, पण तो ईश्वराचा पुत्र नव्हे. ईश्वराचा पुत्र कुणीच नाही; ईश्वराला पुत्र असणे शोभत नाही.'
चीन या मोठय़ा आकाराच्या पण एकभाषिक देशात इ.स.च्या सहाव्या शतकापूर्वीसुद्धा ईश्वराला शोधून काढण्याला फारसे महत्त्व नव्हते. पण चीनच्या राजाला मात्र स्वर्गाचा पुत्र मानले जाई. तो स्वर्गाचा प्रतिनिधी असल्यामुळे प्रजेला त्याची आज्ञा शिरसावंद्य होती. पण तो आपली जबाबदारी नीट पार पाडीत नसल्यास, प्रजेला त्याची उचलबांगडी करण्याचा हक्क होता. इ.स.पू. सहाव्या शतकात लाओत्से आणि पाठोपाठ कन्फ्युशियस यांनी अनुक्रमे ताओइझम आणि कन्फ्युशिअ‍ॅनिझम हे आपले धर्म स्थापन केले. त्यांनीसुद्धा देव-ईश्वर आहे की नाही या वादात न पडता, पण ईश्वराला न नाकारता, गौतम बुद्धाप्रमाणे माणसांच्या गरजांकडे व दु:ख कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे बौद्ध धर्म चीनमध्ये गेला तेव्हा सर्वानीच त्याचे स्वागत केले व मिळतेजुळते घेतले.
याच इ.स.पू. सहाव्या शतकात भारतात महावीर जैन व गौतम बुद्ध हे दोन धर्म संस्थापक होऊन गेले. महावीराने ईश्वराचे अस्तित्व नाकारले व गौतम बुद्धाने त्याच्याविषयी बोलण्याचे नाकारले. परंतु या दोघांच्याही दोन हजार वर्षे अगोदर वेद रचणाऱ्या आर्यनिर्मित धर्म ज्याला आज हिंदू धर्म म्हणतात तो निर्माण झाला होता. त्याच्याविषयी पुढील प्रकरणात.

ओळख अभियांत्रिकी प्रवेश परीक्षांची!

अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे हे अनिवार्य असते. अभियांत्रिकी प्रवेशासाठी ज्या प्रवेशपरीक्षांचे गुण ग्राह्य़ धरले जातात, त्या परीक्षांची ओळख-
दरवर्षी अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवर नजर टाकली असता, अभियांत्रिकी शिक्षणक्रमांच्या बऱ्याच जागा रिक्त राहिल्याचे वाचनात येते. याचा अर्थ असा की, अभियांत्रिकी शिक्षणक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश निश्चितच मिळू शकतो; पण हव्या त्या महाविद्यालयात, हव्या त्या अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळवायचा असेल तर मात्र उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक आहे. आपल्याला, राज्यातीलच उत्तम महाविद्यालयात शिकायचे आहे का? फक्त सरकारी महाविद्यालयातच प्रवेश घ्यायचा आहे का? विशिष्ट एन.आय.टी.मध्ये शिकायचे आहे का? विशिष्ट आय.आय.टी/किंवा तिथल्या अमूक एका विद्याशाखेतच प्रवेश घ्यायचा आहे का, हे मनाशी पक्केकरून बारावीची परीक्षा आणि एकाच विशिष्ट प्रवेशपरीक्षेवर कसून मेहनत घेणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा एकाच वेळी अनेक प्रवेशपरीक्षांची तयारी करण्याचा प्रयत्न केला तर बारावीच्या अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते, शिवाय प्रवेशपरीक्षांतूनही सुमार कामगिरी होते. दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांची संपूर्ण मेहनत निष्फळ ठरते. मित्र-मत्रिणींनो, या लेखातून आपण अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक प्रवेशपरीक्षांची ओळख करून घेऊयात. 
जेईई मेन (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन मेन) 
शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या या एकमेव सामायिक प्रवेशपरीक्षेद्वारे देशभरातील एन.आय.टी. (नॅशनल इन्स्टिटय़ूट्स ऑफ टेक्नॉलॉजी), आय.आय.आय.टी.ज (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी), राज्य सरकारी आणि अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयांतून प्रवेश दिले जातात. प्रवेशासाठी बारावी परीक्षेतील गुण व जेईई परीक्षेतील गुण या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन गुणवत्ता यादी जाहीर केली जाते आणि पुढील प्रवेशप्रक्रियाचे सर्व टप्पे हे गुणवत्ता यादीच्या आधारेच पार पडतात. थोडक्यात, अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत ही परीक्षा निर्णायक भूमिका बजावते. 
ही सामायिक प्रवेशपरीक्षा दिल्लीच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई)नियंत्रित होते तर प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाकडून पार पडते. देशभरातील गुजरात, महाराष्ट्र, नागालँड, मध्यप्रदेश, हरयाणा, पंजाब, उत्तराखंड आणि ओरिसा या राज्यांनी अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेसाठी ही परीक्षा अधिकृत मानली आहे. या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ प्रश्न आणि बहुपर्यायी उत्तरे अशा प्रकारचे असून परीक्षार्थीना ही परीक्षा ऑनलाइन किंवा लेखी देण्याची सुविधा उपलब्ध आहे. 
शैक्षणिक वर्ष २०१४-१५मध्ये घेण्यात येणाऱ्या 'जेईई मेन्स'ची लेखी परीक्षा ४ एप्रिल २०१५ रोजी असून ऑनलाइन परीक्षा- १० एप्रिल २०१५ आणि ११ एप्रिल २०१५ रोजी आहे. प्रवेशप्रक्रियेची विस्तृत माहिती आणि विविध टप्प्यांवर होणारे बदल www.jeemain.nic.in या संकेतस्थळावर पाहता येतील. 
जेईई अ‍ॅडव्हान्स्ड 
जेईई मेन प्रवेशपरीक्षेत उत्तीर्ण झालेले (गुणानुक्रमानुसारचे) दीड लाख विद्यार्थी जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी पात्र असतात. या परीक्षेत मिळालेले गुण खालील शिक्षणसंस्थांतील प्रवेशासाठी ग्रह्य़ धरले जातात -
देशभरातील १६ आय.आय.टी.ज, इंडिअन स्कूल ऑफ माइन्स (आय.एस.एम.) धनबाद.
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ तील जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज स्वीकृती, परीक्षेचे वेळापत्रक व अन्य माहितीसाठी www.jeeadv.iitb.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधा.
जेईई मेन्स आणि अ‍ॅडव्हान्स्ड या दोन स्पर्धा परीक्षांद्वारे राज्यातील सुमारे सर्व सरकारी, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशाचा मार्ग खुला होतो. याव्यतिरिक्त काही खासगी स्वायत्त शिक्षण संस्थांतील शिक्षणाचा उत्तम दर्जा आणि तिथून घेतलेल्या पदवीला नोकरीच्या बाजारपेठेत असणारे अव्वल स्थान लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांचा कल या शिक्षणसंस्थांतून प्रवेश घेण्याकडे दिसून येतो. अशा आद्य आणि अग्रणी संस्थांतील अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक स्पर्धापरीक्षांची ओळख करून घेऊयात.. 
बिटसॅट 
बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानी ही तंत्रशिक्षणातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारी, देशपातळीवरील आद्य खासगी शिक्षण संस्था आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाकडून या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिव्हर्सटिी) दर्जा दिला गेला आहे. संस्थेच्या पिलानी, गोवा, हैद्राबाद, दुबई येथील शाखांतून केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्टुमेन्टेशन या विषयांच्या पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. यातील प्रवेशासाठी बिटसॅट ही परीक्षा आवश्यक आहे. परीक्षा फक्त संगणकीय (ऑनलाइन ) पद्धतीनेच देता येते. प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ व उत्तरे बहुपर्यायी असे असते. परीक्षेचा अभ्यासक्रम, वेळापत्रक आणि नमुना प्रश्नपत्रिका यांसाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा. www.bits-pilani.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१५ असून या वर्षीच्या परीक्षेचा कालावधी १४ मे २०१५ ते 
२९ मे २०१५ असा आहे. 
बारावीच्या गुणांनाही महत्त्व 
उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा (बारावी) - शैक्षणिक वर्ष २०१३-१४ वर्षांपासून अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत, बारावी परीक्षेतील गुणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. जेईई मेन परीक्षेच्या माहितीपत्रकाचा बारकाईने अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, संपूर्ण अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत बारावी (१०+२) परीक्षेतील गुणाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही परीक्षांतील (जेईई मेन व बारावी) गुणांच्या समानीकरणाच्या प्रक्रियेमुळे बारावी परीक्षेतील उत्तम कामगिरी, 
विद्यार्थ्यांस राज्यस्तरीय (स्टेट रँक- महाराष्ट्रातील महाविद्यालयांतील प्रवेशासाठी) तसेच देशस्तरावर (ऑल इंडिया रँक- देशभरातील एन.आय.टी.जमधील प्रवेशासाठी) गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी लाभदायक ठरते. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, विद्यार्थ्यांकडून बारावीच्या अभ्यासावर कमी भर दिला जातो आणि प्रवेशपरीक्षांच्या अभ्यासावर अधिक लक्ष पुरवले जाते, पण बारावी परीक्षेत कमी गुण आणि प्रवेशपरीक्षेत उत्तम गुण हे समीकरण गुणवत्ता यादीत वरचे स्थान मिळवण्यासाठी फायद्याचे ठरत नाही, तेव्हा बारावीच्या अभ्यासाला तरणोपाय नाही. खरं पाहता अभियांत्रिकीसाठीच्या प्रवेशपरीक्षांतील अभ्यासक्रमाचा प्रचंड आवाका, प्रश्नांची अनिश्चितता, वाढलेली काठिण्यपातळी या बाबी लक्षात घेता बारावी परीक्षेत जास्तीतजास्त गुण मिळवणे तुलनेने सोपे ठरू शकते. येत्या फेब्रुवारी २०१५ मध्ये बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा यापुढील परीक्षेपर्यंतचा सर्वाधिक वेळ बारावीच्या अभ्यासावर केंद्रित करणे हिताचे ठरेल.

AIMS ची व्यवस्थापन अभ्यासक्रम- प्रवेश परीक्षा

'एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन्स' (ATMA) ही एमबीए प्रवेशासाठी ग्राह्य़ धरली जाणारी देशस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासाच्या नियोजनाविषयी..



एमबीएच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. या अभ्यासक्रमासाठी ग्राह्य़ धरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांपैकी 'सीमॅट' या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती आपण गेल्या आठवडय़ात करून घेतली. आज आपण असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (AIMS) या संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेविषयी जाणून घेऊयात.
'एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन्स' (ATMA) ही एमबीए प्रवेशासाठी ग्राह्य़ धरली जाणारी देशस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. 'एमबीए'साठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश देताना राज्याबाहेरील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ज्या १५ टक्के जागा राखीव असतात, त्यासाठी 'आत्मा' परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले जातात. तसेच एखाद्या संस्थेतील एकूण जागांपैकी २० टक्के जागांवर व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश दिला जातो. यासाठीदेखील 'आत्मा' परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले जातात.
२०१५ मध्ये 'आत्मा' ही परीक्षा १५ फेब्रुवारी २०१५ या दिवशी होणार असून या परीक्षेसाठीची नोंदणी 
२० डिसेंबरपासून सुरू झाली आहे. नोंदणीची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१५ आहे आणि या प्रवेश परीक्षेचा निकाल २८ फेब्रुवारीच्या आसपास लागेल. फेब्रुवारी २०१५ मध्ये होणाऱ्या या परीक्षेची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. परीक्षा मात्र ऑनलाइन पद्धतीने होणार नाही तर पेपर बेस्ड म्हणजेच पारंपरिक पद्धतीनेच होणार आहे. तसेच 'आत्मा' ही परीक्षा २४ मे २०१५ आणि २६ जुलै २०१५ या तारखांनाही होईल. मात्र, या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होतील. फेब्रुवारी २०१५ मधील परीक्षा मात्र ऑफलाइन पद्धतीने होईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
'आत्मा' परीक्षेच्या स्वरूपाविषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे परीक्षेचा अभ्यास योग्य पद्धतीने करता येईल. या परीक्षेसाठी एकूण तीन तासांचा अवधी मिळतो आणि या तीन तासांमध्ये एकूण १८० प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजेच एका मिनिटामध्ये एक प्रश्न असे वेळेचे नियोजन करावे लागते. प्रत्येक अचूक उत्तराला एक गुण मिळतो आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराबद्दल १/३ गुण वजा केला जातो. म्हणजेच या परीक्षेत 'निगेटिव्ह' गुणांकन पद्धती आहे. आणि त्यामुळेच उत्तम गुण मिळवण्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन आणि तयारी करणे गरजेचे आहे. परीक्षेचा पेपर हा एकूण सहा विभागांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये विश्लेषणात्मक कौशल्ये, (अ‍ॅनालिटिकल रिझनिंग स्किल्स), शाब्दिक कौशल्ये (व्हर्बल स्किल्स) आणि संख्यात्मक कौशल्ये (क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स) या विभागांचा समावेश होतो.
विश्लेषणात्मक कौशल्ये या भागामध्ये मुख्यत: तर्कसंगत विचार (लॉजिकल थिंकिंग) करण्याची क्षमता तपासली जाते. यामध्ये कोणत्याही एका विभागातील विशेष ज्ञान (स्पेशलाइज्ड नॉलेज) असण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक प्रश्न एखाद्या परिस्थितीवर (situation) आधारित असतो आणि त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता तपासली जाते. व्यवस्थापन क्षेत्रामध्ये करिअर करताना जी विश्लेषणात्मक क्षमता वापरावी लागते, तिची सुरुवातच या परीक्षेच्या निमित्ताने होते. यासाठी प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण करत निष्कर्ष काढण्याची सवय लावून घेतली पाहिजे. दैनंदिन व्यवस्थापनामध्ये एखादा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी विश्लेषणात्मक क्षमता उपयोगी पडते.

शाब्दिक कौशल्यावर आधारित प्रश्नांमध्ये मुख्यत: समानार्थी शब्द, वाक्याची रचना योग्य पद्धतीने करणे, वाक्य पूर्ण करणे, तसेच एखादा परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे देणे यासारख्या प्रश्नांचा समावेश होतो. यापैकी समानार्थी शब्दविषयक प्रश्न सोडवताना पूर्वतयारीची गरज असते. यासाठी दररोज किमान दहा नवीन इंग्रजी शब्द शिकून त्याचे समानार्थी शब्द शोधून काढायला हवे. यासाठी चिकाटी व मेहनत आवश्यक ठरते. दररोज नवीन इंग्रजी शब्द शोधून काढण्याची सवय पुढील आयुष्यात तसेच व्यवस्थापन क्षेत्रात उपयोगी पडते. चुकीचे वाक्य दुरुस्त करणे आणि अपुरे वाक्य पूर्ण करणे यासाठी इंग्रजी व्याकरणाची उजळणी करणे अनिवार्य आहे. वास्तविक हे प्रश्न अजिबात अवघड नाहीत, पण योग्य प्रकारे सराव केला नाही तर मात्र प्रश्न सोडवणे कठीण जाते. यासाठी नियमित सरावाला पर्याय नाही.
संख्यात्मक कौशल्यांवर आधारित प्रश्नांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात. यामध्ये सरासरी काढणे, टक्केवारी काढणे, नफा किंवा तोटा यासंबंधीची आकडेमोड, गुणोत्तर व प्रमाण (रेशिओ व प्रपोर्शन), भूमितीविषयक प्रश्न, काळ, काम व वेग यावर आधारित प्रश्न, घनफळ काढणे, सेट थिअरी, लॉगॅरिथम, समीकरणे इ. अनेक प्रश्नांचा समावेश होतो. या विभागातील प्रश्नांची काठिण्य पातळी फारशी नाही. म्हणजेच हे प्रश्न अतिशय अवघड नसतात. मात्र, अनेकांना हा विभाग अवघड जातो, याचे कारण ते सरावात कमी पडतात. त्यावर शाळेमध्ये शिकलेल्या गणिताची पूर्ण उजळणी करणे हा एकच पर्याय आहे. दररोज नियमित सराव केल्यास हाही घटक अवघड ठरणार नाही.
वर उल्लेख केल्याप्रमाणे 'आत्मा' परीक्षेचे एकूण सहा विभाग आहेत. मात्र, प्रश्न प्रामुख्याने वर वर्णन केलेल्या तीन विभागांवर आधारित असतात. 'आत्मा' ही केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मान्यता दिलेली अखिल भारतीय पातळीवरील एक परीक्षा असून अनेक व्यवस्थापन संस्थांमध्ये या परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले जातात. या सर्व संस्थांची यादी 'आत्मा बुलेटिन'मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय राज्याच्या तंत्रशिक्षण विभागामार्फत होणाऱ्या केंद्रीय प्रवेश पद्धतीमध्ये या परीक्षेतील गुण विचारात घेतले जातात. 
'आत्मा' ही परीक्षा २०१५ मध्ये फेब्रुवारी, मे आणि जुलै अशी तीन वेळा घेण्यात येणार असली तरी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी फेब्रुवारी २०१५ मधील परीक्षेच्या दृष्टीनेच नियोजन केलेले उत्तम. नियमित सराव आणि मेहनत यांच्या साहाय्याने परीक्षेत चांगले गुण मिळवून आपल्या पसंतीच्या व्यवस्थापन संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत एमबीए प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेची (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) तारीख जाहीर झाली असून ही परीक्षा शनिवार, १४ मार्च व रविवार, १५ मार्च २०१५ या दिवशी घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीची आहे. या परीक्षेविषयीची इतर माहिती अद्याप जाहीर व्हायची आहे. एमबीए अभ्यासक्रमासंबंधातील या प्रमुख प्रवेश परीक्षेविषयीची सविस्तर माहिती 
पुढील लेखात..
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

अभ्यासाच्या दीर्घकालीन नियोजनाची गरज

२०१४ सालच्या डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न पाहता काही बाबी लक्षात घ्याव्या लागतात. एकतर मुख्य परीक्षेसाठी विशेषीकृत अभ्यास बाजूला सारून व्यापक निरीक्षणात्मक अभ्यासाची पद्धत स्वीकारणे आज अपरिहार्य बनले आहे. चौफेर नजर ठेवत वर्षभरात घडणाऱ्या घटना, घडामोडी अचूकपणे टिपण्याची आणि त्या घटनांचा अभ्यास करत, विश्लेषणात्मक दृष्टी विकसित करण्याची नितांत आवश्यकता आहे. यासाठी सुरुवातीला अभ्यासक्रमाच्या सर्व विषयांतील मूलभूत संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर अभ्यासक्रमातील घटकांना समकालीन घटना-घडामोडींशी जोडण्याची हातोटी विकसित करावी. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर अभ्यासक्रमातील मूळ घटकांची चालू घडामोडींशी नाळ जोडता आल्याशिवाय मुख्य परीक्षेतील प्रश्नांना सामोरे जाणे जिकिरीचे होऊन बसते. हा संबंध जोडताना संबंधित विषयाचे मूलभूत आकलन होणे क्रमप्राप्त ठरते. या पाश्र्वभूमीवर नागरी सेवा परीक्षेच्या तयारीमध्ये नियोजनाची भूमिका अधिकच महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. 
वास्तविक कोणत्याही ध्येयापर्यंत अचूकपणे मार्गक्रमण करण्यासाठी नियोजनाची गरज असते. नियोजन ही एकदाच ठरवण्याची बाब नसून ती दीर्घकालीन प्रक्रिया आहे. यूपीएससी परीक्षेच्या संदर्भात नियोजन कळीचे ठरते ते पुढील कारणांमुळे- व्यापक अभ्यासक्रम, वाचायचे बरेच संदर्भ, विविध प्रकारच्या विषयांचा अभ्यास, पूर्व-मुख्य परीक्षा आणि मुलाखत अथवा व्यक्तिमत्त्व चाचणी असे विविधांगी स्वरूप असणारी परीक्षा आणि त्यासाठी किमान एका वर्षांचा पूर्ण वेळ, सातत्यपूर्ण अभ्यासाची गरज या बाबींमुळे प्रत्येक विद्यार्थ्यांला या परीक्षेच्या तयारीचे सखोल नियोजन करावेच लागते. 

काही कालावधीत केलेला प्रचंड अभ्यास नव्हे तर निर्धारित कालावधीत केलेला नियमित व सातत्यपूर्ण अभ्यास ही बाब या परीक्षेसाठी अत्यावश्यक आहे.
नागरी सेवा परीक्षेच्या अभ्यासामध्ये नियोजनाची भूमिका काय असते हे समजून घेताना काही उद्दिष्टे दृष्टिक्षेपात येतात. ती उद्दिष्टे किंवा हेतू संपादन करण्यातून या परीक्षेचा अभ्यास अधिकाधिक सुलभ बनतो. ही उद्दिष्टे पुढीलप्रमाणे दिसून येतात-
* पहिला हेतू म्हणजे पर्याप्त (केवळ एकच किंवा भाराभर अशी दोन्ही टोके टाळून) संदर्भस्रोत वापरत या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करावी. मात्र, निवड करताना त्या संदर्भसाहित्याचा दर्जा आणि गुणवत्ता लक्षात घ्यावी. आपण अभ्यासासाठी जे संदर्भसाहित्य वापरणार आहोत, ते अस्सल आहे काय याचा विचार प्रामुख्याने करणे अपेक्षित आहे. अस्सल संदर्भच का निवडावेत आणि कसे निवडावेत, असाही प्रश्न समोर येऊ शकतो. खरेतर विषयाची संकल्पनात्मक मांडणी, विस्तारित दृष्टिकोन, विश्लेषण आणि विषयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आणि त्याच्या समकालीन संदर्भाची चर्चा अस्सल संदर्भसाहित्यांमध्येच केलेली असते. उदा. 'एनसीईआरटी'ची क्रमिक पुस्तके वाचून झाल्यानंतर पुढील टप्प्यावर त्या विषयावरील निवडक संदर्भसाहित्यांचे वाचन आवश्यक ठरते. मात्र बहुतांश विद्यार्थी अभ्यास करताना हे करताना दिसत नाहीत.
* या परीक्षेच्या तयारीसाठी वेळेचे व्यवस्थापन करणे अनिवार्य ठरते. सुरुवात मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून करायची झाल्यास मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात किती विषय समाविष्ट आहेत, कोणत्या विषयांना अधिक महत्त्व आहे, कोणत्या विषयांना किती प्रमाणात वेळ देण्याची आवश्यकता आहे, हे ठरवल्याशिवाय वेळेचे गणित सोडविता येत नाही. उदा. राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, नीती आणि प्रशासन हे अभ्यासघटक मोठे असल्याकारणाने त्यांना किती वेळ द्यावा लागेल याचा विचार सर्वप्रथम करायला हवा. त्यानंतर उर्वरित अभ्यासघटकांना वेळेचे वाटप करता येऊ शकते. कोणत्या घटकाचे आकलन होण्यास अधिक काळ लागू शकतो अथवा कमी लागू शकतो या मापदंडावरही वेळेचे वितरण करता येते. थोडक्यात, सर्व विषयांना योग्य न्याय देता येईल या दृष्टीने वेळापत्रक निश्चित करणे उपयुक्त ठरेल.
* मुख्य परीक्षेसाठीचा अभ्यास करताना संदर्भसाहित्यांवर कात्री चालवण्याचे कौशल्ये येणे हीसुद्धा आवश्यक बाब ठरते. याचा अर्थ आपण जी काही संदर्भसाधने वापरतो, ज्यामध्ये पायाभूत पुस्तके, संदर्भग्रंथ, वृतपत्रे तसेच नियतकालिके इत्यादींचा समावेश होतो, अशा साधन स्रोतांचे वाचन करताना या परीक्षेला पूरक आणि पुरेसा होईल एवढाच आवश्यक भाग त्यातून घ्यावा. त्यातील अनावश्यक भागाचे वाचन टाळता आले पाहिजे. एखाद्या संदर्भपुस्तकाचे संपूर्ण वाचन न करता त्यातील काही महत्त्वाचे िबदू विचारात घेण्याची गरज असते. त्यातून आपल्याला वेळ वाचवता येऊ शकतो. थोडक्यात, संदर्भसाहित्यातून कोणता भाग घ्यायचा आणि कोणता नाही याविषयीची संपादकीय दृष्टी आत्मसात करणे अनिवार्य आहे.
* या परीक्षेच्या अभ्यासाची चौकट नियोजनाशिवाय निर्माण करता येऊ शकत नाही. आपण जेव्हा अभ्यासाची चौकट आखतो, त्या वेळी आपला अभ्यास काही विषय घटकांपुरता केंद्रित व एकांगी पद्धतीने न होता सर्व विषयांना त्यांच्या गरजानुरूप समन्याय देणारा असेल, याची खात्री बाळगायला हवी. एखादा घटक कितीही छोटा असो, आपण आखलेल्या चौकटीतून निसटून जाता कामा नये. अभ्यासाच्या चौकटीमुळे तयारी करताना नेमकेपणा आणि अचूकता येते. त्यामुळे आपल्याला तयारी करायची म्हणजे नेमके काय करायचे, कसे करायचे आणि कोणत्या संदर्भसाहित्याचा कसा वापर करायचा आणि कोणती कौशल्ये आत्मसात करायची याचा आराखडा सुस्पष्ट होतो. नागरी सेवा परीक्षेचा व्यापक पट बघता परीक्षेच्या अभ्यासाची आपापली चौकट विकसित करणे नितांत आवश्यक आहे.
* नियोजनातून वाचन, चिंतन आणि लेखन यांचा धागा जुळवता यायला हवा. वाक्यांच्या पाठीमागील (केवळ शब्दार्थ नव्हे, मथितार्थही) अर्थ लक्षात घेऊन केलेल्या वाचनाला 'सूक्ष्म वाचन' म्हटले जाते. अशा वाचनातूनच आपल्या मनात चिंतनाची प्रक्रिया सुरू होते. या चिंतनातून किंवा विचारप्रक्रियेतून वाढलेली आकलनक्षमताच आपल्या लेखनात नवनिर्मिती आणू शकते. आपल्या नियोजनात लेखनाच्या सरावास योग्य वेळ देऊन त्यात नेमकेपणा व प्रभावीपणा याची हमी देता येईल. 
या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी सुरू करताना वरील हेतू साध्य होण्याकरता दीर्घकालीन नियोजनाचे महत्त्व अधोरेखित होते. दीर्घकालीन नियोजन आखताना ते लवचीक किंवा परिस्थितीसापेक्ष ठेवण्याचीही गरज असते. त्याच जोडीला प्रत्येक टप्प्यावरचे सूक्ष्म नियोजनसुद्धा तयार ठेवावे लागते. या परीक्षेची तयारी करताना विद्यार्थीसापेक्ष नियोजनाची पातळी वेगवेगळी असू शकते, याचे भान असणे अत्यावश्यक ठरते. नियोजनाची वरील चर्चा ही केवळ पद मिळवण्यापुरती मर्यादित न राहता आपण यशस्वितांच्या यादीमध्ये वरच्या क्रमांकावर कसे असू याचा विचार करून ही मांडणी केलेली आहे. नवीन वर्षांच्या सुरुवातीला या परीक्षेच्या अभ्यासाची तयारी करण्याचा संकल्प ज्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे, त्यांना नियोजनाचे महत्त्व समजल्यानंतर त्यांच्या अभ्यासाची सुरुवात प्रत्यक्षात कुठून व कशी असेल, याची चर्चा आपण पुढील लेखात करणार आहोत.

राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी..

राज्यसेवा (एमपीएससी) स्पर्धापरीक्षेची पूर्वतयारी करताना काही अभ्यासतंत्रे विकसित करणे आवश्यक असते. त्याविषयी..
गेल्या काही वर्षांत राज्यभरातून स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षीच्या राज्यसेवा परीक्षेचा विचार करता, सुमारे ४५० पदांसाठी, १२-१३ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यंदा, 
५ एप्रिल २०१५ रोजी होणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेलाही १३-१४ लाख विद्यार्थी बसतील, अशी अपेक्षा आहे. या परीक्षेला सामोरे जाताना काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम परीक्षेसाठी नमूद केलेला अभ्यासक्रम समजून घ्या. अभ्यासक्रमातील प्रत्येक घटक-उपघटकांना प्रकरणांमध्ये विभाजित करून अभ्यासाला सुरुवात करावी. गेल्या दोन-तीन वर्षांत कोणत्या प्रकरणावर किती प्रश्न विचारले गेले आहेत, प्रश्नांचे स्वरूप कसे आहे हे समजून घेत अभ्यास करावा. प्रत्येक प्रश्न त्याला जोडून येणारे उपप्रश्न यांविषयी स्पर्धापरीक्षा देणाऱ्या मित्रांशी सविस्तर चर्चा करावी. 
वाचन तंत्र 
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासाची स्वत:ची एक योजना बनवणे आवश्यक आहे. कोणते अभ्यास साहित्य वाचावे, कोणते टाळावे हे समजणे आवश्यक आहे. जास्त संदर्भग्रंथ वाचण्यापेक्षा प्रत्येक घटकावर एक-दोन संदर्भग्रंथांचे वाचन करावे. एखादा घटक वाचण्यापूर्वी त्या घटकावर मागच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किती प्रश्न विचारले गेले आहेत, त्यांचे स्वरूप कसे होते, याचे विश्लेषण करावे म्हणजे आपल्याला कोणत्या भागावर किती लक्ष केंद्रित करायचे आहे हे लक्षात येईल. जर आपण एखादा घटक पहिल्यांदाच वाचत असाल तर वेळ लागतो, आपल्या पहिल्या वाचनातच तो विषय पूर्णपणे समजेल असे होत नाही. दुसऱ्यांदा वाचताना महत्त्वाच्या घटकांना अधोरेखित करावे, म्हणजे पुढच्या वेळी उजळणी करताना पूर्ण पुस्तक वाचण्याची आवश्यकता भासत नाही. पुढच्या वेळी फक्त अधोरेखित केलेल्या ओळींचे वाचन करावे, म्हणजे नेमक्या गोष्टींचा अभ्यास अधिक पक्का होता आणि वेळ 
मोडत नाही.
उजळणी
स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासात उजळणीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. माणसाचा मेंदू संगणक नाही. आपण जे वाचतो, ते तसेच्या तसे जास्त कालावधीपर्यंत लक्षात ठेवू शकत नाही. यासाठी आपण अभ्यासलेल्या विषयाची वेळोवेळी उजळणी करणे आवश्यक असते. अर्थात, उजळणी म्हणजे पाठांतर नाही.
अभ्यास करताना दर ४०-५० मिनिटांनंतर किमान पाच मिनिटांचा ब्रेक घ्यावा. त्यानंतर आपण काय वाचले ते आठवून पाहावे. प्रत्येक दिवसाअंती आपण काय वाचले हे झोपण्यापूर्वी आठवून पाहावे. वाचलेल्या घटकांवर आधारित सुमारे १०० प्रश्नांची निवड करून ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. जे प्रश्न अडतील तो घटक पुन्हा वाचावा. महिन्याच्या शेवटचे दोन-तीन दिवस ठरवून केवळ त्या महिन्याभरात अभ्यासलेल्या प्रकरणांची उजळणी करावी.

वेळेचे व्यवस्थापन 
अभ्यास किती करावा, किती वेळ करावा याचे प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. प्रत्येकाचा अभ्यासाचा असा स्वतंत्र 'प्राइम टाइम' असतो. त्या वेळीच त्याचा अभ्यास उत्तम होतो. पहाटेच्या शांत वातावरणात कुणाच्याही अभ्यासाची समाधी लागते तर कुणाची बठक रात्रीच्या नीरवतेत पक्की जमते. आपला अभ्यास उत्तम पद्धतीने कोणत्या वेळी होतो हे शोधून काढा. हा तुमचा 'प्राइम टाइम' नव्या घटकाची सुरुवात करण्यासाठी तसेच अवघड वाटणाऱ्या पॉइंट्सचा अभ्यास करण्यासाठी राखून ठेवावा. बाकीच्या वेळेत उजळणी, पाठांतर इत्यादी गोष्टी कराव्यात. 
लिहिणं, वाचणं, नोट्स काढणं, प्रश्न सोडवणं, विश्लेषण या परिघाबाहेरही स्पर्धा परीक्षेची दुनिया विस्तारलेली आहे. एकाग्रता कमी झाली की, अभ्यासाला सरळ अर्धविराम देऊन या तयारीकडे वळता येईल. झोपेचे तास कमी करून केलेल्या अभ्यासापेक्षा व्यवस्थित झोप व पुरेसे खाणे झाल्यावर केलेला काही तासांचा अभ्यास अधिक चांगला होतो. ज्या वेळी आपल्याला झोप येत असेल, अभ्यासाचा मूड नसेल त्या वेळी तो वेळ 'सीसॅट पेपर २' साठी किंवा समूह चर्चेसाठी राखून ठेवलेला चांगला. शक्य आहे तेव्हा अभ्यासाचे वेळापत्रक करण्यापेक्षा पूर्ण दिवसभराचे वेळापत्रक ठरवायला हवे. वेळापत्रकानुसार अभ्यास जमत नसेल (बहुतेक वेळा तो जमत नाहीच!) तर अभ्यासानुसार वेळापत्रक बनवा. 
संदर्भग्रंथांचे वाचन 
* चालू घडामोडी - या उपघटकाच्या तयारीसाठी दररोज दोन दैनिकांचे सविस्तर वाचन करून त्यांतील महत्त्वाचे मुद्दे नमूद करून ठेवावेत. 
* इतिहास - इतिहासाचा अभ्यास करताना सर्वप्रथम क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे.
प्राचीन व मध्ययुगीन भारताच्या इतिहासासाठी क्रमिक पुस्तकांचा आधार घ्यावा. 
आधुनिक भारताचा इतिहास- बिपिनचंद्रा. हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे. 
आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर अ‍ॅण्ड ग्रोवर. हे पुस्तक मराठीत भाषांतरित झालेले आहे. 
* भूगोल- सर्वप्रथम पाचवी ते बारावीपर्यंतच्या क्रमिक पुस्तकांचे वाचन करावे. तसेच भारताचा भूगोल- प्रा. ए. बी. सवदी, महाराष्ट्राचा समग्र भूगोल- प्रा. ए. बी. सवदी ही पुस्तके अभ्यासावीत. 
* पर्यावरण व परिस्थितीकी या घटकांचा अभ्यास करण्यासाठी इंटरनेटचा वापर केल्यास अधिक फायदा होतो.
आपले पर्यावरण- नॅशनल बुक ट्रस्ट. 
* भारतीय राज्यघटना- या घटकासाठी अकरावी-बारावीची क्रमिक पुस्तके वाचावीत. तसेच भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत (इंग्रजीत) आणि आपली संसद- डॉ. सुभाष कश्यप. 
(हे पुस्तक मराठीत भाषांतरित 
झालेले आहे.) या पुस्तकांचा अभ्यास करावा.
* आíथक व सामाजिक विकास- इयत्ता अकरावी, बारावीची क्रमिक पुस्तके अभ्यासावीत.
* भारतीय अर्थव्यवस्था- 'प्रतियोगिता दर्पण' (हे िहदीत तसेच इंग्रजीत उपलब्ध आहे. या पुस्तकाच्या अखेरीस नमूद केलेले प्रश्न अवश्य वाचावेत.) आणि महाराष्ट्राची आíथक पाहणी अभ्यासावी. 
* विज्ञान आणि तंत्रज्ञान - सहावी ते दहावीपर्यंतची क्रमिक पुस्तके वाचून त्यानंतर 'स्पेक्ट्रम पब्लिकेशन'च्या (इंग्रजी) पुस्तकाचे वाचन करावे. 
वरील पुस्तकांव्यतिरिक्त योजना, कुरुक्षेत्र, लोकराज्य या मासिकांतील अभ्यासक्रमासंदर्भातील लेख अवश्य वाचावेत. 
grpatil2020@gmail.com

अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे निधन

बालतारका ते अभिनेत्री असा प्रवास करणारी पहिली अभिनेत्री बेबी शकुंतला ऊर्फ उमादेवी खंडेराव नाडगौडा यांचे रविवारी सकाळी येथे निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. तपभराच्या कालावधीत त्यांनी िहदी मराठी चित्रपटसृष्टीत साठ चित्रपटांमध्ये अभिनय केला. विवाहानंतर त्यांनी अभिनय संन्यास घेतला, तरी चित्रपटसृष्टीशी त्यांचे नाते मात्र अखेपर्यंत कायम होते. येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहे. 
बेबी शकुंतला या जुन्या मराठी, िहदी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश अभिनेत्री होत्या. १७ नोव्हेंबर १९३२ रोजी पुणे येथे त्यांचा जन्म झाला. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. त्यांचे शिक्षण पुण्याच्या भावे
प्रशालेत झाले. त्यांचे वडील मुद्रणालयात नोकरीस होते. प्रभात स्टुडिओचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते व त्यांनीच त्यांना चित्रपटात अभिनय करण्यासाठी विचारले. त्यांच्या वडिलांना ते मान्य नव्हते पण अखेर बरेच समजून सांगितल्यानंतर त्यांचा चित्रपट प्रवेश नक्की झाला. 
प्रभातच्या '१० वाजता' या चित्रपटातून पहिल्या मराठी बालतारका म्हणून त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. १९४४ साली प्रदर्शित झालेल्या 'रामशास्त्री' चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी खूपच गाजली. 
'दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव' या गाण्याने त्यांची सर्वदूर ओळख झाली. बालतारका ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. तत्पूर्वी ज्या बालतारका म्हणून चमकल्या, त्यापकी कोणालाही पुढे अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली नव्हती. 
बारा वर्षांच्या कालावधीत त्यांनी मराठी व िहदी भाषेतील साठ चित्रपटांमध्ये अभिनय केला. मायाबाजार, शारदा, तारामती, भाग्यवान, अखेर जमलं, छत्रपती शिवाजी, नन्हे-मुन्हे, अबोली, सौभाग्य, मायबहिणी, कमल के फुल, फरेब, सपना, लहरे, परदेस, झमेला आदी गाजलेल्या चित्रपटांचा त्यामध्ये समावेश होतो. 
मास्टर अविनाश, दुर्गा खोटे, केशवराव दाते आदींसोबत त्यांनी काम केले. भाजली पेंढारकर, बिमल रॉय, दिनकर द. पाटील, अनंत माने, केदार शर्मा, बी.आर.चोप्रा यांसारख्या नामवंत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले होते. पूजा, शिवकन्या, बिंदिया, ब्रजबहू हे चित्रपट त्यांनी केले. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यामध्ये प्रभात पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, कोल्हापूर भूषण शाहू मोडक पुरस्कार, राजा परांजपे पुरस्कार आदींचा समावेश आहे. १९५४ मध्ये त्यांनी येथील उमा चित्रपटगृहाचे चालक खंडेराव नाडगौडा यांच्याशी विवाह केला. तेव्हापासून त्यांनी चित्रपट संन्यास घेतला होता. 
चित्रपटसृष्टीवर शोककळा
बेबी शकुंतला यांच्या निधनाचे वृत्त कळताच येथील हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञान यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी त्यांच्या आठवणी जाग्या केल्या. ते म्हणाले, की त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याचा योग आला नाही. पण त्यांचा सहज सुंदर अभिनय पाहून बरेच काही शिकता आले. 'अबोली' चित्रपटात मूकबधिर कलाकाराचे काम करताना त्यांनी दाखवलेला हृदयस्पर्शी अभिनय अमीट छाप उमटवणारा आहे. शारदा नाटकावर आधारित 'शारदा' चित्रपट बनवला गेला. 
नाटकातील शारदेपेक्षा त्यांचा अभिनय काकणभर सरस होता. त्यांनी चित्रपटात काम करायचे सोडले असले, तरी मराठी चित्रपटसृष्टी व चित्रपट महामंडळाशी त्यांचे नाते अखेपर्यंत कायम होते. प्रभातच्या तुतारीचे पुनरुज्जीवन करण्याच्या कार्यक्रमास त्या आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या जाण्याने चित्रपट महामंडळाचा आधार आम्ही गमावून बसलो आहोत. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांनी जुन्या काळातील नसíगक अभिनय करणारी अभिनेत्री गमावल्याचे सांगितले. 
दादा कोंडके यांच्यापासून त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध होता. 'उमा' चित्रपटगृह त्यांचेच असल्याने मराठी चित्रपटाच्या वितरणाला त्यांच्याकडून सतत मोठी मदत मिळत होती.