Translate

शनिवार, २१ मार्च, २०२०

पोलीस आयुक्ताला जेव्हा कळलं आपला मित्र बेघर आहे

लांब जटा, दाढी, मळलेले कपडे आणि वेड्यांसारखं वागणं बघून कुणाला वाटणार पण नाही श्रीजीत यांनी अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. इतकंच काय तर ते भुवनेश्वरचे पोलीस कमिश्नर सुधांशू सारंगी यांचे क्लासमेट होते याची पुसटशीही कल्पना येणार नाही.

सुधांशू सारंगी हे कटक भुवनेश्वरचे पोलीस कमिश्नर आहेत. त्यांच्यासोबत कटकच्या रेवेनसा कॉलेजमध्ये शिकलेले श्रीजीत मात्र बेघर आहेत. कॉलेजमध्ये असताना हे दोघे चांगले मित्र होते.

पुढे दोघांनीही युपीएससीची तयारी केली. सुधांशू हे आयपीएस झाले मात्र श्रीजीत हे या परीक्षेत अपयशी ठरले.

सिव्हिल सर्विस परीक्षेत आलेल्या अपयशाने श्रीजीत खचून गेले आणि हळुहळू त्यांचं मानसिक संतुलन ढासळू लागल्याचं त्यांचे कुटुंबीय सांगतात.

ते रस्त्यावर हिंडू लागले, मळकट कपडे, लांब दाढी आणि केस हेच त्यांचं आयुष्य बनलं.

एकेदिवशी सुधांशू आणि त्यांच्या बॅचमेट्सना आपल्या मित्राबद्दल कळलं. मग त्यांनी श्रीजीत यांना शोधून काढलं. जेव्हा श्रीजीत यांच्या मित्रांनी त्यांना पाहिलं तर त्यांचा विश्वासच बसला नाही.

श्रीजीत यांना पुरी जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथून त्यांना कटकच्या एससीबी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या मानसिक आरोग्य विभागात पाठवण्यात आलं. सध्या या विभागातच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
परिस्थितीमध्ये सुधारणा

कटकमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन अजून एक आठवडाही झाला नाही आणि श्रीजीत यांच्यात बरेच बदल दिसू लागले आहेत. त्यांच्या जटा आता गेल्या आहेत. त्यांची दाढी करण्यात आली आणि त्यांना चांगले कपडे देण्यात आले आहेत.

भेटायला येणाऱ्या मित्रांना ते हसतमुखाने भेटतात. पुढे काय करायचं आहे, या प्रश्नावर श्रीजीत सांगतात, "मला मुलांना शिकवायचं आहे."
श्रीजीत यांच्यासारखं आयुष्य अनेकांच्या वाट्याला

पुरीमध्ये श्रीजीत हे एकटेच उच्चशिक्षित बेघर आहेत असं नाही. त्यांच्यासारख्या अनेकांवर बेघर होण्याची पाळी आली आहे. त्यामुळे शहरात सध्या 'भिकारी मुक्त पुरी' अभियान राबवलं जात आहे. शहरातल्या भिकाऱ्यांचं पुनर्वसन करण्याची जिल्हा प्रशासनाची योजना आहे.

त्यासाठी 'निलाद्री निलय' नावाने खास पुनर्वसन केंद्र बांधण्यात येत आहेत. या पुनर्वसन केंद्रांमध्ये मोफत अन्न, वस्त्र, राहण्याची व्यवस्था, वैद्यकीय सहाय्य आणि इतरही सुविधा पुरवल्या जाणार आहेत. या सर्वांचा खर्च सरकारद्वारे निवड केलेल्या पाच स्वयंसेवी संस्था करत आहेत.

पुरीचे जिल्हाधिकारी बलवंत सिंह यांनी सांगितलं की सरकार या स्वयंसेवी संस्थांना प्रति व्यक्ती 3,400 रुपये प्रति महिना, अर्थसहाय्य पुरवत आहे.

ते सांगतात, "पुरी शहराला हेरिटेज शहर बनवण्यासाठी गेल्या वर्षी एक योजना सुरू करण्यात आली होती. हा देखील त्याचाच एक भाग आहे. वर्ल्ड क्लास हेरिटेज शहरात भिकारी असणं, योग्य वाटत नाही. म्हणूनच आम्ही हे अभियान सुरू केलं आहे. भीक मागणं कायमचं बंद करणं आणि शक्य तेवढ्या लोकांना त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करणं, हा आमचा उद्देश आहे."

पुरी शहरात जवळपास 700 भिकारी असल्याची माहिती जिल्हा सामाजिक सशक्तीकरण अधिकारी त्रिनाथ पाढी यांनी दिली.

भिकाऱ्यांचं वर्गीकरण करून त्यांच्यासाठी उभारण्यात येणाऱ्या पुनर्वसन केंद्रात पाठवण्याआधी त्यांना पुरी शहरातल्या बेघर लोकांसाठीच्या बेस कॅंपमध्ये ठेवलं जातं.

Image copyrightSANDEEP SAHUप्रतिमा मथळाबेस कॅंप

3 मार्चपासून ही मोहीम सुरू झाली आणि पहिल्या पाच दिवसातच बेस कॅंपमध्ये 146 भिकाऱ्यांना आणण्यात आल्याचं कॅंपच्या संचालिका लोपामुद्रा पाईकराय सांगतात. आम्ही देखील या बेस कॅंपला भेट दिली.
धरित्री चॅटर्जी

बेस कॅंपमध्ये असलेल्या भिकाऱ्यांपैकी धरित्री चॅटर्जी यांना भेटून मला आश्चर्याचा जबर धक्का बसला. दिसायला देखण्या, बॉब कट केस आणि अस्खलित इंग्रजी बोलणाऱ्या 54 वर्षांच्या धरित्री चॅटर्जी कुठूनच भिकारी वाटत नव्हत्या. मात्र, कोलकात्यातील कालीघाटच्या राहणाऱ्या धरित्री चॅटर्जी जगन्नाथ मंदिराजवळ भीक मागताना आढळल्या आणि त्यांना या बेस कॅंपमध्ये आणण्यात आलं.

धरित्री सांगतात, "प्रभू जगन्नाथ यांच्याप्रती माझ्या मनात लहानपणापासूनच आकर्षण होतं. आपली सांसारिक जबाबदारी पूर्ण केल्यानंतर मी गेल्यावर्षी मे महिन्यात 'फोनी' चक्रवादळाच्या काळात पुरीला आले आणि मग इथेच स्थायिक झाले."

Image copyrightSANDEEP SAHUप्रतिमा मथळाधरित्री चॅटर्जी

त्यांच्याशी बोलताना जाणवलं की आध्यात्मिक कारणाव्यतिरिक्त इथे येण्यामागे काही कौटुंबिक कारणही असावं. मात्र, आपल्या कुटुंबाविषयी उघडपणे बोलण्याची त्यांची इच्छा दिसली नाही. त्यामुळे मग मीही अधिक खोलात विचारपूस केली नाही.

आपलं लग्न झालं आहे आणि आपल्याला 22 वर्षांचा मुलगा आहे, एवढं मात्र, त्यांनी सांगितलं. धरित्री शास्त्रीय संगीत शिकल्या आहेत आणि वेल्लोरमधल्या सीएमसी हॉस्पिटलमध्ये त्यांनी कामही केलं आहे.
लक्ष्मीप्रिया मिश्र

धरित्री चॅटर्जी आणि श्रीजीत पाढी यांच्याप्रमाणेच उच्च शिक्षणानंतर भीक मागणाऱ्यांपैकी एक नाव आहे लक्ष्मीप्रिया मिश्र.

Image copyrightSANDEEP SAHU

धरित्री यांच्यासारखंच लक्ष्मीप्रिया यांनाही अस्खलित इंग्रजी येतं. संस्कृतचे अनेक श्र्लोकही त्यांना मुखोद्गत आहेत.

त्यांच्याकडे बघून कुणी म्हणणार नाही की पुरी बालिका विद्यालयात शिक्षिका म्हणून काम केलेल्या या महिलेने कधीकाळी गुजरात आणि इथियोपियातल्या मुलांना भौतिक शास्त्र, रसायन शास्त्र आणि गणित शिकवलं असेल.

आपला एकमेव मुलगा गमावल्यानतंर त्यांचं मानसिक संतुलन ढासळलं आणि त्या भीक मागू लागल्या.

लक्ष्मीप्रिया सांगतात, "माझ्या कुटुंबात फक्त माझा एक तरुण मुलगा होता. सात वर्षांपूर्वी एक दिवस तो अचानक गायब झाला आणि अजून परतलेला नाही. तो जिवंत आहे की नाही, हेसुद्धा मला माहिती नाही."

लक्ष्मीप्रिया यांची दृष्टीही अधू झाली आहे. पुरी इथल्या लायन्स क्लबच्या कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी भुवनेश्वरमधल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे.

Image copyrightSANDEEP SAHUप्रतिमा मथळालक्ष्मीप्रिया मिश्र

'भिकारी मुक्त पुरी' मोहिमेतील कार्यकर्ते सांगतात की मोहिमेच्या पाच दिवसांच्या आतच त्यांना उच्च शिक्षित असलेले एक डझनहून अधिक भिकारी आढळले. यातलंच एक नाव आहे गिरीजा शंकर मिश्र. गिरीजा शंकर मिश्र यांनी प्लास्टिक इंजीनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे.
उच्च शिक्षित असूनही का मागतात भीक?

मोहिमेचे सल्लागार सिद्धार्थ रॉय म्हणतात, "याची अनेक कारणं असू शकतात. ठरवलेलं लक्ष्य आणि हाती आलेलं यश यात मोठा फरक, हेदेखील एक कारण असू शकतं. जेव्हा एखाद्याला वाटतं की आपल्या पात्रतेनुसार आपल्याला फळ मिळत नाही, अशावेळी तो हताश होतो. श्रीजीत पाढी यांचा अशाच श्रेणीत समावेश होऊ शकतो."

रॉय यांच्या मते यामागे दुसरं कारण आपली कौटुंबिक, सामाजिक आणि वर्षानुवर्ष चालत आलेली व्यवस्था हेदेखील असू शकतं. यामुळे एखाद्या व्यक्तीची सामान्य आयुष्य जगण्याची इच्छाच नाहिशी होते.

ते म्हणतात, "काही लोक आध्यात्मिक कारणामुळेही असं करतात. हिंदू धर्मात भिक्षुगिरीला धार्मिक मान्यता आहे. यात काही एस्केपिस्ट (पलायनवादी) आहेत, हेही वास्तव आहे."

Image copyrightSANDEEP SAHU

मात्र, उत्कल विद्यापीठातील मानसोपचार विभागाचे निवृत्त प्राध्यापक प्रताप रथ वेगळंच कारण सांगतात.

ते म्हणतात, "आपल्या समाजात डिग्निटी ऑफ लेबर म्हणजे श्रमाचा मान राखला जात नाही. पाश्चिमात्य विकसित राष्ट्रांमध्ये एखाद्या विद्यापीठात शिकवणारा प्राध्यापकदेखील रिकाम्या वेळेत टॅक्सी चालवतो किंवा एखाद्या हॉटेलमध्ये काम करतो. आपल्या समाजाप्रमाणे तिथला समाज याकडे तुच्छतेने बघत नाही. भारतात एखाद्या व्यक्तीला जेव्हा असं वाटतं की त्याला त्याच्या योग्यतेप्रमाणे काम, नाव किंवा प्रतिष्ठा मिळत नाही तेव्हा तो हताश होतो आणि मग तो समाज काय म्हणेल, ही चिंता करणं सोडतो. याच कारणामुळे भीक मागणाऱ्यांमध्ये उच्चविद्याविभूषित लोक आढळणं, आश्चर्याची बाब नाही."

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा