Translate

शुक्रवार, १५ मे, २०१५

ऊंची वाढवणे.......

साधारणतः पौगंडावस्था पूर्ण होईपर्यंत उंचीमध्ये वाढ होत असते. म्हणजे मुलींमध्ये 15-16 वर्षांनंतर व मुलांमध्ये 18-20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. मुलींमध्ये पाळी सुरू झाली की नंतर उंचीमध्ये सहसा फारसा फरक पडत नाही. अर्थातच उंची वाढवण्यासाठी आधीच प्रयत्न करणे भाग असते. वास्तविक उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रोवले जाते. त्यामुळे गर्भधारणेच्या आधीपासून स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेले असेल, तर बाळाचे वजन व उंची व्यवस्थित वाढते, असा अनुभव आहे.
व्यक्‍तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे उंची. अर्थात शरीरबांधा आणि उंची यांचा समतोल असला, तरच उंची शोभून दिसते. शरीर सात धातूंपासून बनलेले आहे, हे आपण जाणतो. यातील अस्थी धातूवर म्हणजेच हाडांवर उंची अवलंबून असते व ती शोभून दिसण्यासाठी मांस-मेद धातूंना व्यवस्थित पोषण मिळण्याकडेही लक्ष ठेवावे लागते.
प्रकृतिपरीक्षणामध्ये उंची हा मुद्दा महत्त्वाचा असतो. वातप्रकृतीच्या व्यक्‍ती सहसा एक तर फार उंच व बारीक तरी असतात किंवा फार बुटक्‍या व अनियमित शरीरठेवणीच्या असतात. पित्तप्रकृतीच्या व्यक्‍ती साधारण मध्यम उंचीच्या व मध्यम बांध्याच्या असतात, तर कफप्रकृतीच्या व्यक्‍ती धिप्पाड, उंचीच्या मानाने वजन जरा जास्ती असणाऱ्या असतात. उंचीवर प्रकृतीइतकाच आनुवंशिकतेचाही प्रभाव असतो, तसेच लहानपणापासून धातुपोषणाकडे लक्ष देण्याचाही उंची वाढण्यावर परिणाम होत असतो.
साधारणतः पौगंडावस्था पूर्ण होईपर्यंत उंचीमध्ये वाढ होत असते. म्हणजे मुलींमध्ये 15-16 वर्षांनंतर व मुलांमध्ये 18-20 वर्षांनंतर उंची वाढण्याची प्रक्रिया थांबते. मुलींमध्ये पाळी सुरू झाली की नंतर उंचीमध्ये सहसा फारसा फरक पडत नाही.
अर्थातच उंची वाढवण्यासाठी आधीच प्रयत्न करणे भाग असते. वास्तविक उंचीचे मूळ हे गर्भावस्थेत रोवले जाते. त्यामुळे गर्भधारणेच्या आधीपासून स्त्री-पुरुषांनी धातुपोषणाकडे व्यवस्थित लक्ष दिलेले असेल, तर बाळाचे वजन व उंची व्यवस्थित वाढते असा अनुभव आहे.
गर्भधारणेच्या काळात गर्भवतीने लोह, हिमोग्लोबिन, कॅल्शियम योग्य मात्रेमध्ये व नैसर्गिक स्वरूपात सेवन करणेही उंचीच्या दृष्टीने महत्त्वाचे होय. रासायनिक द्रव्यांपासून बनविलेली औषधे आतमध्ये हाडांपर्यंत तसेच हाडांचे पोषण करणाऱ्या मज्जेपर्यंत पोचू शकतातच असे नाही, त्यापेक्षा नैसर्गिक अन्न व औषधातून ही तत्त्वे शरीरात सहजपणे स्वीकारली जातात व त्यामुळे उंची नीट वाढण्यास, एकंदरच सर्व शरीराचे पोषण होण्यास मदत मिळते.
उंचीला पूरक उपाय 
जन्मानंतरही वाढत्या वयात आहारात दूध, घरी बनवलेले साजूक तूप, लोणी, पंचामृत, गहू, खारीक, खसखस, बाभळीच्या डिंकाची लाही या सर्व गोष्टी असल्या तर त्यामुळे उंची नीट वाढण्यास मदत मिळू शकते. उंचीला पूरक असे साधे, पण प्रभावी उपाय पुढीलप्रमाणे सांगता येतील,


•सकाळी व संध्याकाळी कपभर गरम दूध खारकेचे चूर्ण टाकून घेणे. तसेच सर्व धातुपोषक औषधद्रव्यांपासून तयार केलेला "शतावरी कल्प' किंवा "संतुलन चैतन्य कल्प' दुधात टाकून घेणे. 

•रोज सकाळी एक-दोन चमचे घरी बनवलेले ताजे लोणी साखर टाकून घेणे. 

•आहारात रव्याची खीर, गव्हाच्या पिठाचा शिरा, गव्हाची खीर यांचा अधूनमधून समावेश असणे. 

•डिंकाची लाही, खारीक, बदाम वगैरे शक्तिवर्धक व हाडांना पोषक द्रव्यांपासून तयार केलेला डिंकाचा लाडू किंवा अश्‍वगंधा, मुसळी वगैरे घटक असलेले "मॅरोसॅन' हे रसायन सेवन करावे. 

•वात संतुलन करणाऱ्या व धातुपोषण करणाऱ्या औषधांनी सिद्ध तेलाचा अभ्यंग करणे. 

•प्रकृतीचा विचार करून दिलेल्या मोती भस्म, प्रवाळ भस्म, शौक्तिक भस्म वगैरे औषधांचाही वयाच्या मर्यादेत उंची वाढवण्यासाठी चांगला उपयोग होताना दिसतो, यासाठी तज्ज्ञ वैद्यांचा सल्ला अवश्‍य घ्यावा.


हाडे करा बळकट 
तारुण्यावस्थेत पोचेपर्यंत जी उंची वाढते, ती नंतर वाढत्या वयानुसार म्हणजे साधारणतः चाळिशीनंतर थोडीशी कमी होऊ लागते. याचे कारण असते वयानुसार हाडांची थोड्या प्रमाणात झीज होणे, विशेषतः पाठीचे मणके झिजणे. त्यामुळे पस्तिशीनंतर हाडांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवले, पाठीच्या कण्याला कुंडलिनी तेलासारखे तेल लावण्याची सवय ठेवली तर वयानुसार उंची घटण्याचे प्रमाण कमी करता येते.

लहानपणापासून ताठ बसण्याची, ताठ उभे राहण्याची सवय सुद्धा उंचीसाठी पूरक असते. लहानपणापासून योगासने, सूर्यनमस्कारांचा सराव केल्याने सुद्धा शरीराच्या एकंदर परिपूर्ण वाढीला पाठबळ मिळते, उंची वाढण्यास कारणीभूत संप्रेरक स्रवण्यास उत्तेजना मिळू शकते. 
दोरीवरच्या उंच उड्या, सिंगल बार, डबल बार म्हणजेच लटकण्याचे व्यायाम उंची वाढण्यास उपयोगी असतात. याखेरीज उंची वाढण्यासाठी सहायक म्हणून योगासने व संतुलन क्रियायोगापैकी पुढील क्रिया सुचवता येतील,


स्थैर्य 
स्थैर्य क्रियेच्या अभ्यासाने मानेला व पाठीला व्यायाम मिळतो व मेरुदंड लवचिक होतो, पिच्युटरी ग्रंथी कार्यान्वित होते, पचनक्रियेत सुधारणा होते. तसेच दीर्घ व लांब श्‍वासोच्छ्वास करायची सवय लागते. या क्रियेच्या अभ्यासाने सजगता वाढते व व्यक्तीला स्थैर्य मिळते.


•ही क्रिया जास्तीत जास्ती सात वेळा करावी. 

•दोन्ही टाचांमध्ये सुमारे 15-20 सें.मी. तर दोन्ही चवड्यांमध्ये 25-30 सें.मी. अंतर ठेवून ताठ उभे राहावे. हात शरीरालगत सरळ ठेवावेत व हाताच्या मुठी वळलेल्या असाव्यात. 

•पाय जमिनीवर घट्ट रोवावेत. 

•श्‍वास आत घेत, दोन्ही पायांच्या टाचा वर उचलून पायांच्या चवड्यांवर उभे राहावे. टाळूला दोर बांधून आपल्याला जणू कोणी वर ओढत आहे, अशी कल्पना करावी. 

•पोट आत व वर ओढून श्‍वास आत कोंडून धरावा. या वेळी लक्ष सहस्राधार चक्रावर केंद्रित करावे. शक्‍य तितका वेळ या स्थितीत राहावे. 

•श्‍वास हळू हळू बाहेर सोडत, पोटावरचा ताण कमी करून टाचा जमिनीला टेकवत खाली यावे.


विस्तारण 
या क्रियेच्या अभ्यासाने पाठीचा कणा सरळ व्हायला मदत मिळते. कंबरेच्या भागाला बळकटी येते, वायू सहजपणे सरायला मदत होते, तसेच पचनशक्ती सुधारते, थायरॉईड ग्रंथीच्या कार्यावर नियंत्रण येते व फुप्फुसांमधे शक्तिसंचार होतो. मेंदूला उत्तेजना मिळते, संवेदनशीलता वाढते, विस्तार व बदल या दोन मूलभूत गोष्टींची पूर्तता होते.

ही क्रिया पुढीलप्रमाणे करता येते-
•वज्रासनात बसावे, पुढे वाकून पोटावर झोपावे. दंड जमिनीला लंब ठेवून कोपरे जमिनीला टेकवावेत, तर्जनी कानाच्या मागे व उरलेली तीन बोटे गालावर ठेवून दोन्ही हात असे ठेवावेत की हनुवटी तळव्यांना चिकटलेली नसेल. दृष्टीसमोर असावी. स्नायूवर ताण येऊ न देता डोळे वटारल्यासारखे मोठे करावे. 
•तोंडाचा मोठा आ करावा. या वेळी अजगर जणू आपले भक्ष्य आकर्षून घेत आहे अशी कल्पना करावी. 
•सावकाशपणे एका संथ लयीत श्‍वास घ्यावा व सोडावा आणि असे करताना श्‍वास आत घेतल्याचा व बाहेर सोडल्याचा फुसकारल्यासारखा आवाज यावा, अशी 10-12 (सुमारे एक मिनिट) आवर्तने करावीत. 
•श्‍वासोच्छ्वास पूर्ण झाल्यावर कुठल्या बाजूच्या नाकपुडीने श्‍वास चालू आहे हे पाहावे. 
•ज्या बाजूच्या नाकपुडीने श्‍वास चालू आहे ती नाकपुडी वरच्या बाजूला येईल अशा तऱ्हेने डोके जमिनीवर ठेवावे. हात कोपऱ्यातून काटकोनात वाकवून डोक्‍याच्या दोन्ही बाजूला ठेवावे, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले असावे, पाय शिथिल असावेत. 
•डोळे बंद करून शरीरातील सर्व अवयवात प्राणशक्तीचा संचार होत आहे, अशी कल्पना करावी व हळूहळू सर्व शरीर शिथिल करावे. या वेळी आपल्या शरीराचा विस्तार झाला आहे असा अनुभव येतो. 
•थोड्या वेळाने डोळे उघडून वज्रासनात यावे व नंतर उभे राहावे.


धनुरासन 
या आसनाच्या अभ्यासाने पाठीच्या कण्याची व पाठीच्या स्नायूंची लवचिकता वाढते व मज्जातंतूंना बळकटी मिळते. भुजंगासन व शलभासन या दोन्ही आसनांचा यामुळे लाभ होतो.

•पोटावर झोपावे, पाय एकमेकाला जुळलेले असावेत. हात शरीरालगत सरळ ठेवावेत, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेला असावेत. कपाळ जमिनीला टेकलेले असावे. 
•पाय गुडघ्यात वाकवून पायांच्या टाचा नितंबाजवळ आणाव्यात. 
•दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर ठेवून हातांनी पायाचे घोटे पकडावेत. घोटे पकडताना हाताचे अंगठे आतल्या बाजूला व इतर चार बोटे बाहेरच्या बाजूला असावीत. तसेच दोन्ही पायांचे अंगठे एकमेकांना टेकलेले असावेत. 
•पाय व डोके हळूहळू जास्तीत जास्ती वर उचलावे, हात कोपरात सरळ असावेत. 
•स्थितीत संपूर्ण शरीराचा भार नाभीभोवतीच्या भागावर येईल. आपल्या क्षमतेनुसार या स्थितीत राहावे. 
•हातांनी पकडलेले घोटे साडून दोन्ही हात, छाती व डोके जमिनीला टेकवून पूर्वस्थितीला यावे. पोटावर थोडा वेळ आरामात झोपून राहावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा