बाबासाहेबांच्या या लग्नाची गोष्ट सांगताना, सुरुवात माईसाहेब (शारदा कबीर उर्फ सविता) आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या भेटीपासूनच करू.
बाबासाहेब आणि माईसाहेबांची पहिली भेट
मुंबईतल्या पार्ल्यात डॉ. एस. राव नावाचे म्हैसुरियन गृहस्थ राहत. परदेशातून शिक्षण घेऊन परतलेले डॉ. राव हे अर्थतज्ज्ञ होते.
बाबासाहेबांची या डॉ. रावांशी 1942 पासून घनिष्ठ मैत्री होती. बाबासाहेब मुंबईत आले की, ते वेळ काढून डॉ. रावांच्या घरी जात असत. अगदी व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मजूर मंत्री असतानाही बाबासाहेब जेव्हा मुंबईत येत तेव्हा डॉ. रावांच्या घरी जात असत. दोघांमध्ये तासन् तास बौद्धिक चर्चा घडत असे.
माईसाहेबही (तेव्हाच्या शारदा कबीर) डॉ. राव यांना ओळखत होत्या. डॉ. राव यांच्या मुली माईसाहेबांच्या मैत्रिणी होत्या. कारण कबीर कुटुंबाचा राव कुटुंबीयांशी चागंला परिचय होता. त्यामुळे त्यांचे एकमेकांकडे येणे-जाणे होत असे.
बाबासाहेब आणि माईसाहेबांची पहिली भेट झाली, तिला डॉ. एस. राव हेच निमित्त ठरले ते असे.
माईसाहेब म्हणजे पूर्वीच्या शारदा कबीर.
शारदा कबीर या कृष्णराव विनायकराव कबीर आणि जानकीबाई कबीर या मूळच्या रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील दाम्पत्याच्या पोटची मुलगी. सारस्वत ब्राह्मण कुटुंबातील शारदा यांचा जन्म 27 जानेवारी 1912 रोजी झाला. घरात शारदा मिळून एकूण आठ भावंडं.
लग्नानंतर 'शारदा कबीर'च्या 'सविता आंबेडकर' झाल्या. मात्र, बाबासाहेबांसाठी त्या कायम 'शरू'च राहिल्या, तर अनुयायांसाठी 'माईसाहेब' बनल्या. पण हे सारं बाबासाहेबांसोबत लग्नानंतर.
त्याआधी माईसाहेब राजकीय घडामोडींपासून कोसो दूर राहत आपलं वैद्यकीय शिक्षण आणि नंतर वैद्यकीय सेवेत गुंतलेल्या माईसाहेबांना बाबासाहेबांबद्दल 'ते मजूर मंत्री आहेत' एवढीच माहिती होती.
अशातच 1947 सालच्या सुरुवातीला बाबासाहेब दिल्लीतून मुंबईत आल्यानंतर पार्ल्याला डॉ. राव यांच्या घरी गेले होते. तिथं माईसाहेब होत्या. त्यावेळी डॉ. एस. राव यांनी बाबासाहेबांना माईसाहेबांची ओळख करून देताना म्हटलं की, "ही आमच्या मुलींची मैत्रीण. अत्यंत हुशार आहे. एमबीबीएसचं शिक्षण घेतलंय. डॉ. मालवणकरांसारख्या विख्यात डॉक्टरांकडे ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करते."
बाबासाहेब आणि माईसाहेब यांच्या प्रत्यक्ष भेटीचा हा पहिला क्षण.
'तेजस्वी डोळे, धारदार नजर, विद्वतेचे तेज....'
या भेटीवेळचं वर्णन करताना माईसाहेबांनी त्यांच्या 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' या आत्मचरित्रात नोंदवलंय की, 'डॉ. आंबेडकरांचे व्यक्तिमत्व अत्यंत भारदस्त होते. त्यांचे भव्य कपाळ, तेजस्वी व भेदक डोळे, धारदार नजर, अत्याधुनिक व टापटीप पोषाख, चेहऱ्यावर विलसत असलेले विद्वत्तेचे तेज पाहून प्रथमदर्शनीच त्यांच्या असामान्यत्त्वाची खात्री पटत असे.'
त्या पुढे लिहितात, 'परदेशी लोक डॉ. आंबेडकरांना जर्मन राजपुत्र (German Prince) असे का संबोधित, याची प्रचिती त्यांना पाहणाऱ्याला प्रथमदर्शनीच येत असे. त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वाला प्रकांड विद्वत्तेची जोड मिळाल्याने त्यांचा वेगळाच प्रभाव पडत असे.'
याच काळात बाबासाहेबांची तब्येत फारशी बरी नसे. त्यात त्यांच्या खांद्यावर एकाचवेळी बऱ्याच जबाबदाऱ्या आल्या होत्या.
भारत स्वतंत्र झाला आणि नेहरूंच्या अंतरिम मंत्रिमंडळात डॉ. आंबेडकर कायदेमंत्री झाले. त्यात 29 ऑगस्ट 1947 रोजी त्यांच्याकडे राज्यघटनेचा मसुदा बनवण्याची जबाबदारीही आली. त्याचवेळी लेखन, सामाजिक क्षेत्रातली कामं इत्यादी गोष्टीही सुरूच होत्या.
या काळात माईसाहेब मुंबईतल्या गिरगावमधील ह्युजेस रोडवरील डॉ. मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये काम करत होत्या. एकेदिवशी बाबासाहेब अचानक डॉ. मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये आले.
बाबासाहेब अचानक तिथं आल्यानं माईसाहेबांना आश्चर्य वाटलं. मात्र, नंतर त्यांना कळलं की, डॉ. एस. रावांनीच बाबासाहेबांना तिथं पाठवलं होतं. डॉ. एस. राव यांच्या पत्नीला फिट्सचा त्रास होता. तो त्रास डॉ. मालवणकरांच्या उपचारानंतर बरा झाला होता. त्यामुळे डॉ. रावांनी बाबासाहेबांना त्यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉ. मालवणकरांची शिफारस केली होती.
माईसाहेब तिथं ज्युनियर डॉक्टर म्हणून काम करत होत्या. त्यांनीच बाबासाहेबांची तपासणी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की, बाबासाहेब मधुमेह, रक्तदाब, न्यूरायटीस, सांधेदुखी अशा व्याधींनी ते अनेक वर्षांपासून त्रस्त होते. त्यात मधुमेहानं त्यांचं शरीर पोखरून जर्जर झालं होतं. संधिवातामुळे रात्री बिछान्यात तळमळत पडून राहावं लागत असे.
बाबासाहेबांच्या तपासणीत आढळलेल्या या आजारांबद्दल माहिती आत्मचरित्रात देतानाच माईसाहेब म्हणतात की, 'समता प्रस्थापनेच्या आपल्या परमध्येयासाठी व पददलितांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी प्रकृतीची कधीही पर्वा केली नाही.'
तर डॉ. मालवणकरांकडे उपचारास सुरुवात केल्यानंतर बाबासाहेबांना त्याचे चांगले परिणाम दिसू लागले होते. त्यामुळे बाबासाहेब राज्यघटना आणि मंत्रिपदाच्या जबाबदारीनिमित्त दिल्लीत असतानाही, डॉ. मालवणकरांना फोन करून आरोग्यसंबंधी गोष्टी विचारत राहत. डॉ. मालवणकर हेही त्यांना तातडीनं प्रतिसाद देत.
जेव्हा बाबासाहेब मुंबईत येत तेव्हा आठवणीने दोन ठिकाणी आवर्जून जात, एक म्हणजे डॉ. एस. राव यांच्या इथं आणि दुसरं म्हणजे गिरगावात डॉ. मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये. या दोन्ही ठिकाणी माईसाहेबांची नि बाबासाहेबांची भेट होत असे.
बाबासाहेबांनी जेव्हा माईसाहेबांना लग्नाबाबत विचारलं...
आणि मग तो क्षण आला, जेव्हा बाबासाहेबांनी माईसाहेबांना लग्नाबाबत विचारलं.
