कमलनयन बजाज हे प्रसिद्ध गांधीवादी आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे ज्येष्ठ पुत्र. त्यामुळे दीन-दुबळ्यांची सेवा करण्याचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडूनच मिळाला होता. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचाही त्यांना सहवास लाभला होता. त्यांचे कार्य जवळून पाहता आले होते. त्यातूनच त्यांनी प्रेरणा घेऊन लोकसेवेचे व्रत आजन्म जोपासले. एवढेच नव्हे तर आपल्या उद्योगातही लोकसेवा कशी करता येईल, हाच विचार कायम केला.
त्यांनी आपल्या वडिलांचा आदर्श ठेवून त्यांच्या मूल्यांनुसारच आपला उद्योग, व्यापार चालवला. सामाजिक सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी जमनालाल बजाज सेवा ट्रस्टची स्थापना केली. या ट्रस्टद्वारे समाजासाठी भरीव कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.
कमलनयन बजाज यांचा जन्म २३ जानेवारी १९१५ साली झाला. त्यांचे बालपण महात्मा गांधीजींच्या आश्रमात गेले. त्या वास्तव्यादरम्यान त्यांनी चरखा चालवणे, स्वयंपाक करणे, साफसफाई करणे आदी कामे केली. त्यांनी स्वातंत्र्य लढय़ातही हिरिरीने भाग घेतला. गांधीजींबरोबर त्यांनी सविनय कायदेभंग चळवळ, मिठाचा सत्याग्रहातही भाग घेतला होता. मिठाच्या सत्याग्रहाच्या वेळी १९३२ मध्ये त्यांना सहा महिन्यांची शिक्षाही झाली होती.
कमलनयन बजाज यांचे पुण्यात शिक्षण झाले. त्यानंतर अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र शिक्षण सुरू असतानाच १९४२ मध्ये त्यांचे वडील जमनालाल बजाज यांचे निधन झाल्याने शिक्षण अर्धवट सोडून त्यांना भारतात परतावे लागले. भारतात परतल्यावर सर्व उद्योगाची धुरा त्यांच्यावरच येऊन पडली. अविश्रांत मेहनत आणि बुद्धीच्या जोरावर त्यांनी बजाज ग्रुपला थोडय़ाच दिवसांत यशाच्या शिखरावर पोहोचवले. बजाज ऑटो, बजाज टेंपो, बजाज इलेक्ट्रॉनिक्स, मुकुंद आयर्न अॅन्ड स्टील तसेच अन्य कंपन्यांची भरभराट ही त्यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देते.
१९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भाषण ऐकून प्रभावित झालेल्या कमलनयन बजाज यांनी नवभारताच्या निर्मितीत स्वतला गुंतवून घेतले. पाकिस्तानातील सर्व व्यवसाय गुंडाळून त्यांनी तो भारतात आणला. मुंबईमध्ये त्यांचे स्टील रोलिंग मिल आणि अन्य व्यवसाय होते. फायद्यात चालणारे ट्रेडिंग, साखर व्यवसायातून त्यांनी बजाज ग्रुपला नवी दिशा दिली. व्यवसाय मोठय़ा प्रमाणात विस्तारला. त्यामुळे १९६४ मध्ये जवळपास ३० कोटींच्या मालमत्तेसह बजाज समूहाने १९ वे स्थान मिळवले. १९४२ ते १९७२ या दरम्यान विक्रीमध्ये वाढ होऊन ती ६७.६० लाखांवरून ७६ कोटींपर्यंत पोहोचली, तर एकूण नफा १२.७७ लाखांवरून ८.७१ कोटींवर गेला. नवनवीन उद्योगांमध्ये प्रवेश करणे, अतिशय मजबूत वितरणप्रणाली निर्माण करणे, वेगवेगळ्या कंपन्यांशी सहयोगी करार करणे अशा सगळ्याच क्षेत्रात त्यांनी या काळात यश संपादन केले.
कमलनयन बजाज यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. केवळ व्यापार उद्योगच नव्हे, तर राजकारण, समाजकारण, कला, संस्कृती याच्यातही त्यांना रस होता. त्यांची विचारसरणी आधुनिक होती. त्यांनी परिवारातील पुढच्या पिढीला सर्वच बाबतीत स्वातंत्र्य दिले. कंपनीची भरभराट करायची असेल तर जगात येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विकास केला पाहिजे असा सल्ला ते कंपनीत काम करणाऱ्या व्यवस्थापकांना देत. कर्मचाऱ्यांमध्येही आपली गुंतवणूक असली पाहिजे, त्यांना जेवढे जास्त लाभ देता येतील तेवढे दिले पाहिजेत, ही विचारसरणी अनुसरून काम करणारे असे ते उद्योगपती होते.
आपल्याबरोबर काम करणाऱ्या सर्वाचीच काळजी घेणारे कमलनयनजी स्वतच्या आरोग्याबाबत मात्र तेवढेसे दक्ष नव्हते. कामात सतत व्यग्र असल्याने त्यांनी आरोग्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले. त्यातूनच १ मे १९७२ मध्ये त्यांचे निधन झाले.
काकाजी (कमलनयनजी) हे बजाज ग्रुपची रचना करणारे शिल्पकार होते. त्यांनी आपल्या कार्यकाळातच ग्रुपला प्रमुख २० उद्योगांमध्ये नेऊन ठेवले. आज बजाज समूहाकडे सुमारे एक लाख ३० हजार कोटी रुपयांचे भागभांडवल असून एकूण नफा आठ हजार कोटी रुपये इतका आहे. मोटारसायकल बनवणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये बजाज ऑटोचा तिसरा क्रमांक लागतो.
-राहुल बजाज, बजाज समूहाचे अध्यक्ष
(नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'कमलनयन बजाज : आर्किटेक्ट ऑफ बजाज ग्रुप' या स्मरणिकेत)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा