Translate

बुधवार, २१ जानेवारी, २०१५

तेरा वर्षीय शुभम बनला अमेरिकी उद्योजक!, कमी खर्चीक 'ब्रेल प्रिंटर'चा निर्माता

उद्योजक होण्यासाठी वयाचे बंधन नसते हे अमेरिकेत वास्तव्यास असणाऱया भारतीय वंशाच्या अवघ्या तेरा वर्षीय शुभम बॅनर्जीने सिद्ध करून दाखवले आहे. कॅलिफोर्नियाला राहणाऱया या तंत्रप्रिय लहानग्याने अंध व्यक्तींसाठीची ब्रेल लिपी छापून देणारा कमी खर्चीक प्रिंटर तयार करुन त्याची कंपनी देखील सुरू केली आहे.
एके दिवशी शुभमने सहज आपल्या कुटुंबियांना अंध व्यक्ती वाचन कसे करतात? असा साधा प्रश्न विचारला असता त्याच्या पालकांनी 'गुगल'वर जाऊन याचे उत्तर शोधण्यास सांगितले. त्यानंतर शुभमने 'गुगल'वर यासंदर्भात शोध घेण्यास सुरूवात केली आणि अंधव्यक्तींना सोयीस्कर ठरणारी ब्रेल लिपी छापून देणाऱया प्रिंटरची किंमत तब्बल २,००० डॉलर्स इतकी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. मुख्यत्वे विकसनशील देशातील अंध व्यक्तींना इतके महाग प्रिंटर्स खरेदी करणे अशक्य असल्याचे त्याला समजले. हीच गोष्ट शुभमच्या तंत्रप्रिय वृत्तीला प्रेरणा देणारी ठरली आणि शाळेच्या विज्ञान प्रदर्शनात शुभमने 'लेगो रोबोटिक्स कीट'च्या साह्याने ब्रेल लिपी छापून देणारा प्रिंटर सादर केला.
ब्रेल लिपी आणि लेगो तंत्रज्ञान यांच्या संयुक्तीकरणातून शुभमने आपल्या प्रिंटरला 'ब्रेगो' नाव दिले आहे. शुभमच्या या 'ब्रेगो' प्रिंटरने सर्वांची वाहवा मिळवली तसेच अनेक पारितोषिकेही पटकावली. शुभमने तयार केलेला हा 'ब्रेगो' सध्या प्राथमिक स्वरुपाचा असला तरी, त्याला पुढील काळात ३५० डॉलर्समध्ये उपलब्ध होईल असा 'डेस्कटॉप ब्रेल प्रिंटर' तयार करायचा आहे. विशेष म्हणजे, तंत्रविश्वातील बलाढ्य 'इंटेल' कंपनीसाठी काम करणाऱया शुभमच्या वडिलांनी त्याच्यातील गुणांना ओळखून ३५,००० डॉलर्सच्या भांडवलावर शुभमसाठी 'ब्रेगो लॅब' सुद्धा सुरू करून दिली आहे. पालक म्हणून आम्ही त्याच्या कल्पनेला प्रोत्साहन देण्यास सुरूवात केली असून काहीतरी नाविन्य निर्माण करण्याची शुभममध्ये सुरु झालेली प्रक्रिया यापुढेही अशीच कायम राहावी, यासाठी प्रयत्न राहतील, असे शुभमच्या वडिलांनी सांगितले.
शुभमचा प्रिंटर पाहून इंटेल कंपनीचे अधिकारीही प्रभावित झाले. इतकेच नाही तर इंटेल कंपनीने शुभमच्या कंपनीत गुंतवणूक करून चांगली सुरूवात करून दिली आहे. तसेच नाविन्यपूर्ण उत्पादनासाठी इंटेलकडून उद्यम भांडवल मिळविणारा सर्वात तरुण उद्योजक म्हणून शुभमची ओळख निर्माण झाली आहे.

मंगळवार, २० जानेवारी, २०१५

खोडद येथील महाकाय दुर्बिण

खोडद येथील महाकाय दुर्बिणीत अर्थात 'जीएमआरटी'मध्ये (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) खूप

मोठय़ा पल्ल्याच्या सुधारणा सुरू असून येत्या एक दे दीड वर्षांत या दुर्बिणीची तरंग लांबी ३२ मेगा हर्ट्झवरून तब्बल ४०० मेगा हर्ट्झपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे या दुर्बिणीची संवेदनशीलता वाढून आकाशाचा अधिक लांबवरचा भागही अभ्यासणे शक्य होईल. पुण्यातील 'एनसीआरए'मधील (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स) शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली.
एनसीआरएतर्फे १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान रेडिओ खगोलशास्त्रावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाणार असून त्यात खगोलशास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञान व नवीन संशोधनांवर चर्चा होणार आहे. पाचशेहून अधिक खगोलशास्त्राचे अभ्यासक व विद्यार्थ्यांनी या परिषदेसाठी नोंदणी केली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एनसीआरएच्या शास्त्रज्ञांनी खोडद, तसेच उटी येथे असलेल्या दुर्बिणींमध्ये सुरू असलेल्या सुधारणांबाबत माहिती दिली. एनसीआरएचे केंद्र संचालक प्रो. एस. के. घोष, प्रो. जयराम चेंगलूर, प्रो. ईश्वर चंद्रा. सी. एच., नीरज भुवन, जे. के. सोळंकी या वेळी उपस्थित होते.
खोडद येथील 'जीएमआरटी' या महाकाय दुर्बिणीच्या उभारणीबरोबरच त्यात सुधारणा करण्याचे कामही एनसीआरए करते. जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आपल्या संशोधनांसाठी या दुर्बिणीची मदत घेत असून प्रतिवर्षी खोडदला खगोलशास्त्रातील शंभरहून अधिक प्रकल्पांवर काम केले जाते. सध्या या दुर्बिणीत खूप मोठय़ा पल्ल्याच्या सुधारणा सुरू आहेत. प्रो. ईश्वर चंद्र म्हणाले, ''पहिल्या आकाशगंगेचा उदय केव्हा झाला असावा, आकाशगंगांमध्ये हायड्रोजनचे प्रमाण किती असेल, दोन आकाशगंगा एकमेकांवर आदळल्यावर काय होते अशा अगणित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न जीएमआरटीच्या साहाय्याने केला जातो. खगोलशास्त्रातील आकाशगंगा, पल्सार, तारे अशा विविध गोष्टींबाबतची मूलभूत संशोधने तिथे होत आहेत. दुर्बिणीची तरंग लांबी वाढवल्यामुळे अधिक दूरवरच्या आणि फिकट दिसणाऱ्या आकाशाचा अभ्यासही चांगल्या प्रकारे करता येईल.''

उटीच्या दुर्बिणीचे तंत्रज्ञान 'डिजिटल' होणार

तमिळनाडूमधल्या 'उटी रेडिओ टेलिस्कोप'चे (ओआरटी) कामही एनसीआरए पाहते. या दुर्बिणीचे तंत्रज्ञान सध्या 'अॅनालॉग' असून त्यात बदल करून अद्ययावत 'डिजिटल' तंत्रज्ञानावर ही दुर्बीण चालणार आहे. अवकाशातील हवामानाच्या (स्पेस व्हेदर) अभ्यासासाठी ही दुर्बीण महत्त्वाची आहे. सूर्यावर नैसर्गिकरित्या होणाऱ्या स्फोटांची तीव्रता किती याचा अभ्यास यात प्रामुख्याने केला जातो. उटीच्या दुर्बिणीची क्षमता वाढवल्यानंतर प्रकाशाचे अधिक स्रोत अभ्यासता येतील.