Translate

सोमवार, १९ जानेवारी, २०१५

मराठी कोश

ज्ञान संपादन करण्याचे असंख्य पर्याय आज वेगवेगळ्या संकेतस्थळांवर आणि अ‍ॅप्स स्वरूपात उपलब्ध आहेत. अभ्यासासाठी आणि करिअरच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या विविध वेबसाइट्सची माहिती देणारे पाक्षिक सदर..
आपल्याला एखादा इंग्रजी शब्द अडला की, आपण त्याचा मराठीत अर्थ पाहितो खरा, पण कधीकधी डिक्शनरीत दिलेला अर्थ हा शब्दश: असतो. त्यामुळे तो शब्द अधिक नेमका व मुळातून समजण्यासाठी त्या शब्दाशी जोडलेले संदर्भ किंवा इतर अर्थ शोधावे लागतात. त्यासाठी वेगवेगळे जाडजूड कोश पालथे घालण्यावाचून गत्यंतर नसते. पण हे कोश तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरवरच - ऑनलाइन वापरायला मिळाले तर..? 
अर्थातच, हे शक्य आहे. कारण आज मराठी विश्वकोश, केतकर ज्ञानकोश, परिभाषा कोश यांसारखे महत्त्वाचे मराठी कोश संकेतस्थळांवर मोफत उपलब्ध आहेत. 
विश्वकोशाची marathivishwakosh.in अशी वेबसाइट असून त्यावर सध्या २० खंड उपलब्ध आहेत. ते सीडी स्वरूपातही मिळतात. मराठी माणसाला मराठीतून विविध संज्ञांची माहिती व्हावी या हेतूने महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन करण्यात आले. या मंडळाने तयार केलेले हे खंड सीडॅक संस्थेच्या मदतीने युनिकोड स्वरूपात या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आपल्याला हवा असलेला शब्द या संकेतस्थळावर सर्च करता येतो. शब्द टाइप करण्यासाठी तिथे की-बोर्डही देण्यात आलेला आहे. शब्द सर्च केल्यानंतर आपल्याला त्या शब्दाबद्दलची नोंद दिसते, ज्यात तो शब्द किंवा संकल्पना म्हणजे काय, त्याचा इतिहास आदी गोष्टी संक्षिप्त स्वरूपात पाहता येतात. उदा. आग किंवा अग्नी असा शब्द आपण शोधल्यास सर्च केलेल्या नोंदीत अग्नीचा शोध कसा लागला, त्यामुळे मानवी जीवन कसे बदलले यापासून पोटातला अग्नी म्हणजे काय इत्यादी माहिती मिळते.
मराठीतून माहिती मिळवण्याचा आणखी एक स्रोत म्हणजे ज्ञानकोशकार केतकर यांचा कोश. डॉ. श्री. व्यं. केतकर यांनी १९१६ ते १९२८ या काळात ज्ञानकोशाच्या 
२३ खंडांचे काम केले होते. हे सगळे खंड ketkardnyankosh.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने या संकेतस्थळाची निर्मिती केली असून त्याचे रूपही देखणे व अधिक यूजर फ्रेंडली आहे. यामध्येही सर्चचा पर्याय दिला आहे, पण विश्वकोशापेक्षा येथे सर्च अधिक जलद गतीने होतो. यावर तुम्ही एखादा शब्द शोधल्यास तुम्हाला तो शब्द ज्या ज्या खंडात, ज्या ज्या संदर्भात आलेला आहे ते सगळे येथे दिसते. उदा. सफरचंद असा शब्द शोधल्यास वनस्पतीशास्त्रापासून काबूल-कंदाहार यांसारखी शहरं, अशा ज्या ज्या नोंदींत किंवा लेखांत सफरचंदाचा उल्लेख आला असेल त्या नोंदीची िलक तुम्हाला दिसते. तुम्हाला हव्या असलेल्या संदर्भानुसार तुम्ही ती िलक उघडून माहिती मिळवू शकता. बऱ्याच वेळा आपल्याला इंग्रजीतला एखादा शब्द माहिती असतो, त्याचा अर्थही माहिती असतो, पण त्या शब्दाला मराठी पर्यायी शब्द काय हे ठाऊक नसते किंवा माहीत असला तरी त्याबाबत खात्री नसते. अशा वेळी तुम्हाला 
coe.maharashtra.gov.in/index.php?option=com_content&view=article&id=116&Itemid=586&lang=mr या िलकवर असलेल्या ४६ मराठी परिभाषा कोशांची मदत घेता येईल. यावर अर्थशास्त्र, औषधशास्त्र, धातूशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल व भूशास्त्र, वित्तीयशास्त्र, साहित्य समीक्षा अशा विविध विषयांचे पारिभाषा कोश आहेत. हे कोश मूळ छापील गं्रथांची पाने स्कॅन करून पीडीएफ स्वरूपात देण्यात आले आहेत. त्यामुळे आवश्यक त्या कोशाची पीडीएफ तुम्ही कॉम्प्युटरवर डाऊनलोड करून त्यात शब्द शोधू शकता. फक्त यात सर्च देऊन शब्द शोधता येत नाही, तर तो छापील पुस्तकाप्रमाणेच शोधावा लागतो. 
मराठी भाषेत झालेले ज्ञान-संपादनाचे कार्य आजच्या आधुनिक युगातल्या इंटरनेटसारख्या माध्यमांद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवण्याचे काम वर उल्लेखलेल्या संस्थांनी केले आहे आणि त्या यापुढेही ते करत राहतील. आता जबाबदारी आहे ती आपली, शब्द अडला की, तो शोधण्याची! 
संस्कृत भाषेचा ऑनलाइन कोश
मराठी शब्दाचा अर्थ शोधताना तो शब्द ज्या संस्कृत शब्दापासून तयार झाला असेल त्या शब्दाचा अर्थ शोधावा लागतो. अशा वेळी ऑनलाइन संस्कृत कोशासाठी andhrabharati.com या संकेतस्थळाचा वापर करता येईल. Monier William's Sanskrit-English Dictionary आणि Wilson Sanskrit-English Dictionary या कोशांचा उत्तम डेटाबेस या संकेतस्थळासाठी वापरण्यात आला असून हा कोश संस्कृत-इंग्रजी असा आहे. यात त्या शब्दात उपसर्ग असेल किंवा इतर शब्द संधी-समास होऊन जोडलेले असतील तर त्या शब्दांच्या अर्थाच्या िलकही दिल्या जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा