Translate

सोमवार, २२ डिसेंबर, २०१४

शेरू या श्वानाचा अखेर मृत्यू झाला..........

1) 26/11 च्या मुंबई हल्ल्याचा उल्लेख करताच तो थरार अनेकांच्या डोळ्यासमोर उभा राहतो. दहशतवाद्यांनी केलेला अंदाधुंद गोळीबार आणि त्यात जखमी झालेलं असंख्य मुंबईकरांसाठी आजही त्या आठवणी अंगावर काटा आणतात. याच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा साक्षीदार असलेला आणि गेली सहा वर्ष या हल्ल्याची जखम सांभाळत मृत्यूशी झुंज देणाऱ्या शेरू या श्वानाचा अखेर मृत्यू झाला.

हृदयविकाराच्या झटक्यानं शेरूची शनिवारी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात प्राणज्योत मालावली. 26/11 च्या मुंबई हल्ल्यावेळी छत्रपती शिवाजी टर्मिनसवर शेरू दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात जखमी झाला होता. तेव्हापासूनच तो परळच्या या रुग्णालयात उपचार घेत होता. पण, काल अखेर त्यानं जगाचा निरोप घेतला.

सीएसटी स्टेशनवर अजमल कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारावेळी शेरू देखील रेल्वे स्थानकात होता. दहशतवाद्यांच्या तीन गोळ्या शेरूला लागल्या होत्या. स्थानकात विव्हळत पडलेल्या या श्वानाला फोटोग्राफर श्रीपाद नाईक यांनी परळच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं होतं.

डॉक्टरांनी त्याच्या शरिरातील दोन गोळ्या काढल्या, श्वसननलिकेत एक गोळी तशीच अडकून होती. तेव्हापासून तो याच रुग्णालयात उपचार घेत होता.  शेरुबद्दल कळल्यानंतर एका पारशी कुटुंबानं या बहाद्दर श्वानाला दत्तक घेतलं. त्याच्या उपचारासाठी लागणारा दर महिन्याचा सर्व खर्च हे कुटुंब करत होतं.

पण, गेल्या काही दिवसांपासून शेरूची प्रकृती खालावत होती. त्यात त्यानं अन्नही सोडलं. अखेर शनिवारी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. अत्यंत भावपूर्ण वातावरणात रुग्णालयाच्या आवारातच शेरूवर अंत्यसंस्कार करण्यात आले



2) मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरील पार्सल रूमबाहेरचा कोपरा सहा वर्षांनंतर शनिवारी पुन्हा हळहळला. तेथून ये-जा करणाऱ्या आणि थोडीशी उसंत मिळाल्यानंतर पाठ टेकणाऱ्या अनेक हमालांना या कोपऱ्याकडे पाहाताना त्याची आठवण यायची. एखादा कुणी तरी सवड काढून परळच्या पेटिट पशुरुग्णालयात चक्कर मारूनही यायचा.. आता त्या आठवणी पुसट होणार आहेत. स्टेशनच्या आवारातच राहणारा एक भटका कुत्रा मुंबईला चटका लावून दोन दिवसांपूर्वी काळाआड गेला. सहा वर्षांपूर्वीच्या, २६ नोव्हेंबर २००८ या दिवशीच्या भीषण अतिरेकी हल्ल्यातील एक मूक साक्षीदार हरपला. टर्मिनसवरील गर्दीतच तो पंधरा वर्षांपूर्वी कधी तरी जन्मला, तिथेच तो वाढला. त्या दिवशी, छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या आवारात कसाब आणि त्याच्या साथीदारांनी अचानक सुरू केलेल्या बेछूट गोळीबारामुळे रेल्वे स्टेशन भयाने थरारून गेले. शेराच्या थाटात त्या परिसरात वावरणारा तो कुत्राही घाबरला; पण त्याही स्थितीत त्याने आपले राखणदाराचे कर्तव्य बजावले. हल्लेखोरांच्या दिशेने पाहात तो भुंकला; पण दुसऱ्याच क्षणाला बंदुकीच्या सुसाट गोळ्यांनी जखमी होऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. कसाबसा, खुरडत खुरडत तो पार्सल रूमजवळील कोपऱ्यात येऊन निपचित पडला.. आजूबाजूला सुरू असलेला भीषण रक्तपात आणि बंदुकीच्या गोळ्या, बॉम्बस्फोटांच्या आवाजाने त्याच्या हृदयात धडकी भरली होती.. अर्धवट बेशुद्धावस्थेत तो अखेरचे क्षण मोजत होता. रक्तपात थांबल्यानंतर स्टेशनवर पसरलेल्या स्मशानकळेतच, एका वृत्तछायाचित्रकाराने या जखमी कुत्र्याला पाहिले आणि एक तरी जीव वाचवावा या जाणिवेतून तातडीने त्याला परळच्या पेटिट पशुवैद्यकीय इस्पितळात दाखल केले.
..तातडीने त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शरीरात शिरलेल्या दोन गोळ्यांपैकी एक बाहेर काढण्यात आली, पण दुसऱ्या गोळीने मात्र त्याच्या श्वसनमार्गातच घर केले होते. डॉक्टरांनी जोखीम घेतली नाही. तो हळूहळू बरा झाला. सहा महिन्यांच्या उपचारानंतर परळच्या पेटिट इस्पितळात त्याच्यासाठी छोटेखानी पिंजरा तयार करण्यात आला आणि '२६-११ च्या हल्ल्यातील जखमी कुत्रा' असा एक फलकही त्या पिंजऱ्यावर लटकावला गेला. २६ नोव्हेंबरच्या त्या हल्ल्याचा तो एक जिवंत, पण मूक साक्षीदार बनून राहिला. त्याच्या डोळ्यांत नंतरही बहुधा त्या हल्ल्याच्या भयखुणा उमटत होत्या. मानसिक आघातातून पुढे तो सावरला, कर्मचाऱ्यांच्या प्रेमामुळे तेथे रुळला. एका पारशी महिलेने तर त्याला अखेरच्या श्वासापर्यंत अपार प्रेम दिले. दाखल झाल्यानंतर तेथेच त्याचे नामकरण झाले- 'शेरू'!..
मुंबईवरील त्या हल्ल्यातून शेरू सुदैवाने बचावला; पण त्या क्रूर दहशतवाद्यांनी त्या दिवशी प्राण्यांनाही दया दाखविली नव्हती. ताजमहाल हॉटेलवरील हल्ल्यात त्यांनी तेथे असलेल्या लॅबड्रॉर जातीच्या दोन कुत्र्यांना गोळ्या घालून ठार मारले होते. नरिमन हाऊसजवळ थैमान असहय़ झाल्याने मोती नावाची एक रस्त्यावरची कुत्री पुढे कित्येक दिवस भयाच्या छायेतून बाहेरच पडली नव्हती. भटक्या कुत्र्यांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेने तिच्यावर उपचार केले आणि ती सावरली. पोलिसांची गाडी ताब्यात घेऊन नरिमन पॉइंटच्या रस्त्यावरून वेगाने जाणाऱ्या अतिरेक्यांचा हैदोस असहय़ होऊन याच परिसरातील काळू नावाचा एक कुत्रा गाडीचा पाठलाग करीत गाडीसोबत पळताना भुंकू लागला. अतिरेक्यांच्या बंदुकीतून सुटलेल्या एका गोळीने त्याचा वेध घेतला आणि पळता पळता एक क्षीण किंकाळी मारून काळूने प्राण सोडला..
बॉम्बस्फोटाच्या आणि बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने घाबरून त्या दिवशी शेकडो कबुतरे मरून पडली होती..
शेरू हा त्या साऱ्या घटनेचा साक्षीदार बनून पुढे सहा वर्षे जगला. तो मूक होता. त्या दिवसाच्या आठवणी त्याच्या मनात कशा घर करून राहिल्या असतील, ते कुणालाच कळले नाही. परळच्या पेटिट रुग्णालयातील तो रिकामा पिंजरा अस्वस्थ आहे!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा