Translate

मंगळवार, २० जानेवारी, २०१५

खोडद येथील महाकाय दुर्बिण

खोडद येथील महाकाय दुर्बिणीत अर्थात 'जीएमआरटी'मध्ये (जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप) खूप

मोठय़ा पल्ल्याच्या सुधारणा सुरू असून येत्या एक दे दीड वर्षांत या दुर्बिणीची तरंग लांबी ३२ मेगा हर्ट्झवरून तब्बल ४०० मेगा हर्ट्झपर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे या दुर्बिणीची संवेदनशीलता वाढून आकाशाचा अधिक लांबवरचा भागही अभ्यासणे शक्य होईल. पुण्यातील 'एनसीआरए'मधील (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स) शास्त्रज्ञांनी ही माहिती दिली.
एनसीआरएतर्फे १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान रेडिओ खगोलशास्त्रावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाणार असून त्यात खगोलशास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञान व नवीन संशोधनांवर चर्चा होणार आहे. पाचशेहून अधिक खगोलशास्त्राचे अभ्यासक व विद्यार्थ्यांनी या परिषदेसाठी नोंदणी केली आहे. याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एनसीआरएच्या शास्त्रज्ञांनी खोडद, तसेच उटी येथे असलेल्या दुर्बिणींमध्ये सुरू असलेल्या सुधारणांबाबत माहिती दिली. एनसीआरएचे केंद्र संचालक प्रो. एस. के. घोष, प्रो. जयराम चेंगलूर, प्रो. ईश्वर चंद्रा. सी. एच., नीरज भुवन, जे. के. सोळंकी या वेळी उपस्थित होते.
खोडद येथील 'जीएमआरटी' या महाकाय दुर्बिणीच्या उभारणीबरोबरच त्यात सुधारणा करण्याचे कामही एनसीआरए करते. जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आपल्या संशोधनांसाठी या दुर्बिणीची मदत घेत असून प्रतिवर्षी खोडदला खगोलशास्त्रातील शंभरहून अधिक प्रकल्पांवर काम केले जाते. सध्या या दुर्बिणीत खूप मोठय़ा पल्ल्याच्या सुधारणा सुरू आहेत. प्रो. ईश्वर चंद्र म्हणाले, ''पहिल्या आकाशगंगेचा उदय केव्हा झाला असावा, आकाशगंगांमध्ये हायड्रोजनचे प्रमाण किती असेल, दोन आकाशगंगा एकमेकांवर आदळल्यावर काय होते अशा अगणित प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न जीएमआरटीच्या साहाय्याने केला जातो. खगोलशास्त्रातील आकाशगंगा, पल्सार, तारे अशा विविध गोष्टींबाबतची मूलभूत संशोधने तिथे होत आहेत. दुर्बिणीची तरंग लांबी वाढवल्यामुळे अधिक दूरवरच्या आणि फिकट दिसणाऱ्या आकाशाचा अभ्यासही चांगल्या प्रकारे करता येईल.''

उटीच्या दुर्बिणीचे तंत्रज्ञान 'डिजिटल' होणार

तमिळनाडूमधल्या 'उटी रेडिओ टेलिस्कोप'चे (ओआरटी) कामही एनसीआरए पाहते. या दुर्बिणीचे तंत्रज्ञान सध्या 'अॅनालॉग' असून त्यात बदल करून अद्ययावत 'डिजिटल' तंत्रज्ञानावर ही दुर्बीण चालणार आहे. अवकाशातील हवामानाच्या (स्पेस व्हेदर) अभ्यासासाठी ही दुर्बीण महत्त्वाची आहे. सूर्यावर नैसर्गिकरित्या होणाऱ्या स्फोटांची तीव्रता किती याचा अभ्यास यात प्रामुख्याने केला जातो. उटीच्या दुर्बिणीची क्षमता वाढवल्यानंतर प्रकाशाचे अधिक स्रोत अभ्यासता येतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा