Translate

बुधवार, १४ जानेवारी, २०१५

कागदी फुले

गणेशोत्सवाच्या निमित्ताने इथे अनेकजण आपल्या कलाकृति सादर करत आहेत त्या बघुन मला स्फुर्ती आली. मी आज कागदाची फुले केली. मी ऑफिसमधे रिकामा वेळ मिळाला कि हि करतच असतो.
आपण जी क्रेप कागदाची फुले करत असू, तशीच हि करतो. पण यासाठी मी कॉम्प्यूटरच्या कंटिन्यूअस स्टेशनरीचा कागद वापरतो. मला यासाठी कात्री, गोंद वगैरे काहीच लागत नाही. या पाकळ्या मी हातानेच कागद फाडून बनवतो. आधी मधे एक कपटा चुरगाळून कळीसारखा आकार करुन घेतो, आणि त्याभोवती पाकळ्या रचत जातो. या पाकळ्यांच्या कडा किंचीत गुंडाळून घेतो. तळाशी हातानेच पिळ देत पाकळ्या घट्ट बसवत जातो. शेवटी देठाला, याच कागदाची कडेची पट्टी, गुंडाळून घेतो.

अरे वा, इथे अनेक लोकांना हि फुले करुन बघाविशी वाटताहेत का ?
(करायला घेतल्यावर तूम्हाला नक्कीच असे
जाणवेल, कि हे काम अतिशय सोप्पे आहे.)
पहिल्यांदा कागदाचा एक कपटा चुरगाळुन त्याला खाली रुंद व वरती निमुळता
होत गेलेला आकार द्या. याच्या कडा निमुळत्या टोकाकडे असू द्या, म्हणजे कळीचा
भास होईल.
पाकळ्या शक्यतो हातानेच फाडा. म्हणजे कडा अनियमित होतात, व नैसर्गिक
दिसतात. या पाकळ्या फाडताना, वरुन गोलाकार आणि खाली निमुळत्या आकारात
फाडा. निमुळते टोक जरासे लांब असू द्या, म्हणजे ते टोक, त्या भागात पिळून त्याचा
देठ करता येतो. आतल्या पाकळ्या थोड्या कमी रुंद ठेवा व बाहेरचा थोड्या रुंद ठेवा.

आतली एखाद, दुसरी पाकळी तशीच गुंडाळा, कारण गुलाबाच्या आतल्या पाकळ्य़ा
बाहेर वळलेल्या नसतात. नंतरच्या पाकळ्या गुंडाळण्यापुर्वी, त्याच्या कडा किंचीत
बाहेरच्या बाजूला वळवा.
या पाकळ्या गुंडाळल्यानंतरही, त्यांना हवा तसा आकार देता येतो. पाकळ्या करताना
गुलाबाचे फुल कसे दिसते, ते डोळ्यासमोर ठेवा. एखादी पाकळी मनासारखी नाहीच, जमली
तर काढून टाका. व दुसरी घ्या.
साधारण सहा सात पाकळ्यात फुल पुर्ण होते. शेवटी, या कागदाची कडेची पट्टी देठाला
घट्ट गुंडाळा. मी कागदाशिवाय कुठलेच साधन वापरत नाही, पण जर हिरवा दोरा
गुंडाळता आला, तर फुल मजबूतही होईल आणि जास्त नैसर्गिक दिसेल.

हा कागद शक्यतो पांढराच असतो. याला रंग देण्यासाठी, त्यावर स्प्रे मारता येईल, म्हणजे
आवश्यक ते शेडींगही दिसेल. सगळे फूलच रंगात बुडवले, तरी चालू शकेल.

मी शक्यतो न वापरलेलेच कागद घेतो, त्यामुळे ते टाकाऊतून टिकाऊ या व्याख्येत बसत नाही.
एका बाजूने प्रिंट केलेला कागद वापरला, तर ते जरा विचित्र दिसते. पण प्रॅक्टीससाठी तो
वापरता येईल.
शाळेतल्या क्रेप फुलानंतर मी फुले कधी केली नव्हती. पण एका प्रदर्शनात, मला सुनीता नागपाल
या कलाकार भेटल्या. त्या सॅटिनच्या कापडांना, मेण लावून फुले करत असत (अजूनही असतील)
त्या काळात जाहिरातींसाठी लागणारी, बहुतेक फुले त्या करत असत. माहीमला त्यांचे टेंपल ऑफ़
फ्लॉवर्स नावाचे दुकान होते. मी रस दाखवल्यावर त्यांनी मला त्यांच्या दुकानात बोलावून, ती
पुर्ण प्रक्रिया शिकवली होती. त्यांचे कसब इतके पराकोटीचे होते, कि कुठलेही खरे फुल आणून द्या,
मी तसे खोटे फुल करुन देते, असे त्या म्हणत असत. पण त्यासाठी आकार आणि गोलाकार देण्यासाठी त्या काही खास उपकरणे वापरत असत, त्यामुळे मला स्वतंत्ररित्या तशी फुले करणे, शक्य झाले नाही.

हा प्रकार मात्र मी स्वत: चाळा म्हणून सुरु केला. कागदाच्या कलाकृतीच्या बाबतीत, मला एका
कलाकाराची आवर्जून आठवण येते. त्यांचे नाव बहुदा श्री गोळे किंवा भोळे असे होते. ते कार्ड पेपर
वापरुन कागदांची शिल्प बनवत असत. म्हणजे अगदी मंदिरावर कोरीव काम असते तसे शिल्प.
त्या शिल्पातल्या मानवी आकृत्या देखील ते बनवत असत. त्यासाठी अगदी खसखशीएवढे तुकडे
वापरत असत. या प्रकारात त्यांनी भारतीय तसेच पाश्चात्य शैलीतील शिल्प बनवली होती.
त्यातले बारकावे तर इतके असत, कि ती शिल्प जिवंत वाटत. उदा पाश्चात्य धर्तीच्या शिल्पात
एक तरुण जोडपे, एक कारंजे, झाड, त्यावरचे पक्षी सर्व होते आणि हे सगळे केवळ फुटभर
उंचीचे. एखादा पक्षी जर बोटभर उंचीचा असेल, तर त्याच्या प्रत्येक पिसाचे बारकावे त्यात असत.
नंतर त्यावर ते फेव्हीकॉल स्प्रे करत असत. या कलाकृतींचे प्रदर्शन वरळीच्या नेहरु सेंटरमधे
भरले होते, आणि त्यावेळी लोकांनी चक्क रांगा लावल्या होत्या. (नेहरु सेंटरच्या इतिहासात हे
पहिल्यांदाच घडले होते.) पण या कलाकाराबद्दल नंतर कुठेच काहि वाचनात आले नाही.
(इथे कुणी आहे का, ज्यांना ते प्रदर्शन आठवतेय ?)
माझ्याकडे इतक्या बारकाव्याने कोरलेली चिनी लाकडी शिल्प पण होती.
या सगळ्या कलाकृतींच्या तूलनेत, हि फुले अगदीच बाळबोध आहे, आणि म्हणुनच, मी या
प्रशंसेला अजिबात पात्र नाही.

तर हे फोटो. आतल्या कळी पासून सुरवात. मग पाकळीचा आकार, वळवलेली पाकळी. मग एकेक पाकळी लावल्यावर ... (आता बघा करुन, नक्कीच जमेल)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा