Translate

सोमवार, २५ मे, २०१५

जॉन नॅश (वय ८६) यांचा पत्नी अलिसिया (वय ८३) यांच्यासह मोटार अपघातात मृत्यू

अर्थशास्त्राचे 'नोबेल' व गणितातील 'आबेल' असे दोन प्रतिष्ठेचे पुरस्कार पटकावणारे ख्यातनाम गणितज्ञ जॉन नॅश (वय ८६) यांचा पत्नी अलिसिया (वय ८३) यांच्यासह मोटार अपघातात मृत्यू झाला. अलीकडच्या काळातील सर्वात प्रज्ञावान गणितज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या जीवनावर 'ए ब्यूटीफुल माइंड' हा चित्रपट २००१ मध्ये साकारण्यात आला होता व त्यात रसेल क्रो यांनी नॅश यांची भूमिका केली होती. नुकतेच नॅश यांना गणितातील आबेल या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. प्रिन्स्टन विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ते टॅक्सीतून प्रवास करीत असताना ती अचानक रस्त्याच्या कडेला असलेल्या अडथळ्यांवर आदळली. हा आघात एवढा मोठा होता की, दोघे पती-पत्नी टॅक्सीतून बाहेर उडाले, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी सिटबेल्ट लावलेला नव्हता. 
प्रिन्स्टन विद्यापीठातच ते राहात होते, त्याच विद्यापीठात त्यांनी 'गेम थिअरी'वर विशेष काम केले होते. त्यांना १९९४ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते. नॅश यांना छिन्नमनस्कतेचा विकार (स्क्रीझोफ्रेनिया) होता व त्या आजाराशी झगडत त्यांनी मानसिक आरोग्याचे पुरस्कर्ते म्हणून काम केले. नॅश यांच्या निधनाने धक्का बसल्याचे अभिनेते रसेल क्रो यांनी म्हटले आहे, अतिशय सुंदर मैत्री संपली. सुंदर मने व सुंदर हृदये जुळली होती ती विदीर्ण झाली असेही त्यांनी सांगितले.
*****
जॉन यांना १९९४ मध्ये गणितातील धोरणात्मक निर्णय, कुशल डावपेच, नफा-तोटा या 'गेम्स थिअरी'वर व अर्थशास्त्रामधील योगदानाबद्दल नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले होते. विशेष म्हणजे ते अर्थशास्त्र हा विषय ओझरता शिकले होते. 
*****
पदवीसाठी त्यांनी अभियांत्रिकी हा विषय विवडला होता, पण त्यांनी रसायनशास्त्रातून पदवी घेतली होती. वीस वर्षे वयाचे असताना त्यांनी डॉक्टरेटसाठी संशोधन केले होते. त्यावेळी अर्थशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार दिला जात नव्हता. तब्बल ४४ वर्षांनंतर त्यांचा फक्त २७ पानांचा प्रबंध नोबेलसाठी विचारात घेतला गेला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा