Translate

सोमवार, २९ डिसेंबर, २०१४

भारत-पाकिस्तान सीमेवर 'लेसर वॉल'

भारत आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील नदी किनाऱ्यानजीक असलेल्या भागांमधून दहशतवादी वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करीत आहेत. यावर खबरदारीचा उपाय म्हणून सीमा सुरक्षा दलाकडून 'लेसर वॉल' उभारण्यात येणार आहे.
नियंत्रण रेषेव्यतिरिक्त उर्वरित ३३२३ किलोमीटर लांबीच्या सीमांचे संरक्षण सीमा सुरक्षा दलातर्फे केले जाते. सीमावर्ती भागात जेथे शक्य आहे अशा ठिकाणी तारेचे कुंपण उभारण्यात येते. मात्र तरीही काही भाग असा असतो की, जेथे असे कुंपण उभारणे शक्य नसते. सीमेपलीकडे असणाऱ्या अतिरेक्यांकडून अशा जागांचा वापर घुसखोरी करण्यासाठी केला जातो. मात्र त्यावरही अंकुष ठेवण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे दलाने ठरवले आहे.
सीमारेषेवरील अशा 'मुक्त जागा' टिपण्यासाठी फरहीन लेसर वॉल वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचदृष्टीने बसंतार, बेन नाला, करोल कृष्ण, पालोआ नाला या जम्मू परिसरातील नदी किनाऱ्यांवर लेसर बसविण्यात आले आहेत. गतवर्षी २६ सप्टेंबर रोजी जम्मूतील हिरानगर येथील नद्यांमधून आलेल्या अतिरेक्यांनी लेफ्टनंट कर्नलसह १० जणांची हत्या केली होती. तर यंदा मार्च महिन्यातही घुसखोरांनी जवानांसह नागरिकांना मारले होते. अशा घटना टाळण्यासाठी लेसर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

आधुनिक फरहीन लेसर तंत्रज्ञान 
जेथे तारेचे कुंपण उभारलेले नाही अशा ठिकाणी संशयास्पद हालचाल झाली तर तेथे बसविण्यात आलेले सेन्सर लुकलुकतात आणि सीमेवर तैनात असलेल्या जवानाला संदेश मिळतो. याच धर्तीवर शत्रूपक्षाने खोदलेली छुपी भुयारे हुडकण्यासाठीही लेसर प्रणालीवर चालणारी आधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणांबरोबरच तापमानातील सूक्ष्म फरक टिपणाऱ्या 'लेसर रडार' प्रणालीच्या सध्या चाचण्या सुरू आहेत. या प्रणालीमुळे एखादी व्यक्ती लेसर किरणाचा मार्ग भेदून पुढे सरकल्यास तत्काळ संदेश मिळतो. सध्या अशा प्रकारचे तंत्रज्ञान इस्राइल आणि सिंगापूर या देशांत वापरले जाते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा