सध्या जगभरात अँड्रॉईड फोन युझर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. मात्र त्याचवेळी हॅकर्सची संख्याही वाढतानाच दिसत आहे.
2014 पर्यंत जगभरात विक्री झालेल्या मोबाईल्सपैकी 80 टक्के मोबाईल अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिमचे होते असं समोर आलं आहे. जगभरात अँड्रॉईड मोबाईल्सना ग्राहकांची पसंती असतानाच, हॅकर्सही या संख्येने मोठ्या असलेल्या युझर्सना गंडा घालण्याच्या तयारीत आहेत.
तुम्हीही अँड्रॉईड फोन वापरत असाल, तर तुमचा फोन आणि डेटा हॅकर्सपासून कसा सुरक्षित ठेवायचा? त्याबाबत काही टिप्स
हॅकर्सची अँड्रॉईडलाच पसंती का?
रशियाच्या एका सायबर सुरक्षा कंपनीच्या मते, हॅकर्स हॅकिंगबाबत विचार करताना तीन बाबींकडे लक्ष देतो
1 – सर्वाधिक मोबाईल युझर्स कोणती ऑपरेटिंग सिस्टिम (ओएस) वापरतात
2 – ओएसच्या प्रोग्रामबाबत दस्ताऐवज उपलब्ध आहेत की नाही.
3 - यामध्ये काही त्रुटी, कमतरता आहे की नाही.
अँड्रॉईड मोबाईलमध्ये सर्वाधिक अॅप डाऊनलोड आणि इंस्टॉल करता येतात. त्यामुळेही हॅकर्सनी अँड्रॉईड मोबाईल्सना लक्ष्य केलं आहे.
काळजीचं कारण का?
बँक अकाऊंटमधून पैसे चोरी, पर्सनल डेटा, फोटो, व्हिडीओ यांची चोरी करण्याचा हॅकर्सचा हेतू असतो. त्यामुळेच सायबर सुरक्षा तज्ज्ञांसाठी ही डोकीदुखी ठरली आहे.
कॅमेरा आणि माईकद्वारेही हॅकिंग?
कॅमेरा, माईक यासारख्या फिचर्सद्वारेही अँड्रॉईड मोबाईल हॅक केले जाऊ शकतात, असं मोबाईल सुरक्षा कंपनी कूलस्पॅनचे सीईओ ग्रेग स्मिथ यांनी 2013 मध्ये फोर्ब्सला सांगितलं होतं. चिंतेची बाब म्हणजे यासारखे हॅकिंग टूल सहजासहजी ऑनलाईन उपलब्ध आहेत.
काही सॉफ्टवेअर जे अॅपसारखी दिसतात, त्याद्वारे अनेक अँड्रॉईड युझर्सना गंडा घालण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे असे सॉफ्टवेअर्सही मोफत उपलब्ध आहेत.
कोणत्या अॅपचा धोका?
तुमचे SMS वाचणारे, तुमच्या खर्चाच्या हप्त्यांचे SMS पाठवणारे अॅप धोकादायक आहेत. त्यांची संख्या सध्या वाढत आहे. मात्र आता हॅकर्स तुमच्या फोनमधील बँक पासवर्ड चोरणारे बँकिंग अॅपही बनवत असल्याचं समोर आलं आहे.
हॅकर्स हे युझर्सना व्हायरसवाले अॅप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळेच हॅकर्सचं काम सोपं होतं.
फ्री आणि अश्लिल व्हिडीओ अॅप
प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या फ्री आणि अश्लिल व्हिडीओसारख्या अॅपद्वारे हॅकर्स युझर्सना सहज गंडवू शकतात. यासारखे अॅप हे हॅकिंगसाठीच बनवले जात असल्याचंही सायबर सुरक्षा तज्ज्ञ सांगतात.
काय काळजी घ्यावी?
1. ‘काहीही’ डाऊनलोड करू नका
तुमच्या मोबाईलवरून कोणतंही अॅप डाऊनलोड करताना योग्य कंपनी आणि वेबसाईटवरूनच डाऊन करा. काही विशेष अॅप लाँच झाल्यानंतर आपल्यापैकी बहुतेकजण ते अॅप त्वरीत डाऊनलोड करतात. मात्र काही वेळा हॅकर्सनी रचलेली ती चाल असते. त्या अॅपद्वारे तुमचा फोन आणखी कोणी व्यक्ती वापरत असल्याचं तुम्हाला माहितही होणार नाही.
2. परमिशन/ परवानगी पेज लक्ष देऊन वाचा
कोणतंही अॅप डाऊनलोड करताना आपण बेधडक YES म्हणून अॅक्सेप्ट करतो. मात्र त्याआधी अॅपबाबत देण्यात आलेली पॉलिसी आपण अजिबात वाचत नाही.
काही अॅप तुमचं फोनबुक वाचण्याची परवानगी मागतं, मात्र आपण ते न वाचता YES म्हणतो, आणि तिथे फसवणूक होते. त्यामुळे असे अॅप इन्स्टॉल करू नका.
3. बॅकअप जरूर ठेवा
तुमच्या फोनमधील डाटाची जबाबदारी तुमचीच असते. त्यामुळे हा डाटा सांभाळून ठेवणे गरजेचं आहे. म्हणूनच या डाटाचा बॅकअप घेऊन ठेवा.
4. गुगल –फ्री अँड्रॉईडबाबत विचार करा
अँड्रॉईड फोन खरेदी केल्यानंतर ते गुगलसोबत करारबद्ध होतात, याची माहिती ग्राहकाला नसते.
कोणतंही त्रयस्त अॅप इन्स्टॉल न करणं हे ग्राहक/युझर्सच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. मात्र थर्ड पार्टी अॅप/ त्रयस्त अॅप इन्स्टॉल करणे अँड्रॅईडमध्ये सहज सोपं असतं.
5. अपडेट करत राहा
कोणतंही एक सॉफ्टवेअर, अॅप हे एका दिवसात तयार होत नाही. त्याची सातत्याने चाचणी घ्यावी लागते. त्यामध्ये अनेकवेळा त्रुटीही असण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्ही एखादं अॅप इन्स्टॉल केलं असेल, आणि काही काळानंतर कंपनीला त्या अॅपबाबत त्रुटी आढळल्यास, कंपनी अपडेट जारी करतं.
हे अपडेट करणं आवश्यक आहे. अॅप अपडेट करणं मोफत आहे.
अँड्रॉईडचे विविध व्हर्जन पाहता, जुन्या ओएसच्या तुलनेत गुगलचं सध्याचं 5.0 लॉलीपॉप सर्वात सुरक्षित आहे. काही अँड्रॉईड कंपन्या अपडेट जारी करत नाहीत. त्यामुळे युझर्सना धोका असतो.
6. इन्क्रिप्शनचा वापर करा
तुमच्या फोनवर पूर्ण डिव्हाईस इन्क्रिप्शनचा वापर करा. सध्याच लाँच झालेल्या सॅमसंग, एलजी, एचटीसी, अॅपल आणि ब्लॅकबेरी स्मार्टफोनमध्ये (अॅपल आणि ब्लॅकबेरी अँड्रॉईडचा वापर करत नाही) याप्रकारची सुविधा आहे.
जर तुमच्या अँड्रॉईड फोनमध्ये अशी सुविधा नसेल तर इन्क्रिप्शन अॅपचा वापर करा.
7. असुरक्षित वाय-फायपासून सावधान
सध्या अनेक ठिकाणी वाय-फाय नेटवर्क उपलब्ध आहे. मात्र म्हणून त्याचा बेधडक वापर करू नका. त्याच्या सुरक्षिततेबाबतची योग्य माहिती तुम्हाला नसेल, तर फुकटचं वाय-फाय वापरू नका.
तसंच बँक अकाऊंट नंबर, क्रेडिट/डेबिट कार्ड पासवर्ड याबाबतची माहिती सार्वजनिक वाय-फायवर शेअर करू नका.
8. अँटी व्हायरस आवश्य ठेवा
इंटरनेटचा वापर करताना फोन सुरक्षित ठेवण्यासाठी अँटी व्हायरस असणं आवश्यक आहे, याबाबतची माहिती सर्वांनाच आहे. हा अँटी व्हायरस वेळो-वेळी अपडेट करणंही तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे नव्या धोक्यांना सामोरं जाण्यास तुमचा अँटी व्हायरस सज्ज असेल.