Translate

शनिवार, २१ मार्च, २०२०

भानामती किंवा देवी महिलांच्याच अंगात का येते?

आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणांवर प्रत्येक स्त्रीला कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. हा लेख याच मालिकेचा एक भाग आहे. महिला, अंधश्रद्धा आणि मानसिक आजार यांचा परस्परांशी काय संबंध आहे, हे उलगडून सांगणारा लेख.


भानामतीचा प्रकार खरंच असतो का? आणि हे फक्त महिलांच्याच अंगात का येतं?

सणा-समारंभाला, जत्रेत, पूजा-आर्चा होत असताना एखाद्या बाईच्या अंगात अचानक जोर येतो, ती घुमायला लागते. त्या महिलेच्या अंगात देवी आली असं काहीजण म्हणतात. तर आपल्या अंगात कोणी प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्ती कालांतराने येत राहते, असं एखाद्या महिलेला वाटत राहतं. तर भानामतीमुळे एखादी स्त्री पछाडली गेलीये आणि त्यात सगळं कुटुंबच भरडलं जातं अशीही उदाहरणं ऐकायला, पाहायला मिळतात. बहुतांशवेळा हे प्रकार महिलांसोबतच घडतात.

दोन महिन्यांपूर्वीची घटना. अनिताचं (बदललेलं नाव) लग्न होऊन सहा महिने उलटले असतील. घरात अकल्पित गोष्टी घडायला सुरुवात झाली. घरात कधी अचानक भांडी पडायची, वस्तू गायब व्हायच्या. कधी गरज नसताना गॅस सुरु राहिलेला असायचा. एकदा तर अंगावरच्या कपड्याने पेट घेतला. नंतर चक्क एकदा तर घरातला नऊ तोळे दागिन्यांचा डबा गायब झाला. हळूहळू घरातल्या किंमती वस्तू नाहीशा व्हायला लागल्या. तिच्या घरातलेही या घटनांनी हादरुन गेले होते. या सगळ्या घटनांमध्ये तोपर्यंत कोणाला इजा झाली नव्हती. पण तिच्या अंगावर लाल रंगात फुल्या यायला लागल्या आणि कोणीतरी करणी करतंय याची चर्चा जोरात सुरू झाली. घराबाहेरही भानामतीचे किस्से रंगू लागले. एकाचं दुसऱ्या कानाला जाताना त्यात किश्श्यांची भर पडू लागली. तिला आधी डॉक्टरकडे नेण्यात आलं. पण अंगावरच्या खुणा बंद होणं काही थांबलं नाही.

औरंगाबादच्या शहाजी भोसले यांनी आतापर्यंत देशभरात भानामतीच्या 302 केसेस हाताळल्या आहेत. अंधश्र्रद्धा निर्मूलन समितीचं ते गेली तीस वर्षं काम करतायत. भानामती म्हणजे कोणीतरी घडवून आणतं, अशी लोकांची धारणा असल्याने अनितासोबत जे घडतंय ते का आणि कसं याचा शहाजी भोसले यांना शोध घ्यावा लागणार होता. कोणीही आजूबाजूला नसताना त्यांनी फक्त अनिताशीच चर्चा केली. अंगावर लाल फुल्या कशा आल्या विचारताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली की तिच्या लिपस्टिकचाही रंगही तोच आहे. त्यांनी अनिताला पुढे विचारलं- कोणी भानामती करत असेल तर नुसत्या फुल्या कश्या?
भानामतीसाठी काळ्या कपड्याच्या बाहुलीला टाचणी किंवा कापण्यासाठी फुल्या मारल्या तर तशाच वेदना वा जखमा त्या व्यक्तीला होतात, असा काळी जादू करणाऱ्यांचा दावा असतो. त्याविषयी शहाजी भोसलेंनी अनिताला सांगितलं. दुसऱ्या दिवशी अनिताच्या हातावर, पायावर, मांडीवर लाल-काळ्या रंगात फुल्या आणि त्यासोबत जखमाही दिसू लागल्या. अंगावर झालेल्या खुणा बिब्बाच्या आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. बिब्बाचं तेल त्वचेला घातक असतं. त्याच्या फुल्या मारल्यानंतर काही मिनिटांनी व्रण दिसायला लागतात. आणि जिथे आपला हात पोहचू शकतो तिथेच हे व्रण दिसतात. शहाजींसमोर हे मान्य करायला अनिता तयार नव्हती. आणि घरातले चमत्कारिक प्रकार थांबायलाही तयार नव्हते.

अनिताच्या घरात स्वयंपाकघरातील भांडी पडण्याचे प्रकार वाढू लागले. एक दिवस सकाळी शहाजी यांनी जाणीवपूर्वक घरातल्या सर्व मंडळींना घरी थांबवून घेतलं. सर्वांना स्वयंपाकघरात यायला सांगितलं. वीस मिनिटं झाली तरी एकही भांडं पडलं नाही. शहाजींनी सगळ्यांना बाहेर जायला सांगितलं आणि मुद्दामहून तिला शेवटी ठेवून तिच्याकडे दुर्लक्ष केल्यासारखं दाखवलं. ती जशी स्वयंपाकघरातून बाहेर पडली तसा एक डबा गडगडत आली पडला. तो तसा पडावा म्हणून अनिताने त्याखाली एक पेपर ठेवला होता, हे शहाजींच्या लक्षात आलं. भानामतीचा प्रकार खरंच आहे, हे सांगण्याचा अनिताचा हा खटाटोप होता. तो या प्रकाराने अपयशी ठरला.
शहाजींनी स्वतःच भानामती करणाऱ्या अनिताला रंगेहात पकडलं. नंतर तिनेही मान्य केलं की आधीचे सारे प्रकार तिनेच घडवून आणले होते. अनिताचं पूर्वी एका तरुणावर प्रेम होतं आणि हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं होतं. त्यानंतर ती एका मनाच्या विकाराने पीडित झाली. घरातल्याचं लक्ष, सहानुभूती मिळवण्यासाठी तिने रहस्यमय गोष्टी रचायला सुरुवात केली.
I

शहाजी भोसलेंच्या मते, "भानामतीच्या 99 टक्के घटनांमध्ये पीडित महिला स्वतःच भानामती करत असते. त्यामागचं वैज्ञानिक सत्य शोधून काढावं लागतं. या घटना रायायनिक अभिक्रिया, भौतिक अभिक्रिया आणि हातचलाखीने भरलेल्या असतात. तर एक टक्के घटनांमध्ये एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या बाबतीत सगळं घडवून आणते. त्यात आकस किंवा त्रास देणं हा हेतू असतो. पीडित महिलेच्या अंगावरचे कपडे पेटतात पण तिला इजा होत नाही, घरावर दगड पडतात पण त्यात कोणी जखमी होत नाही, त्यामुळे भानामतीत कोणाचा मृत्यू झालेली उदाहरणं दिसत नाहीत. भानामती आणि मराठवाड्यातल्या बिब्बा म्हणजेच गोट्याच्या झाडाचा जवळचा संबंध आहे. भोकरदन, फुलांब्री, सिल्लोड, कन्नड या भागात बिब्बाची झाडं अधिक प्रमाणात आढळतात. त्यामुळे भानामतीमध्ये बिब्बा अनेकदा वापरला जातो."

डोळ्यातून खडे पडणारी महिला, सलग पंधरा दिवस साप चावला असं सांगणारी मुलगी, अचानक कोणीतरी केसांची वेणीच कापून टाकली अशी प्रकरणं शहाजी भोसले यांनी हाताळली आहेत. अशा महिलांच्या मनावर उपचार करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदतही घेण्यात आली. भानामतीचे प्रकार कमी होतायत का? शहाजी भोसले यांच्या मते, उलट भानामतीची प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणात पुढे येताना दिसतायत. पूर्वी मांत्रिक, तांत्रिक यांच्याकडे जाणारी मंडळी आता जागरूक होऊ लागली आहेत. भानामतीच्या केसेस त्यांच्याकडे महिन्यातून एक-दोन येतातच. बुवा-बाबांच्या आर्थिक, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्याची उदाहरणं ताजी आहेत.
भुंकणारी भानामती

मराठवाड्यात भानामती हा शब्द प्रचलित आहे. काही वर्षांपूर्वी भुंकणारी भानामती असा शब्दही गावागावांमध्ये प्रचलित होता. महिलेच्या अंगात कोणी दुसरी व्यक्ती आलीये आणि तोंडातून हूं हूं करतेय म्हणून तिला भुंकणारी भानामती म्हटलं जाई. हल्ली हा शब्द मागे पडलाय.

ज्याला भुंकणाऱ्या भानामती म्हटलं जातं त्या अंगात आलेल्या महिला आपल्याला आजही जत्रा, घरगुती किंवा सार्वजनिक समारंभात दिसतात. त्यांच्या कधी देवी अंगात येते तर कधी एखादी मृत पावलेली व्यक्ती. असे प्रकार सर्रास संपूर्ण भारतात पाहायला मिळतात. प्रसिद्ध देवस्थान, पीर- दर्गा असो की कुंभमेळे. त्याला धर्माचंही बंधन नाही.

अगदी ताजं उदाहरण आहे. महाशिवरात्रीला फेसबुकवर अडीच लाख मेंबर असलेल्या महिलांच्या एका ग्रुपवर अशाच एका महिलेचा व्हिडिओ पोस्ट केला गेला. मंदिरात शंकराची आरती सुरू होती, तितक्यात एक बाई हूं हूं आवाज करत वाऱ्याच्या वेगाने मुर्तीसमोर गेली. ती इतकी वेगाने घुमू लागली की सोबत असलेल्या दोघांना तिला आवरणं कठीण जात होतं. बाजूच्या भिंतीला तिने जोरजोरात धडका मारायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यावर तासाभरात त्याला हजारो लाईक्स मिळाले आणि कमेंटही आल्या. त्यात बहुतेक कमेंट्स नमस्कार इमोजीच्या होत्या. कित्येक महिलांचा देवी अंगात येणं यावर विश्वास असल्याचं यातून स्पष्ट दिसलं.

डोंबिवलीत राहणारे सुशीला मुंडे आणि मच्छिंद्र मुंडे गेली 25 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करताना देवी अंगात येण्याचे प्रकार जवळून पाहिले आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये लैंगिक शोषणातून झालेली मानसिक कोंडी, महिलांची लैंगिक उपासमार हे कारण पुढे आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

अंगात येतं म्हणजे नेमकं काय होतं?

"अंगात येणं हा प्रकार आपल्या संस्कारांशी जोडलेला असतो. काही ठराविक परिस्थितीमध्ये प्रासंगिक मनोविघटन होतं. यात आपल्या इंद्रियांकडून वर्तनाकडे सूचना पाठवली जाते. ढोल किंवा आरतीचा आवाज, धूप-अगरबत्तीचा वास यामुळे इंद्रिय उद्दिपीत होतात. त्यावेळी शरीरातील ताकदीचा रिझर्व्ह फोर्स वापरला जातो. एरव्हीपेक्षा अनेक पटीने ताकद असल्याचं आजूबाजूच्या लोकांना जाणवतं."

अशी प्रकरणं हाताळताना प्रसंगी काही क्लृप्त्याही कराव्या लागतात असं मच्छिंद्र मुंडे म्हणतात. एकदा एका महिलेच्या अंगात दर पोर्णिमेला देवी यायची. हा दिवस कधीच चुकायचा नाही. अंनिस म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना 22 जूनची पोर्णिमा चुकवायची नव्हती. त्यांनी एक प्रयोग करायचा ठरवला. जुनं कॅलेंडर शोधून तिच्या घरी लावण्यात आलं. त्यात 12 जूनला पोर्णिमा होती. अपेक्षेप्रमाणे त्या महिलेच्या अंगात दहा दिवस आधीच देवी आली. दुसऱ्या दिवशी तिला बदललेल्या कॅलेंडरविषयी सांगण्यात आलं. ती निरागसपणे म्हणत होती, मला खरंच कळत नाही हे कसं होतं. समुपदेशनाच्या अनेक भेटींनंतर तिची घरात झालेली मानसिक कोंडी आणि लग्नानंतरही झालेली लैंगिक उपासमार हे कारण असल्याचं उघड झालं.

तज्ज्ञांच्या मते- नेहमी त्याच त्या गोष्टींचा विचार केल्याने मेंदूतील रसायनांचा समतोल बिघडतो. अशा वेळी स्वतःच्या मनातल्या दुःखाचा निचरा बाईला करायचा असतो. अबोध मनाच्या पातळीवर हा निचरा करण्यासाठी ती काहीकाळ एका दुसऱ्या भूमिकेत प्रवेश करते. त्याला अंगात येणं असं म्हणतात.

कधी कधी देवी अंगात येण्याचा वापर आपलं घरातलं वा समाजातलं स्थान वाढवण्यासाठीही केला जातो, अशी उदाहरणं आहेत.

झाशीची राणी घोड्यावर बसली आणि...

सांगलीतली ही गाजलेली घटना 1987च्या आसपासची आहे. त्या बाईंचा पुनर्जन्मावर गाढा विश्वास. त्यांच्यात अधूनमधून पूर्वजन्मातील स्मृती जाग्या व्हायच्या. पूर्वजन्मी त्या झाशीची राणी लक्ष्मीबाई होत्या असं त्यांना वाटायचं. त्यावेळी त्यांच्या व्याख्यानाचे कार्यक्रम पार पडत. अंगात झाशीची राणी लक्ष्मीबाई संचारायची.

झाशीच्या राणीवर व्याख्यानं देत असताना त्या खुद्द राणी होऊन जात. बाईंनी वयाची पन्नाशी ओलांडलेली होती. त्यामुळे त्यांच्या वयाचा मान लोक ठेवत, त्यात राणी म्हटल्यावर लोक बेभानपणे ऐकत असत. त्यांच्यातली झाशीची राणी बाहेर कशी काढायची हा अंनिससमोर मोठा प्रश्न होता. अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांना एक युक्ती सुचली. झाशीच्या राणींना जाहीरपणे घोड्यावर बसवायची.

मच्छिंद्र मुंडे हा किस्सा अगदी जिवंत करुन सांगतात. "बाई स्वतःला झाशीची राणी समजत असल्याने त्यांनी खुल्या मैदानात घोडेस्वारी करायला होकार दिला. उमद्या घोड्याची शोधाशोध सुरू झाली. सांगली-साताऱ्यात मिळेना म्हणून कार्यकर्त्यांनी थेट महालक्ष्मीच्या रेडकोर्सवरुन घोडा ट्रकमधून घालून आणला. तोपर्यंत पत्रकं छापून वाटून झाली होती आणि पेपरमध्ये बातम्याही प्रसिद्ध झाल्या. सरकारी अधिकारीही कार्यक्रमाला उपस्थित होते. खबरदारी म्हणून अॅम्बुलन्सही बोलवण्यात आली होती. गेल्या जन्मी घोडेस्वारी करण्याचा अनुभव असला तरी या जन्मी काहीच सराव नाही, त्यामुळे राणींना दोन-तीन वेळा घोड्यावर बसण्याची मुभा देण्यात येणार होती. ठरल्याप्रमाणे हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत या जन्मीच्या झाशीच्या राणी घोड्यावर बसल्या. पण रेडकोर्सच्या घोड्याने मैदान सोडत कुंपणापलिकडे उडी मारली. क्षणार्धात बाई पडल्या, किरकोळ जखमी झाल्या आणि त्यांना हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं. लोकांसमोर त्याचं भानावर येणं महत्त्वाचं होतं. त्यांना स्क्रिझोफ्रेनियाचा तीव्र मानसिक आजार होता हे उघड झालं, त्यातून उपचार घेऊन त्या पुढे बऱ्याही झाल्या."

अनुभवातून आलेल्या नैराश्य, मानसिक कोंडमाऱ्यामुळे त्यांना झाशीच्या राणीचं रुप उसनं घ्यावं लागलं होतं.

बाह्य स्वरुपात दिसणाऱ्या अंधश्रद्धांच्या मूळाशी मानसिक आजार असल्याची अशी अनेक उदाहरणं आहेत. पण हे महिलांच्याच वाट्याला का येतं?

डॉ. दाभोलकरांनी त्याचं उत्तर आपल्या पुस्तकांमध्ये दिलंय- "आपल्या देशात बाईला जन्माला येण्यापासून ते पुढे जन्मभर एक जीवनव्यापी गौणत्व (किंमत नसणं) सोसावं लागतं. त्याला उत्तर मिळण्याची तिची धडपड बहुदा करुणाजनक पद्धतीने अयशस्वी ठरते. अशी बाई ही भानामतीचा बळी ठरणं ही तिचा नव्हे तर स्त्री-पुरुष विषमतेवर आधारित समाजरचनेचा दोष आहे."

1 टिप्पणी: