Translate

सोमवार, २५ मे, २०१५

जॉन नॅश (वय ८६) यांचा पत्नी अलिसिया (वय ८३) यांच्यासह मोटार अपघातात मृत्यू

अर्थशास्त्राचे 'नोबेल' व गणितातील 'आबेल' असे दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावणारे ख्यातनाम गणितज्ञ जॉन नॅश (वय ८६) यांचा पत्नी अलिसिया (वय ८३) यांच्यासह मोटार अपघातात मृत्यू झाला. अलीकडच्या काळातील सर्वात प्रज्ञावान गणितज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जीवनावर 'ए ब्यूटीफुल माइंड' हा चित्रपट २००१ मध्ये साकारण्यात आला होता व त्यात रसेल क्रो यांनी नॅश यांची भूमिका केली होती. नुकतेच नॅश यांना गणितातील आबेल या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रिन्स्टन विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते टॅक्सीतून प्रवास करीत असताना ती अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या अडथळ्यांवर आदळली. हा आघात एवढा मोठा होता की, दोघे पती-पत्नी टॅक्सीतून बाहेर उडाले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी सिटबेल्ट लावलेला नव्हता. 
प्रिन्स्टन विद्यापीठातच ते राहात होते, त्याच विद्यापीठात त्यांनी 'गेम थिअरी'वर विशेष काम केले होते. त्यांना १९९४ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते. नॅश यांना छिन्नमनस्कतेचा विकार (स्क्रीझोफ्रेनिया) होता व त्या आजाराशी झगडत त्यांनी मानसिक आरोग्याचे पुरस्कर्ते म्हणून काम केले. नॅश यांच्या निधनाने धक्का बसल्याचे अभिनेते रसेल क्रो यांनी म्हटले आहे, अतिशय सुंदर मैत्री संपली. सुंदर मने व सुंदर हृदये जुळली होती ती विदीर्ण झाली असेही त्यांनी सांगितले.
*****
जॉन यांना १९९४ मध्ये गणितातील धोरणात्मक निर्णय, कुशल डावपेच, नफा-तोटा या 'गेम्स थिअरी'वर व अर्थशास्त्रामधील योगदानाबद्दल नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. विशेष म्हणजे ते अर्थशास्त्र हा विषय ओझरता शिकले होते. 
*****
पदवीसाठी त्यांनी अभियांत्रिकी हा विषय विवडला होता, पण त्यांनी रसायनशास्त्रातून पदवी घेतली होती. वीस वर्षे वयाचे असताना त्यांनी डॉक्टरेटसाठी संशोधन केले होते. त्यावेळी अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नव्हता. तब्बल ४४ वर्षांनंतर त्यांचा फक्त २७ पानांचा प्रबंध नोबेलसाठी विचारात घेतला गेला.

सोमवार, १८ मे, २०१५

एड्स / एचआयव्ही .......... तेव्हा आणि आता

ते वर्ष होतं १९८६, जेव्हा चेन्नईच्या वेश्यावस्तीत भारतातल्या पहिल्या एड्सच्या रुग्णाचं निदान झालं. पाठोपाठ अनेक मोठय़ा शहरातून, जिथे जिथे एड्सच्या तपासण्यांची सुविधा होती अशा ठिकाणी रुग्ण सापडू लागले आणि एड्स नावाचा भस्मासुर देशात उत्पन्न झाल्याची बातमी सर्वदूर पसरली. 
या प्राणघातक रोगाला इलाज नसतो, एकदा तो झाला की मृत्यू ठरलेलाच, अशा सुरुवातीच्या माहितीमुळे देश ढवळून निघाला. हा रोग नक्की कशामुळे होतो, कसा पसरतो यविषयीच्या अज्ञानामुळे समाजाच्या सर्व थरांत प्रचंड भीती निर्माण झाली. त्याला जडलेल्या अनैतिक वर्तनाच्या कलंकामुळे त्याची तपासणी करून घेण्याविषयीही खूप वादविवाद झाले.
एकीकडे असुरक्षित लैंगिक संबंध, दूषित रक्त संक्रमण, मातेकडून गर्भाला किंवा स्तनपान करणाऱ्या बाळाला संक्रमण, शिरेतून नशा आणणाऱ्या औषधांचा वापर या सर्व गोष्टींतून एचआयव्ही विषाणूंचा प्रसार आणि एड्सची लागण वाढतच चाललेली होती. बघता बघता एड्सच्या रुग्णसंख्येच्या बाबतीत भारताचा क्रमांक संपूर्ण जगात तिसरा आणि आशिया-पॅसिफिकमध्ये दुसरा आहे, असं दिसून आलं. एकटय़ा भारतात एड्स रुग्णांची संख्या ५,३०,००० पर्यंत येऊन पोहोचली.

केवळ २० वर्षांपूर्वी असं भयंकर चित्र दिसत असताना एड्सवरची औषधं तर निघाली होती, ती देशात मिळतही होती, पण बरीच महाग असल्यानं खूपच कमी रुग्णांना त्यांचा फायदा घेता येत होता. मात्र परिस्थिती आटोक्याबाहेर चालली आहे हे ओळखून शासनानं वेळीच उचललेल्या पावलांमुळे आणि भारतीय औषध कंपन्यांनी निर्माण केलेल्या प्रभावी जेनेरिक औषधांमुळे या भीषण परिस्थितीत जो क्रांतिकारक बदल झाला आहे तो वाचकांपुढे मांडण्यासाठी हा आजचा लेख आहे.
कोणत्याही व्यक्तीची रोगप्रतिबंधक शक्ती त्याच्या सीडीफोर (CD4) लिम्फोसाइट या रक्तपेशीच्या संख्येवरून मोजली जाते. एचआयव्हीचा विषाणू या 'सीडीफोर लिम्फोसाइट' वरच हल्ला करत असल्यानं रुग्ण आपली प्रतिकारक शक्ती गमावून बसतो आणि कोणत्याही इतर जंतुसंसर्गाला चटकन बळी पडतो. एचआयव्हीसोबतच वेगवेगळे इतर जंतू (यात विषाणू, बॅक्टेरिया, बुरशीचे असंख्य प्रकार यांचा समावेश होतो) या रुग्णाच्या शरीरात विनासायास प्रवेश करतात आणि रुग्णाचा मृत्यू या 'संधिसाधू' जंतूंच्या संसर्गामुळेही होत असतो. अशा संसर्गात सर्वात अग्रणी आहेत ते क्षयरोगाचे जंतू.
२००० साली देशातल्या काही प्रमुख औषधी कंपन्यांनी त्यांची एड्सवरची अत्यंत प्रभावी उत्पादनं बाजारात आणली, तीसुद्धा जेनेरिक रूपात, विश्वास बसणार नाही अशा म्हणजे पूर्वीच्या किमतीच्या केवळ पाच टक्के किमतीत, आजच्या घटकेला ही औषधं दिवसाला ६० रुपये म्हणजे महिन्याला १८०० रुपये एवढय़ा नाममात्र किमतीत मिळतात; एवढंच नव्हे तर शासनाच्या हजारो केंद्रांमध्ये ती अक्षरश: फुकट मिळतात. एड्सवरची औषधं हा बहुधा तीन औषधांचा एकत्र संच असतो. त्याला एआरटी (अँटी रेट्रो व्हायरल थेरपी) असं म्हणतात. घ्यायला सोप्या अशा कॉम्बिनेशन पिल सकाळी एक आणि रात्री एक या डोसमध्ये दिल्या जातात. त्यांच्या सोबत क्षय रोगाची, तसंच इतर जंतूंच्या प्रतिबंधाची औषधंसुद्धा दिली जातात.
आज देशातल्या (आणि सर्व जगातल्याही) आर्थिक निम्न आणि मध्यम स्तरातल्या रुग्णांची खात्री पटली आहे की त्यांना ही औषधं कायम घ्यायची आहेत आणि त्यांचा पुरवठा नित्य आणि विनाशुल्क होऊ शकतो, म्हणूनच आज जगातल्या २५ दशलक्ष रुग्णांपैकी निम्म्याहून जास्त लोक आता नियमित एआरटी घेत आहेत. रोगनिदान झाल्याबरोबर उपचार सुरू केले, नियमित तपासणी ठेवली आणि उपचारात सातत्य ठेवलं तर अनेक पातळ्यांवर आश्चर्यकारक सुधारणा दिसून येते. सीडीफोर पेशी वाढतात त्यामुळे आगंतुक जंतूंचा शिरकाव होत नाही. रोगाची लक्षणे कमी होतात. एकंदर आरोग्य सुधारतं. आयुर्मर्यादा वाढते. रुग्ण कार्यक्षम जीवन जगू शकतो. सध्या आपल्या देशात १० वर्षांहून अधिक काळ सातत्यानं उपचार घेऊन सर्वसामान्य जीवन जगणारे असंख्य रुग्ण आहेत. पाश्चात्त्य देशात हाच कालावधी ३०-४० वर्षे एवढा वाढला आहे. असं म्हटलं जातं की, त्वरित निदान आणि अखंड उपचार घेणारा एड्सचा रुग्ण मरू शकेल, पण दुसऱ्या कोणत्या संसर्गजन्य नसलेल्या व्याधीनं, एड्समुळे नव्हे.
अर्थात, ही सर्व प्रगती ज्यांच्यासाठी आहे त्या रुग्णांपर्यंत हे उपचार पोहोचणं तितकंच महत्त्वाचं आहे. २००२ साली भारतात एकंदर जनतेच्या ०.४१ टक्के लोकांना ही बाधा झाली होती. २०१३ साली हेच प्रमाण ०.२७ टक्के इतकं कमी आलं आहे. सध्या देशात एकूण १,२०,००० बाधित रुग्ण आहेत, म्हणजे गेल्या फक्त एक दशकात ५७ टक्के इतकी घट झाली आहे. कशी घडून आली ही सुधारणा?
आश्चर्य वाटेल इतक्या तत्परतेनं शासनानं १९८७ मध्येच 'एड्स कंट्रोल'चा कार्यक्रम हाती घेतला. त्यामध्ये वरचेवर सुधारणा करून त्याची व्याप्ती वाढवली. आज या कार्यक्रमाच्या अंतर्गत फार मोठय़ा प्रमाणावर एचआयव्ही एड्स जनजागरणाचे प्रयत्न चालू आहेत. विविध माध्यमांचा वापर करून, या संसर्गाची लागण कशी होते, रक्त तपासणी (फारशी महाग नाही, कुठेही उपलब्ध, एक दिवसात रिपोर्ट), निदान आणि उपचार किती परिणामकारक असू शकतात यांची माहिती समाजाच्या सर्व स्तरांत पसरवण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. शाळा, महाविद्यालये, रेल्वे स्थानकं, मोठे रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी प्रसारफलक, जाहिराती, पथनाटय़ं, रेडिओ, टीव्ही अशा सर्व मार्गाचा उपयोग केला जात आहे. यासाठी वेगवेगळ्या बिगरसरकारी सेवाभावी संस्थासुद्धा उत्तम साथ देत आहेत.
१९९७ मध्ये केवळ ६७ असलेली एड्स कंट्रोल केंद्रांची संख्या आज १५ हजारांवर गेली आहे. एचआयव्हीचा धोका जास्त असणाऱ्या सर्व व्यक्तींची तपासणी, बाधित व्यक्तींचे सातत्याने आणि विनाशुल्क उपचार, त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींची तपासणी, वारंवार समुपदेशन अशी अनेक कामं तिथे चालू असतात. रुग्ण केंद्रांपर्यंत येण्याची वाट न पाहता त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्यसेवक सतत प्रयत्नशील असतात. गर्भवती स्त्रिया, अतिदक्षता विभागातील रुग्ण, रक्तपेढीमध्ये गोळा होणारे रक्त, शस्त्रक्रियेसाठी आलेले रुग्ण, डॉक्टर्स आणि सहकारी अशा सर्वाचीही तपासणी केली जाते. थोडक्यात, एकही बाधित रुग्ण नजरेतून सुटू नये असा हा प्रयत्न.
देशातली दक्षिणेची चार राज्ये- आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही एड्सच्या रुग्णांच्या संख्येत अग्रगण्य होती. अद्यापि तशीच आहेत. तरीही वरील चारही राज्यात एचआयव्हीची साथ आटोक्यात येत आहे असं म्हणता येईल, याखेरीज एड्सचा प्रादुर्भाव दिसून येतो तो ईशान्य भारतात, जिथे एड्स जनजागृतीचे प्रयत्न जोरदार करूनही वाढत्या व्यसनाधीनतेमुळे नवीन लागण होणे सुरूच आहे. स्त्री वेश्यांमध्ये एचआयव्हीचं प्रमाण १०.२ टक्क्यांवरून २.७ टक्क्य़ांपर्यंत आलं आहे. समलिंगी लोकांमध्ये प्रमाण ४. ४ टक्के इतकं आहे. एड्सप्रतिबंधक यंत्रणा ८४ टक्के लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि एड्समुळे होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात २९ टक्के इतकी घट झाली आहे. पुरुष-वेश्या आणि लिंग-परिवर्तित लोक किंवा तृतीयपंथी यांच्यामध्ये मात्र शिक्षणाचा अभाव, मद्य व इतर नशेचा वापर आणि एड्सबद्दल माहिती नसणे या कारणांमुळे अजूनही एचआयव्हीची बाधा होण्याचं प्रमाण जास्त आहे. लमाण, धनगर इत्यादी भटक्या जमाती आणि राष्ट्रीय महामार्गावरून सतत प्रवास करणारे ट्रक ड्रायव्हर्स यांच्यापर्यंत पोहोचणे, मात्र शासकीय यंत्रणांसाठी एक आव्हान आहे.
तरीही एचआयव्ही एड्सच्या संदर्भात घडून आलेले हे बदल अचंबित करणारे आहेत यात शंका नाही. २०१५ या चालू वर्षांत एकही मूल आईकडून एचआयव्ही घेऊन जन्मणार नाही यासाठी आपली यंत्रणा कटिबद्ध आहे. एचआयव्हीला मूठमाती देण्याच्या प्रयत्नांची आपण दखल घ्यायलाच हवी.

शुक्रवार, १५ मे, २०१५

भय इथले संपत नाही - कवी ग्रेस (१० मे, १९३७-२६ मार्च, २०१२)

माणिक सीताराम गोडघाटे असे त्यांचे पूर्ण नाव. ग्रेस यांचा १० मे रोजी जन्मदिन असतो. अगदी जुन्या पिढीतील मर्ढेकरांनंतरच्या नवकवींमध्ये त्यांची गणना होते. ‘भय इथले संपत नाही’ असे म्हणत साऱ्या महाराष्ट्राला कवितेच्या विश्वात घेऊन जाणाऱ्या ग्रेस यांना, त्यांच्या ‘वाऱ्याने हलते रान’ ह्या ललितलेख संग्रहासाठी २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या आयुष्यातील हा एकमेव राष्ट्रीय/ राज्यस्तरीय पुरस्कार ठरला.
सत्तरच्या दशकात पद्य लेखनाबरोबर गद्य लेखनाच्या विविध छटा दाखवणारा लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. वाचकाला ते मुक्त विहार करणाऱ्या जगात घेऊन जात असत. अगदी पाश्चात्त्य कविता, उर्दू शैली, शायरी, पंडिती काव्य, संत वाङ्मय यांचा प्रचंड अभ्यास असल्याप्रमाणे त्यांचे लिखाण असे. परंतु असे काही नसल्याचा ते वेळोवेळी खुलासा करत असत. त्यांचे बहरलेले भाषावैभव आणि ‘इदम् न मम’ची भावना, यामुळेच त्यांचे अनुकरण करणे अगदीच कठीण असल्याचे साहित्य विश्वातील मंडळीकडून आजही बोलले जाते. मी टाचणं टीपणं करणारा, दुसऱ्याने माझे अनुकरण करावे यासाठी इतरांना उपदेश करणारी व्यक्ती नाही असे म्हणत अगदी मुक्तछंद कवितांचा आनंद साहित्य विश्वाला देणारे कवी ग्रेस हे मूळचे नागपूरचे. ते पेशाने मराठीचे प्राध्यापक होते. १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर २००४ पर्यंत त्यांनी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य केले. तसेच या कालावधीमध्ये त्यांनी दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समिती आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य म्हणून देखील आपली मातृभाषा समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न आपल्या शैलीतून सुरूच ठेवला. ‘युगवाणी’ या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राचे १९७१ ते १९७४ या काळात त्यांनी संपादन केले. मुंबईतील ‘संदर्भ’ या लेखक केंद्राचेही ते काही काळ संपादक होते. हे सारे सांगण्यामागचा उद्देश असा की, आपल्या कलेचे देणे लागणारा हा कवी सदैव कार्य तप्तरतेने समाजाची सामाजिक बांधिलकी जपत, श्रोतृवर्गास आपल्या लिखाणाच्या बळावर मंत्रमुग्ध करणारा भाषप्रभू म्हणून लिखाण करत राहिला, अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत.
असे म्हणतात की, ‘जे न देखे रवि, ते देखे कवी.’ कवी ग्रेस यांनी ‘ग्रेस’ असे टोपण नाव घेऊन कविता लिहिण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांचे प्रकाशक रामदास भटकळ यांनी एक किस्सा सांगितल्याचे येथे आवर्जून मांडावेसे वाटते. रामदास भटकळ यांनी संगितले, की त्यावेळी ग्रेस म्हणजे स्त्री की पुरुष आहे हे नक्की माहीत नसताना देखील एक नवकवी लाभला आहे, जो आपल्या शब्दांनी सर्वांना वेगळ्या विश्वात घेऊन जातो म्हणून लोक त्यांच्या कविता ऐकत, वाचत, पुटपुटत असत. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्त्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी ग्रेस हे नाव धारण केले आणि त्यापुढे ते ग्रेस या टोपण नावाने कविता करू लागले. तसेच वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या, आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली. आपले पहिले पुस्तक त्यांनी रामदास भटकळ यांच्यामार्फत इन्ग्रिड बर्गमनपर्यंत पोचवले.
‘जो अंदर से घबराया होता है, वो आवाज चढाके ही बोलता है’, असे म्हणून सर्वांना आपल्या ललितसाहित्याची ओळख मराठी, हिन्दी, उर्दू, इंग्रजी अशा भाषांमध्ये चौफेर फटकेबाजी करत कवी ग्रेस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक ललित लेखसंग्रह आणि कवितासंग्रह यांच्या माध्यमातून करून दिली. पॉप्युलर प्रकाशनाने त्यांची ‘ओल्या वेळूची बासरी’, ‘कावळे उडाले स्वामी’, ‘ग्रेसच्या कविता-धुक्यातून प्रकाशाकडे’, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, ‘चर्चबेल’, ‘मितवा’, ‘वाऱ्याने हलते रान’, ‘संध्याकाळच्या कविता’ सहित अनेक लिखाणे प्रसिद्ध केली आहेत. दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या ‘महाश्वेता’ या मालिकेत ग्रेस यांच्या ‘निष्पर्ण तरूंची राई’ (चंद्रमाधवीचे प्रदेश) या कवितेचा शीर्षकगीत म्हणून (भय इथले संपत नाही) वापर करण्यात आला. लतादीदींच्या आवाजातील या कवितेने श्रोता वर्ग अजूनही मंत्रमुग्ध होतो.
प्रेमी युगुलांना प्रेम कवितांच्या माध्यमातून चिरकाल टिकेल असे नाते आपल्या शब्द भावनांमधून सांगणारा हा कवी फक्त भाषाकवी नसून भावनाकवी होता आणि अशा भावना त्यांनी आपल्या अनेक कवितांमधून व्यक्त केल्या. अगदी कॅन्सरसारख्या आजारामुळे मृत्यू येणार हे माहीत असताना देखील, आयुष्य संपेपर्यंत ते लिखाण करत राहिले. त्यामुळे जरी कवी ग्रेस आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे लेखन मराठी भाषेला समृद्ध करत आपल्या सर्वांसाठी आणि भविष्यातील रसिकांसाठीही उपलब्ध आहे.

ऊंची वाढवणे.......

साधारणतः पौगंडावस्था पूर्ण होईपर्यंत उंचीमध्ये वाढ होत असते. म्हणजे मुलींमध्ये 15-16 वर्षांनंतर व मुलांमध्ये 18-20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. मुलींमध्ये पाळी सुरू झाली की नंतर उंचीमध्ये सहसा फारसा फरक पडत नाही. अर्थातच उंची वाढवण्यासाठी आधीच प्रयत्न करणे भाग असते. वास्तविक उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रोवले जाते. त्यामुळे गर्भधारणेच्या आधीपासून स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेले असेल, तर बाळाचे वजन व उंची व्यवस्थित वाढते, असा अनुभव आहे.
व्यक्‍तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे उंची. अर्थात शरीरबांधा आणि उंची यांचा समतोल असला, तरच उंची शोभून दिसते. शरीर सात धातूंपासून बनलेले आहे, हे आपण जाणतो. यातील अस्थी धातूवर म्हणजेच हाडांवर उंची अवलंबून असते व ती शोभून दिसण्यासाठी मांस-मेद धातूंना व्यवस्थित पोषण मिळण्याकडेही लक्ष ठेवावे लागते.
प्रकृतिपरीक्षणामध्ये उंची हा मुद्दा महत्त्वाचा असतो. वातप्रकृतीच्या व्यक्‍ती सहसा एक तर फार उंच व बारीक तरी असतात किंवा फार बुटक्‍या व अनियमित शरीरठेवणीच्या असतात. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍ती साधारण मध्यम उंचीच्या व मध्यम बांध्याच्या असतात, तर कफप्रकृतीच्या व्यक्‍ती धिप्पाड, उंचीच्या मानाने वजन जरा जास्ती असणाऱ्या असतात. उंचीवर प्रकृतीइतकाच आनुवंशिकतेचाही प्रभाव असतो, तसेच लहानपणापासून धातुपोषणाकडे लक्ष देण्याचाही उंची वाढण्यावर परिणाम होत असतो.
साधारणतः पौगंडावस्था पूर्ण होईपर्यंत उंचीमध्ये वाढ होत असते. म्हणजे मुलींमध्ये 15-16 वर्षांनंतर व मुलांमध्ये 18-20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. मुलींमध्ये पाळी सुरू झाली की नंतर उंचीमध्ये सहसा फारसा फरक पडत नाही.
अर्थातच उंची वाढवण्यासाठी आधीच प्रयत्न करणे भाग असते. वास्तविक उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रोवले जाते. त्यामुळे गर्भधारणेच्या आधीपासून स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेले असेल, तर बाळाचे वजन व उंची व्यवस्थित वाढते असा अनुभव आहे.
गर्भधारणेच्या काळात गर्भवतीने लोह, हिमोग्लोबिन, कॅल्शियम योग्य मात्रेमध्ये व नैसर्गिक स्वरूपात सेवन करणेही उंचीच्या दृष्टीने महत्त्वाचे होय. रासायनिक द्रव्यांपासून बनविलेली औषधे आतमध्ये हाडांपर्यंत तसेच हाडांचे पोषण करणाऱ्या मज्जेपर्यंत पोचू शकतातच असे नाही, त्यापेक्षा नैसर्गिक अन्न व औषधातून ही तत्त्वे शरीरात सहजपणे स्वीकारली जातात व त्यामुळे उंची नीट वाढण्यास, एकंदरच सर्व शरीराचे पोषण होण्यास मदत मिळते.
उंचीला पूरक उपाय 
जन्मानंतरही वाढत्या वयात आहारात दूध, घरी बनवलेले साजूक तूप, लोणी, पंचामृत, गहू, खारीक, खसखस, बाभळीच्या डिंकाची लाही या सर्व गोष्टी असल्या तर त्यामुळे उंची नीट वाढण्यास मदत मिळू शकते. उंचीला पूरक असे साधे, पण प्रभावी उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील,


•सकाळी व संध्याकाळी कपभर गरम दूध खारकेचे चूर्ण टाकून घेणे. तसेच सर्व धातुपोषक औषधद्रव्यांपासून तयार केलेला "शतावरी कल्प' किंवा "संतुलन चैतन्य कल्प' दुधात टाकून घेणे. 

•रोज सकाळी एक-दोन चमचे घरी बनवलेले ताजे लोणी साखर टाकून घेणे. 

•आहारात रव्याची खीर, गव्हाच्या पिठाचा शिरा, गव्हाची खीर यांचा अधूनमधून समावेश असणे. 

•डिंकाची लाही, खारीक, बदाम वगैरे शक्तिवर्धक व हाडांना पोषक द्रव्यांपासून तयार केलेला डिंकाचा लाडू किंवा अश्‍वगंधा, मुसळी वगैरे घटक असलेले "मॅरोसॅन' हे रसायन सेवन करावे. 

•वात संतुलन करणाऱ्या व धातुपोषण करणाऱ्या औषधांनी सिद्ध तेलाचा अभ्यंग करणे. 

•प्रकृतीचा विचार करून दिलेल्या मोती भस्म, प्रवाळ भस्म, शौक्तिक भस्म वगैरे औषधांचाही वयाच्या मर्यादेत उंची वाढवण्यासाठी चांगला उपयोग होताना दिसतो, यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.


हाडे करा बळकट 
तारुण्यावस्थेत पोचेपर्यंत जी उंची वाढते, ती नंतर वाढत्या वयानुसार म्हणजे साधारणतः चाळिशीनंतर थोडीशी कमी होऊ लागते. याचे कारण असते वयानुसार हाडांची थोड्या प्रमाणात झीज होणे, विशेषतः पाठीचे मणके झिजणे. त्यामुळे पस्तिशीनंतर हाडांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवले, पाठीच्या कण्याला कुंडलिनी तेलासारखे तेल लावण्याची सवय ठेवली तर वयानुसार उंची घटण्याचे प्रमाण कमी करता येते.

लहानपणापासून ताठ बसण्याची, ताठ उभे राहण्याची सवय सुद्धा उंचीसाठी पूरक असते. लहानपणापासून योगासने, सूर्यनमस्कारांचा सराव केल्याने सुद्धा शरीराच्या एकंदर परिपूर्ण वाढीला पाठबळ मिळते, उंची वाढण्यास कारणीभूत संप्रेरक स्रवण्यास उत्तेजना मिळू शकते. 
दोरीवरच्या उंच उड्या, सिंगल बार, डबल बार म्हणजेच लटकण्याचे व्यायाम उंची वाढण्यास उपयोगी असतात. याखेरीज उंची वाढण्यासाठी सहायक म्हणून योगासने व संतुलन क्रियायोगापैकी पुढील क्रिया सुचवता येतील,


स्थैर्य 
स्थैर्य क्रियेच्या अभ्यासाने मानेला व पाठीला व्यायाम मिळतो व मेरुदंड लवचिक होतो, पिच्युटरी ग्रंथी कार्यान्वित होते, पचनक्रियेत सुधारणा होते. तसेच दीर्घ व लांब श्‍वासोच्छ्वास करायची सवय लागते. या क्रियेच्या अभ्यासाने सजगता वाढते व व्यक्तीला स्थैर्य मिळते.


•ही क्रिया जास्तीत जास्ती सात वेळा करावी. 

•दोन्ही टाचांमध्ये सुमारे 15-20 सें.मी. तर दोन्ही चवड्यांमध्ये 25-30 सें.मी. अंतर ठेवून ताठ उभे राहावे. हात शरीरालगत सरळ ठेवावेत व हाताच्या मुठी वळलेल्या असाव्यात. 

•पाय जमिनीवर घट्ट रोवावेत. 

•श्‍वास आत घेत, दोन्ही पायांच्या टाचा वर उचलून पायांच्या चवड्यांवर उभे राहावे. टाळूला दोर बांधून आपल्याला जणू कोणी वर ओढत आहे, अशी कल्पना करावी. 

•पोट आत व वर ओढून श्‍वास आत कोंडून धरावा. या वेळी लक्ष सहस्राधार चक्रावर केंद्रित करावे. शक्‍य तितका वेळ या स्थितीत राहावे. 

•श्‍वास हळू हळू बाहेर सोडत, पोटावरचा ताण कमी करून टाचा जमिनीला टेकवत खाली यावे.


विस्तारण 
या क्रियेच्या अभ्यासाने पाठीचा कणा सरळ व्हायला मदत मिळते. कंबरेच्या भागाला बळकटी येते, वायू सहजपणे सरायला मदत होते, तसेच पचनशक्ती सुधारते, थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण येते व फुप्फुसांमधे शक्तिसंचार होतो. मेंदूला उत्तेजना मिळते, संवेदनशीलता वाढते, विस्तार व बदल या दोन मूलभूत गोष्टींची पूर्तता होते.

ही क्रिया पुढीलप्रमाणे करता येते-
•वज्रासनात बसावे, पुढे वाकून पोटावर झोपावे. दंड जमिनीला लंब ठेवून कोपरे जमिनीला टेकवावेत, तर्जनी कानाच्या मागे व उरलेली तीन बोटे गालावर ठेवून दोन्ही हात असे ठेवावेत की हनुवटी तळव्यांना चिकटलेली नसेल. दृष्टीसमोर असावी. स्नायूवर ताण येऊ न देता डोळे वटारल्यासारखे मोठे करावे. 
•तोंडाचा मोठा आ करावा. या वेळी अजगर जणू आपले भक्ष्य आकर्षून घेत आहे अशी कल्पना करावी. 
•सावकाशपणे एका संथ लयीत श्‍वास घ्यावा व सोडावा आणि असे करताना श्‍वास आत घेतल्याचा व बाहेर सोडल्याचा फुसकारल्यासारखा आवाज यावा, अशी 10-12 (सुमारे एक मिनिट) आवर्तने करावीत. 
•श्‍वासोच्छ्वास पूर्ण झाल्यावर कुठल्या बाजूच्या नाकपुडीने श्‍वास चालू आहे हे पाहावे. 
•ज्या बाजूच्या नाकपुडीने श्‍वास चालू आहे ती नाकपुडी वरच्या बाजूला येईल अशा तऱ्हेने डोके जमिनीवर ठेवावे. हात कोपऱ्यातून काटकोनात वाकवून डोक्‍याच्या दोन्ही बाजूला ठेवावे, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले असावे, पाय शिथिल असावेत. 
•डोळे बंद करून शरीरातील सर्व अवयवात प्राणशक्तीचा संचार होत आहे, अशी कल्पना करावी व हळूहळू सर्व शरीर शिथिल करावे. या वेळी आपल्या शरीराचा विस्तार झाला आहे असा अनुभव येतो. 
•थोड्या वेळाने डोळे उघडून वज्रासनात यावे व नंतर उभे राहावे.


धनुरासन 
या आसनाच्या अभ्यासाने पाठीच्या कण्याची व पाठीच्या स्नायूंची लवचिकता वाढते व मज्जातंतूंना बळकटी मिळते. भुजंगासन व शलभासन या दोन्ही आसनांचा यामुळे लाभ होतो.

•पोटावर झोपावे, पाय एकमेकाला जुळलेले असावेत. हात शरीरालगत सरळ ठेवावेत, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला असावेत. कपाळ जमिनीला टेकलेले असावे. 
•पाय गुडघ्यात वाकवून पायांच्या टाचा नितंबाजवळ आणाव्यात. 
•दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर ठेवून हातांनी पायाचे घोटे पकडावेत. घोटे पकडताना हाताचे अंगठे आतल्या बाजूला व इतर चार बोटे बाहेरच्या बाजूला असावीत. तसेच दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना टेकलेले असावेत. 
•पाय व डोके हळूहळू जास्तीत जास्ती वर उचलावे, हात कोपरात सरळ असावेत. 
•स्थितीत संपूर्ण शरीराचा भार नाभीभोवतीच्या भागावर येईल. आपल्या क्षमतेनुसार या स्थितीत राहावे. 
•हातांनी पकडलेले घोटे साडून दोन्ही हात, छाती व डोके जमिनीला टेकवून पूर्वस्थितीला यावे. पोटावर थोडा वेळ आरामात झोपून राहावे.

गुरुवार, ७ मे, २०१५

राजर्षी शाहू महाराज. .

संस्थानाधिपती पददलितांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०३ वी पुण्यतिथी आहे. एक संस्थानाधिपती यापेक्षा महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे महान नेते, हीच त्यांची खरी ओळख आहे. येथील बहुजन समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे बहुजन समाजाने त्यांना आपले दैवतच मानले आहे.
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे जन्मठिकाण कोल्हापूर येथील राजवाड्यात असून हे स्थळ आता विश्रामधाम म्हणून ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव यशवंतराव असे होते. वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे, तर आईचे नाव राधाबाईसाहेब असे होते. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांना इंग्रजांनी वेडसर ठरवून अहमदनगर जिल्ह्यात कैदेत ठेवले होते. तेथेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांना औरसपुत्र नसल्याने त्यांच्या पत्नी आनंदीबाईनी शाहू महाराजांना दत्तक घेतले. शाहू महाराजांचे प्रारंभीचे शिक्षण खासगी शिक्षकामार्फत झाले. पुढील राजकुमारांसाठी असलेल्या कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. परतल्यावर त्यांनी युरोपियन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी, भाषा इ. शिक्षण घेतले. संस्कृत भाषेचेही त्यांनी अध्ययन केले.
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची अधिकारसूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर संस्थानात दौरा काढून संस्थानाची राज्यव्यवस्था व प्रजेची स्थिती यांची जातीने पाहणी केली. यावेळी आपल्या प्रजेची हलाखीची स्थिती पाहून आपल्या हाती आलेल्या सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करण्याचा त्यांनी मनोमन निश्चय केला व पुढे तो आयुष्यभर प्रत्यक्षातही उतरविला.
शाहू महाराजांच्या काळात बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला होता. शिक्षण ही फक्त वरिष्ठ वर्गाचीच मक्तेदारी समजली जात होती. बहुजन समाजाच्या मागासलेपणाचे एक कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव हे होय, ही गोष्ट शाहू महाराजांनी ओळखली. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्याच्या कार्याला त्यांनी प्राधान्य दिले. महाराजांनी विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांच्यासाठी वसतिगृहांची स्थापना केली. कारण त्या काळी शिक्षणाच्या सोयी फक्त शहरातच उपलब्ध होत्या. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते. आपल्या मुलांना शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी पाठविण्याची कुवत त्यांच्यात नव्हती त्यामुळे गोरगरीब मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी शहरात त्यांच्या राहण्याची अल्पखर्चात व्यवस्था व्हावी म्हणून महाराजांनी वसतिगृहांची स्थापना केली. वसतिगृहात सर्व जातिधर्मांच्या मुलांना प्रवेश दिला. महाराजांनी बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात राबविलेली ‘सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण योजना’ हे एक क्रांतिकारक पाऊल होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठीही त्यांनी सहकार्य केले. स्त्रीशिक्षणासाठी एक खास अधिकारीपद निर्माण करून ‘स्त्री शिक्षण अधीक्षिका’ म्हणून मिस लिटन यांची नेमणूक केली. अकाली वैधव्य आलेल्या आपल्या सुनेला, राणी इंदुमतीला शाहूंनी आपल्या देखरेखीखाली शिकवले. आपल्या सुनेने डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
पददलित व मागासलेल्या वर्गाची उन्नती हे शाहू महाराजांनी आपले जीवितकार्य मानले होते. अस्पृश्यांवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापुरात ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ या नावाचे त्यांनी एक वसतिगृह उभारले. त्यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. अस्पृश्यांना समाजात मानाने जगता यावे म्हणून त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. अस्पृश्यांना शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती अशा ठिकाणी समानतेने वागवावे असे आदेश त्यांनी दिले होते. अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या राज्यातील महार वतने रद्द केली आणि जमिनी अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने करून दिल्या. तसेच त्यांनी अस्पृश्यांसमवेत सहभोजने आयोजित केली. या कार्यामुळे बहुजन समाजाने त्यांना आपले दैवत मानले.
शाहू महाराजांचा समाजसुधारणेच्या बाबतीतील दृष्टिकोन अत्यंत पुरोगामी होता. जातिभेदाला त्यांचा तीव्र विरोध होता. जातिभेद नष्ट झाल्याशिवाय आपल्या समाजाची उन्नती होणार नाही, असे त्यांचे मत होते. जातिव्यवस्था घालवण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. देवदासींची प्रथा बंद करून स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या प्रवृत्तीस आळा घातला.
महात्मा फुले यांच्यानंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देऊन त्यांनी तिच्यात नवचैतन्य निर्माण केले. बहुजन समाजाची अस्मिता जागृत केली. सामाजिक चळवळीतील महात्मा फुले यांचे वारसदार शाहू हेच होते.
शाहूंच्या जीवनातील वेदोक्त प्रकरण खूप महत्त्वाचे ठरले. त्यामुळे महाराष्ट्रात ब्राह्मण व ब्राह्मणेतर हा जो वाद धुमसत होता, तो बाहेर पडला. महाराजांच्या पदरी असलेल्या एका पुरोहिताने म्हटले की, ‘आपण क्षत्रिय नसल्यामुळे आपणासाठी वैदिक मंत्र म्हणण्याची गरज नाही. शूद्रांना पुराणोक्त पद्धतीने अनुग्रह करावयाचा असतो.’ या पुरोहिताच्या उर्मटपणामुळे शाहूंना वाटले जर छत्रपती असूनही वेदोक्त मंत्रापासून व आदरापासून आपणाला वंचित ठेवले जाते, तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल? यानंतर शाहू ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळींकडे वळले. पुरोहित बहुजनांची पिळवणूक करतात. त्यामुळे आपल्याच लोकांकरवी लग्न, मुंज, श्रावणी हे विधी करावेत यासाठी त्यांनी धर्मविधी कसे पाळावेत याचे सशस्त्र शिक्षण देणारी शाळा काढली. ब्राह्मणेतर चळवळीचे लोण शाहूंनी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवले. बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या हिताचा ध्यास घेतला होता. आणि त्यासाठी कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी होती.
आपल्या राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठीही शाहूंनी अनेक कार्ये हाती घेतली. त्यांनी शाहू छत्रपती ‘स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’ची स्थापना केली. राधानगरी धरणाची उभारणी करून शेतीस प्रोत्साहन दिले. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे गहाण पडल्या होत्या. त्या सोडवण्यासाठी त्यांना कर्जे उपलब्ध करून दिली. शाहू महाराज आयुष्यभर आपल्या राज्यातील प्रजेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले. त्यांच्या सुधारणा क्रांतिकारक व मूलगामी स्वरूपाच्या होत्या.