शाकाहारी असल्याची कल्पना लग्नापूर्वीच दिलेली असतानाही लग्नानंतर आपल्या ताटात हेतुत: मांसाहारी जेवण वाढून पती आणि सासू-सासऱ्यांकडून छळणूक झाल्याची पत्नीची तक्रार मान्य करत कुटुंब न्यायालयाने तिला घटस्फोट मंजूर केला. पती आणि सासू-सासऱ्यांची ही वागणूक क्रूरता असल्याचा दावा करत पत्नीने काडीमोडासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतली होती.
मांसाहारी पदार्थ ताटात वाढून छळणूक करण्याबरोबरच सासू-सासरे आपल्याला मारहाणही करत असल्याचा आरोप या महिलेने घटस्फोटाची मागणी करताना केला होता. मे २०११ मध्ये लग्न झाल्यापासून लगेचच सासू-सासऱ्यांनी या ना त्या कारणास्तव आपली छळणूक करण्यास सुरुवात केली. सासू आपल्याशी वाईट पद्धतीने बोलण्यासह शारीरिकदृष्टय़ाही त्रास देत असे. शिवाय पतीचा स्वभाव हा तापट असल्याने छोटय़ा-मोठय़ा कारणांवरून तोही आपल्याला छळत, असे आरोप या महिलेने केले. या महिलेने घटस्फोटासाठी केलेल्या अर्जात दावा केला होता की, ती शाकाहारी आहे आणि लग्नापूर्वीच तिने त्याची कल्पना पतीसह सासू-सासऱ्यांना दिली होती; परंतु लग्नानंतर सगळे काही बदलले. छळ करण्याच्या हेतूने सासू जाणीवपूर्वक आपल्या ताटात मांसाहारी पदार्थ वाढत असे. सततच्या या प्रकारामुळे आपण जेवण सोडून दिले. परिणामी आपली तब्येत बिघडत गेली. एवढेच नव्हे, तर लग्नानंतर चार महिन्यांनी सासऱ्यांनीही हुंडा आणला नाही म्हणून छळण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्याला मारहाण केली होती आणि एकदा तर सासू-सासऱ्यांनी आपल्याला मध्यरात्री घराबाहेर काढले होते. आपले वडील पोलीस आहेत, त्यामुळे ती आपल्याविरुद्ध तक्रार करू शकत नाही आणि केलीच त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पतीने आपल्याला दिल्याचा तिने अर्जात उल्लेख केला होता. न्यायालयाने पती आणि त्याच्या आई-वडिलांना आरोपांबाबत आपली बाजू मांडण्यास सांगितले होते; परंतु त्यांच्याकडून त्याला प्रतिसाद देण्यात आला नाही. त्याची दखल घेत न्यायालयाने पत्नीचा दावा मान्य करत तिची घटस्फोटाची मागणी मान्य केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा