Translate

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

अभिनेत्री बेबी शकुंतला यांचे निधन

बालतारका ते अभिनेत्री असा प्रवास करणारी पहिली अभिनेत्री बेबी शकुंतला ऊर्फ उमादेवी खंडेराव नाडगौडा यांचे रविवारी सकाळी येथे निधन झाले. त्या ८३ वर्षांच्या होत्या. तपभराच्या कालावधीत त्यांनी िहदी मराठी चित्रपटसृष्टीत साठ चित्रपटांमध्ये अभिनय केला. विवाहानंतर त्यांनी अभिनय संन्यास घेतला, तरी चित्रपटसृष्टीशी त्यांचे नाते मात्र अखेपर्यंत कायम होते. येथील पंचगंगा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी आहे. 
बेबी शकुंतला या जुन्या मराठी, िहदी चित्रपटसृष्टीतील प्रथितयश अभिनेत्री होत्या. १७ नोव्हेंबर १९३२ रोजी पुणे येथे त्यांचा जन्म झाला. महाजन कुटुंबातील त्या एकमेव कन्या होत्या. त्यांचे शिक्षण पुण्याच्या भावे
प्रशालेत झाले. त्यांचे वडील मुद्रणालयात नोकरीस होते. प्रभात स्टुडिओचे मालक दामले हे त्यांच्या आईचे नातेवाईक होते व त्यांनीच त्यांना चित्रपटात अभिनय करण्यासाठी विचारले. त्यांच्या वडिलांना ते मान्य नव्हते पण अखेर बरेच समजून सांगितल्यानंतर त्यांचा चित्रपट प्रवेश नक्की झाला. 
प्रभातच्या '१० वाजता' या चित्रपटातून पहिल्या मराठी बालतारका म्हणून त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. १९४४ साली प्रदर्शित झालेल्या 'रामशास्त्री' चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी खूपच गाजली. 
'दोन घडीचा डाव त्याला जीवन ऐसे नाव' या गाण्याने त्यांची सर्वदूर ओळख झाली. बालतारका ते अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या. तत्पूर्वी ज्या बालतारका म्हणून चमकल्या, त्यापकी कोणालाही पुढे अभिनेत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली नव्हती. 
बारा वर्षांच्या कालावधीत त्यांनी मराठी व िहदी भाषेतील साठ चित्रपटांमध्ये अभिनय केला. मायाबाजार, शारदा, तारामती, भाग्यवान, अखेर जमलं, छत्रपती शिवाजी, नन्हे-मुन्हे, अबोली, सौभाग्य, मायबहिणी, कमल के फुल, फरेब, सपना, लहरे, परदेस, झमेला आदी गाजलेल्या चित्रपटांचा त्यामध्ये समावेश होतो. 
मास्टर अविनाश, दुर्गा खोटे, केशवराव दाते आदींसोबत त्यांनी काम केले. भाजली पेंढारकर, बिमल रॉय, दिनकर द. पाटील, अनंत माने, केदार शर्मा, बी.आर.चोप्रा यांसारख्या नामवंत दिग्दर्शकांसोबत त्यांनी काम केले होते. पूजा, शिवकन्या, बिंदिया, ब्रजबहू हे चित्रपट त्यांनी केले. त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. त्यामध्ये प्रभात पुरस्कार, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार, कोल्हापूर भूषण शाहू मोडक पुरस्कार, राजा परांजपे पुरस्कार आदींचा समावेश आहे. १९५४ मध्ये त्यांनी येथील उमा चित्रपटगृहाचे चालक खंडेराव नाडगौडा यांच्याशी विवाह केला. तेव्हापासून त्यांनी चित्रपट संन्यास घेतला होता. 
चित्रपटसृष्टीवर शोककळा
बेबी शकुंतला यांच्या निधनाचे वृत्त कळताच येथील हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली. निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञान यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांनी त्यांच्या आठवणी जाग्या केल्या. ते म्हणाले, की त्यांच्यासोबत एकत्र काम करण्याचा योग आला नाही. पण त्यांचा सहज सुंदर अभिनय पाहून बरेच काही शिकता आले. 'अबोली' चित्रपटात मूकबधिर कलाकाराचे काम करताना त्यांनी दाखवलेला हृदयस्पर्शी अभिनय अमीट छाप उमटवणारा आहे. शारदा नाटकावर आधारित 'शारदा' चित्रपट बनवला गेला. 
नाटकातील शारदेपेक्षा त्यांचा अभिनय काकणभर सरस होता. त्यांनी चित्रपटात काम करायचे सोडले असले, तरी मराठी चित्रपटसृष्टी व चित्रपट महामंडळाशी त्यांचे नाते अखेपर्यंत कायम होते. प्रभातच्या तुतारीचे पुनरुज्जीवन करण्याच्या कार्यक्रमास त्या आवर्जून उपस्थित होत्या. त्यांच्या जाण्याने चित्रपट महामंडळाचा आधार आम्ही गमावून बसलो आहोत. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष विजय कोंडके यांनी जुन्या काळातील नसíगक अभिनय करणारी अभिनेत्री गमावल्याचे सांगितले. 
दादा कोंडके यांच्यापासून त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध होता. 'उमा' चित्रपटगृह त्यांचेच असल्याने मराठी चित्रपटाच्या वितरणाला त्यांच्याकडून सतत मोठी मदत मिळत होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा