हिवाळ्याची चाहूल लागताच मुलांची त्वचा कोरडी पडण्यास सुरवात होते. हिवाळ्यात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी असते आणि हवामान कोरडे असते. त्याचा परिणाम मुलांच्या त्वचेवर होतो.
आपली त्वचा ही शरीरातील मोठा अवयव आहे, असे म्हणायला हरकत नाही. मानवीत्वचा ही शरीराचा जवळजवळ दोन चौरस मीटर भाग व्यापते. त्वचा शरीराचे बाह्यावरण असल्याने शरीरातील अवयवांचे वातावरणातील धुलीकण, रसायने इत्यादीपासून रक्षण करण्याचे काम करत असते. तसेच शरीराचे तापमान संतुलित ठेवणे व अल्ट्राव्हायोलेट किरणांचा संपर्कात आल्यावर त्वचा ‘ड’ जीवनसत्वनिर्मितीसाठी सहायक ठरते. त्वचेचे बाह्यावरण हे सतत जुन्या पेशी मृत होऊन झडून नवीन पेशींनी बनत असते. हे चक्र सतत चालूच असते.
हवामानातील विषमतेमुळे, काळजी न घेतल्याने त्वचा कोरडी पडून काही त्वचाविकार बळावण्यास सुरवात होते.लहान मुलांची त्वचा खूप नाजूक असते. हिवाळ्याची चाहूल लागताच मुलांची त्वचा कोरडी पडण्यास सुरवात होते. हिवाळ्यात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी असते आणि हवामान कोरडे असते. त्याचा परिणाम मुलांच्या त्वचेवर होतो.ज्या मुलांची त्वचा ‘कोरडी त्वचा’ प्रकारात मोडते त्यांना हिवाळ्यात अजूनच त्रास होण्याची शक्यता असते. ही प्रवृत्ती खरंतर जास्त करून अनुवांशिकरित्या मुलांमध्ये आलेली असते. कोरडेपणामुळे गालावर, तळहातावर, पायांवर तसेच ओठांवर बारिक चिरा पडतात. चिरा, भेगा गेल्याने त्या भागावर कंड सुटतो, लालसरपणा येतो. खाजवल्यामुळे रक्त येऊन जखम होऊ शकते. त्वचा खडबडीत आणि कोरडी असल्याने छोट्या भेगांना लागून खरचटून अजून दुखावली जाते.
एक्झिमा असणाऱ्या मुलांच्या त्वचेवर हिवाळ्यात लालसरपणा आणि खाज जास्त येण्याची शक्यता असते. कोरडे निस्तेज असे चेहऱ्यावर येणारे डाग हेसुद्धा जास्त प्रमाणात हिवाळ्यातच येतात. तसेच ते साबणाच्या वापराने वाढू शकतात. सर्वसाधारणपणे वापरली जाणारे साबण, सौंदर्यप्रसाधने कधी कधी त्वचेचा नैसर्गिक स्निग्धपणा कमी करतात. अल्कोहोल बेस्ड मॉईश्चराइझर्समुळे संवेदनशील त्वचा असलेल्या मुलांना त्वचा कोरडी पडण्याचा त्रास होऊ शकतो.
यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणजे सर्वप्रथम लहान मुलांना चौरस आहार द्यावा, आहारात फळे, पालेभाज्या, कडधान्ये, सॅलड्स, तसेच लोणी, तूप या स्निग्ध पदार्थांचा समावेश असावा. लहान मुलांना सकाळी आंघोळीआधी त्यांच्या त्वचेला मानवणाऱ्या ऑलिव्ह, बदाम, तीळ किंवा खोबरेल तेलाने मालिश करून आंघोळ घातल्यास त्वचा मऊ राहण्यास मदत होते. रात्री झोपताना कोमट पाण्याने हातपाय, चेहरा स्वच्छ धुवून कोरडा करून फुटलेल्या त्वचेवर पेट्रोलियम जेलीचा वापर करावा. ओठांवर साजूक तुपाचा वापर केला तरी उपयुक्त ठरते.
घरगुती उपायांनी जर मुलास आराम पडत नसेल, त्वचा कोरडी राहून लालसर होत असेल, कंड सुटत असेल, जखमा होत असतील तर वैद्यकीय मदत घ्यावी. लहान मुलांच्या बाबतीत वेळोवेळी बालरोग तज्ज्ञांचा सल्ला घेणेच योग्य ठरते.मुलांच्या अशा थंडीतील कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी होमिओपॅथिक उपाययोजना काय आहेत. ते आपण पाहू.
लक्षण साधर्म्यानुसार उपयोगी पडणारी औषधे म्हणजे...
पेट्रोलियम - त्वचा कोरडी, खडबडीत, तडे गेलेली असते. खूप संवेदनशील झालेली असते. थंडीने पडणाऱ्या भेगा त्वचा खरवडली जाणे या साठी उपयोगी.
ग्राफायटिस - कोरडी त्वचा असल्याने सतत खाज येणे तसेच हातापायाच्या बोटांवर होणाऱ्या भेगा, बोटांच्यामध्ये, टाचांवर पडणाऱ्या भेगांसाठी उपयुक्त ठरते. कोरड्या त्वचेवरील व्रण ज्यातून चिकट स्त्राव वाहत असतो, त्यासाठी ग्राफायटिसची मदत होते.
सल्फर - खूप कोरडी, अस्वच्छ त्वचा, ओठावर आणि दोन ओठांच्यामध्ये पडणाऱ्या भेगांसाठी उपयुक्त.
याशिवाय अर्सेनिकम, सेपीया, मेझेरियम, कालीमूर ही औषधेसुद्धा उपयुक्त ठरतात.
काही औषधांची मलमेसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. त्यांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर केल्यास उपयुक्त ठरते.