नांदेडपासून 82 किलोमीटर अंतरावर असलेलं कोटग्याळ हे गाव गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलं आहे. याला कारणही तसंच आहे. या गावात 5 मे रोजी दोन बहिणींनी एकाच नवऱ्याशी लग्न केलं आहे.
धुरपता आणि राजश्री शिरगिरे या दोन बहिणींनी साईनाथ उरेकर या एकाच नवरदेवाशी लग्न केलं.
दुपारी दोनच्या सुमारास आमची गाडी कोटग्याळ गावच्या वेशीवर पोहोचली. गाडी पोहोचताच लोकांचा घोळका गाडीभोवती जमा झाला. आम्ही म्हणजे कुणी चॅनेलवाले आहोत, असा भाव जमलेल्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता.
या मंडळींना आम्ही शिरगिरे यांच्या घराचा पत्ता विचारला तितक्यात एकजण उद्गारला, "टीव्हीवाले लय येऊ राहिले आजकाल, झालं ना आता त्यांचं लग्न, संसार सुरू झाला आहे आता त्यांचा."
बराच वेळ चर्चा केल्यानंतर त्यांच्यातल्या एकानं मारुतीच्या मंदिराकडे हात करून शिरगिरे यांच्या घराचा पत्ता सांगितला.
- शाही लग्नाचं आमंत्रण थेरेसा मे, ट्रंप, ओबामांना का नाही?
- अवघ्या महिनाभरातच त्यांनी केलं सोनम कपूरला प्रपोज
मुलीच्या घरासमोर पोहोचलो तेव्हा तिथं सात ते आठ जण पहारा देताना दिसून आले. कुणीही आमच्याशी बोलायला तयार नव्हतं.
तिथल्या लोकांना लग्नाबद्दल विचारत होतो तर त्यांच्याकडून एकच प्रतिक्रिया मिळत होती, "झालं ते चांगलं झालं, विषय सोडून द्या."
मुलींचे आई-वडील कुठे आहेत? असं विचारल्यानंतर, "ते बाहेरगावी गेले आहेत आणि नवरदेव-नवरी देव दर्शनाला गेले आहेत, चार-पाच पाच दिवसानंतर परत येतील," असं उत्तरं मिळाल.
3 तास आम्ही मुलीच्या घरासमोर जमलेल्या लोकांशी चर्चा करत होतो. पण कुणी जास्त काही बोलायला तयार नव्हतं. शेवटी साडे पाचच्या सुमारास मुलीचे चुलत भाऊ प्रकाश शिरगिरे आमच्याशी बोलायला तयार झाले.
"त्यांचा संसार कोलमडू नये याची आम्हाला भीती आहे. कारण एका मुलाशी दोन बहिणींचं लग्न लावणं हे कायदेशीर आहे की नाही, हे काळण्याएवढं माझं कुटुंब शिक्षित नाही. कुठल्याही वडिलांना वाटतं की आपली मुलगी नांदावी तसंच माझ्या काकांनाही वाटलं," आम्ही काही विचारायच्या आतच प्रकाश यांनी कुटुंबीयांच्या भावना व्यक्त केल्या.
"साईनाथ हे धुरपता आणि राजश्री यांच्या आत्याचा मुलगा आहे. माझी मोठी चुलत बहीण धुरपता ही लहानपणपासून गतिमंद आहे, ती सारखी आजारी पडत असे. तिच्या उपचारासाठी काकानं अनेक प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले. साईनाथ लहानपणापासून राजश्री आणि धुरपता यांच्याच घरी वाढला आहे. त्याला ही बाब माहिती होती. त्यानं लग्न केलं आणि आज तो सुखी आहे. आता काही संकट येऊ नये ही भीती आम्हाला आहे," कुटुंबीयांना काय वाटतं यावर प्रकाश बोलत होते.
'आम्ही खूश आहोत'
प्रकाश बोलत असताना त्यांच्या सोबतची माणसं आम्हाला परतवून लावण्याचा प्रयत्न करत होती. पण तितक्यात एका व्यक्तीनं वधू आणि वराच्या आईकडे बोट केलं. आम्ही त्यांच्याकडे गेलो. काही विचारायच्या आतच त्यांनी, "आम्हाला यातलं काही कळत नाही. पण आम्ही खूश आहोत," असं सांगितलं आणि त्या तिथून बाजूला निघून गेल्या.
एव्हाना संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. नवरदेव आणि नवरी देवदर्शनाला गेले नसून नवरदेवाच्या गावी (समराळा) आहेत, असं आम्हाला कळलं. यानंतर आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला.
"माझी मोठी बहीण गतिमंद असल्यानं तिचं लग्न होणं कठीण होतं. मोठी असल्याकारणानं माझ्याआधी तिचं लग्न व्हायला हवं होतं. पण ते होत नव्हतं. माझ्याआधी तिचं लग्न व्हावं ही माझी इच्छा असल्यानं मी ही बाब घरच्यांसमोर मांडली. साईनाथशी माझं लग्न ठरलं तेव्हा मी त्याला ही बाब स्पष्टपणे सांगितली आणि त्यानंही ती मान्य केली. आज आमचा तिघांचा संसार सुखानं सुरू आहे," राजश्री त्यांच्या लग्नाबद्दल सांगतात.
नवरदेव मुलगा साईनाथ यांनीही अशीच भावना व्यक्त केली. "राजश्री ही माझ्या मामाची मुलगी आहे. मी त्यांच्या इथे लहानाचा मोठा झालो. लग्नाआधी राजश्री आणि तिच्या घरच्यांनी मला दोघींशीही लग्न करशील का असं विचारलं आणि मी होकार दिला. आज आम्ही खूश आहोत."
असे झाले साईनाथ घरजावई
गंगाधर शिरगिरे (वय 60) यांना धुरपता, राजश्री आणि ज्योती अशा तीन मुली. मुलगा नसल्यानं त्यांनी बहिणीच्या मुलाचा म्हणजेच साईनाथ उरेकर यांचा इयत्ता दुसरी पासून सांभाळ केला. लहानपणीच साईनाथ यांचं लग्न धुरपता यांच्याशी करायचं ठरवण्यात आलं.
पण धुरपता यांचा गतिमंदपणा बरा होत नसल्यानं साईनाथ यांचं लग्न त्यांच्या लहान बहिणीशी म्हणजेच राजश्रीसोबत करायचं ठरलं.
पण माझ्यासोबत लग्न करायचं असेल तर माझ्या मोठ्या बहिणीचाही सांभाळ करावा लागेल, अशी अट राजश्री यांनी घातली.
राजश्री यांची अट साईनाथ यांनी मान्य केली आणि 5 मे रोजी हा लग्न सोहळा पार पडला.
कायदा काय सांगतो?
कुटुंबीयांच्या मानसिक स्थितीबद्दल आम्ही गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकरी संतोष पाटील यांच्या मते, "कायद्याच्या भीतीनं शिरगिरे परिवारात अस्वस्थता आहे आणि त्यांना समुपदेशनाची गरज आहे."
गावातील युवक संतोष पाटील म्हणतात की, "पारंपरिक पद्धतीनं जगत असलेल्या आमच्या गावाची चर्चा सगळीकडे होत असल्यानं शिरगिरे कुटुंब भांबावलं आहे."
यासंबंधी अधिक जाणून घेण्याकरता आम्ही वकील असीम सरोदे यांच्याशी संपर्क साधला.
"द्विभार्या प्रतिबंधक कायद्यानुसार 2 लग्न करणं हा गुन्हा आहे. या दोन्हीपैकी एका बहिणीनं तक्रार केली तर ती केस दाखल होऊ शकते. तसंच अशी लग्न होऊ न देणं ही महिला आणि बालकल्याण विभागाची जबाबदारी असते. ते स्वत:हून या गोष्टींची दखल घेऊ शकतात. त्यांच्याकडे आलेल्या रिपोर्टनुसार अथवा बातम्यांनुसार दखल घेऊन ते कारवाई करू शकतात," असीम सरोदे संबंधित कायद्याबद्दल सांगतात.
"पण यातून कुणाचंही गुन्हेगारीकरण होता कामा नये. केस दाखल होणं सोपी गोष्ट आहे. पण ज्या उद्देशानं त्या मुलानं दोन बहिणींशी लग्न केलं तो उद्देश पाहिला पाहिजे, या प्रकरणाला इमोशनल अपील आहे असं वाटतं. म्हणजे यामध्ये त्यांचा उद्देश गुन्हेगारीचा नाही. त्यांना नुसतंच कायद्याच्या कचाट्यात पकडून फायदा नाही तर यावर समोपचाराने तोडगा निघण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं वाटतं," असं सरोदे पुढे सांगतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा