उद्धरावा स्वयें आत्मा,
खचू देऊ नये कधी
आत्मा चि आपला बंधु
आत्मा चि रिपु आपुला -गीताई ६ -५
भगवद्गीतेतील हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे, भगवान सांगतात, आपल्यात बदल करायचा असेल तर तो आपण स्वत:च करायला हवा, कारण आपण स्वत:च आपले सर्वात जवळचे मित्र असतो आणि आपले स्वत:चे शत्रूही. बदल घडवून आणण्याची, स्वत:च्या उद्धाराची, प्रगतीची अंतिम जबाबदारी आपली स्वत:चीच असते आणि आपल्यात बदल करण्यात रोखणारा अडथळा आणणारा सर्वात मोठा शत्रू आपण स्वत:च असतो.
जिंकुनि घेतला आत्मा
बंधु तो होय आपुला
सोडिला जरी तो स्वैर
शत्रुत्व करितो स्वयें गीताई ।। ६.६
म्हणजेच आपण आपल्या स्वत:च्या आंतरिक नैसर्गिक ऊर्मीवर नियंत्रण राखत, ती ऊर्जा योग्य मार्गाने सामाजिक/नैतिक बंधनात ठेवली तर आपण आपले स्वत:चे मित्र होतो नाही तर त्या ऊर्मीना स्वैर सोडले, मोकाट सोडले तर आपल्यासारखा शत्रू आपणच!
मला नेहमीच आधुनिक मानसशास्त्राची, विशेषत: समुपदेशनाची बीजं भगवद्गीतेत आणि संतसाहित्यात असल्याचं जाणवतं. गीतेत अनेक सर्वकालीन सत्य सांगितलेली आहेत, आणि यातच गीतेची शाश्वतता आहे. स्वत:चा उद्धार म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून आपल्याच मनाशी संवाद साधत त्या मनाला प्रगल्भ बनवण्याची प्रेरणा देणारा ग्रंथराज आहे ही गोष्ट नक्की! आपण आपला मित्र बनण्यासाठी आणि स्वत:चाच उद्धार करण्यासाठी काही सोपी वाटणारी सूत्रं आहेत. त्यातलं पहिलं सूत्र म्हणजे सतत भानावर राहत जगणं. आपल्या अवतीभवती अनेक लोभाचं-मोहाचं जाळं पसरलेलं असतं. आपण बेसावध असलो तर अजाणतेपणी त्या मोहात पडू शकतो. माझा एक मित्र दारूच्या व्यसनापासून तब्बल एकोणीस वर्षे दूर होता. व्यसनाच्या काळात त्याने जितकं काही गमावलं होतं त्याच्या दुप्पट त्याने कमावलं होतं. एकदा तो मित्रांबरोबर मायानगरी थायलंडला, पटाया इथं गेला, मौज करायची, इतकंच त्याने ठरवलं होतं. तिथले काही खास शोज पाहून झाल्यावर तो उत्तेजित झाला. बाकीच्या सगळ्या मित्रांनी बीअरच्या बाटल्या उघडल्या. आणि त्याने ग्लास कधी तोंडाला लावला ते त्याला कळलंच नाही. आजपर्यंत म्हणजे एकोणीस वर्षे अकरा महिने अकरा दिवस 'पहिला घोटच घातक' हे ब्रीदवाक्य मनाशी घोळवणारा माणूस त्या दिवशी विसरला. आणि त्या दिवशी तो किती बाटल्या प्यायला तेसुद्धा त्याला आठवेना. सकाळी उठताच हात थरथरू लागले. तत्क्षणी फोन उचलला आणि दारूची ऑर्डर दिली. आणि तेव्हा जे सुरू झालं ते त्याचं पिणं अखंड चालू आहे. तीन महिने त्याच्या बायकोने वाट पाहिली आणि नंतर ती वैतागून माहेरी निघून गेली. सध्या त्याला मोकळं रान आहे. पैसे आहेत तोपर्यंत तो असाच पीत राहणार.
असे असतात बेसावध राहण्याचे परिणाम. प्रत्येकाच्या जीवनात असे घडतेच असे नाही. पण वाहन चालवताना वाळू होती हे कळलेच नाही, इतकंच काय जेवण करताना भाताची वाफ अशी भाजून काढणारी असेल असं वाटलं नव्हतं असं म्हणणारे असतातच की! स्वहितासाठी पहिली जरुरी असते ती सावधानतेने आणि सुरक्षितपणे जगण्याची.
स्वहित जपणं हे खरं तर जगण्याचं पाहिलं उद्दिष्टं असायला हवं, पण आपल्याकडे त्याग त्याग खेळण्याची, विशेषत: महिलावर्गाची परंपरा आहे. शिळी, कच्ची, डाग असलेली पोळी असू दे वा माश्याची शेपटी ती नेहमी आई किंवा पत्नीच्या वाटय़ाला. कितीही भूक लागो पतिराजांच्या आधी जेवण? अरे बापरे! ते तर वज्र्यच, अजूनही कित्येक घरात हे दृश्य आहे. या सगळ्यातून आपल्याला दोन गोष्टी शिकायच्या आहेत. म्हणजे असं बघा -मी जसाही आहे गुणदोषांसकटच आहे हे सत्य आहे. मी आहे त्यापेक्षा अधिक चांगला होऊ शकतो, ते हेही मर्यादित अर्थानं खरं आहे. ज्या गोष्टी माझ्यात बदलायला हव्या आहेत त्या बदलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलाय. बस्स. इतकंच पुरेसं आहे. आणि आपल्यातील दोष कमी करत गुणांचा विकास करण्याची, ज्याच्या-त्याच्या मर्यादेनुसार जबाबदारी आहे. याउपर जर कोणी नावं ठेवत असेल तर ठेवू दे. तो आपला प्रश्न आहे.
जयश्रीचं उदाहरण माझ्या डोळ्यांसमोर घडलेलं आहे. लहानपणी तिला विशिष्ट प्रकारचा संधिवाताचा आजार झाला होता. त्या आजाराने तिची संपूर्ण हालचाल जवळजवळ बंद झाली होती. कितीही वेदनाशामक औषधं दिली तरी वेदनेने ती विव्हळत असायची. तिच्या आई-वडिलांचा कल अॅलोपथिक औषधांकडे नव्हता. पण अखेर ते संधिवाततज्ज्ञ डॉक्टरकडे गेलेच. त्यांनी सांगितले, 'आपण तिला, शरीरात आपोआप निर्माण होणाऱ्या रसायनासारखे तीव्र गुणधर्म असलेले कृत्रिम औषधांचे डोस देऊ शकतो. एका आठवडय़ात तिच्या वेदना कमी होतील आणि महिनाभरात ती अगदी नेहमीसारखी शाळेत जायला लागेल.''
तिची आई म्हणाली,''डॉक्टर, लगेच सुरू करा ते औषध.''
डॉक्टर म्हणाले, ''ते कधीही सुरू करता येईल, पण त्या औषधाचे दीर्घकालीन काही परिणाम होतील. तिच्या स्नायूंची अवास्तव वाढ होऊ शकते आणि ती फारच जाड होईल. तिला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून सांगतो, विचार करून निर्णय घ्या.'' आई म्हणाली, 'पुढचे पुढे बघू.' म्हणता म्हणता जयश्री मोठी झाली. हाडापेराने मजबूत. उंचीही सर्वसामान्य मुलींपेक्षा दोन-तीन इंच जास्त. बोली भाषेत उभी-आडवी वाढली. तरी तिची एक सवय चांगली होती. ती भरपूर व्यायाम करायची. स्वत:च्या ताकदीच्या बळावर कबड्डीमध्ये इतकं प्रावीण्य मिळवलं की सरकारतर्फे तिचा गौरव केला गेला. पण स्थळ मिळेना. आता आईबापाला चिंता वाटायला लागली, हिला अनुरूप नवरा आणायचा तरी कुठून ? हे सगळं फक्त आपण औषधांबाबत घेतलेल्या निर्णयामुळेच ही टोचणी त्यांना छळू लागली.
याबाबत जेव्हा जयश्रीला कळलं तेव्हा जयश्री त्यांना जे म्हणाली ऐकून मी त्या मुलीला साष्टांग दंडवत घालायचाच तेवढा बाकी होतो. ''आज तुम्हाला जो प्रश्न वाटतो तो प्रश्न ना तुमचा आहे ना माझा. त्या वेळी जे तुम्ही केलंत ते मला लवकर बरं वाटावं म्हणूनच. त्याबद्दल खंत बाळगायचं काहीच कारण नाही. आज मी जाड असले तरी स्थूल नाही. स्थूलता हा माझा प्रश्न नसून बांधा हा प्रश्न आहे. अत्यंत नियमित व्यायाम करून मी तो सुडौल राखते आहे. जर काही मुलांना मी जाड वाटली असेल तर असू दे. मी कशी आहे, काय आहे आणि का आहे याचे संपूर्ण भान मला आहे. मी आहे तशी उत्तम आहे. आणि मला आहे तशी स्वीकारणारा मुलगा मिळेलच. कदाचित थोडा जास्त वेळ लागेल. पण मी सर्व प्रयत्न करून अशीच राहणार आहे, हे सत्य आहे आणि ते मला कळून चुकले आहे की आडव्या बांध्यानेच मला जगावे लागणार आहे.''
पुढची कहाणीही रंजक आहे. तिचे लग्न अत्यंत हुशार, देखण्या मुलाशी झाले. त्याच्यावर फक्त एक ठपका होता. लग्नाच्या तिसऱ्याच दिवशी त्याची पत्नी तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती. ती पळून जाणार आहे हे पहिल्याच दिवशी त्याच्या पत्नीने सांगितले होते. पण तरीही त्याच्यावर 'घटस्फोटित' हा छापा पडलाच. जयश्री म्हणाली, 'माझ्या शरीरयष्टीत माझा असा काहीच दोष नाही त्याचप्रमाणे त्याची पत्नी पळून गेली तर यात त्याचा तरी काय दोष?' हे सगळं घडू शकतं जर माणसानं स्वत:चा विनाशर्त स्वीकार केला आणि आपल्या निर्णयांची जबाबदारी घेतली तर आणि तरच.
आपण मृत्यू पावल्यावर आपल्याबद्दल लोक मनातल्या मनात काय म्हणतील? याचा विचार केल्यावर जे हाती येईल ते फक्त सत्य. आणि सत्याच्या शोधाची सुरुवात आत्मशोधापासून होते हे विसरून चालत नाही. निदान या निमित्ताने सत्याकडे प्रवास सुरू व्हावा. मीही तुमच्यासारखा यात्रिक आहे. कदाचित तुमच्या आधी, प्रवासाच्या दिशेचा नकाशा मिळवण्यात यशस्वी झालो असेन इतकंच. पण हाच नकाशा अंतिम नाही. कोणी अन्य मार्ग शोधून काढेल. कदाचित तो या मार्गापेक्षा सोपाही असेल. प्रत्येकाला निवडीचे स्वातंत्र्य असतेच.
या लेखमालेचा शेवट करताना, ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाची फक्त आठवण होते आहे -जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात
Translate
सोमवार, २२ डिसेंबर, २०१४
आपण मृत्यू पावल्यावर आपल्याबद्दल लोक मनातल्या मनात काय म्हणतील? याचा विचार केल्यावर जे हाती येईल ते फक्त सत्य. आणि सत्याच्या शोधाची सुरुवात आत्मशोधापासून होते. निदान या निमित्ताने तुमचाही प्रवास सत्याकडे सुरू व्हावा..
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा