Translate

गुरुवार, २९ जानेवारी, २०१५

'राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषद'ने देशात महाराष्ट्राचे 'मॉडेल'

गेल्या दशकभरात महाराष्ट्राने ऐच्छिक रक्तदानात देशात घेतलेली आघाडी कायम असून गेल्या वर्षभरात तब्बल १५ लाख ५९ हजार ६६९ रक्ताच्या पिशव्या जमवून स्वत:चाच यापूर्वीचा विक्रम मोडला आहे. महत्त्वाचे म्हणजे जमा केलेल्या एकूण रक्तापैकी सुमारे ९५ टक्के रक्त हे ऐच्छिक रक्तदानाच्या माध्यमातून जमा करण्यात आले असून महाराष्ट्राचा पराक्रम संपूर्ण देशासाठी प्रेरक ठरणारा आहे. रक्तदान क्षेत्रातील महाराष्ट्राच्या प्रगतीचा आढावा घेऊन 'राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषद'ने देशात महाराष्ट्राचे 'मॉडेल' देशभर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. 
महाराष्ट्रात गेल्या वर्षभरात स्वयंसेवी संस्था, महाविद्यालये, रेल्वे स्थानके अशा ठिकाणी तसेच उद्योग जगताबरोबरच राजकीय नेते आणि धार्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या सहभागाने 'राज्य रक्तसंक्रमण परिषद'ने तब्बल २४ हजार ६४७ रक्तदान शिबिरांचे आयोजन केले. त्यात पंधरा लाखांहून अधिक रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या असून देशातील कोणत्याही राज्यात याच्या निम्म्यानेदेखील रक्त जमा होऊ शकलेले नाही. एकेकाळी ऐच्छिक रक्तदानात पश्चिम बंगालची 'दादागिरी' होती. तथापि गेले दशकभर 'राज्य रक्तसंक्रमण परिषदे'च्या अथक प्रयत्नांतून महाराष्ट्राने देशात सर्वप्रथम येण्याचा मान टिकवला आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या कालावधीत हे रक्त जमा करण्यात आले आहे. आरबीसी, प्लेटलेटस्, प्लाझ्मा आदी रक्तघटक वेगळे केल्यामुळे देशातील कोणत्याही राज्याला आवश्यकतेनुसार रक्तपुरवठा करण्याची क्षमता राज्याकडे निर्माण झाल्याचे रक्त संक्रमण परिषदेचे साहाय्यक संचालक डॉ. संजयकुमार जाधव यांनी सांगितले. 
राज्यात ३१० रक्तपेढय़ा असून त्यापैकी ७५ शासकीय व निमशासकीय रक्तपेढय़ा आहेत. गेल्या वर्षभरात शासकीय तसेच महापालिकांच्या रुग्णालयातील साडेतील लाख रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी यातून मोफत रक्त उपलब्ध झाले. राज्यात रक्तघटक विलगीकरणाची २४४ ठिकाणी व्यवस्था असून टक्केवारीच्या भाषेत सांगायचे झाल्यास संपूर्ण देशात जमा होणाऱ्या रक्तापैकी केवळ २० टक्के रक्ताचे विलगीकरण होते तर महाराष्ट्राचे प्रमाण देशाच्या तुलनेत ६५ टक्के एवढे आहे.

चालता चालता मोबाइल चार्ज!

तुम्ही प्रवासात आहात. एक महत्त्वाचा फोन करायचा आहे, पण मोबाइलची बॅटरी पूर्णपणे 'डाऊन' झाली आहे.. अशा परिस्थितीत काय करू नि काय नको, अशी आपली अवस्था होते. पण लवकरच तुमची ही समस्या मिटणार आहे. तुम्ही जितके अंतर चालाल, तितकी अधिक वीजनिर्मिती करणारे एक तंत्रज्ञान रॉयल महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी विकसित केले आहे. चपलेत बसवलेल्या प्लेट्सच्या मदतीने पिझो इलेक्ट्रिसिटी पद्धतीने वीजनिर्मिती करणारा हा प्रकल्प भविष्यात केवळ मोबाइलच नव्हे तर, अनेक इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी 'ऊर्जादायी' ठरणारा आहे. 

डोंबिवली युवक एज्युकेशनल ट्रस्ट संचालित रॉयल महाविद्यालयातील बारावीच्या विज्ञान विभागातील इलेक्ट्रिकल विषयातील सूरज तिवारी आणि हर्षित राय या विद्यार्थ्यांनी साकारलेला हा प्रकल्प येत्या गुरुवारी २९ जानेवारीला होणाऱ्या तालुकास्तरीय प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे. बारावीच्या पुस्तकातील 'पिझो इलेक्ट्रिसिटी'विषयीच्या माहितीच्या आधारे शिक्षक नलीन मौर्य यांच्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी हे तंत्रज्ञान तयार केले आहे. 
प्रत्येक व्यक्ती दिवसाला सरासरी ७ हजार फूट चालते. ती ऊर्जा या संयंत्रात वापरण्यात आली आहे. चपलेत बसविण्यात आलेल्या प्लेटस्वर चालल्यानंतर दाब येताच त्यातून निर्माण होणाऱ्या विजेचे एसी टू डीसीमध्ये रूपांतर करून ती साठवून ठेवली जाते. प्रत्येक पावलाला ३० व्होल्टची वीजनिर्मिती होते, असे या तंत्रज्ञानाचे स्वरूप आहे. विशेष म्हणजे, चपलेतील सोलच्या खाली प्लेट्स टाकून अशी 'वीजनिर्मिती' सुरू करता येत असल्याने त्यासाठी कोणत्याही विशेष चपलांची वा बुटांची गरज नाही. 'विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे प्रकल्प खरोखरच वाखाणण्यासारखे असून त्यांच्या कल्पनाशक्तीला सलाम आहे. त्यांच्या या प्रेरणेने आम्हा शिक्षकांनाही एक वेगळीच ऊर्जा मिळते. त्यांना आम्ही सदैव सहकार्य करत राहू,' असे महाविद्यालयाचे प्रा. डी. एच. तिवारी यांनी सांगितले.

'स्मार्ट फोनचा वापर हल्ली वाढला आहे, मात्र बॅटरी चार्जिग ही त्यातील सर्वात मोठी समस्या आहे. त्यामुळे 'पिझो' तत्त्वाद्वारे वीजनिर्मिती करून त्यावर उपाय शोधावा, या विचाराने हा प्रकल्प आम्ही साकारला. केवळ चप्पलपुरतेच मर्यादित न राहता रस्त्यावरील वाहने, नृत्याचे व्यासपीठ, पदपथ, जॉिगग ट्रॅक याबरोबरच रेल्वे स्थानक येथे हजारो प्रवासी दररोज चालतात. त्यातून निर्माण होणारी ऊर्जाही आपल्याला यात वापर करता येईल.'

बुधवार, २८ जानेवारी, २०१५

पोटाची खळगी भरण्यासाठी ‘तो’ करतो स्त्री वेशांतर !

रावळपिंडी : पाकिस्तानात राहणारा 27 वर्षीय वसीम अक्रम हा मोबाईलचे पार्ट्स विक्रेता आहे. मात्र, मोबाईल विक्रीमधून फार काही उत्पन्न मिळत नाही. या तुटपुंज्या उत्पन्नामुळे त्याचं घरही चालत नाही. त्यामुळे वसीम रात्री डान्सर म्हणून काम करतो. पाकिस्तानातील डान्सिंगच्या दुनियेत तो ‘राणी’ या नावाने ओळखला जातो. विवाह सोहळे, प्रायव्हेट पार्ट्यांमधून डान्स करुन लोकांचे मनोरंजन करतो. त्यातून त्याला त्याचे घर चालवण्यापुरते पैसे मिळतात.

मोबाईलचे पार्ट विकून खूप तुटपुंजे उत्पन्न मिळते. त्यातून स्वत:चं आणि घरातील खर्चही भागत नाही. मोबाईलचे पार्ट विकून घराचा गाडा हकता येणं शक्य नसल्यानेच डान्सर म्हणून काम करतो. विवाह सोहळे, प्रायव्हेट पार्ट्यांमधून खूप उत्पन्न मिळतो, असे वसीम अक्रम सांगतो.

पाकिस्तानतील जाचक कायद्यांमुळे ट्रान्सजेंडरसारख्या लोकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. अनेकांना तर एखाद्या शहरात ओळख लपवून काम करावे लागते. कारण ओळख जाहीर झाल्यास लोक हिणवतात. त्यामुळे एकंदरीतच असे काम करत असताना भीतीच्या वातावरणात राहावे लागते, असे वसीमचे म्हणणे आहे. शिवाय सोहळ्यांमध्ये डान्स करत असताना अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. मात्र त्या सहन केल्या नाहीत, तर पैसे मिळणे बंद होतात.
पाकिस्तानातील कायद्यांमध्ये महिला आणि पुरुषांनी कोणती कामे करावी, हे निश्चित केले आहे. त्यामुळे तृतीयपंथीयांना केवळ विवाह सोहळे, प्रायव्हेट पार्ट्यांमध्येच डान्सची परवानगी आहे.

अशा भीतीच्या वातावरणातही वसीम अक्रमसारखे पोटाची खळगी भरण्यासाठी ही कामे करतात. पाकिस्तातील कायद्यांचा आणि एकंदरीत कट्टरवाद्यांचा विचार करता, वसीम सारख्यांना अशी कामं करत असताना किती कठीण जात असेल, याची फक्त कल्पना केलेलीच बरी.

आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, राज्य सरकार स्मारक उभारणार



'कॉमन मॅन'चे जनक आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी वैकुंठ स्मशानभूमीत लक्ष्मण यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. लक्ष्मण यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी राज्य सरकार त्यांचे स्मारक उभारेल, अशी घोषणा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.


आर. के. लक्ष्मण यांचे सोमवारी संध्याकाळी पुण्यात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी संध्याकाळी सहा वाजून ५० मिनिटांनी रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. 
'द टाइम्स ऑफ इंडिया' वृत्तपत्रातून त्यांनी काढलेली व्यंगचित्रे खूप गाजली होती. 'कॉमन मॅन' या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून त्यांनी भोवतालच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींवर मार्मिक भाष्य केले होते. त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णने तसेच 'मालगुडी डेज' या कादंबरीसाठी रेखाटलेली अर्कचित्रे लोकप्रिय झाली होती. भारतीय व्यंगचित्रकलेला त्यांनी नवी ओळख मिळवून दिली. व्यंगचित्रासोबतच्या ओळींमधून त्यांनी काढलेले चिमटे न बोचता नेमका परिणाम साधत. त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने १९७१ साली पद्मभूषण आणि २००५ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. १९८४ साली मॅगसेसे पुरस्काराने आर. के. लक्ष्मण यांचा गौरव करण्यात आला होता. 
२४ ऑक्टोबर १९२१ रोजी म्हैसूरमध्ये जन्माला आलेल्या आर. के. लक्ष्मण यांना मुंबईतील प्रसिद्ध जे जे स्कुल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी. ए.ची पदवी घेतली आणि मुंबईच्या 'फ्री प्रेस जर्नल'मध्ये पहिली पूर्णवेळ नोकरी केली. विशेष म्हणजे तिथे दिवंगत व्यंगचित्रकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्यांचे सहकारी होते. त्यानंतर जवळपास ५० वर्षे त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये व्यंगचित्र रेखाटली.

स्वामी चिन्मयानंद यांच्याकडून 'बी. डी. गोएंका पत्रकारिता' पुरस्कार स्वीकारताना आर. के. लक्ष्मण. यावेळी रामनाथ गोएंकाही उपस्थित होते. (एक्स्प्रेस छायाचित्र संग्रहातून)

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

मानवंदना पथकाचं नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी

राष्ट्रपती भवनात अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना दिल्या गेलेल्या ‘गार्ड ऑफ ऑनर’चे नेतृत्व विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी केले. भारतात पहिल्यांदाच एखाद्या देशाच्या अध्यक्षांना एका महिला अधिकाऱ्याने मानवंदना दिली. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात ‘गार्ड ऑफ ऑनर’चा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. 21 तोफांची सलामी देऊन ओबामा यांचं राष्ट्रपती भवनात स्वागत करण्यात आले. त्यानंतर लष्कराच्या विंग कमांडर पूजा ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ची मानवंदना देण्यात आली. ओबामा यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ची मानवंदना देणाऱ्या पथकाचे नेतृत्व करायला मिळालं, हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, अशी भावना विंग कमांडर पूजा ठाकूर यांनी व्यक्त केली

बजाज समूहाचे शिल्पकार कमलनयन बजाज

कमलनयन बजाज हे प्रसिद्ध गांधीवादी आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे ज्येष्ठ पुत्र. त्यामुळे दीन-दुबळ्यांची सेवा करण्याचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळाला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचाही त्यांना सहवास लाभला होता. त्यांचे कार्य जवळून पाहता आले होते. त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेऊन लोकसेवेचे व्रत आजन्म जोपासले. एवढेच नव्हे तर आपल्या उद्योगातही लोकसेवा कशी करता येईल, हाच विचार कायम केला.
त्यांनी आपल्या वडिलांचा आदर्श ठेवून त्यांच्या मूल्यांनुसारच आपला उद्योग, व्यापार चालवला. सामाजिक सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी जमनालाल बजाज सेवा ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टद्वारे समाजासाठी भरीव कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. 
कमलनयन बजाज यांचा जन्म २३ जानेवारी १९१५ साली झाला. त्यांचे बालपण महात्मा गांधीजींच्या आश्रमात गेले. त्या वास्तव्यादरम्यान त्यांनी चरखा चालवणे, स्वयंपाक करणे, साफसफाई करणे आदी कामे केली. त्यांनी स्वातंत्र्य लढय़ातही हिरिरीने भाग घेतला. गांधीजींबरोबर त्यांनी सविनय कायदेभंग चळवळ, मिठाचा सत्याग्रहातही भाग घेतला होता. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी १९३२ मध्ये त्यांना सहा महिन्यांची शिक्षाही झाली होती. 
कमलनयन बजाज यांचे पुण्यात शिक्षण झाले. त्यानंतर अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र शिक्षण सुरू असतानाच १९४२ मध्ये त्यांचे वडील जमनालाल बजाज यांचे निधन झाल्याने शिक्षण अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. भारतात परतल्यावर सर्व उद्योगाची धुरा त्यांच्यावरच येऊन पडली. अविश्रांत मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर त्यांनी बजाज ग्रुपला थोडय़ाच दिवसांत यशाच्या शिखरावर पोहोचवले. बजाज ऑटो, बजाज टेंपो, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, मुकुंद आयर्न अॅन्ड स्टील तसेच अन्य कंपन्यांची भरभराट ही त्यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देते.
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भाषण ऐकून प्रभावित झालेल्या कमलनयन बजाज यांनी नवभारताच्या निर्मितीत स्वतला गुंतवून घेतले. पाकिस्तानातील सर्व व्यवसाय गुंडाळून त्यांनी तो भारतात आणला. मुंबईमध्ये त्यांचे स्टील रोलिंग मिल आणि अन्य व्यवसाय होते. फायद्यात चालणारे ट्रेडिंग, साखर व्यवसायातून त्यांनी बजाज ग्रुपला नवी दिशा दिली. व्यवसाय मोठय़ा प्रमाणात विस्तारला. त्यामुळे १९६४ मध्ये जवळपास ३० कोटींच्या मालमत्तेसह बजाज समूहाने १९ वे स्थान मिळवले. १९४२ ते १९७२ या दरम्यान विक्रीमध्ये वाढ होऊन ती ६७.६० लाखांवरून ७६ कोटींपर्यंत पोहोचली, तर एकूण नफा १२.७७ लाखांवरून ८.७१ कोटींवर गेला. नवनवीन उद्योगांमध्ये प्रवेश करणे, अतिशय मजबूत वितरणप्रणाली निर्माण करणे, वेगवेगळ्या कंपन्यांशी सहयोगी करार करणे अशा सगळ्याच क्षेत्रात त्यांनी या काळात यश संपादन केले. 
कमलनयन बजाज यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. केवळ व्यापार उद्योगच नव्हे, तर राजकारण, समाजकारण, कला, संस्कृती याच्यातही त्यांना रस होता. त्यांची विचारसरणी आधुनिक होती. त्यांनी परिवारातील पुढच्या पिढीला सर्वच बाबतीत स्वातंत्र्य दिले. कंपनीची भरभराट करायची असेल तर जगात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकास केला पाहिजे असा सल्ला ते कंपनीत काम करणाऱ्या व्यवस्थापकांना देत. कर्मचाऱ्यांमध्येही आपली गुंतवणूक असली पाहिजे, त्यांना जेवढे जास्त लाभ देता येतील तेवढे दिले पाहिजेत, ही विचारसरणी अनुसरून काम करणारे असे ते उद्योगपती होते. 
आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्वाचीच काळजी घेणारे कमलनयनजी स्वतच्या आरोग्याबाबत मात्र तेवढेसे दक्ष नव्हते. कामात सतत व्यग्र असल्याने त्यांनी आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. त्यातूनच १ मे १९७२ मध्ये त्यांचे निधन झाले.

काकाजी (कमलनयनजी) हे बजाज ग्रुपची रचना करणारे शिल्पकार होते. त्यांनी आपल्या कार्यकाळातच ग्रुपला प्रमुख २० उद्योगांमध्ये नेऊन ठेवले. आज बजाज समूहाकडे सुमारे एक लाख ३० हजार कोटी रुपयांचे भागभांडवल असून एकूण नफा आठ हजार कोटी रुपये इतका आहे. मोटारसायकल बनवणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये बजाज ऑटोचा तिसरा क्रमांक लागतो.
-राहुल बजाज, बजाज समूहाचे अध्यक्ष

(नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'कमलनयन बजाज : आर्किटेक्ट ऑफ बजाज ग्रुप' या स्मरणिकेत)

लंडन..

१८०२ साली कवी वर्ड्सवर्थने वेस्टमिनिस्टर ब्रिजवरून गुंफलेले लंडन शहरावरील हे काव्य म्हणजे सहा वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये प्रथमच आलो तेव्हा माझ्यासाठी या शहराविषयी एक प्रकारचं कुतूहल व आदरमिश्रित भावांदोलन होतं. जागतिक भाषा म्हणून सर्वत्र स्वीकारल्या गेलेल्या इंग्रजीबरोबरच या देशाने, किंबहुना या भाषेच्या जोरावरच विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुस्थापत्य, विधी आणि साहित्य आदी क्षेत्रांत मोलाचे योगदान दिलेले आहे. थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या या शहराने अनेक परकीय आक्रमणे अनुभवली. या आक्रमणांपासून धडा घेत साऱ्या जगावर अधिराज्य गाजवले. मात्र, मी या शहरात दाखल झालो तेव्हा इंग्लंडची पूर्वीची मत्ता धोक्यात आली होती. २००९ सालचे आर्थिक मंदीचे वादळ अमेरिका व युरोपला आपल्या कवेत घेऊन आशिया खंडाच्या दिशेने वेगाने कूच करीत होते. 'बाह्य़स्रोता'च्या (Outsource) या जमान्यात इंग्लंडने आपले कारखाने इतर देशांत वळवले होते. लंडनची आशिया आणि अमेरिका खंडाशी असलेली वेळेची अनुकूलता आणि जगद्बोली इंग्रजी यांच्या बळावर आर्थिक विनिमयात अग्रेसर होण्याचे इंग्लंडचे ध्येय कसाला लागले होते. इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला लंडन जवळपास ४० टक्के कारणीभूत ठरते. त्यामुळे अर्थातच आर्थिक मंदीने देशाचा कणा मोडला होता.
परंतु'Stiff upper lip' हा इंग्रजी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य पैलू. आपल्या भावना सहजासहजी प्रकट न करणे आणि 'Keep Calm and carry on' या तत्त्वाने आल्या परिस्थितीला तोंड देऊन या कठीण परिस्थितीतून ब्रिटिश जनता मार्ग काढू लागली.
मुंबईत आपले आई-वडील, मित्रमंडळींच्या छत्रछायेखाली आयुष्य कंठणाऱ्या माझ्यासारख्याला या शहराचा हा अनुभव येथील माणसांचा एक नवा कंगोरा दाखवून गेला. बऱ्याच घरांमध्ये पालकांनी नोकरी नसलेल्या पाल्याला आपल्या छत्राखाली घेतले. परदेशी कुटुंबांविषयीचा माझा गैरसमज मी ऑस्ट्रेलियात शिकत असतानाच दूर झाला होता. पण लंडन.. जे न्यूयॉर्कपाठोपाठचे आर्थिक उलाढालींचे माहेरघर समजले जाते, तिथल्या स्थानिक ब्रिटिशांची आपुलकीही फार भावली. परंपरा जपणे हे ब्रिटिश लोकांचे एक वैशिष्टय़. म्हणूनच १८०२ साली वर्ड्सवर्थला भावलेले लंडन आजही जगातील सर्वात देखणे शहर राहिले आहे. हाइड पार्क, रिजंट्स पार्क, हॅमस्टेड हिद, ग्रिनिच, रिचमंड येथील भव्य आणि हरित निसर्गसंपदा या शहरांचे वेगळेपण आपल्यासमोर उलगडते. अर्थात, काळापुढे नतमस्तक होत थेम्स नदीकिनारी पुरातन वास्तूंशेजारी आता आधुनिक इमारतीसुद्धा डौलाने उभ्या राहिल्या आहेत. आधुनिकतेला कलात्मकतेची जोड देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, थेम्सच्या काठावर असलेले जुने वीजकेंद्र सध्या आधुनिक चित्र व कला-प्रदर्शनाचे प्रशस्त दालन बनले आहे. 'टेट मॉडर्न' या आधुनिक कलादालनाचे बाहेरील वास्तुस्थापत्य जुनेच ठेवून मॉडर्न आर्टचे अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले आहे.
मुंबईप्रमाणेच लंडननेही सबंध इंग्लंडमधील लोकांना आकर्षित केले आहे. इंग्रजी ही जरी देशाची एकच भाषा असली तरी ती बोलण्याची प्रत्येकाची तऱ्हा व लकब मात्र वेगळी आहे. त्यामुळे आपल्या तर्खडकरी इंग्रजीचा इथे फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे लंडनच्या टय़ुबमधील भुयारी रेल्वे निवेदनांचे आकलन व्हायला मला जरा उशीरच लागला. बरं, कुणाला विचारायचे तर प्रत्येकाची सांगण्याची आणि बोलण्याची लकब निरनिराळी. कॉकनी, ईस्ट एंड आणि वेस्ट एंड ही लंडनच्या लोकांची बोली एकच. परंतु इंग्लंडच्या उत्तर भागांत यॉर्कशायर, मॅन्चेस्टर येथील लोकांची बोली काहीशी वेगळी. लंडनची भुयारी रेल्वे आणि लोकांची बोलीभाषा यावर संशोधनपर निबंधच लिहिता येईल.
पण लंडनचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या शहराने अख्ख्या जगातील लोकांना आकर्षित केले आहे. जर्मनी (हो! दोन युद्धांना सामोरे जाऊनही अनेक जर्मन लोक इंग्लंडमध्ये वास्तव्य करतात!), स्पेन, नॉर्वे, फ्रान्स (हा इंग्लंडचा कला व वैचारिक क्षेत्रातील शत्रू!) या युरोपीय देशांव्यतिरिक्त दुबई, तुर्कस्तान, इजिप्त, कॅनडा, चीन, मलेशिया, रशिया, पाकिस्तान, बांगलादेश, आर्यलड आदी अनेक देशांतील लोकांनी लंडनला आपलेसे केले आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. लंडनमध्ये हे प्रमाण जास्त आहे. इंग्रजांचे भारतीय जेवणशैलीवरील प्रेम माझ्या पथ्यावरच पडले. कारण भारतीय रेस्टॉरंट्सची लंडन तसेच इंग्लंडमध्ये इतरत्रही वानवा नाही. अर्थात, भारतातील जेवणास तोड नाही. पण सोय तर झाली!
परंतु लंडन म्हणजे संपूर्ण इंग्लंड नव्हे. भिन्न धर्माचे, वंशांचे आणि वर्णाचे लोक लंडनमध्ये राहत असल्याने येथील लोकांचे विचार संकुचित नाहीत. छोटय़ा गावांत आणि शहरांत राहणाऱ्या इंग्लिश माणसांचे जागतिक घडामोडींचे अज्ञान सारखेच आहे. किंबहुना, काही देश व तिथल्या लोकांबद्दलचे गैरसमजच अधिक आहेत. एकदा लंडनमध्ये मला एकाने भारतात जाण्यासाठी मलेरिया आणि इतर रोगांचे प्रतिकारक डोस घ्यायची गरज आहे का, असे विचारले होते. भारत जरी गरीब देश असला तरीही भारतीयांकडे मंगळावर यशस्वीरीत्या यान पाठविण्याइतकी बौद्धिक संपदा आहे, हे मला अनेकदा सांगावे लागते.
लंडनबाहेर वास्तव्य करताना येथील लोकांच्या 'राज'कीय विचारांचीही ओळख झाली. गेले १८ महिने मी बाथ या लंडनपासून सुमारे ११५ मैलांवर असलेल्या शहरात राहतो आहे. जवळपास ९९% लोकसंख्या गौरवर्णीय ब्रिटिशांची आहे. बाथ हे पुरातनकाळापासून इंग्लंडमधील एक महत्त्वाचे शहर. साहित्यिक (जेन ऑस्टिन) आणि सांस्कृतिक (रोमन बाथ स्पा) यांचा वारसा या निसर्गसंपन्न शहराला लाभला आहे. माझ्या इथल्या वास्तव्यात एकदा मी माझ्या काही कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत कॉफीसाठी बाहेर पडलो होतो. गप्पांच्या ओघात एकजण म्हणाला, 'प्रशांत, ब्रिटिशराजचे दिवस फार वैभवाचे होते, नाही का?' आजवर कुणीही माझ्याकडे थेटपणे भारतातील ब्रिटिश राजवटीचा उल्लेख केलेला नव्हता. लंडनमध्ये असताना एक-दोन इंग्लिश मित्रांनी त्यांच्या पूर्वजांच्या भारतातीतल 'पराक्रमा'बद्दल उलट निषेधच व्यक्त केला होता. पण माझा हा सहकारी २०-२५ टक्के (किंबहुना जास्त) इंग्लिश लोकांचे प्रतिनिधित्व करीत होता; जे अजूनही ब्रिटिश साम्राज्याच्या 'त्या' धुंदीत आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धात जर्मनीचा मित्रराष्ट्रांनी कसा पराभव केला, याच्या सुरस कथा इथल्या काहींच्या मनात अजूनही रुंजी घालत असतात. तशात आर्थिक मंदी व त्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी यामुळे परप्रांतीयांविषयीचा त्यांचा विरोध अधिकच तीव्र झाला आहे. याची परिणती राजकीय पटलावरही दिसते आहे. 'युकीप' या प्रांतीयवादी राजकीय पक्षाच्या प्रगतीमुळे मेमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ब्रिटनचे राजकीय भवितव्य झाकोळण्याची दाट शक्यता आहे. पण अशी संकुचित प्रांतीय विचारधारा प्रत्येक देशात असतेच. 
'मी ब्रिटिशांच्या काळात जन्मलो नव्हतो. तू जन्मला असशील तर मला तेव्हाच्या गोष्टी सांग,' असे उत्तर देऊन मी माझ्या त्या सहकाऱ्याचे म्हणणे उडवून लावले. खरं तर प्रत्येक प्रगत आणि प्रगतीशील देशांमध्ये असे संकुचित विचारांचे लोक असतातच. परंतु देशाची प्रगती अवलंबून असते ती प्रगत विचारांच्या नागरिकांच्या प्रमाणावर! इंग्लंडच्या सुदैवाने आधुनिक विचारसरणीच्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच लंडन अनेकांना भुरळ घालत असते. 
-प्रशांत सावंत

सातवा सुदईरी

सौदी राजघराण्यातल्या राजपुत्रांची संख्या आजमितीला सात हजार इतकी आहे. या हजारो पुत्रांमधून राजप्रमुख म्हणून निवडले गेलेले अब्दुल्ला बिन अब्दुल अझीझ यांचे काल वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. मुळात जेव्हा सत्ता मिळाली तेव्हाच ते थकले भागलेले होते. २००५ साली ते राज्यावर आले त्या वेळी त्यांच्या सहस्रचंद्रदर्शनाची वेळ आली होती. त्यांच्या आधीचे राजे फाहद हे अब्दुल्ला यांच्या तुलनेत डोक्याने बेतास बात. शेवटची काही वष्रे त्यांना अर्धागवायूने ग्रासलेले होते. सौदीचे कडवे इस्लामीकरण झाले ते फाहद यांच्या काळात. त्याचप्रमाणे आणखी एका घटनेसाठी जग फाहद यांना विसरणार नाही. ते म्हणजे अल कायदा. १९९० सालच्या ऑगस्ट महिन्यात इराकच्या सद्दाम हुसेन याने ज्या वेळी कुवेतचा घास घेतला, त्या वेळी सौदी अरेबियासही धोका निर्माण झाला. कारण कुवेतनंतर सद्दाम हा सौदीत घुसणार आणि हे सुन्नी राज्य ताब्यात घेणार ही शक्यता उघड दिसत होती. हे अमेरिकेस परवडणारे नव्हते. कारण त्या वेळी सौदी तेलावर अमेरिकेचा संसार अवलंबून होता. तेव्हा सौदीला वाचवण्यासाठी अमेरिकेने सद्दामविरोधात युद्ध पुकारले आणि त्यासाठी सौदी भूमीचा युद्धतळ म्हणून वापर करण्यास सुरुवात केली. सौदी अरेबियाचा राजा हा मुसलमानांसाठी पवित्र असलेल्या मक्का आणि मदिना या धर्मस्थळांचा रक्षक असतो. या दोन्ही ठिकाणी अन्य धर्मीयांनी जाणे हे कर्मल्लांना मंजूर नसते. परंतु कुवेतला आणि पर्यायाने सौदीला वाचवण्याच्या हेतूने अमेरिकी फौजा सौदी भूमीवर उतरल्या आणि इस्लामी धर्ममरतडांनी तोबा तोबा म्हणत त्या विरोधात काहूर उठवले. अमेरिकी फौजांत यहुद्यांचा समावेश होता. यहुद्यांनी पवित्र मक्का मदिनेच्या भूमीत पाऊल टाकावे यासारखे पाप नाही. त्यामुळे साहजिकच इस्लामी कर्मल्लांनी आकांत केला. त्याचे नेतृत्व केले ओसामा बिन लादेन या तरुणाने. अफगाणिस्तानात सोविएत फौजांविरोधात लढण्याचा यशस्वी अनुभव असलेल्या ओसामाने चक्क राजे फाहद यांच्या विरोधातच जंग पुकारले. परिस्थिती इतकी बिकट झाली की अखेर राजे फाहद यांना ओसामाची गठडी वळून सौदीबाहेर पाठवावे लागले. ओसामा सोमालिया आदी देशांत गेला तो त्यामुळे. परंतु त्यामुळे सौदी राजघराणे आणि हे अतिरेकी इस्लामी यांच्यात कायमच संघर्ष होत राहिला.
राजे अब्दुल्ला यांच्याकडे सत्ता आली ती या पाश्र्वभूमीवर. ९/११ घडून गेलेले, अल कायदा प्रबळ झालेली, तेलाचे भाव कोसळल्यामुळे सौदी खजिना रिता झालेला आणि धर्माच्या मुद्दय़ावर इस्लामी जगताविषयी सर्वत्र एक प्रकारची नाराजी दाटलेली. अशा वेळी वयाच्या ऐंशीत असलेले राजे अब्दुल्ला यांच्याकडे सौदीची सूत्रे आली असता त्यांच्या सुधारणावादी सुराने वातावरणात एक प्रकारचा आशावाद निर्माण झाला. कारण वयोवृद्ध होते तरी राजे अब्दुल्ला विचाराने आधुनिक होते. अर्थात त्यांचे आधुनिकत्व हे मर्यादित अर्थानेच घ्यावयास हवे. सौदी शहरांतील निवडणुकांत महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचे धाडसी पाऊल या अब्दुल्ला यांनीच टाकले. संतुलन हे त्यांच्या राजकारणाचे वैशिष्टय़. राजे फाहद यांच्या काळात तेलाचे भाव वाटेल तसे वरखाली होत. ते संतुलन राजे अब्दुल्ला यांनी आणले. त्या आधी तेल हे सौदीने एखाद्या अस्त्रासारखे वापरले. असे करण्यास राजे अब्दुल्ला यांचा विरोध होता. २००८ सालातील अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकांच्या आधी तेलाचे भाव मोठय़ा प्रमाणावर वाढले होते. ते कमी करण्यासाठी अमेरिकेचा दबाव येत होता आणि सौदीने अधिकाधिक तेल उपसावे यासाठी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश हे आग्रही होते. त्या वेळी राजे अब्दुल्ला यांनी अध्यक्ष बुश यांना जाहीरपणे चार बोल सुनावले. अमेरिकेच्या तेलपिपासू वृत्तीवर टीका करताना अब्दुल्ला म्हणाले, बुशसाहेब थोडेसे तेल आमच्या नातवंडांसाठी राहू द्या. जागतिक राजकारणाचे भान हे राजे अब्दुल्ला यांचे वैशिष्टय़ होते. त्या बाबत ते त्यांचे पूर्वसुरी राजे फैजल यांच्याइतकेच तल्लख होते. राजे फैजल यांनी संपूर्ण जग आपल्या तालावर नाचवले. पुढे याच राजकारणातून त्यांची हत्या झाली. राजे अब्दुल्ला त्या टोकाला गेले नाहीत. राजे फैजल यांच्याप्रमाणेच अब्दुल्ला हेदेखील काटकसरी होते. गेली काही वष्रे विविध उपचारांसाठी अमेरिकावारी करणाऱ्या अब्दुल्ला यांचा सारा लवाजमा स्वतंत्र खासगी शाही विमानांनी यायचा. पण त्या तुलनेत अब्दुल्ला यांना संपत्ती मिरवणे आवडायचे नाही. अमेरिकेशी त्यांचे उत्तम संबंध होते. हेन्री फोर्ड यांच्यापासून अनेक अमेरिकी अध्यक्षांशी त्यांचे व्यक्तिगत संबंध होते. महाविद्यालयीन काळात अमेरिकेस राहावयाची संधी मिळालेली असल्याने त्यांचा दृष्टिकोन तुलनेने आधुनिक होता. त्याचमुळे सौदी अरेबियाची सूत्रे घेतल्यावर एबीसी या वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सौदी अरेबियात लवकरच महिला मोटारी चालवू शकतील, अशी घोषणा केली होती. दुर्दैवाने ती काही त्यांच्या हयातीत अमलात येऊ शकली नाही. महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला, पण त्यात पुढे काही फारशी प्रगती होऊ शकली नाही. आता तर ते गेलेच. त्यांची जागा राजे सलमान हे घेतील. राजे सलमान यांच्या निमित्ताने सुदईरी सातांचे पुन्हा आगमन होत आहे, ही बाब लक्षणीय.
अशासाठी की हे सुदईरी सात धर्माच्या बाबत अत्यंत कर्मठ मानले जातात. सुदईरी हे सौदीचे संस्थापक महंमद बिन इब्न सौद यांची अत्यंत आवडती राणी. राज्य स्थापन होत असताना सौद यांनी पहिल्याच वर्षांत जवळपास २२ विवाह केले. यातीलच एक होती हस्सा िबत अहमद अल सुदईरी. नज्द प्रांतातील सत्ताधीशांची ती कन्या. इब्न सौद यांच्याप्रमाणेच नज्द प्रांतीयदेखील इस्लामातील कडव्या अशा वहाबी संप्रदायाचे पाईक. त्याहीमुळे असेल आणि राणी सुदईरी रूपवती म्हणूनही असेल इब्न सौद यांचा तिच्यावर भलताच जीव होता. याची जाणीव सुदईरी यांनाही होती. त्यामुळे त्यांच्या शब्दालाही राजकारणात मान होता. त्यातूनच या सुंदरी सुदईरी हिने इब्न सौद यांच्याकडून वचन घेतले की तिच्या संतानाकडेच सौदी गादी जाईल. तिला सात मुलगे झाले. राजे फाहद हे तिचेच चिरंजीव. त्यांच्या निधनानंतर सत्ता खरे तर तिच्या अन्य मुलांकडेच जायची. पण ती राजे अब्दुल्ला यांच्याकडे गेली. ते राजे फाहद यांचे सावत्र बंधू. आता राजे अब्दुल्ला पगंबरवासी झाल्यानंतर पुन्हा सुदईरीपुत्र सलमान याच्याकडे सौदी राजघराण्याची सूत्रे आली आहेत.
तेल भावाची घसरगुंडी थांबायला तयार नाही आणि इस्लामी जगात शांतता नांदण्याची शक्यता नाही अशा वेळी राजे सलमान यांच्याकडे जगातील सर्वात समृद्ध तेलसाठय़ाची मालकी येत आहे. इतके दिवस अमेरिका तेलासाठी सौदीवर अवलंबून होती. २०१८ नंतर तशी परिस्थिती राहणार नाही. अमेरिका तेलाच्या बाबत स्वयंपूर्ण होईल. अशा वेळी सौदीला राजकारणाची आखणी नव्याने करावी लागणार आहे. जवळपास २० हजार जणांचे हे सौदी राजघराण्याचे लचांड एकत्र बांधून ठेवणे हेही आव्हान आहे. हा सातवा सुदईरी हे आव्हान कसे पेलतो यावर पश्चिम आशियातील आणि अर्थातच जागतिकही, स्थर्य अवलंबून राहील.

संमोहन विद्या

अफू किंवा मद्याच्या अमलाखाली गुंगीत पडलेल्या रुग्णावर शस्त्र चालवण्याचे दिवस संपले आणि १६ ऑक्टोबर १८४६ या दिवशी बोस्टन येथे ईथर वापरून एका रुग्णाचा दात न दुखवता उपटण्याचा प्रयोग करण्यात आला. आधुनिक भूलशास्त्राची ही सुरुवात समजली जाते. 
त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. नवनवीन औषधं आणि नवं तंत्रज्ञान पुढे विकसित होत गेलं आणि आज संमोहन ऊर्फ भूलशास्त्र ही वैद्यकाची एक महत्त्वाची शाखा समजली जाते, जिच्यामुळे कोणत्याही शस्त्रक्रिया डॉक्टर आणि रुग्ण, दोघांसाठी जास्त सोप्या होऊ लागल्या आहेत. भूल देण्यामागे बरेच उद्देश असतात. रुग्णाला मुळीच दुखता कामा नये, आपल्यावर शस्त्र चालवत आहेत याची जाणीवसुद्धा होऊ नये. शस्त्रक्रियेच्या वेळी रुग्णाचे स्नायू पूर्ण शिथिल पाहिजेत. महत्त्वाचं म्हणजे ही भूल रुग्णाच्या दृष्टीनं अगदी सुरक्षित हवी आणि काम झाल्यावर तिचा प्रभाव लगोलग नष्ट व्हावा. 
ईथर आणि क्लोरोफॉर्म हे सुरुवातीचे भुलीचे वायू या कसोटय़ांना उतरले नाहीत. प्रचंड उलटय़ा, हृदय आणि यकृतावर विषारी परिणाम अशा कारणांमुळे त्यांचा वापर मागे पडला. एकीकडे संमोहनशास्त्राचा विकास चालू राहिला आणि ही कला अधिकाधिक शास्त्रशुद्ध, प्रगल्भ झाली आणि तिची तीन पायऱ्यांमध्ये विभागणी झाली.
पहिली पायरी म्हणजे रुग्णाची शुद्ध हरपणे. बहुधा हे काम शिरेतून दिल्या जाणाऱ्या औषधाचं असतं. दुसरी पायरी म्हणजे संपूर्ण शस्त्रक्रिया चालू असताना बेशुद्धावस्था कायम राहाणे. हे काम वायुरूप भुलीच्या औषधांनी केलं जातं. यासाठी श्वासनलिकेत एक नळी घालून ती अ‍ॅनॅस्थेशिया मशीनला जोडतात आणि मशीनमधून ऑक्सिजन आणि भुलीचा वायू यांचं मिश्रण रुग्णाच्या श्वासनलिकेपर्यंत पोचवलं जातं. तिसरी पायरी म्हणजे शस्त्रक्रिया संपते, भूल उतरते, रुग्ण शुद्धीवर येऊन स्वत: श्वास घेऊ लागतो आणि श्वासनलिकेत घातलेली नळी काढून टाकली जाते.
पेंटोथाल या प्रभावी औषधानं पहिल्या पायरीचं काम सुमारे ५०-६० वर्षे अगदी चोख केलं. दुसऱ्या पायरीचं बेशुद्धावस्था चालू ठेवायचं काम हॅलाथेन आणि ट्रायलिन या वायुरूप औषधांनी केलं. ईथर-क्लोरोफॉर्मपेक्षा ही औषधं कितीतरी सुरक्षित होती. आता तर त्यांच्यापेक्षाही अधिक चांगली परिणामकारक औषधं वापरली जात आहेत. आजच्या जमान्यात भूल ही हवी तिथेच, हवी तितकीच, हवा तेवढाच वेळ दिली जाते. यामध्ये अतिशय नेमकेपणा (प्रिसिजन) आलेला आहे. पेंटोथालऐवजी आजकाल एक आश्चर्यकारक औषध वापरतात. त्याचं नाव प्रोपोफॉल. शिरेतून त्याचे थेंब जसे रुग्णाच्या शरीरात जाऊ लागतात तसा तो भाग अगदी बघता बघता जादू केल्यासारखा बेशुद्ध होतो. इन्फ्युजन पंप नावाच्या उपकरणातून प्रोपोकॉल सूक्ष्म मात्रेत संपूर्ण शस्त्रक्रिया संपेपर्यंत चालू ठेवता येतं आणि शस्त्रक्रिया संपल्यावर शांतपणे झोपलेला रुग्ण एकदम ताजातवाना, सावध होतो. डोक्यात कसलाही गोंधळ, भरकटणं, गरगरणं नाही. उलटी नाही. जिभेला जडपण नाही. विचार एकदम स्पष्ट आणि नेहमीसारखं बोलायला सुरुवात. फक्त मधल्या काळात काय घडून गेलं याचा पत्ता नसतो. मोडलेलं हाड जोडणे, क्युरेटिंग, मनोरोग्यांना विद्युत उपचार अशा छोटय़ा गोष्टींसाठी प्रोपोफॉल पुरेसं असतं, किंवा मोठय़ा शस्त्रक्रिया करत असताना मुख्य औषधाला मदत म्हणूनही ते वापरता येतं. एकच दोष म्हणजे कमकुवत हृदयाच्या रुग्णांसाठी ते वापरता येत नाही. हृदयरोग्यांना चालतील अशी दुसरीही औषधं आता आली आहेत. अर्थात अधिक महागडी.
प्रीमेडिकेशन म्हणजे शस्त्रक्रियेच्या आधी दिली जाणारी औषधं हा भूलशास्त्राचाच एक भाग आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये रुग्णाला नेण्यापूर्वीच थोडं गुंगीचं औषधही देतात. त्यामुळे प्रत्यक्ष थिएटरमध्ये आणताना रुग्ण शांत, स्वस्थ असतो, पूर्ण सहकार्य करतो. साहजिकच शस्त्रक्रिया सुरळीत, निर्विघ्नपणे पार पडते. शस्त्रक्रियेचा रुग्ण आधीच प्रचंड घाबरलेला असेल, तर काय करणार? अशा रुग्णाला कमरेच्या स्नायूमध्ये केटॅमिनसारखं इंजेक्शन देतात. काही मिनिटांत त्याला गुंगी येते. त्यानंतर ऑपरेशन टेबलवर निजवून त्याला पुढची भूल दिली जाते.
रुग्णाला बरेच आजार असतील तर भूलतज्ज्ञ आधीच त्याची तपासणी करून त्याच्यासाठी अनुरूप औषधांचं नियोजन करतो. शस्त्रक्रियेदरम्यान गुंतागुंत होऊ नये म्हणून भूलतज्ज्ञाला अतिशय सतर्क राहावं लागतं, कारण सर्जन तर त्याच्या कामात मग्न असतो. सध्याच्या अत्याधुनिक थिएटरमध्ये रुग्णाचा रक्तदाब, नाडीचे ठोके, हृदयाचा आलेख, रक्तातील ऑक्सिजन व इतर वायूंचे प्रमाण अशा अनेक गोष्टी मॉनिटरवर सतत दिसत असतात. त्यामुळे भूलतज्ज्ञ एकटा असला तरी या माहितीच्या आधारे कोणत्याही क्षणी योग्य ती कृती करून संकट टाळू शकतो. 
आता आपण भूलशास्त्रातली काही अभिनव तंत्र पाहू या. मेंदूच्या शस्त्रक्रिया मोठय़ा वैशिष्टय़पूर्ण असतात. नाजूक, सूक्ष्म, कौशल्यपूर्ण मुख्य म्हणजे रुग्ण जागृतावस्थेत हवा. मेंदूच्या विशिष्ट भागाला सर्जननी चेतावणी दिली की रुग्णानं त्याला प्रतिसाद द्यायला हवा. यात तो घाबरताही कामा नये, त्याला वेदनाही होऊ नयेत. यासाठी फेन्टॅतील आणि ड्रोपेरिडॉल अशा औषधांचं मिश्रण वापरून हा परिणाम साधला जातो, याला म्हणतात कॉन्शस अ‍ॅनाल्जेसिया. गळा आणि मानेच्या शस्त्रक्रिया मुळात करायला अवघड. त्यात श्वासनलिकेत नळी असल्यामुळे सर्जनला तो भाग दिसणार कसा? यासाठी एका अगदी लहान नळीतून 'हाय फ्रीक्वेन्सी जेट व्हेंटिलेशन' तंत्राचा वापर करून सेकंदाला सुमारे तीस मि.ली. भुलीचं औषध आणि ऑक्सिजन दिला जातो. यामुळे रुग्णाला पुरेसा ऑक्सिजन मिळतो आणि सर्जनला आपलं हस्तकौशल्य दाखवायला वाव. या तंत्रामुळे स्वरयंत्राचा कर्करोग, मानेच्या मणक्याचा अस्थिभंग, केलेले वार अशा कित्येक अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होत आहेत. विशिष्ट शरीररचनेमुळे काही रुग्णांच्या श्वासनलिकेत नळी घालणं अशक्य होऊन बसतं. अशा वेळी घशात स्वरयंत्रावर जाऊन बसेल असा मास्क घालतात आणि त्यातूनच भूल दिली जाते. लहानसहान शस्त्रक्रियांसठी हे तंत्र सोयीस्कर पडतं. वॉर्डमध्ये हृदय किंवा श्वसन बंद पडलेल्या रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठीसुद्धा हा 'लॅरिंजियल मास्क' कामी येतो.
हात, पाय, खांदे, गुडघे यांच्या शस्त्रक्रिया आज सरसकट 'रिजनल ब्लॉक' देऊन करतात. त्या त्या अवयवाच्या संवेदना आणि स्नायूंची हालचाल यावर नियंत्रण ठेवणारी मुख्य नस बधिर केली जाते. पूर्वी हे काम अंदाजानं केलं जाई. भूलतज्ज्ञाचं शरीररचनेचं ज्ञान कसोटीला लागे. त्यात चुका होत. आता 'नव्र्ह स्टिम्युलेटर' हे विद्युत उपकरण किंवा अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीनं त्या नसचा अचूक ठावठिकाणा काढून तिथेच ते इंजेक्शन दिलं जातं.
हाडांच्या शस्त्रक्रिया इतरही अनेक मोठय़ा शस्त्रक्रियांच्या नंतर रुग्णाला काही दिवस अतोनात वेदना होतात. यामुळे त्याच्या शरीरप्रकृतीवर अनिष्ट परिणाम होतो. तो लवकर बरा होत नाही. यासाठी आता 'एपिडय़ूरल'ची मदत घेतली जाते. पाठीच्या मणक्यात मज्जारज्जूच्या बाहेरच्या आवरणात एक नळी ठेवली जाते. तिच्यामधून ऑपरेशननंतर तीन-चार दिवसही वेदनाशामक औषधाचा डोस ठरावीक वेळाने देतात. रुग्णाला लक्षणीय आराम मिळतो. तो तातडीने आवश्यक त्या हालचाली, फिजिओथेरपीचे व्यायाम करायला लागतो. 
औषधाचे फवारे मारूनही भूल देतात. दुर्बिणीतून तपासणी (ब्राँकोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी) करताना आधी फवारा मारून तोंडाचा आतला भाग बधिर करतात. दातांचं काम करताना हिरडीत इंजेक्शन द्यायचे ही जुनी गोष्ट. आता 'जेट' इंजेक्शनं आली आहेत, सुईविना इंजेक्शन देता येतं. नाकाची शस्त्रक्रिया करताना आधी नाकपुडीत बधिर करणाऱ्या औषधात भिजवलेली गॉझटेप पॅक करून मग काम करतात. 
वेदनारहित प्रसूती हा भूलशास्त्राचा नवा अवतार गेल्या पाच वर्षांत खूपच प्रचलित आणि लोकप्रिय झाला आहे. वर वर्णन केल्याप्रमाणे 'एपिडय़ूरल' नळीतून फेंटॅनील आणि बधिर करणाऱ्या औषधाचे अगदी लहान लहान डोस थोडय़ा थोडय़ा वेळाने दिले जातात. यामुळे प्रसूती वेदना नाहीशी होते, पण स्नायू कार्यक्षमच राहतात. याला 'वॉकिंग अॅनालजेसिया' म्हणतात. अशा प्रकारे नैसर्गिक प्रसूतीची वेदना दूर करून स्त्रीच्या आयुष्यातली ही अत्यंत आनंदाची घटका भूलशास्त्रानं अविस्मरणीय केली आहे.
भूलशास्त्रातील सातत्यानं चाललेल्या आश्चर्यकारक प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणासारख्या अतिशय गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियाही आता यशस्वी होऊ लागल्या आहेत. म्हणूनच आता असं म्हणायला हरकत नाही की आज प्रत्येक यशस्वी सर्जनमागे एक कुशल भूलतज्ज्ञ असतो. 
डॉ. लीली जोशी -drlilyjoshi@gmail.com
(या लेखासाठी विशेष साहाय्य) ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. मीरा मुळे,
डॉ. राजीव गरुड

पद्म, पद्मविभूषण पुरस्कार जाहीर 26 जानेवारी 2015

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि महानायक अमिताभ बच्चन, अभिनेता दिलीप कुमार, प्रकाशसिंह बादल यांच्यासह नऊ जणांना पद्मविभूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात येणार आहे.

तर महासंगणकाचे निर्माते शास्त्रज्ञ विजय भटकर, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या स्वपन दासगुप्ता, मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स यांच्या पत्नी मेलिंडा यांच्यासह 20 जणांचा पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

तर चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, लेखक आणि कवी प्रसून जोशी यांच्यासह 75 दिग्गजांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल.

पद्मविभूषण पुरस्कार विजेते

1. लालकृष्ण अडवाणी
2. अमिताभ बच्चन
3. प्रकाशसिह बादल
4. डॉ. डी. विरेंद्र हेगडे
5. दिलीप कुमार
6. जगदगुरु रामानंदचार्य स्वामी रामभद्राचार्य
7. प्रा. मालुर रामस्वामी श्रीनिवासन
8. कोट्टयन के. वेणुगोपाल
9. करिम अल हुसेन अगा खान

पद्मभूषण

1. जाहनू बरुवा
2. डॉ. विजय भटकर
3. स्वपन दासगुप्ता
4. स्वामी सत्यमित्रानंद गिरी
5. एन. गोपालस्वामी
6. डॉ. सुभाष कश्यप
7. डॉ. गोकुळोत्सवजी महाराज
8. डॉ. अंबरीश मिथल
9. सुधा रगुनाथन
10. हरिश साल्वे
11. डॉ. अशोक सेठ
12. रजत शर्मा
13. सतपाल
14. शिवाकुमार स्वामी
15. डॉ. खराग सिंग वाल्दिया
16. प्रा. मंजूल भार्गव
17. डेव्हिड फ्रॉली
18. बिल गेट्स
19. मेलिंडा गेट्स
20. सैचिरो मिसुमी

पदम श्री 

1. डॉ. मंजुला अनागनी
2. श्री. एस अरुणान
3. मिस. कन्याकुमारी अवसारला
4. डॉ. बेटिना शारदा बौमर
5. नरेश बेदी
6. अशोक भगत
7. संजय लीला भंसाली
8. डॉ. लक्ष्मी नंदन बोरा
9. डॉ. ग्यान चतुर्वैदी
10. प्रो. डॉ. योगेश कुमार चावला
11. श्रीमती जयकुमारी छिकाला
12. श्री. बिबेक देबरॉय
13. डॉ. सारुंगबम बिमला कुमार देवी
14. डॉ. अशोक गुलाटी
15 डॉ. रणदीप गुलेरिया
16. डॉ. के पी हरिदास
17. श्री राहुल जैन
18. श्री रविंद्र जैन
19. डॉ. सुनील जोगी
20. प्रसून जोशी
21. डॉ. प्रफुल्ल कर
22. मिस. साबा अंजुम
23. श्रीमती उषकिरण खान
24. डॉ. राजेश कोटेचा
25. प्रो. अलका क्रिपलानी
26. डॉ. हर्ष कुमार
27. श्री नारायण पुरुषोत्तमा माल्या
28. श्री लॅम्बर्ट मॅस्कॅरेन्हस
29. डॉ. जनक पलटा मॅकगिलन
30. श्री वीरेंद्र राज मेहता
31. श्री तारक मेहता
32. श्री नील हर्बट नोन्गकिऱ्हीन
33. श्री चेवांग नॉर्फेल
34. श्री टी व्ही मोहनदास पै
35. डॉ. तेजस पटेल
36 डॉ. जादव मोलाई पेयांग
37. श्री. बिमला पोद्दार
38. डॉ. एन प्रभाकर
39. डॉ. प्रल्हादा
40. डॉ. नरेंद्र प्रसाद
41. श्री. राम बहादूर राय
42. मिताली राज
43. श्री पी व्ही राजारामन
44. प्रो. जे एस राजपूत
45. श्री कोटो श्रीनिवास
46. प्रो. बिमल रॉय
47. श्री शेखर सेन
48. श्री गुणवंत शाह
49. श्री ब्रह्मदेव शर्मा
50. श्री. मनू शर्मा
51. प्रो. योग राज शर्मा
52. श्री वसंत शास्त्री
53. श्री एस के शिवकुमार
54. पी व्ही सिंधू
55. श्री सरदारा सिंह
56. अरुनिमा सिन्हा
57. श्री महेश राज सोनी
58. डॉ. निखिल टंडन
59. श्री. एस थेगत्से
60. डॉ. हरगोविंद लक्ष्मीशंकर
61. Shri. Huang Baosheng
62. प्रा. जॅक ब्लॅमोन्ट
63. सैयदना मोहम्मद बोहरानुद्दीन
64. Shri Jean-Claude Carriere
65. डॉ. नंदाराजन 'राज' चेट्टी
66. जॉर्ज एल. हार्ट
67. जगदगुरु अमर्ता सुर्यानंदा महाराजा
68. दिवंगत मिठालाल मेहता
69. तृप्ती मुखर्जी
70. डॉ. दत्तात्रेयुदू नोरी
71. डॉ. रघु रामा पिलारिसेट्टी
72. डॉ. सुमित्रा रावत
73. Prof. Annette Schmiedchen
74. दिवंगत प्राणकुमार शर्मा
75. दिवंगत आर. वासुदेवन

घाणीतच जगायचं नि घाणीतच मरायचं? स्वच भारत ????

पहाटेचे पाच वाजलेत. बाहेर काळामिट्ट काळोख आहे. हजेरीसाठी 'थंब' मशीन लावलंय. मुकादम शिस्तीचा आहे. जरा उशीर झाला तर खाडा लावेल या भीतीने सायकल दामटली. पायांत गोळे आले; पण नशीब! सहा वाजता कामावर पोहोचले एकदाची! अ‍ॅसिड, फिनेल, झाडू उचलला आणि संडासाच्या दिशेने निघाले. भोवती सगळी झोपडपट्टी. पहिल्या संडासात डोकावले. आत अंधूक उजेड होता. दार लावलेलं. ठोकलं, ''चला, आवरा लवकर!'' आतला माणूस लगेच बाहेर आला नि जोरात टमरेलच मारलं डोक्यावर! ''xxx दम नाही का बाहेर येईपर्यंत!'' म्हणत तरातरा निघून गेला. 
मस्तकात कळच गेली. तिरमिरीत डोकं धरून त्या घाणीतच फतकल मारली. जरा वेळाने उठले. कोणी बघितलं आणि तक्रार केली मुकादमला तर लगेच खाडा लावायचा. गेल्या आठवडय़ात एकच दिवस आले नाही तरी चार दिवस खाडा लावला आणि पैसे कापले. हप्ते देत नाही ना त्याला! त्याचा खुन्नस काढतो. जाऊ दे. उद्या वॉर्ड ऑफिसरसमोर उभं केलं तर नोकरी जायची. त्यापेक्षा गप्प बसावं ते बरं!
मी उठून संडास साफ करायला आत गेले, तर एका म्हातारीने पार दरवाजापासून घाण करून ठेवली होती. भिंतीवरही विष्ठा होती. जागोजागी मशेरी लावून थुंकलेलं होतं. मागून एक जण टमरेल घेऊन आली. दरडावून म्हणाली, ''भाभी, ती भिंत नीट साफ कर आणि हो, या चिंध्या गोळा कर!'' चिंध्या, फडकी, पॅड रक्ताने भरलेल्या. त्यांना भयानक दरुगधी येत होती. आठवडा झाला मास्क नाही मिळालेले. कचराकुंडय़ाही कमी केल्यात. सकाळच्या प्रहरी रस्त्यावर पेपर वाचत उभ्या असलेल्या लोकांच्या अंगावरून तिथवर जाताना उघडय़ा बादलीतले ते अस्वच्छ पॅड्स बघून पुरुष उगाचच खाकरतात. ओशाळं वाटतं म्हणून त्या पॅड्सना हातानेच दाबलं खाली. त्याच्यावर माती, कचरा टाकून ते झाकून टाकलं आणि आले टाकून ते सगळं कचराकुंडीत! अशी कशी ही माणसं? स्वत:ची घाणसुद्धा धड साफ करत नाहीत. 
काल पुरुषांच्या टॉयलेटच्या खिडकीत दारूची बाटली होती. टाकायला गेले, तर त्यात कोणी तरी लघवी भरलेली होती. ती अंगावर सांडली. अंगावर काटा आला. आज पुरुषांचं टॉयलेट पुन्हा तुंबलंय. ते काढणाऱ्यांना निरोप दिलाय, पण ते काही चार दिवस येणार नाहीत. शेवटी भिंतीपलीकडे गेले. सळई ठेवलेय तिथे. ती घुसवली. खराटय़ाने घाण बाहेर ओढली आणि डोक्याला हात लावला. अहो, काय नव्हतं त्यात? वापरलेले घाणेरडे निरोध, गुटखा-तंबाखूची पाकिटं, नशाच्या पुडय़ांची पाकिटं, विटांचे तुकडे आणि दारूच्या बाटल्यासुद्धा आतच कोंबलेल्या! लोक सगळं नको ते खातात, त्यामुळे विष्ठेला असा दर्प येतो की भडभडून उलटीच येते.
आज हगणदारी साफ करायचा दिवस! नकोच वाटतो तो! झोपडपट्टय़ांमध्ये मुलांना बाहेर संडासला बसवतात. बादलीत माती घेऊन जायचं. त्यावर ती माती टाकायची. बरेचदा उन्हाने सुकून विष्ठा कडक झालेली असते. ती खराटय़ाने खरवडायची. नाहीच निघाली तर सरळ हाताने उचलून बालदीत भरायची. ती खरवडताना इतकं वाकावं लागतं की, त्या विष्ठेचा घाण वास नाकात जातो. पावसाळय़ात उलटी परिस्थिती. पावसाच्या पाण्याने वाहून आलेल्या घाणीत उभं राहूनच सगळं साफ करायचं. शेवटी पावसाळा काय, उन्हाळा काय.. सगळे दिवस घाणीतच सरायचे आमचे!
दुपारी एकची शिफ्ट संपली आणि संडासच्या पायरीवर ठेवलेला घरून आणलेला डबा उचलला. पोटात भुकेने आग पडली होती. पहाटेपासून कपभर चहावर काम करत होते. तिथेच संडासच्या पायरीवर बसकण मारली. संडासच्या वासाबरोबर डब्यातली कोरडी पोळीभाजी पोटात ढकलली. अन्नाला चव असते म्हणतात. मला कधी लागलीच नाही ती चव! तरी आता निदान पोटात अन्न पोटात तरी जातंय. मेहतर म्हणून काम मिळालं त्याचं नेमणूक पत्र हातात पडलं तेव्हा कळेना, हसावं की रडावं? चांगली दहावी पास मुलगी मी! टायपिंग शिकलेली. टय़ूशन्स घेणारी, पार्लरचा कोर्स केलेली. नागरवस्ती विकास योजनेत उत्कृष्ट संघटक म्हणून पुरस्कार मिळवलेला! सगळं सगळं गेलं मातीत! मेहतर जातीत जन्माला आले. शिकले, सवरले. वाटलं, आपल्याला नाही करावं लागणार हे काम. कसलं काय? सोळाव्या वर्षी आईने लग्न उरकलं. सासू अर्धवट होती. तिने बाहेरच्या खोलीत लघवी, संडास करून ठेवला होता. ते साफ करायला लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी हातात झाडू घेतला तो कायमचा! आधी घरच्यांची घाण काढली, आता दुनियेची घाण काढते. नशीब दुसरं काय? बरं, नवरा तरी धड मिळावा? तोही ऐदी, आळशी, संशयी. घरात दोन-दोन दिवस चूल पेटायची नाही. शेवटी गावाबाहेरचा घाणीचा ढिगारा उपसून त्यातून लाकूडफाटा, भंगार गोळा करून विकायला लागले. शहरात वाढलेली, शिकलेली मुलगी मी! त्या घोंगावणाऱ्याा माशा मारत घाणीच्या ढिगाऱ्यावर उभी राहिले तेव्हा रडूच कोसळलं मला! तशातच दोन बाळंतपणं झाली. मरायला टेकले तेव्हा आईने शहरात आणलं. हे मेहतरचं काम मिळवून दिलं. पगार बरा मिळतो, पण किंमत शून्य! फार वाईट वागतात लोक हे असलं काम करते म्हणून! कुणी साधा जेवणाचा डबा, पिशवीसुद्धा घरात ठेवू देत नाही, की जवळपास फिरकत नाही. बोलणार तेही लांबून! बाजूने जाणार तेही अंग चोरून! अरे, तुमचीच घाण साफ करतो ना आम्ही?
पहिल्या दिवशी कामावर गेले तेव्हा संडासातले ते घाणीचे ढीग बघून पळून जावंसं वाटलं? हे काम करू, की सोडून देऊ या विचारांत किती तरी वेळ नुसती उभी राहिले; पण डोळय़ांसमोर उपाशी पोरांची केविलवाणी तोंडं आली. मग मन घट्ट केलं, नाक दाबलं आणि उचलला खराटा! दिवसभर संडास साफ केले. घरी गेले. किती तरी वेळ अंग घासून आंघोळ केली तरी सारखं वाटत होतं, ती सगळी घाण अजून हातांना लागतेय. नाकांत तोच दर्प! आईने पुढय़ात ताट ठेवलं. ताटातला वरणभात पाहिला आणि सारखं तेच डोळय़ांसमोर यायला लागलं. ताटावरून उठले आणि मोरीत जाऊन भडाभडा उलटी केली. पोरांना पोटाशी घेतलं आणि ढसाढसा रडले. 
परवा पोरीचा रिझल्ट लागला. तीन विषयांत नापास! मी सकाळी लवकर कामावर जाते. मुलाला उठवून नवरा वेळेवर शाळेत पाठवत नाही. रोज त्याचा पहिला तास बुडतो. शेवटी दोघांना समोर बसवलं आणि सांगून टाकलं, तुमच्या भविष्यासाठी मी हे काम करतेय. पहाटे चारला उठून डबे करते. दिवसभर कष्ट करते. तुम्ही तरी मला निराशा देऊ नका बाळांनो! अरे घरात, बाहेर काय काय सहन करायचं मी? बाहेरचं जग फारच वाईट. गेल्या आठवडय़ातली गोष्ट! एक माणूस नागडा संडासात काळोखात आडोशाला उभा राहायचा. विचारायचा येतेस का माझ्याबरोबर? बदनामीच्या भीतीने चार दिवस गप्प बसले. मग मुकादमाकडे तक्रार केली. आणखी एक जण, पहाटे काळोखात माझा पाठलाग करत असे. एक दिवस सायकल थांबवून असा सडकून मारला चपलाने की बस्स! मजबुरी आहे म्हणून हे काम करतो म्हणजे आम्हाला काय किंमत नाही? कसंही वागायचं? पुरुषांची मुतारी साफ करायला गेलं, की मुद्दाम लघवीला उभे राहतात. आपण वाकून संडास धूत असलो, की पुरुष मुद्दाम धक्का मारून आत शिरतात. मग मेहतर बायका घालतात शिव्या! पण काय उपयोग? उद्या परत इथेच यायचंय.
उन्हाळय़ात सफाईला पाणी नसतं, तर आम्ही काय करणार? लोक आम्हालाच शिव्या घालतात, तक्रार करतात. काही वेळा संडासाखाली चेंबरसारखी पाण्याची टाकी असते. त्याचं झाकण उघडून बादलीला दोरी लावून आत सोडावी लागते आणि त्यातून पाणी काढावं लागतं. हात भरून येतात; पण कोणी मदतीला येत नाही. एकदा तर अ‍ॅसिड टाकलं, त्याच्या धुराने कोंडले, हातपाय भाजले; पण कुणी पेलाभर पाणी पाजलं नाही, की घरात घेतलं नाही. तशीच किती तरी वेळ पायरीवर पडून राहिले. एकदा खूप तहान लागली म्हणून एका बाईच्या दारात गेले, तर वसकन अंगावरच आली. ''एऽऽऽ दूर हो. ती देवाची खोली आहे. देवावर सावली पडेल तुझी. विटाळ होईल.'' कमाल आहे! हिचं घर झोपडपट्टीत, संडासाला लागून! तो विटाळ नाही आणि तिची घाण साफ करणारीचा मात्र विटाळ! कोण म्हणतं समाजातली अस्पृश्यता संपलेय?
रोज दहा कि.मी. सायकल चालवून पाय दुखतात म्हणून सेकंडहँड स्कुटी घेतली, तर राऊंडला आलेले साहेब फटकन बोलले, ''गाडीवर फिरतेस? कामाची गरज नाही वाटतं तुला.'' म्हटलं, ''साहेब, घाम गाळून पैसे कमावते. xxx नाही करत!'' गप्प बसले. एखाद्या दिवशी चांगले कपडे घातले, तर लगेच लोक बोलतात, ''संडास धुणारी बाई आणि कपडे बघा!'' म्हणजे जिंदगीभर आम्ही घाणीतच जगायचं आणि घाणीतच मरायचं का? 
चांगलं जगण्याचा आम्हाला हक्क नाही ?

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा

कालबाह्य हेलिकॉप्टर आणि अन्य लष्करी सामग्रीच्या मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्र्यांची भेट मिळावी म्हणून महाराष्ट्रासह देशातील काही लष्करी अधिकाऱ्यांच्या पत्नींचा गट कित्येक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे. तथापि, संरक्षण मंत्रालयात सध्या एकच धावपळ सुरू आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा दौरा पूर्ण होईपर्यंत काही बोलू नका, असा संदेश त्यांना देण्यात आला आहे. १५ दिवसांपासून संरक्षणमंत्र्यांनी सर्व भेटीगाठी रद्द केल्या आहेत. राष्ट्राच्या सुरक्षिततेची धुरा सांभाळणाऱ्या या मंत्रालयात समरप्रसंगातदेखील नसेल इतकी आणीबाणीची स्थिती सध्या आहे. केवळ संरक्षणच नव्हे, तर सुरक्षा- व्यवस्थेशी निगडित गृह, गुप्तचर यंत्रणा, पोलीस, निमलष्करी व विशेष कृतीदल, सीमेवर तैनात लष्करी जवान, सागरात तळ ठोकलेल्या युद्धनौका या सर्वावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा दौरा सुखेनैवपणे पार पाडण्याचे प्रचंड दडपण आहे. अर्थात प्रश्न जगातील सर्वाधिक शक्तिशाली अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेचा आहे. त्यातही सुमारे दोन तास खुल्या आकाशाखाली होणाऱ्या प्रजासत्ताकदिन सोहळ्यातील संचलनाचा आहे. या सोहळ्यात ओबामा यांच्या सुरक्षिततेचे भारतीय यंत्रणांच्या बरोबरीनेच अमेरिकी गुप्तचर यंत्रणेसमोरही आव्हान आहे.
देशांतर्गत आणि देशाबाहेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व त्यांच्या पत्नीच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी युनायटेड स्टेट सीक्रेट सव्‍‌र्हिसवर असते. संरक्षण कवच पुरवणारी जगात नावाजलेली ही यंत्रणा. सुरक्षा कवच देण्याची पद्धती तसेच कार्यवाहीबद्दल त्यांच्याकडून कमालीची गुप्तता बाळगली जाते. स्थितीचे प्रत्यक्ष अवलोकन करताना संभाव्य धोके हेरून स्थानिक यंत्रणांच्या मदतीने आपल्या राष्ट्राध्यक्षांभोवताली मजबूत संरक्षक तटबंदी उभारणे हे त्यांचे मुख्य काम. प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलन सोहळ्याची सुरक्षितता हे स्थानिक यंत्रणांसाठी नेहमीच आव्हान असते. यंदा त्यास खुद्द अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याने सुरक्षा व्यवस्थेची संपूर्ण परिमाणेच बदलली आहेत. ओबामा भारत दौऱ्यावर असल्याने दहशतवादी आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतील. लष्कर-ए-तोयबाला अन्य दहशतवादी संघटना, पाकिस्तान लष्कर, आयएसआय यांचे पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारत-अमेरिका या दोन्ही राष्ट्रांतील सुरक्षा यंत्रणांना अधिक सतर्कता बाळगणे अनिवार्य झाले आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांसाठीची सुरक्षा मानकेलक्षात घेतल्यास 'न भूतो..' अशी सुरक्षाव्यवस्था यंदा अनुभवायला मिळेल. दृश्य स्वरूपात काही अंशी ही व्यवस्था लक्षात येईल. त्याचबरोबर अदृश्य स्वरूपात पडद्यामागून बरेच काही कार्यरत राहणार आहे.
कार्यक्रमस्थळ राजपथ आणि नवी दिल्ली कधीच सुरक्षा छावणीत रूपांतरित झाली आहे. ज्या हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांचा मुक्काम आहे, ज्या मार्गावरून ते मार्गक्रमण करतील, ज्या आग्रा शहराला ते भेट देणार आहेत, अशा सर्व ठिकाणांची टेहेळणी अमेरिकी सुरक्षा यंत्रणांनी आधीच करून सुरक्षाव्यवस्थेचा आराखडा तयार केला आहे. सीक्रेट सव्‍‌र्हिस यंत्रणांच्या नियमित कामकाजाचाच तो भाग आहे. संचलन सोहळ्यात सातस्तरीय सुरक्षाव्यवस्थेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, भारतीय राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्याभोवती अमेरिकी आणि भारतीय विशेष सुरक्षा पथकांचे संयुक्त सुरक्षा कवच राहील. अमेरिकेचे अध्यक्ष खुल्या आकाशात जास्तीत जास्त ४५ मिनिटे घालवू शकतात. प्रजासत्ताकदिन सोहळ्यात संचलन दोन तासाहून अधिक काळ चालणार आहे. खुल्या आकाशाखाली इतका वेळ थांबण्याची अमेरिकन राष्ट्राध्यक्षांची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. खबरदारीचा उपाय म्हणून अतिविशेष व्यक्तींची आसनव्यवस्था 'बुलेटप्रुफ' काचेच्या भिंतीने बंदिस्त केली जाईल. हा परिसर 'नो फ्लाय झोन' करण्याची अमेरिकी यंत्रणांची मागणी अमान्य करण्यात आल्याचे सांगितले जाते. कारण ती मान्य केल्यास सोहळ्यातील मुख्य आकर्षण असणारे हवाई संचलनही होऊ शकणार नाही.
परंपरेनुसार या सोहळ्यातील प्रमुख अतिथींचे भारतीय राष्ट्रपतींसमवेत मोटारीने राजपथावर आगमन होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जगात कोणत्याही दौऱ्यात रस्तामार्गाने भ्रमण करताना खास निर्मिलेल्या अतिसुरक्षित 'बीस्ट' मोटार वगळता अन्य वाहनांचा वापर करीत नाहीत. त्यामुळे या सोहळ्यास ते नेमक्या कोणत्या मोटारीतून येणार, याबद्दल संदिग्धता आहे. बीस्ट या आलिशान आणि तितक्याच मजबूत मोटारीची वैशिष्टय़े लक्षात घेतल्यास अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षाव्यवस्थेचा दर्जा लक्षात येतो. १८ फूट लांब आणि आठ टन वजनाची ही मोटार शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे. रासायनिक हल्ल्यापासून संरक्षणाची तजवीज, रात्रीच्या अंधारात सुस्पष्ट दिसेल असे कॅमेरे, उपग्रहाधारित दूरध्वनी आणि १८० अंश कोनात वळण घेईल असे चालकास दिलेले खास प्रशिक्षण ही या वाहनाची काही वैशिष्टय़े. शिवाय अमेरिकेचे उपाध्यक्ष आणि पेंटागॉनशी थेट संपर्क साधण्याची खास व्यवस्था या मोटारीत आहे. त्यामुळे भारतीय राजशिष्टाचाराचे पालन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष करणार काय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्यासाठी बसविलेले १५ हजार सीसी टीव्ही कॅमेरे, वर्दळीच्या ठिकाणी संशयितांची चेहऱ्यावरून ओळख पटवता येईल यासाठी कार्यान्वित केलेले 'फेस रेकग्निशन कॅमेरे', दुपटीने वाढवलेला फौजफाटा, हवाई हल्ले रोखण्यासाठी बसविलेल्या विमानविरोधी तोफा, मोक्याच्या ठिकाणी उंच इमारतींवर तैनात होणारे 'स्नाइपर्स' अर्थात बंदुकधारी, ७२ तास आधी सभोवतालचा परिसर रिक्त करणे, सोहळ्याच्या कालावधीत दिल्ली विमानतळावरील बंद ठेवण्यात येणारी हवाई तसेच रस्ते व मेट्रो स्थानकावरील वाहतूक आदी उपायांद्वारे सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कसूर राहू नये याची दक्षता बाळगली जात आहे. दिल्लीत कडेकोट बंदोबस्त ठेवताना सीमेवरून घुसखोरी होऊ नये म्हणून अतिरिक्त कुमक तैनात केली गेली आहे. सागरी सीमांवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवण्यात येत आहे. खुद्द अमेरिकेने पाकिस्तानला आपल्या राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्यावेळी दहशतवादी कारवाया घडल्यास गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे. या काळात गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानमधून उपग्रहाधारित दूरध्वनीवरील संभाषणावर लक्ष ठेवून आहेत.
अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षाव्यवस्थेची वेगळी खासियत आहे. त्यात कोणत्याही स्वरूपाची तडजोड करण्यास गुप्तचर यंत्रणा तयार नसतात. 'एअर फोर्स १' विमानाने राष्ट्राध्यक्ष जगभर प्रवास करतात. अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असणाऱ्या या विमानाची शत्रूच्या रडार यंत्रणेला निष्प्रभ करण्याची क्षमता आहे. ४५ हजार फूट उंचीवरून राष्ट्राध्यक्ष जगाच्या संपर्कात राहतील अशी विशेष व्यवस्था या विमानात आहे. आवश्यकतेनुसार दिमतीला अमेरिकन लष्कराची हेलिकॉप्टर्सही असतात. राष्ट्राध्यक्ष जेव्हा या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, तेव्हा ते 'आर्मी वन' या नावाने ओळखले जाते. ज्या हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्ष वास्तव्य करतील, त्याचा ताबा आधीच गुप्तचर यंत्रणा घेते. राष्ट्राध्यक्षांचे आगमन होण्याच्या काही दिवस आधी संपूर्ण हॉटेल रिक्त करून त्यांच्यासाठी राखीव असणाऱ्या दालनांच्या मजल्यावरील सर्व प्रकारचे फर्निचर, आरसे व तत्सम साहित्य हटविले जाते. त्या ठिकाणी नव्याने सर्व व्यवस्था केली जाते. गरज वाटल्यास यंत्रणेने संबंधित हॉटेलमधील 'वायरिंग'ही बदलल्याची काही उदाहरणे आहेत. अमेरिकी राष्ट्राध्यक्षांच्या तीन दिवसीय भारतदौऱ्यात सुरक्षिततेसाठी चाललेले हे सगळे व्याप या महासत्तेचा रूबाब अधोरेखित करणारे आहेत.

शुक्रवार, २३ जानेवारी, २०१५

तुमच्या किचनमध्येच आहेत दातांच्या पिवळेपणावरचे उपचार, वाचा 7 टिप्स

निरोगी आरोग्यासाठी जसे व्यायाम करणे गरजेचे आहे. तसेच दातांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी त्याची निगा राखणे गरजेचे आहे. आज अनेक जणांना दातांवरील पिवळेपणाच्या समस्येने ग्रासले आहे. सकाळ संध्याकाळ ब्रश करून देखील पिवळेपणाची ही समस्या कमी होत नसल्याने अनेक जण त्रस्त आहेत. आज आम्ही तुम्हाला तुमच्या दातावर आलेल्या पिवळेपणाची समस्या कशा प्रकारे कमी करता येईल याबद्दलच्या काही खास टिप्स सांगणार आहोत.
 
1- संत्र्याचे साल 
संत्र्याच्या सालीमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. यामुळे तोंडातील बॅक्टेरियाशी लढण्याची ताकद निर्माण होण्यास मदत होते. तसेच दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासही मदत होते.
 
काय करावे - दातांवरील पिवळसरपणा कमी करण्यासाठी आठवड्यातून तीन वेळेस संत्र्याच्या सालीने दातांना स्क्रब करावे.

2. स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीमधील तत्व देखील दात पांढरे शुभ्र करण्यासाठी उपयोगी ठरतात.
 
काय करावे - साधारण एक मुठ्ठीभर स्ट्रॉबेरीची पेस्ट बनवून एक दिवसाआड झोपण्यापूर्वी दांतांना लावावी आणि सकाळी उठून नेहमीच्या पद्धतीन ब्रश करावा असे केल्यास दातांचा पिवळसरपणा कमी होण्यास मदत होते.

3. लिंबू
लिंबामध्ये ब्लीचिंग तत्व उपलब्ध असतात. हे तत्व पिवळेपणा कमी करण्यास मदतगार ठरतात. लिंबाचे साल दातांवर घासल्याने पिवळेपणा कमी होतो.
 
काय करावे - लिंबाचा रस पण्यात एकत्र करून गुळणा केल्यास पिवळेपणा कमी होण्यास मदत होते

4. तुळस
भरपूर औषधी गुण असलेली तुळस जशी सर्दी-खोकल्यासाठी रामबाण आहे तसेच ती दातांवर ल पिवळेपणा कमी करण्यासाठी देखील उपयोगी आहे.
 
काय कराल - तुळशीची पानांची पेस्ट तयार करून ब्रश केल्यास पिवळेपणा कमी होतो.

5. बेकिंग सोडा
दातांवरील पिवळेपणा कमी करण्यासाठी बेकिंग सोडा एक उत्तम पर्याय आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा टूथपेस्टमध्ये करून आठवड्यातून दोनदा ब्रश करावा. तसेच अर्धा चमचा बेकिंग सोडा पाण्यात टाकून हलक्या हाताने दातांवर लावावे. असे केल्याने दात लवकर पांढरे शुभ्र होण्यास मदत होते.

6. मीठ
मीठामध्ये सोडियम आणि इतर तत्वेदेखील असतात. या तत्वांमुळे दात पांढरे राहण्यास मदत होते.
 
काय करावे - हलक्या हातांनी दातांवर मीठ लावून घासल्यास पिवळेपणा कमी होतो.
 
7- सफरचंद
सफरचंदामध्ये असलेल्या अॅसिडिक प्रॉपर्टीज दात पांढरे होण्यास मदत होते.
 
काय करावे - रोज एक सफरचंद खाण्याची सवय लावा.

बुधवार, २१ जानेवारी, २०१५

जाहिराती पहा आणि पैसे मिळावा.......... Registration साठी क्लिक करा.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. जाहिराती पहा  आणि  फ्री मोबाईल रिचार्ज सह ९०००/- प्रती  महिना कमवा. गुंतवणूक काही नाही रजिस्टर फी काही नाही. मोबाईल वर किवा कॉम्पुटर वर फक्त क्लिक करा आणि फ्री रजिस्टर करून पैसे मिळावा .

जाहिराती पहा आणि पैसे मिळावा.......... Registration साठी क्लिक करा.