संस्थानाधिपती पददलितांचे कैवारी राजर्षी शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०३ वी पुण्यतिथी आहे. एक संस्थानाधिपती यापेक्षा महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे महान नेते, हीच त्यांची खरी ओळख आहे. येथील बहुजन समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे बहुजन समाजाने त्यांना आपले दैवतच मानले आहे.
राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. त्यांचे जन्मठिकाण कोल्हापूर येथील राजवाड्यात असून हे स्थळ आता विश्रामधाम म्हणून ओळखले जाते. त्यांचे मूळ नाव यशवंतराव असे होते. वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे, तर आईचे नाव राधाबाईसाहेब असे होते. कोल्हापूर संस्थानचे राजे चौथे शिवाजी यांना इंग्रजांनी वेडसर ठरवून अहमदनगर जिल्ह्यात कैदेत ठेवले होते. तेथेच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्यांना औरसपुत्र नसल्याने त्यांच्या पत्नी आनंदीबाईनी शाहू महाराजांना दत्तक घेतले. शाहू महाराजांचे प्रारंभीचे शिक्षण खासगी शिक्षकामार्फत झाले. पुढील राजकुमारांसाठी असलेल्या कॉलेजमध्ये पाठविण्यात आले. परतल्यावर त्यांनी युरोपियन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी, भाषा इ. शिक्षण घेतले. संस्कृत भाषेचेही त्यांनी अध्ययन केले.
शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची अधिकारसूत्रे आपल्या हाती घेतल्यानंतर संस्थानात दौरा काढून संस्थानाची राज्यव्यवस्था व प्रजेची स्थिती यांची जातीने पाहणी केली. यावेळी आपल्या प्रजेची हलाखीची स्थिती पाहून आपल्या हाती आलेल्या सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करण्याचा त्यांनी मनोमन निश्चय केला व पुढे तो आयुष्यभर प्रत्यक्षातही उतरविला.
शाहू महाराजांच्या काळात बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला होता. शिक्षण ही फक्त वरिष्ठ वर्गाचीच मक्तेदारी समजली जात होती. बहुजन समाजाच्या मागासलेपणाचे एक कारण त्यांच्यातील शिक्षणाचा अभाव हे होय, ही गोष्ट शाहू महाराजांनी ओळखली. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार घडवून आणण्याच्या कार्याला त्यांनी प्राधान्य दिले. महाराजांनी विद्यार्थ्यांची गरज ओळखून त्यांच्यासाठी वसतिगृहांची स्थापना केली. कारण त्या काळी शिक्षणाच्या सोयी फक्त शहरातच उपलब्ध होत्या. ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोक अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत होते. आपल्या मुलांना शिक्षणासाठी शहराच्या ठिकाणी पाठविण्याची कुवत त्यांच्यात नव्हती त्यामुळे गोरगरीब मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी शहरात त्यांच्या राहण्याची अल्पखर्चात व्यवस्था व्हावी म्हणून महाराजांनी वसतिगृहांची स्थापना केली. वसतिगृहात सर्व जातिधर्मांच्या मुलांना प्रवेश दिला. महाराजांनी बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात राबविलेली ‘सक्तीचे व मोफत प्राथमिक शिक्षण योजना’ हे एक क्रांतिकारक पाऊल होते. स्त्रियांच्या शिक्षणासाठीही त्यांनी सहकार्य केले. स्त्रीशिक्षणासाठी एक खास अधिकारीपद निर्माण करून ‘स्त्री शिक्षण अधीक्षिका’ म्हणून मिस लिटन यांची नेमणूक केली. अकाली वैधव्य आलेल्या आपल्या सुनेला, राणी इंदुमतीला शाहूंनी आपल्या देखरेखीखाली शिकवले. आपल्या सुनेने डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
पददलित व मागासलेल्या वर्गाची उन्नती हे शाहू महाराजांनी आपले जीवितकार्य मानले होते. अस्पृश्यांवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कोल्हापुरात ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ या नावाचे त्यांनी एक वसतिगृह उभारले. त्यांनी अस्पृश्यांना स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन दिले. अस्पृश्यांना समाजात मानाने जगता यावे म्हणून त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. अस्पृश्यांना शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती अशा ठिकाणी समानतेने वागवावे असे आदेश त्यांनी दिले होते. अस्पृश्यांची गुलामगिरी नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपल्या राज्यातील महार वतने रद्द केली आणि जमिनी अस्पृश्यांच्या नावावर रयतवारीने करून दिल्या. तसेच त्यांनी अस्पृश्यांसमवेत सहभोजने आयोजित केली. या कार्यामुळे बहुजन समाजाने त्यांना आपले दैवत मानले.
शाहू महाराजांचा समाजसुधारणेच्या बाबतीतील दृष्टिकोन अत्यंत पुरोगामी होता. जातिभेदाला त्यांचा तीव्र विरोध होता. जातिभेद नष्ट झाल्याशिवाय आपल्या समाजाची उन्नती होणार नाही, असे त्यांचे मत होते. जातिव्यवस्था घालवण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. देवदासींची प्रथा बंद करून स्त्रियांना क्रूरपणे वागवण्याच्या प्रवृत्तीस आळा घातला.
महात्मा फुले यांच्यानंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देऊन त्यांनी तिच्यात नवचैतन्य निर्माण केले. बहुजन समाजाची अस्मिता जागृत केली. सामाजिक चळवळीतील महात्मा फुले यांचे वारसदार शाहू हेच होते.
शाहूंच्या जीवनातील वेदोक्त प्रकरण खूप महत्त्वाचे ठरले. त्यामुळे महाराष्ट्रात ब्राह्मण व ब्राह्मणेतर हा जो वाद धुमसत होता, तो बाहेर पडला. महाराजांच्या पदरी असलेल्या एका पुरोहिताने म्हटले की, ‘आपण क्षत्रिय नसल्यामुळे आपणासाठी वैदिक मंत्र म्हणण्याची गरज नाही. शूद्रांना पुराणोक्त पद्धतीने अनुग्रह करावयाचा असतो.’ या पुरोहिताच्या उर्मटपणामुळे शाहूंना वाटले जर छत्रपती असूनही वेदोक्त मंत्रापासून व आदरापासून आपणाला वंचित ठेवले जाते, तर सामान्य माणसाची काय अवस्था असेल? यानंतर शाहू ब्राह्मण-ब्राह्मणेतर चळवळींकडे वळले. पुरोहित बहुजनांची पिळवणूक करतात. त्यामुळे आपल्याच लोकांकरवी लग्न, मुंज, श्रावणी हे विधी करावेत यासाठी त्यांनी धर्मविधी कसे पाळावेत याचे सशस्त्र शिक्षण देणारी शाळा काढली. ब्राह्मणेतर चळवळीचे लोण शाहूंनी खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचवले. बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन या संस्थेची स्थापना केली. शाहू महाराजांनी बहुजन समाजाच्या हिताचा ध्यास घेतला होता. आणि त्यासाठी कोणताही त्याग करण्याची त्यांची तयारी होती.
आपल्या राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठीही शाहूंनी अनेक कार्ये हाती घेतली. त्यांनी शाहू छत्रपती ‘स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’ची स्थापना केली. राधानगरी धरणाची उभारणी करून शेतीस प्रोत्साहन दिले. दुष्काळाच्या काळात शेतकऱ्यांच्या जमिनी सावकारांकडे गहाण पडल्या होत्या. त्या सोडवण्यासाठी त्यांना कर्जे उपलब्ध करून दिली. शाहू महाराज आयुष्यभर आपल्या राज्यातील प्रजेच्या विकासासाठी प्रयत्नशील राहिले. त्यांच्या सुधारणा क्रांतिकारक व मूलगामी स्वरूपाच्या होत्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा