साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च समजला जाणार 'ज्ञानपीठ' पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना शुक्रवारी जाहीर झाला. मराठी साहित्यातील योगदानाबद्दल नेमाडे यांना हा पुरस्कार दिला जात असल्याचे शुक्रवारी दुपारी दिल्लीमध्ये जाहीर करण्यात आले. दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
मराठी साहित्यविश्वात मैलाचा दगड ठरलेली 'कोसला' ही नेमाडेंची पहिली कादंबरी १९६३ मध्ये प्रकाशित झाली. त्यांच्या वयाच्या अवघ्या २५व्या वर्षी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीतील पांडुरंग सांगवीकर ही व्यक्तिरेखा अजरामर ठरली. 'कोसला'नंतर नेमाडे यांनी लिहिलेल्या बिढार, जरीला, झूल या कादंबऱयाही खूप गाजल्या. 'हिंदू- एक समृद्ध अडगळ' ही काही वर्षांपूर्वी त्यांनी लिहिलेली कादंबरीही वाचकांच्या पसंतीस उतरली.
नेमाडे यांचे देखणी आणि मेलडी हे कवितासंग्रहही प्रसिद्ध झाले आहेत. त्याचबरोबर समीक्षात्मक लेखनही त्यांनी केले आहे. स्पष्टवक्तेपणासाठी नेमाडे विशेष प्रसिद्ध आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते मराठी साहित्यातील चौथे साहित्यिक आहेत. यापूर्वी विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज, विष्णू सखाराम खांडेकर आणि विंदा ऊर्फ गोविंद विनायक करंदीकर या मराठीतील तिन्ही दिग्गजांना 'ज्ञानपीठ' पुरस्कारने गौरविण्यात आले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा