दिल्लीत तीन वर्षांपूर्वी गाजलेल्या आणि संपूर्ण देश हादरवणाऱ्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडाला पीडित मुलगीच जबाबदार होती, असा दावा या प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीने केला आहे. अर्थात या प्रकरणातल्या एक अल्पवयीन वगळता सर्व आरोपीला फाशीची शिक्षा झाल्यामुळे या आरोपाने काही फरक पडणार नसला तरी 16 डिसेंबर 2012 चं निर्भया बलात्कार प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येणार आहे. यावेळी निमित्त आहे, बीबीसीच्या डॉक्युमेंटरीचं. बीबीसी 4 चे डॉक्युमेंटरी निर्माते लेस्ली उडवीन यांनी ही डॉक्युमेंटरी तयार केलीय. या डॉक्युमेंटरीत मुकेश सिंह या आरोपीने या बलात्कार आणि हत्याकांडाला पीडित मुलगी आणि तिचा मित्रच जबाबदार असल्याचा आरोप केलाय.
बीबीसीच्या प्रेस रिलीजमध्येच ही माहिती देण्यात आलीय. रविवारी 8 मार्च रोजी म्हणजे आंतरराष्ट्रीय महिला दिनी ही डॉक्युमेंटरी प्रसारित होणार आहे. बीसीसी 4 च्या 'इंडियाज डॉटर India’s Daughter' (भारत कन्या) या कार्यक्रमात ही डॉक्युमेंटरी प्रसारित होईल.
टाळी कधीही एका हाताने वाजत नाही, त्यासाठी दोन हात लागतातच! असा तर्क लावत मुकेश सिंहने बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की दिल्लीत कुणीही चांगल्या घरातील मुलगी आपल्या मित्रासोबत रात्री नऊ वाजल्यानंतर फिरत नाही.
दिल्लीतल्या निर्भया बलात्कार प्रकरणाचे पडसाद संपूर्ण भारतभरात उमटले होते. त्यावेळी आंदोलकांनी अतिशय संरक्षित समजल्या जाणाऱ्या दिल्लीतील परिसरात तसंच इंडिया गेट परिसरात उग्र निदर्शने केली होती. त्यावेळच्या संतत्प जनक्षोभामुळे सरकारला महिला अत्याचार रोखण्यासाठी कठोर कायदे करावे लागले होते.
या प्रकरणाची फास्ट ट्रॅक सुनावणी झाल्यानंतर 2013 मध्ये मुकेश सिंह आणि अन्य आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. मुकेश सिंह हा त्या बसचा ड्रायव्हर होता. बसमध्ये निर्भयावर बलात्कार होत असताना, कुठेही न थांबता तो सबंध दिल्लीत बस फिरवत होता.
लेस्ली उडवीन यांनी या डॉक्युमेंटरीसाठी तुरूंगात जाऊन आरोपी मुकेश सिंह याची मुलाखत घेतली. त्यामध्ये त्याने आपल्या बुरसटलेल्या विचारसरणीचं दर्शन घडवलं आहे. स्त्री-पुरूष किंवा मुलगा-मुलगी कधीही समान असू शकत नाहीत, असं स्पष्ट करून त्याने घरकाम हेच मुलीचं कर्तव्य असल्याचं मुलाखतीत सांगितलं. मात्र हल्ली शिक्षणामुळे तसंच पाश्चिमात्य विचारसरणीच्या प्रभावामुळे मुली डिस्को आणि बारमध्ये रात्री उशीरापर्यंत जातात, अपुरे कपडे घालतात, त्यामुळे बघणारे उत्तेजित होतात, असं आरोपी मुकेश सिंहला वाटतं.
पीडित मुलीने प्रतिकार केल्यानेच तिच्यावर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. जर तिने विरोध न करता आम्हाला जे करायचं होतं ते करु दिलं असतं तर तिला आम्ही सोडून दिलं असतं, असा संतापजनक दावा दोषी मुकेश सिंहने केला आहे.
बीबीसीच्या मुलाखतीत आरोपी मुकेश सिंहने दिलेल्या मुलाखतीवर पीडित मुलीच्या वडिलांनी तातडीने प्रतिक्रिया व्यक्त केली. आरोपी आता सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना जाहीर झालेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबाजवणी व्हायला हवी, असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
निर्भया प्रकरणानंतर, दिल्लीसह देशभरात ज्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराविरोधात एकवटले, त्यावेळच्या जनक्षोभानेच आपल्याला निर्भया प्रकरणावर डॉक्युमेंटरी करण्याची प्रेरणा मिळाली. कोणाही नेत्याशिवाय दिल्लीत हे आंदोलन सुरू होतं, मला भारतासारख्या देशातील, त्यामागील प्रेरणेचा शोध घ्यायचा होता, असं बीबीसीचे निर्मात्या लेस्ली उडवीन यांनी स्पष्ट केलंय.
आरोपी मुकेश सिंह यांच्या मुलाखतीत त्याने केलेल्या विधानाचा आपल्यालाही धक्का बसल्याचं लेस्ली उडवीन यांनी स्पष्ट केलंय. आरोपी मुकेश सिंह याची मुलाखत भारतातील बुरसटलेल्या पुरूषप्रधान मानसिकतेचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या निर्घृण कृत्यामुळे एका निष्पाप मुलीला जीव गमवावा लागला, त्यानंतर देशभरात जनक्षोभ उसळला, या आरोपींना फाशीची शिक्षा झाली, तरीही त्यांची विचार करण्याची मानसिकता बदलत नाही, असं लेस्ली उडवीन आवर्जून नमूद करतात.
बीबीसीच्या या डॉक्युमेंटरीमध्ये आरोपीची बाजू कोर्टात मांडणारे दोन वकील आणि निर्भयाचे वडील यांच्याही मुलाखती आहेत.