कोलंबिया युनिवर्सिटीतील संशोधकांनी एक स्मार्टफोन डोंगल विकसित केलंय. या डोंगलच्या सहाय्याने अगदी 15 मिनिटात एड्स/एचआयव्ही टेस्ट करता येणार आहे. अमेरिकेतील कोलंबिया स्कूल ऑफ इंजिनीयरिंग अँड अप्लाईड सायन्समधील जैववैद्यकीय अभियांत्रिकीचे सहयोगी प्राध्यापक सॅम्युएल सिया यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या टीमने हे स्मार्टफोनला बसवता येईल असं डोंगल विकसित केलंय. प्रयोगशाळेत करायवची रक्ताची चाचणी आता स्मार्टफोनच्या सहाय्याने करता येणं या डोंगलमुळे शक्य झालंय.
वैद्यकीय निदानासाठी रक्ताच्या अनेक चाचण्या कराव्या लागतात, मात्र या उपकरणामुळे सर्वात महत्वाची रक्ताची चाचणी स्मार्टफोनच्या सहाय्याने करता येणार आहे, ती म्हणजे एलिझा टेस्ट... एन्झिम लिंक्ड इम्युनोसोर्बेंट अॅसे म्हणजे एलिसा असं एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे की नाही हे तपासणाऱ्या टेस्टला म्हणतात.
कोलंबिया युनिवर्सिटीतील सॅम्युअल सिया यांच्या टीमने बनवलेल्या डोंगलला रक्ताच्या चाचणीसाठी आवश्यक पॉवरही स्मार्टफोनमधूनच मिळणार आहे. तसंच या स्मार्टफोनचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एचआयव्हीचा संसर्ग तपासण्यासाठी आवश्यक त्रिस्तरीय चाचणी एकाच वेळी करता येणं शक्य होणार आहे. सध्या त्यासाठी तीन वेगवेगळ्या चाचण्या कराव्या लागतात.
रवांडामधील तब्बल 96 जणांची रक्तचाचणी करून या स्मार्टफोन डोंगलची उपयोगिता तपासण्यात आल्याचंही सॅम्युएल सिया यांनी म्हटलंय. म्हणजे ज्या क्लिष्ट चाचण्यांसाठी पैसा आणि वेळ खर्च करून तंत्रसज्ज प्रयोगशाळेत जावं लागतं, त्यासाठी तुम्हाला फक्त स्वतःचा स्मार्टफोन जवळ बाळगावा लागेल. या सर्व टेस्ट एका स्मार्टफोनच्या सहाय्याने करण्याची किमया जगात पहिल्यांदाच साध्य झालीय.
स्मार्टफोनला फिट बसणाऱ्या या ब्लड टेस्ट डोंगलची किंमत फक्त 34 डॉलर्स म्हणजे भारतीय रूपयांमध्ये जेमतेम दोन ते अडीच हजारांच्या घरात आहे. सध्या एचआयव्हीच्या संसर्ग तपासण्यासाठी कराव्या लागणाऱ्या एलिझा टेस्टसाठी लागणारी उपकरणे किंवा त्यासाठीच्या प्रयोगशाळा उभारणीचा खर्च हा किमान 11 ते 12 लाखांच्या घरात आहे. त्यातुलनेत फक्त मोबाईल फोनवर बसवण्याचं हे उपकरण कितीतरी स्वस्त आहे.
सॅम्युअल सिया आणि त्यांच्या टीमने एचआयव्ही संसर्गाच्या टेस्टिंगसाठी बनवलेल्या अतिशय पोर्टेबल उपकरणाविषयी जर्नल सायन्स ट्रान्सलेशनल मेडिसीनमध्ये शोध निबंध प्रकाशित करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा