Translate

शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २०१५

ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे काय?

मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यात सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. किंबहुना नोबेल पुरस्कारइतके महत्व ‘ज्ञानपीठ’ला भारतीय साहित्यात आहे. भारतीय भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट लेखन कऱणाऱ्या आणि लेखनामध्ये नव-नवे प्रयोग करणाऱ्या साहित्यिकाला या पुरस्काराने सन्मानित केले जाते.

1961 सालापासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. साहू जैन आणि रमा जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवासाठी ‘ज्ञानपीठ’ची सुरुवात केली. 29 डिसेंबर 1965 रोजी पहिला ‘ज्ञानपीठ’ देण्यात आला. मल्याळम कवी श्री. गोविंद शंकर कुरुप हे पहिल्या ‘ज्ञानपीठ’चे मानकरी ठरले.

‘ज्ञानपीठ’साठी निवड कशी केली जाते?

भारतीय भाषांमध्ये लेखन करणाऱ्या साहित्यिकाचा ‘ज्ञानपीठ’ने गौरव केला जातो. पुस्तक प्रकाशित होऊन किमान पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच विचार या पुरस्कारासाठी केला जातो. पुरस्काराची सुरुवात झाली तेव्हा दीड लाख रुपये एवढे मानधन होते, आता पुरस्काराचे मानधन 11 लाख एवढे आहे. जेव्हा एकाच वेळी दोन साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो, तेव्हा मानधनही विभागून दिले जाते.

भारतातील विद्यापीठे, शिक्षणसंस्थांचे प्रमुख, प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, भाषाशास्त्रज्ञ इत्यादी आपापल्या मातृभाषेतील साहित्यिक आणि साहित्यकृतीची शिफारस ‘ज्ञानपीठ’साठी करु शकतात. किंबहुना अशा व्यक्तींना शिफारस करण्याची विनंतीही केली जाते. ज्ञानपीठ पुरस्कारासाठीचं नाव अंतिम करण्यासाठी भारतातील प्रत्येक भाषांमधील तीन सदस्यांची एक समिती गठीत केली जाते. ती समिती आपल्या भाषेतील एका प्रतिभावंत साहित्यिकाचं नाव अंतिम करते. त्यानंतर मध्यवर्ती समितीकडून सर्व भाषांमधून एका साहित्यिकाचे नाव ‘ज्ञानपीठ’साठी निवडल जाते.

 ‘ज्ञानपीठ’चे स्वरुप

‘ज्ञानपीठ’ विजेत्या साहित्यिकाला 11 लाख रुपयांचे मानधन आणि वाग्देवीची प्रतिमा प्रदान केली जाते. वाग्देवी ही माळवा प्रांतातील धारमधील सरस्वती मंदिरातील एका मूर्तीची प्रतिकृती आहे. वाग्देवीची मूळ मूर्ती लंडनमधील ब्रिटिश म्युझियममध्ये आहे.

मराठीतील ‘ज्ञानपीठ’चे मानकरी

वि. स. खांडेकर (1974), वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज (1987) आणि विंदा करंदीकर (2003) यांचा ज्ञानपीठ पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे आणि आता 2014 चा ज्ञानपीठ पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना जाहीर झाला आहे. ‘ज्ञानपीठ’ने सन्मान होणारे भालचंद्र नेमाडे हे चौथे मराठी साहित्यिक आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा