मेडिकेशन नव्हे; मेडिटेशनची गरज
कम्प्युटरच्या अतिवापरामुळे जडणाऱ्या मानसिक व शारीरिक व्याधीची आपण माहिती घेत आहोत. बैठ्या जीवनशैलीमुळे जडणा-या मानेच्या व इत व्याधींची माहिती आपण या लेखातून घेऊया...
सतत खुर्चीत बसल्यामुळे मानेचे विकार होतात. आपल्या पाठीचे ३३ मणके असतात. पाठीच्या या मणक्यांना ताणणे, पीळ देणे, दाब देणे म्हणजेच नैसर्गिक हालचाली केल्यामुळे पाठीच्या मणक्यांची लवचिकता चांगली राहाते. पण आपली जीवनशैली बदलली, खुर्चीचा वापर वाढला. डायनिंग टेबल आले, वॉशिंग मशिन, कमोडची सुविधा आली, वाहाने आली आणि आपल्याला हे सर्व मिळालेच पाहिजे या महत्वाकांक्षेपोटी अपेक्षांचे ओझेही वाढले.
दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अनेकजण एसीमध्ये काम करतात. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा संबंधच नसतो. परिणामी डी-३ जीवनसत्वाची कमतरता भासते. त्याचप्रमाणे कॅल्शिअमचे प्रमाणही घटते. कॅल्शिअमचे प्रमाण घटल्यामुळे हाडे कमकूवत होतात. बदललेल्या जीवनशैलीमुळे एका समस्येतून दुसरी समस्या निर्माण होते. सतत एसीमध्ये बसल्यामुळे फारशी तहान लागत नाही. पाण्याच्या अभावामुळे मलावरोध होते. त्यामुळे मुळव्याध होण्याचा धोका संभवतो. अपूर्ण शौचामुळे पित्त वाढते. याचा झोपेवर परिणाम होऊन निद्रानाशाचा विकार जडू शकतो. पोट जर साफ नसेल तर मन साफ नसते ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे व्यायामाचा अभाव दुसरीकडे बहुतेकजण कँटीन कल्चरला बळी पडतात,. फास्ट फूड, जंक फूड, चहा-कॉफीचे वाढलेले प्रमाण यामुळे पित्त वाढते त्याचबरोबर स्थूलपणाही वाढण्याची शक्यता असते.
ही सर्व जीवनशैली ज्या कम्प्युटरमुळे लागलेली असते त्याच्या मुळाशी पुन्हा गेल्यावर असे लक्षात येते की, कम्प्युटर हा आज्ञाधारक नोकराप्रमाणे वागत असतो. आपल्या प्रत्येक आज्ञेवर तडक कारवाई होते. कम्प्युटरच्या अतिसहवासामुळे माणसांपासून काहीजण दुरावतात. ते ओबिडिअन्ट पीसी सिंड्रोमचे लक्ष्य होतात. प्रत्येक ठिकाणी या व्यक्ती हुकुमशहासारख्या वागू लागतात. काहीसे हेकेखोर, रागीट व चिडचिडे होतात.
या सगळ्यावर नियंत्रण मिळवणे निश्चति शक्य आहे. त्यासाठी दिवसातील चाळीस मिनिटे स्वतःसाठी काढा. व्यायाम किंवा योगासने करा. प्रत्येक वेळेस वाहान वापरण्याची सवय सोडून द्या. चालण्यावर भर द्या. दर तासाला एक ग्लास पाणी पिणे ही सवय जरी स्वतःला लावून घेतली तर त्याचा खूप फायदा होईल. मुख्य म्हणजे कम्प्युटरपासून दूर जाऊन माणसांमध्ये मिसळा. संयमाची आवश्यक्ता असलेले खेळा खेळा, शांत जागी बसून ध्यानधारणा करा. भावनांचे संतुलन करण्यासाठी मेडिकेशन (औषधे) नव्हे तर मेडिटेशनची (ध्यानधारणा) आवश्यक्ता आहे. अखेरीस कम्प्युटरचे फायदे मिळवताना त्याच्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्यास शिकणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा