अभियांत्रिकी पदवी परीक्षेच्या प्रवेशासाठी प्रवेशपरीक्षा उत्तीर्ण होणे हे अनिवार्य असते. अभियांत्रिकी प्रवेशासाठी ज्या प्रवेशपरीक्षांचे गुण ग्राह्य़ धरले जातात, त्या परीक्षांची ओळख-
दरवर्षी अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांवर नजर टाकली असता, अभियांत्रिकी शिक्षणक्रमांच्या बऱ्याच जागा रिक्त राहिल्याचे वाचनात येते. याचा अर्थ असा की, अभियांत्रिकी शिक्षणक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश निश्चितच मिळू शकतो; पण हव्या त्या महाविद्यालयात, हव्या त्या अभियांत्रिकी शाखेत प्रवेश मिळवायचा असेल तर मात्र उद्दिष्ट निश्चित करणे आवश्यक आहे. आपल्याला, राज्यातीलच उत्तम महाविद्यालयात शिकायचे आहे का? फक्त सरकारी महाविद्यालयातच प्रवेश घ्यायचा आहे का? विशिष्ट एन.आय.टी.मध्ये शिकायचे आहे का? विशिष्ट आय.आय.टी/किंवा तिथल्या अमूक एका विद्याशाखेतच प्रवेश घ्यायचा आहे का, हे मनाशी पक्केकरून बारावीची परीक्षा आणि एकाच विशिष्ट प्रवेशपरीक्षेवर कसून मेहनत घेणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा एकाच वेळी अनेक प्रवेशपरीक्षांची तयारी करण्याचा प्रयत्न केला तर बारावीच्या अभ्यासाकडेही दुर्लक्ष होते, शिवाय प्रवेशपरीक्षांतूनही सुमार कामगिरी होते. दोन दगडांवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तर विद्यार्थ्यांची संपूर्ण मेहनत निष्फळ ठरते. मित्र-मत्रिणींनो, या लेखातून आपण अभियांत्रिकी प्रवेशासाठी आवश्यक प्रवेशपरीक्षांची ओळख करून घेऊयात.
जेईई मेन (जॉइंट एन्ट्रन्स एक्झामिनेशन मेन)
शैक्षणिक वर्ष २०१३-१४ पासून केंद्र सरकारने निर्धारित केलेल्या या एकमेव सामायिक प्रवेशपरीक्षेद्वारे देशभरातील एन.आय.टी. (नॅशनल इन्स्टिटय़ूट्स ऑफ टेक्नॉलॉजी), आय.आय.आय.टी.ज (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फम्रेशन टेक्नॉलॉजी), राज्य सरकारी आणि अन्य अभियांत्रिकी महाविद्यालयांतून प्रवेश दिले जातात. प्रवेशासाठी बारावी परीक्षेतील गुण व जेईई परीक्षेतील गुण या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन गुणवत्ता यादी जाहीर केली जाते आणि पुढील प्रवेशप्रक्रियाचे सर्व टप्पे हे गुणवत्ता यादीच्या आधारेच पार पडतात. थोडक्यात, अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत ही परीक्षा निर्णायक भूमिका बजावते.
ही सामायिक प्रवेशपरीक्षा दिल्लीच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई)नियंत्रित होते तर प्रत्यक्ष प्रवेशप्रक्रिया तंत्रशिक्षण संचालनालयाकडून पार पडते. देशभरातील गुजरात, महाराष्ट्र, नागालँड, मध्यप्रदेश, हरयाणा, पंजाब, उत्तराखंड आणि ओरिसा या राज्यांनी अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेसाठी ही परीक्षा अधिकृत मानली आहे. या परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ प्रश्न आणि बहुपर्यायी उत्तरे अशा प्रकारचे असून परीक्षार्थीना ही परीक्षा ऑनलाइन किंवा लेखी देण्याची सुविधा उपलब्ध आहे.
शैक्षणिक वर्ष २०१४-१५मध्ये घेण्यात येणाऱ्या 'जेईई मेन्स'ची लेखी परीक्षा ४ एप्रिल २०१५ रोजी असून ऑनलाइन परीक्षा- १० एप्रिल २०१५ आणि ११ एप्रिल २०१५ रोजी आहे. प्रवेशप्रक्रियेची विस्तृत माहिती आणि विविध टप्प्यांवर होणारे बदल www.jeemain.nic.in या संकेतस्थळावर पाहता येतील.
जेईई अॅडव्हान्स्ड
जेईई मेन प्रवेशपरीक्षेत उत्तीर्ण झालेले (गुणानुक्रमानुसारचे) दीड लाख विद्यार्थी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा देण्यासाठी पात्र असतात. या परीक्षेत मिळालेले गुण खालील शिक्षणसंस्थांतील प्रवेशासाठी ग्रह्य़ धरले जातात -
देशभरातील १६ आय.आय.टी.ज, इंडिअन स्कूल ऑफ माइन्स (आय.एस.एम.) धनबाद.
शैक्षणिक वर्ष २०१४-१५ तील जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज स्वीकृती, परीक्षेचे वेळापत्रक व अन्य माहितीसाठी www.jeeadv.iitb.ac.in या संकेतस्थळावर संपर्क साधा.
जेईई मेन्स आणि अॅडव्हान्स्ड या दोन स्पर्धा परीक्षांद्वारे राज्यातील सुमारे सर्व सरकारी, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील प्रवेशाचा मार्ग खुला होतो. याव्यतिरिक्त काही खासगी स्वायत्त शिक्षण संस्थांतील शिक्षणाचा उत्तम दर्जा आणि तिथून घेतलेल्या पदवीला नोकरीच्या बाजारपेठेत असणारे अव्वल स्थान लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांचा कल या शिक्षणसंस्थांतून प्रवेश घेण्याकडे दिसून येतो. अशा आद्य आणि अग्रणी संस्थांतील अभियांत्रिकी शिक्षणाच्या प्रवेशासाठी आवश्यक स्पर्धापरीक्षांची ओळख करून घेऊयात..
बिटसॅट
बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी, पिलानी ही तंत्रशिक्षणातील अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण देणारी, देशपातळीवरील आद्य खासगी शिक्षण संस्था आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाकडून या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा (डीम्ड युनिव्हर्सटिी) दर्जा दिला गेला आहे. संस्थेच्या पिलानी, गोवा, हैद्राबाद, दुबई येथील शाखांतून केमिकल, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड इन्स्टुमेन्टेशन या विषयांच्या पदवी अभ्यासक्रमांचे शिक्षण दिले जाते. यातील प्रवेशासाठी बिटसॅट ही परीक्षा आवश्यक आहे. परीक्षा फक्त संगणकीय (ऑनलाइन ) पद्धतीनेच देता येते. प्रश्नांचे स्वरूप वस्तुनिष्ठ व उत्तरे बहुपर्यायी असे असते. परीक्षेचा अभ्यासक्रम, वेळापत्रक आणि नमुना प्रश्नपत्रिका यांसाठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधावा. www.bits-pilani.ac.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० फेब्रुवारी २०१५ असून या वर्षीच्या परीक्षेचा कालावधी १४ मे २०१५ ते
२९ मे २०१५ असा आहे.
बारावीच्या गुणांनाही महत्त्व
उच्च माध्यमिक शालान्त परीक्षा (बारावी) - शैक्षणिक वर्ष २०१३-१४ वर्षांपासून अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत, बारावी परीक्षेतील गुणांना महत्त्व प्राप्त झाले आहे. जेईई मेन परीक्षेच्या माहितीपत्रकाचा बारकाईने अभ्यास केल्यावर असे लक्षात येते की, संपूर्ण अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेत बारावी (१०+२) परीक्षेतील गुणाचे स्थान महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही परीक्षांतील (जेईई मेन व बारावी) गुणांच्या समानीकरणाच्या प्रक्रियेमुळे बारावी परीक्षेतील उत्तम कामगिरी,
विद्यार्थ्यांस राज्यस्तरीय (स्टेट रँक- महाराष्ट्रातील महाविद्यालयांतील प्रवेशासाठी) तसेच देशस्तरावर (ऑल इंडिया रँक- देशभरातील एन.आय.टी.जमधील प्रवेशासाठी) गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी लाभदायक ठरते. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, विद्यार्थ्यांकडून बारावीच्या अभ्यासावर कमी भर दिला जातो आणि प्रवेशपरीक्षांच्या अभ्यासावर अधिक लक्ष पुरवले जाते, पण बारावी परीक्षेत कमी गुण आणि प्रवेशपरीक्षेत उत्तम गुण हे समीकरण गुणवत्ता यादीत वरचे स्थान मिळवण्यासाठी फायद्याचे ठरत नाही, तेव्हा बारावीच्या अभ्यासाला तरणोपाय नाही. खरं पाहता अभियांत्रिकीसाठीच्या प्रवेशपरीक्षांतील अभ्यासक्रमाचा प्रचंड आवाका, प्रश्नांची अनिश्चितता, वाढलेली काठिण्यपातळी या बाबी लक्षात घेता बारावी परीक्षेत जास्तीतजास्त गुण मिळवणे तुलनेने सोपे ठरू शकते. येत्या फेब्रुवारी २०१५ मध्ये बारावी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा यापुढील परीक्षेपर्यंतचा सर्वाधिक वेळ बारावीच्या अभ्यासावर केंद्रित करणे हिताचे ठरेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा