Translate

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

AIMS ची व्यवस्थापन अभ्यासक्रम- प्रवेश परीक्षा

'एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन्स' (ATMA) ही एमबीए प्रवेशासाठी ग्राह्य़ धरली जाणारी देशस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासाच्या नियोजनाविषयी..



एमबीएच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य असते. या अभ्यासक्रमासाठी ग्राह्य़ धरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांपैकी 'सीमॅट' या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची माहिती आपण गेल्या आठवडय़ात करून घेतली. आज आपण असोसिएशन ऑफ इंडियन मॅनेजमेंट स्कूल्स (AIMS) या संस्थेतर्फे घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेविषयी जाणून घेऊयात.
'एम्स टेस्ट फॉर मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन्स' (ATMA) ही एमबीए प्रवेशासाठी ग्राह्य़ धरली जाणारी देशस्तरीय प्रवेश परीक्षा आहे. 'एमबीए'साठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश देताना राज्याबाहेरील विद्यार्थी-विद्यार्थिनींना ज्या १५ टक्के जागा राखीव असतात, त्यासाठी 'आत्मा' परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले जातात. तसेच एखाद्या संस्थेतील एकूण जागांपैकी २० टक्के जागांवर व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश दिला जातो. यासाठीदेखील 'आत्मा' परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले जातात.
२०१५ मध्ये 'आत्मा' ही परीक्षा १५ फेब्रुवारी २०१५ या दिवशी होणार असून या परीक्षेसाठीची नोंदणी 
२० डिसेंबरपासून सुरू झाली आहे. नोंदणीची शेवटची तारीख ९ फेब्रुवारी २०१५ आहे आणि या प्रवेश परीक्षेचा निकाल २८ फेब्रुवारीच्या आसपास लागेल. फेब्रुवारी २०१५ मध्ये होणाऱ्या या परीक्षेची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. परीक्षा मात्र ऑनलाइन पद्धतीने होणार नाही तर पेपर बेस्ड म्हणजेच पारंपरिक पद्धतीनेच होणार आहे. तसेच 'आत्मा' ही परीक्षा २४ मे २०१५ आणि २६ जुलै २०१५ या तारखांनाही होईल. मात्र, या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होतील. फेब्रुवारी २०१५ मधील परीक्षा मात्र ऑफलाइन पद्धतीने होईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
'आत्मा' परीक्षेच्या स्वरूपाविषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे. कारण त्यामुळे परीक्षेचा अभ्यास योग्य पद्धतीने करता येईल. या परीक्षेसाठी एकूण तीन तासांचा अवधी मिळतो आणि या तीन तासांमध्ये एकूण १८० प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजेच एका मिनिटामध्ये एक प्रश्न असे वेळेचे नियोजन करावे लागते. प्रत्येक अचूक उत्तराला एक गुण मिळतो आणि प्रत्येक चुकीच्या उत्तराबद्दल १/३ गुण वजा केला जातो. म्हणजेच या परीक्षेत 'निगेटिव्ह' गुणांकन पद्धती आहे. आणि त्यामुळेच उत्तम गुण मिळवण्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन आणि तयारी करणे गरजेचे आहे. परीक्षेचा पेपर हा एकूण सहा विभागांमध्ये विभागलेला आहे. यामध्ये विश्लेषणात्मक कौशल्ये, (अ‍ॅनालिटिकल रिझनिंग स्किल्स), शाब्दिक कौशल्ये (व्हर्बल स्किल्स) आणि संख्यात्मक कौशल्ये (क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स) या विभागांचा समावेश होतो.
विश्लेषणात्मक कौशल्ये या भागामध्ये मुख्यत: तर्कसंगत विचार (लॉजिकल थिंकिंग) करण्याची क्षमता तपासली जाते. यामध्ये कोणत्याही एका विभागातील विशेष ज्ञान (स्पेशलाइज्ड नॉलेज) असण्याची आवश्यकता नाही. प्रत्येक प्रश्न एखाद्या परिस्थितीवर (situation) आधारित असतो आणि त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता तपासली जाते. व्यवस्थापन क्षेत्रामध्ये करिअर करताना जी विश्लेषणात्मक क्षमता वापरावी लागते, तिची सुरुवातच या परीक्षेच्या निमित्ताने होते. यासाठी प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने एखाद्या परिस्थितीचे विश्लेषण करत निष्कर्ष काढण्याची सवय लावून घेतली पाहिजे. दैनंदिन व्यवस्थापनामध्ये एखादा प्रश्न सोडवण्यासाठी किंवा निर्णय घेण्यासाठी विश्लेषणात्मक क्षमता उपयोगी पडते.

शाब्दिक कौशल्यावर आधारित प्रश्नांमध्ये मुख्यत: समानार्थी शब्द, वाक्याची रचना योग्य पद्धतीने करणे, वाक्य पूर्ण करणे, तसेच एखादा परिच्छेद वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे देणे यासारख्या प्रश्नांचा समावेश होतो. यापैकी समानार्थी शब्दविषयक प्रश्न सोडवताना पूर्वतयारीची गरज असते. यासाठी दररोज किमान दहा नवीन इंग्रजी शब्द शिकून त्याचे समानार्थी शब्द शोधून काढायला हवे. यासाठी चिकाटी व मेहनत आवश्यक ठरते. दररोज नवीन इंग्रजी शब्द शोधून काढण्याची सवय पुढील आयुष्यात तसेच व्यवस्थापन क्षेत्रात उपयोगी पडते. चुकीचे वाक्य दुरुस्त करणे आणि अपुरे वाक्य पूर्ण करणे यासाठी इंग्रजी व्याकरणाची उजळणी करणे अनिवार्य आहे. वास्तविक हे प्रश्न अजिबात अवघड नाहीत, पण योग्य प्रकारे सराव केला नाही तर मात्र प्रश्न सोडवणे कठीण जाते. यासाठी नियमित सरावाला पर्याय नाही.
संख्यात्मक कौशल्यांवर आधारित प्रश्नांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न असतात. यामध्ये सरासरी काढणे, टक्केवारी काढणे, नफा किंवा तोटा यासंबंधीची आकडेमोड, गुणोत्तर व प्रमाण (रेशिओ व प्रपोर्शन), भूमितीविषयक प्रश्न, काळ, काम व वेग यावर आधारित प्रश्न, घनफळ काढणे, सेट थिअरी, लॉगॅरिथम, समीकरणे इ. अनेक प्रश्नांचा समावेश होतो. या विभागातील प्रश्नांची काठिण्य पातळी फारशी नाही. म्हणजेच हे प्रश्न अतिशय अवघड नसतात. मात्र, अनेकांना हा विभाग अवघड जातो, याचे कारण ते सरावात कमी पडतात. त्यावर शाळेमध्ये शिकलेल्या गणिताची पूर्ण उजळणी करणे हा एकच पर्याय आहे. दररोज नियमित सराव केल्यास हाही घटक अवघड ठरणार नाही.
वर उल्लेख केल्याप्रमाणे 'आत्मा' परीक्षेचे एकूण सहा विभाग आहेत. मात्र, प्रश्न प्रामुख्याने वर वर्णन केलेल्या तीन विभागांवर आधारित असतात. 'आत्मा' ही केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने मान्यता दिलेली अखिल भारतीय पातळीवरील एक परीक्षा असून अनेक व्यवस्थापन संस्थांमध्ये या परीक्षेतील गुण ग्राह्य़ धरले जातात. या सर्व संस्थांची यादी 'आत्मा बुलेटिन'मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय राज्याच्या तंत्रशिक्षण विभागामार्फत होणाऱ्या केंद्रीय प्रवेश पद्धतीमध्ये या परीक्षेतील गुण विचारात घेतले जातात. 
'आत्मा' ही परीक्षा २०१५ मध्ये फेब्रुवारी, मे आणि जुलै अशी तीन वेळा घेण्यात येणार असली तरी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी फेब्रुवारी २०१५ मधील परीक्षेच्या दृष्टीनेच नियोजन केलेले उत्तम. नियमित सराव आणि मेहनत यांच्या साहाय्याने परीक्षेत चांगले गुण मिळवून आपल्या पसंतीच्या व्यवस्थापन संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत एमबीए प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेची (कॉमन एन्ट्रन्स टेस्ट) तारीख जाहीर झाली असून ही परीक्षा शनिवार, १४ मार्च व रविवार, १५ मार्च २०१५ या दिवशी घेतली जाणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीची आहे. या परीक्षेविषयीची इतर माहिती अद्याप जाहीर व्हायची आहे. एमबीए अभ्यासक्रमासंबंधातील या प्रमुख प्रवेश परीक्षेविषयीची सविस्तर माहिती 
पुढील लेखात..
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा