Translate

मंगळवार, २७ जानेवारी, २०१५

लंडन..

१८०२ साली कवी वर्ड्सवर्थने वेस्टमिनिस्टर ब्रिजवरून गुंफलेले लंडन शहरावरील हे काव्य म्हणजे सहा वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये प्रथमच आलो तेव्हा माझ्यासाठी या शहराविषयी एक प्रकारचं कुतूहल व आदरमिश्रित भावांदोलन होतं. जागतिक भाषा म्हणून सर्वत्र स्वीकारल्या गेलेल्या इंग्रजीबरोबरच या देशाने, किंबहुना या भाषेच्या जोरावरच विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, वास्तुस्थापत्य, विधी आणि साहित्य आदी क्षेत्रांत मोलाचे योगदान दिलेले आहे. थेम्स नदीच्या काठावर वसलेल्या या शहराने अनेक परकीय आक्रमणे अनुभवली. या आक्रमणांपासून धडा घेत साऱ्या जगावर अधिराज्य गाजवले. मात्र, मी या शहरात दाखल झालो तेव्हा इंग्लंडची पूर्वीची मत्ता धोक्यात आली होती. २००९ सालचे आर्थिक मंदीचे वादळ अमेरिका व युरोपला आपल्या कवेत घेऊन आशिया खंडाच्या दिशेने वेगाने कूच करीत होते. 'बाह्य़स्रोता'च्या (Outsource) या जमान्यात इंग्लंडने आपले कारखाने इतर देशांत वळवले होते. लंडनची आशिया आणि अमेरिका खंडाशी असलेली वेळेची अनुकूलता आणि जगद्बोली इंग्रजी यांच्या बळावर आर्थिक विनिमयात अग्रेसर होण्याचे इंग्लंडचे ध्येय कसाला लागले होते. इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेला लंडन जवळपास ४० टक्के कारणीभूत ठरते. त्यामुळे अर्थातच आर्थिक मंदीने देशाचा कणा मोडला होता.
परंतु'Stiff upper lip' हा इंग्रजी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा एक अविभाज्य पैलू. आपल्या भावना सहजासहजी प्रकट न करणे आणि 'Keep Calm and carry on' या तत्त्वाने आल्या परिस्थितीला तोंड देऊन या कठीण परिस्थितीतून ब्रिटिश जनता मार्ग काढू लागली.
मुंबईत आपले आई-वडील, मित्रमंडळींच्या छत्रछायेखाली आयुष्य कंठणाऱ्या माझ्यासारख्याला या शहराचा हा अनुभव येथील माणसांचा एक नवा कंगोरा दाखवून गेला. बऱ्याच घरांमध्ये पालकांनी नोकरी नसलेल्या पाल्याला आपल्या छत्राखाली घेतले. परदेशी कुटुंबांविषयीचा माझा गैरसमज मी ऑस्ट्रेलियात शिकत असतानाच दूर झाला होता. पण लंडन.. जे न्यूयॉर्कपाठोपाठचे आर्थिक उलाढालींचे माहेरघर समजले जाते, तिथल्या स्थानिक ब्रिटिशांची आपुलकीही फार भावली. परंपरा जपणे हे ब्रिटिश लोकांचे एक वैशिष्टय़. म्हणूनच १८०२ साली वर्ड्सवर्थला भावलेले लंडन आजही जगातील सर्वात देखणे शहर राहिले आहे. हाइड पार्क, रिजंट्स पार्क, हॅमस्टेड हिद, ग्रिनिच, रिचमंड येथील भव्य आणि हरित निसर्गसंपदा या शहरांचे वेगळेपण आपल्यासमोर उलगडते. अर्थात, काळापुढे नतमस्तक होत थेम्स नदीकिनारी पुरातन वास्तूंशेजारी आता आधुनिक इमारतीसुद्धा डौलाने उभ्या राहिल्या आहेत. आधुनिकतेला कलात्मकतेची जोड देण्यात आली आहे. उदाहरणार्थ, थेम्सच्या काठावर असलेले जुने वीजकेंद्र सध्या आधुनिक चित्र व कला-प्रदर्शनाचे प्रशस्त दालन बनले आहे. 'टेट मॉडर्न' या आधुनिक कलादालनाचे बाहेरील वास्तुस्थापत्य जुनेच ठेवून मॉडर्न आर्टचे अत्याधुनिक केंद्र सुरू करण्यात आले आहे.
मुंबईप्रमाणेच लंडननेही सबंध इंग्लंडमधील लोकांना आकर्षित केले आहे. इंग्रजी ही जरी देशाची एकच भाषा असली तरी ती बोलण्याची प्रत्येकाची तऱ्हा व लकब मात्र वेगळी आहे. त्यामुळे आपल्या तर्खडकरी इंग्रजीचा इथे फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे लंडनच्या टय़ुबमधील भुयारी रेल्वे निवेदनांचे आकलन व्हायला मला जरा उशीरच लागला. बरं, कुणाला विचारायचे तर प्रत्येकाची सांगण्याची आणि बोलण्याची लकब निरनिराळी. कॉकनी, ईस्ट एंड आणि वेस्ट एंड ही लंडनच्या लोकांची बोली एकच. परंतु इंग्लंडच्या उत्तर भागांत यॉर्कशायर, मॅन्चेस्टर येथील लोकांची बोली काहीशी वेगळी. लंडनची भुयारी रेल्वे आणि लोकांची बोलीभाषा यावर संशोधनपर निबंधच लिहिता येईल.
पण लंडनचे महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे या शहराने अख्ख्या जगातील लोकांना आकर्षित केले आहे. जर्मनी (हो! दोन युद्धांना सामोरे जाऊनही अनेक जर्मन लोक इंग्लंडमध्ये वास्तव्य करतात!), स्पेन, नॉर्वे, फ्रान्स (हा इंग्लंडचा कला व वैचारिक क्षेत्रातील शत्रू!) या युरोपीय देशांव्यतिरिक्त दुबई, तुर्कस्तान, इजिप्त, कॅनडा, चीन, मलेशिया, रशिया, पाकिस्तान, बांगलादेश, आर्यलड आदी अनेक देशांतील लोकांनी लंडनला आपलेसे केले आहे. इंग्लंडमध्ये सर्वाधिक लोकसंख्या भारतीय वंशाची आहे. लंडनमध्ये हे प्रमाण जास्त आहे. इंग्रजांचे भारतीय जेवणशैलीवरील प्रेम माझ्या पथ्यावरच पडले. कारण भारतीय रेस्टॉरंट्सची लंडन तसेच इंग्लंडमध्ये इतरत्रही वानवा नाही. अर्थात, भारतातील जेवणास तोड नाही. पण सोय तर झाली!
परंतु लंडन म्हणजे संपूर्ण इंग्लंड नव्हे. भिन्न धर्माचे, वंशांचे आणि वर्णाचे लोक लंडनमध्ये राहत असल्याने येथील लोकांचे विचार संकुचित नाहीत. छोटय़ा गावांत आणि शहरांत राहणाऱ्या इंग्लिश माणसांचे जागतिक घडामोडींचे अज्ञान सारखेच आहे. किंबहुना, काही देश व तिथल्या लोकांबद्दलचे गैरसमजच अधिक आहेत. एकदा लंडनमध्ये मला एकाने भारतात जाण्यासाठी मलेरिया आणि इतर रोगांचे प्रतिकारक डोस घ्यायची गरज आहे का, असे विचारले होते. भारत जरी गरीब देश असला तरीही भारतीयांकडे मंगळावर यशस्वीरीत्या यान पाठविण्याइतकी बौद्धिक संपदा आहे, हे मला अनेकदा सांगावे लागते.
लंडनबाहेर वास्तव्य करताना येथील लोकांच्या 'राज'कीय विचारांचीही ओळख झाली. गेले १८ महिने मी बाथ या लंडनपासून सुमारे ११५ मैलांवर असलेल्या शहरात राहतो आहे. जवळपास ९९% लोकसंख्या गौरवर्णीय ब्रिटिशांची आहे. बाथ हे पुरातनकाळापासून इंग्लंडमधील एक महत्त्वाचे शहर. साहित्यिक (जेन ऑस्टिन) आणि सांस्कृतिक (रोमन बाथ स्पा) यांचा वारसा या निसर्गसंपन्न शहराला लाभला आहे. माझ्या इथल्या वास्तव्यात एकदा मी माझ्या काही कार्यालयीन सहकाऱ्यांसोबत कॉफीसाठी बाहेर पडलो होतो. गप्पांच्या ओघात एकजण म्हणाला, 'प्रशांत, ब्रिटिशराजचे दिवस फार वैभवाचे होते, नाही का?' आजवर कुणीही माझ्याकडे थेटपणे भारतातील ब्रिटिश राजवटीचा उल्लेख केलेला नव्हता. लंडनमध्ये असताना एक-दोन इंग्लिश मित्रांनी त्यांच्या पूर्वजांच्या भारतातीतल 'पराक्रमा'बद्दल उलट निषेधच व्यक्त केला होता. पण माझा हा सहकारी २०-२५ टक्के (किंबहुना जास्त) इंग्लिश लोकांचे प्रतिनिधित्व करीत होता; जे अजूनही ब्रिटिश साम्राज्याच्या 'त्या' धुंदीत आहेत. दुसऱ्या जागतिक महायुद्धात जर्मनीचा मित्रराष्ट्रांनी कसा पराभव केला, याच्या सुरस कथा इथल्या काहींच्या मनात अजूनही रुंजी घालत असतात. तशात आर्थिक मंदी व त्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी यामुळे परप्रांतीयांविषयीचा त्यांचा विरोध अधिकच तीव्र झाला आहे. याची परिणती राजकीय पटलावरही दिसते आहे. 'युकीप' या प्रांतीयवादी राजकीय पक्षाच्या प्रगतीमुळे मेमध्ये होणाऱ्या निवडणुकीत ब्रिटनचे राजकीय भवितव्य झाकोळण्याची दाट शक्यता आहे. पण अशी संकुचित प्रांतीय विचारधारा प्रत्येक देशात असतेच. 
'मी ब्रिटिशांच्या काळात जन्मलो नव्हतो. तू जन्मला असशील तर मला तेव्हाच्या गोष्टी सांग,' असे उत्तर देऊन मी माझ्या त्या सहकाऱ्याचे म्हणणे उडवून लावले. खरं तर प्रत्येक प्रगत आणि प्रगतीशील देशांमध्ये असे संकुचित विचारांचे लोक असतातच. परंतु देशाची प्रगती अवलंबून असते ती प्रगत विचारांच्या नागरिकांच्या प्रमाणावर! इंग्लंडच्या सुदैवाने आधुनिक विचारसरणीच्या नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. म्हणूनच लंडन अनेकांना भुरळ घालत असते. 
-प्रशांत सावंत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा