जर्कीनऐवजी स्वेटर घेऊन दिले म्हणून पुण्यात अलीकडेच एका निरागस कोवळ्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. या पार्श्वभूमीवर टीनेजर्सच्या मानसशास्त्राची उकल करणाऱ्या एका संशोधनाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. 'अकारण होणाऱ्या टीकेमुळे मुलांच्या मेंदूवर परिणाम होऊन सारासारबुद्धीने विचार करण्याची त्यांची क्षमता हरवते. त्यामुळे ज्या घरातली मुले कॉलेजच्या वाटेवर आहेत, त्या घरातल्या पालकांनी अधिक सावध राहायला हवे,' असा इशारा संशोधन अहवालात दिला आहे.
बालपण आणि तारुण्याच्या उंबरठ्यावरील पौगंडावस्थेतील मुलांची मानसिक अवस्था दोलायमान असते. त्यामुळे या वयातील मुलांमध्ये आणि पालकांमध्ये सतत संघर्षाचे खटके उडत असतात. चारचौघांमध्ये मुलांना घालून-पाडून बोलल्याने मुले पालकांच्या विरोधात बंड पुकारू लागतात. मुले आणि पालकांमधील यामुळे दरी देखील वाढत जाते. आजवरच्या या अनुभवाला आता शास्त्रीयदृष्ट्या जोड मिळाल्याने पालकांच्या अशा वागण्याने मुलांच्या मेंदूत होत असलेल्या उलथापालथी त्यांना कशाप्रकारे नकारात्मकतेकडे नेतात याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे न्युरोफिजिशियन आणि मानसोपचार तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.
पौगंडावस्थेतील मुलांमध्ये वाढत असलेल्या नकारात्मकतेवर अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील पिटर्सबर्ग विद्यापीठातील केयुंग हॉ ली यांच्या नेतृत्त्वात कॅलिफोर्निया-ब्रेकिन्ले आणि हॉवर्ड विद्यापीठाने हे संशोधन केले. यात एकूण ३२ मुलांच्या ब्रेनचे मॅपिंग करण्यात आले. यात १४ वर्षांच्या वयोगटातील २२ मुली आणि १० मुलांचा समावेश होता. संशोधकांनी या मुलांच्या मेंदूतील तीन भागांवर आपले लक्ष केंद्रित केले. यासाठी या मुलांना त्यांच्याच पालकांच्या आवाजातील काही संवाद एकविण्यात आले. या संशोधनात असे आढळून आले की, जेव्हा या मुलांवर त्यांच्याच पालकांनी टीकात्मक भाषा वापरली, तेव्हा या मुलांच्या मेंदूतील एका कप्प्यातील हालचालींमध्ये साधर्म्य आढळले. मेंदुतील हा भाग नकारात्मक विचारसरणीवर प्रभाव टाकतो. ज्यावेळी मुलांनी ही टीका ऐकली, तेव्हा त्यांच्या मेंदूतील दुसऱ्या भागात कसलीही प्रतिक्रिया जाणवली नाही. विशेष म्हणजे हा भाग एखाद्याने दिलेल्या सल्ल्यावर सकारात्मकतेने विचार करतो. मात्र, पालकांनी जेव्हा एखाद्या गोष्टीवरून जाब विचारला असेल, तर या मुलांमध्ये त्यावर सकारात्मकतेने विचारच केला जात नसल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. या वयातली मुले बंडखोरी करतात, ऐकूनच घेत नाहीत, असा पालकांचा तक्रारीचा सूर असतो. मात्र, त्यांच्या अशा वागण्यामागे मेंदूत होणारे हे बदलच कारणीभूत असल्याचे हा अभ्यास म्हणतो. त्यामुळे या वयातल्या मुलांचे मानसशास्त्र व त्यांच्या मेंदूत होणारे बदलही समजून घेण्यास मदत होणार आहे.
अभ्यासकांनी मेंदूच्या ज्या भागावर हे संशोधन केले तो कानाच्या वरचा भाग आकलन शक्तीवर फोकस करतो. वैद्यकीय परिभाषेत याला टेंपरो परायटल जंक्शन म्हणतात. समोरच्या माणसाच्या बोलण्याचा सारासार विवेकबुद्धीने अर्थ लावून हा भाग सकारात्मकतेने विचार करतो. मात्र, या संशोधनात हा भागच डिअॅक्टिव्ह आढळला. त्यामुळेच मुलांमध्ये नकारात्मक आणि बंडखोरी वाढते. यातून पौगंडावस्थेतील मुलांचे मानसशास्त्र समजून घेण्यास मदत होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा