माणिक सीताराम गोडघाटे असे त्यांचे पूर्ण नाव. ग्रेस यांचा १० मे रोजी जन्मदिन असतो. अगदी जुन्या पिढीतील मर्ढेकरांनंतरच्या नवकवींमध्ये त्यांची गणना होते. ‘भय इथले संपत नाही’ असे म्हणत साऱ्या महाराष्ट्राला कवितेच्या विश्वात घेऊन जाणाऱ्या ग्रेस यांना, त्यांच्या ‘वाऱ्याने हलते रान’ ह्या ललितलेख संग्रहासाठी २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला होता. त्यांच्या आयुष्यातील हा एकमेव राष्ट्रीय/ राज्यस्तरीय पुरस्कार ठरला.
सत्तरच्या दशकात पद्य लेखनाबरोबर गद्य लेखनाच्या विविध छटा दाखवणारा लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. वाचकाला ते मुक्त विहार करणाऱ्या जगात घेऊन जात असत. अगदी पाश्चात्त्य कविता, उर्दू शैली, शायरी, पंडिती काव्य, संत वाङ्मय यांचा प्रचंड अभ्यास असल्याप्रमाणे त्यांचे लिखाण असे. परंतु असे काही नसल्याचा ते वेळोवेळी खुलासा करत असत. त्यांचे बहरलेले भाषावैभव आणि ‘इदम् न मम’ची भावना, यामुळेच त्यांचे अनुकरण करणे अगदीच कठीण असल्याचे साहित्य विश्वातील मंडळीकडून आजही बोलले जाते. मी टाचणं टीपणं करणारा, दुसऱ्याने माझे अनुकरण करावे यासाठी इतरांना उपदेश करणारी व्यक्ती नाही असे म्हणत अगदी मुक्तछंद कवितांचा आनंद साहित्य विश्वाला देणारे कवी ग्रेस हे मूळचे नागपूरचे. ते पेशाने मराठीचे प्राध्यापक होते. १९६६ ते १९६८ या काळात नागपूरच्या धनवटे नॅशनल कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर ते नागपूरच्याच वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे अध्यापन करू लागले. प्राध्यापक म्हणून १९९७ मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर २००४ पर्यंत त्यांनी नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापिठात मराठी विभागात व ललित कला विभागात संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य केले. तसेच या कालावधीमध्ये त्यांनी दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समिती आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य म्हणून देखील आपली मातृभाषा समाजमनावर बिंबवण्याचा प्रयत्न आपल्या शैलीतून सुरूच ठेवला. ‘युगवाणी’ या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राचे १९७१ ते १९७४ या काळात त्यांनी संपादन केले. मुंबईतील ‘संदर्भ’ या लेखक केंद्राचेही ते काही काळ संपादक होते. हे सारे सांगण्यामागचा उद्देश असा की, आपल्या कलेचे देणे लागणारा हा कवी सदैव कार्य तप्तरतेने समाजाची सामाजिक बांधिलकी जपत, श्रोतृवर्गास आपल्या लिखाणाच्या बळावर मंत्रमुग्ध करणारा भाषप्रभू म्हणून लिखाण करत राहिला, अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत.
असे म्हणतात की, ‘जे न देखे रवि, ते देखे कवी.’ कवी ग्रेस यांनी ‘ग्रेस’ असे टोपण नाव घेऊन कविता लिहिण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांचे प्रकाशक रामदास भटकळ यांनी एक किस्सा सांगितल्याचे येथे आवर्जून मांडावेसे वाटते. रामदास भटकळ यांनी संगितले, की त्यावेळी ग्रेस म्हणजे स्त्री की पुरुष आहे हे नक्की माहीत नसताना देखील एक नवकवी लाभला आहे, जो आपल्या शब्दांनी सर्वांना वेगळ्या विश्वात घेऊन जातो म्हणून लोक त्यांच्या कविता ऐकत, वाचत, पुटपुटत असत. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्त्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी ग्रेस हे नाव धारण केले आणि त्यापुढे ते ग्रेस या टोपण नावाने कविता करू लागले. तसेच वैशिष्ट्यपूर्ण अर्पणपत्रिका आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये काही ओळी छापण्याची पद्धत या दोन खास गोष्टी संध्याकाळच्या कविता ह्या १९६७ साली प्रकाशित केलेल्या आपल्या पहिल्या काव्यसंग्रहात त्यांनी वाचकांना सादर केल्या, आणि ती परंपरा त्यांनी पुढेही चालू ठेवली. आपले पहिले पुस्तक त्यांनी रामदास भटकळ यांच्यामार्फत इन्ग्रिड बर्गमनपर्यंत पोचवले.
‘जो अंदर से घबराया होता है, वो आवाज चढाके ही बोलता है’, असे म्हणून सर्वांना आपल्या ललितसाहित्याची ओळख मराठी, हिन्दी, उर्दू, इंग्रजी अशा भाषांमध्ये चौफेर फटकेबाजी करत कवी ग्रेस यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक ललित लेखसंग्रह आणि कवितासंग्रह यांच्या माध्यमातून करून दिली. पॉप्युलर प्रकाशनाने त्यांची ‘ओल्या वेळूची बासरी’, ‘कावळे उडाले स्वामी’, ‘ग्रेसच्या कविता-धुक्यातून प्रकाशाकडे’, ‘चंद्रमाधवीचे प्रदेश’, ‘चर्चबेल’, ‘मितवा’, ‘वाऱ्याने हलते रान’, ‘संध्याकाळच्या कविता’ सहित अनेक लिखाणे प्रसिद्ध केली आहेत. दूरदर्शनवरून प्रसारित झालेल्या ‘महाश्वेता’ या मालिकेत ग्रेस यांच्या ‘निष्पर्ण तरूंची राई’ (चंद्रमाधवीचे प्रदेश) या कवितेचा शीर्षकगीत म्हणून (भय इथले संपत नाही) वापर करण्यात आला. लतादीदींच्या आवाजातील या कवितेने श्रोता वर्ग अजूनही मंत्रमुग्ध होतो.
प्रेमी युगुलांना प्रेम कवितांच्या माध्यमातून चिरकाल टिकेल असे नाते आपल्या शब्द भावनांमधून सांगणारा हा कवी फक्त भाषाकवी नसून भावनाकवी होता आणि अशा भावना त्यांनी आपल्या अनेक कवितांमधून व्यक्त केल्या. अगदी कॅन्सरसारख्या आजारामुळे मृत्यू येणार हे माहीत असताना देखील, आयुष्य संपेपर्यंत ते लिखाण करत राहिले. त्यामुळे जरी कवी ग्रेस आज आपल्यामध्ये नसले तरी त्यांचे लेखन मराठी भाषेला समृद्ध करत आपल्या सर्वांसाठी आणि भविष्यातील रसिकांसाठीही उपलब्ध आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा