रावळपिंडी : पाकिस्तानात राहणारा 27 वर्षीय वसीम अक्रम हा मोबाईलचे पार्ट्स विक्रेता आहे. मात्र, मोबाईल विक्रीमधून फार काही उत्पन्न मिळत नाही. या तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्याचं घरही चालत नाही. त्यामुळे वसीम रात्री डान्सर म्हणून काम करतो. पाकिस्तानातील डान्सिंगच्या दुनियेत तो ‘राणी’ या नावाने ओळखला जातो. विवाह सोहळे, प्रायव्हेट पार्ट्यांमधून डान्स करुन लोकांचे मनोरंजन करतो. त्यातून त्याला त्याचे घर चालवण्यापुरते पैसे मिळतात.
मोबाईलचे पार्ट विकून खूप तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यातून स्वत:चं आणि घरातील खर्चही भागत नाही. मोबाईलचे पार्ट विकून घराचा गाडा हकता येणं शक्य नसल्यानेच डान्सर म्हणून काम करतो. विवाह सोहळे, प्रायव्हेट पार्ट्यांमधून खूप उत्पन्न मिळतो, असे वसीम अक्रम सांगतो.
पाकिस्तानतील जाचक कायद्यांमुळे ट्रान्सजेंडरसारख्या लोकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. अनेकांना तर एखाद्या शहरात ओळख लपवून काम करावे लागते. कारण ओळख जाहीर झाल्यास लोक हिणवतात. त्यामुळे एकंदरीतच असे काम करत असताना भीतीच्या वातावरणात राहावे लागते, असे वसीमचे म्हणणे आहे. शिवाय सोहळ्यांमध्ये डान्स करत असताना अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. मात्र त्या सहन केल्या नाहीत, तर पैसे मिळणे बंद होतात.
पाकिस्तानातील कायद्यांमध्ये महिला आणि पुरुषांनी कोणती कामे करावी, हे निश्चित केले आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांना केवळ विवाह सोहळे, प्रायव्हेट पार्ट्यांमध्येच डान्सची परवानगी आहे.
अशा भीतीच्या वातावरणातही वसीम अक्रमसारखे पोटाची खळगी भरण्यासाठी ही कामे करतात. पाकिस्तातील कायद्यांचा आणि एकंदरीत कट्टरवाद्यांचा विचार करता, वसीम सारख्यांना अशी कामं करत असताना किती कठीण जात असेल, याची फक्त कल्पना केलेलीच बरी.