1947 च्या डिसेंबर महिन्यात बाबासाहेब मुंबईत आले असताना, डॉ. मालवणकरांच्या क्लिनिकमध्ये गेले होते. तिथून तपासणी करून बाबासाहेब दादारमधील राजगृहात जाणार होते. माईसाहेब दादरमध्येच पोर्तुगीज चर्चसमोर राहत असत. त्यामुळे बाबासाहेबांनी विचारलं की, "चला तुम्हाला दादरला घरी सोडतो. मलाही राजगृहाला जायचं आहे."
याच दिवशी बाबासाहेब माईसाहेबांना म्हणाले, "हे पाहा डॉक्टर, माझे लोक व सहकारी मला आग्रह करत आहेत की सहचारिणी करा. परंतु, मला माझ्या आवडीची, योग्यतेची व अनुरूप स्त्री मिळणे फार कठीण आहे. पण माझ्या लोकांसाठी मला अधिक जगायला पाहिजे. अशावेळी काळजी घ्यायला कोणी तरी असणे आवश्यक आहे. अशा सुयोग्य स्त्रीचा शोध घेणे, मी तुमच्यापासूनच सुरू करतो."
हे ऐकल्यावर माईसाहेब संकोचल्या आणि त्यावर काय उत्तर द्यावं त्यांना कळलं नाही. बाबासाहेबांनी तातडीनं उत्तराची अपेक्षा ठेवली नाही आणि ते दिल्लीत निघून गेले.
नंतर 25 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतून माईसाहेबांच्या नावे एक पत्र आलं. ते बाबासाहेबांचं पत्र होतं. त्यात त्यांनी लिहिलं होतं की, 'मला सहचारिणी शोधण्याची सुरुवात तुझ्यापासूनच सुरू करीत आहे. अर्थात, जर तू तयार असशील तरच! तरी तू याचा विचार करून मला कळव'
पुढे याच पत्रात बाबासाहेबांनी लिहिलं होतं की, 'तुझ्या नि माझ्या वयातील फरक व माझी प्रकृती ही अशी, या कारणांनी तू मला नकार जरी दिलास तरी मला बिलकूल दु:ख होणार नाही.'
दरम्यानच्या काळात माईसाहेब मोठ्या विचारात पडल्या. त्यांनी आधी डॉ. मालवणकरांशी चर्चा केली. डॉ. मालवणकर म्हणाले की, "आंबेडकरांनी जबरदस्ती केली नाहीय, त्यामुळे शांतपणे विचार करून योग्य काय ते तुम्ही स्वत:च ठरवा."
डॉ. मालवणकरांनीही निर्णय माईसाहेबांवरच सोडला. मग त्या गोंधळलेल्या अवस्थेत घरी आल्या आणि मोठ्या भावाला बाबासाहेबांच्या लग्नाच्या मागणीबाबत सांगितलं.
त्यावर माईसाहेबांचे ज्येष्ठ बंधू म्हणाले, "म्हणजे तू भारताची कायदेमंत्रीण होणार तर! अजिबात नकार देऊ नकोस. पुढे जा."
भावाच्या वाक्यांनी माईसाहेबांना आधार मिळाला आणि त्यांनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि होकार कळवला.
'लग्नासाठी होकार देऊन दीन-दलितांच्या राजाची जबाबदारी मी स्वीकारली होती,' असं माईसाहेब आत्मचरित्रात म्हणतात.
माईसाहेबांच्या होकाराचं पत्र जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बाबासाहेबांना पोहोचलं आणि त्याच आठवड्यात बाबासाहेबांनी माईसाहेबांना एक सोन्याची साखळी पाठवली. त्या साखळीच्या पॅडॉलवर नांगर (बोटी नांगरणारा) कोरलेला होता. ही साखळी बाबासाहेबांचे निकटवर्तीय शंकरानंद शास्त्रींनी माईसाहेबांकडे आणून दिली.
त्यानंतर दोघांमध्ये नियमित पत्रव्यवहार सुरू झाला. या पत्रांमध्ये माईसाहेब आणि बाबासाहेब एकमेकांना अनुक्रमे 'शरू' आणि 'राजा' असा उल्लेख करत.
20 फेब्रुवारी 1948
रोजी लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबांनी 'राजा' शब्दाबद्दल लिहिलंय. 'Dearest Sharu...' अशी सुरूवात करून पत्राच्या शेवटी 'With Fondest and Deepest Love, from
Raja' असं लिहिलंय.
बाबासाहेब इतरांना पत्र लिहिताना 'भीमराव आंबेडकर किंवा बी. आर. आंबेडकर' असं शेवटी लिहित. केवळ माईसाहेबांच्या पत्रांमध्ये ते स्वत:चा 'राजा' असा उल्लेख करत.
'राजा' शब्दाबद्दल या पत्रात त्यांनी म्हटलंय की,
"एलफिन्स्टन महाविद्यालयातील माझे विद्यार्थी मला या नावानं हाक मारत. तुलाही ते कसं सूचलं? आणि तुला आवडत असेल ते तर तू 'राजा' म्हण."
पुढे एकमेकांना पाठवलेली सर्व पत्रं 'शरू'ने तिच्या 'राजा'ला आणि 'राजा'नं त्याच्या 'शरू'ला लिहिलेलीच होती.
वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी लग्न का केलं?
माईसाहेबांसोबत लग्न करण्याचे ठरल्यानंतर बाबासाहेबांनी कमलाकांत चित्रे, डॉ. मालवणकर, दौलत जाधव, भाऊराव गायकवाड यांसारख्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत 'फ्री प्रेस जर्नल'चे डॉ. नायर यांनाही त्यांनी कळवले.
डॉ. नायर आणि बाबासाहेबांचे जिव्हाळ्याचे संबंध असण्याला कारण होतं ते डॉ. नायरांचं बुद्धाबाबतचं आकर्षण. मुंबई सेंट्रलच्या नायर हॉस्पिटलच्या आवारात बुद्धमंदिर त्यामुळेच आहे. बाबासाहेब मुंबईत असताना त्यांना विश्रांतीची गरज वाटल्यास, ते डॉ. नायरांच्या जुहू येथील बंगल्यात राहायला जात असत.
तर लग्न आधी मुंबईत करण्याचं ठरल होतं. मात्र, ते दिल्लीत पार पडलं.
दिल्लीत गुरुवारी, 15 एप्रिल 1948
रोजी बाबासाहेब आणि माईसाहेबांचं लग्न झालं.
देशाची फाळणी, गांधी हत्या या सर्व पार्श्वभूमीवर देशातील वातावरण तणावाचे होते. त्यामुळे लग्नाचा समारंभ छोटेखानीच असावा आणि या समारंभाला अधिक प्रसिद्धी मिळू नये, असं मत बाबासाहेबांचं होतं आणि झालंही तसंच.
त्यावेळी बाबासाहेब दिल्लीतील '1, हार्डिंग्ज अव्हेन्यू' या सरकारी बंगल्यात राहत असत. नोंदणी पद्धतीनं याच बंगल्यात लग्नाची प्रक्रिया पार पडली. निवडक लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
त्याच दिवशी संध्याकाळी स्वागतसमारंभ आयोजित करण्यात आला होता आणि त्यासाठी भारताचे तत्कालीन गव्हर्नर-जनरल लॉर्ड माऊट बॅटन यांचा खास दूत हजर होता.
स्वागतसमारंभ आटोपल्यावर बाबासाहेब आणि माईसाहेब सरदार पटेलांच्या बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावेळी सरदार पटेल हृदयविकाराच्या त्रासामुळे आजारी होते. आजारामुळे बेडवरूनच पटेलांनी बाबासाहेब-माईसाहेबांना आशीर्वाद दिले.
अशा पद्धतीनं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत बाबासाहेब आणि माईसाहेबांचं 15 एप्रिल 1948 रोजी लग्न झालं.
माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लग्नाची तारीख
15 एप्रिल 1948 च का निवडली, याचेही स्पष्टीकरण दिले आहे.
त्या म्हणतात की, 14 एप्रिल हा डॉक्टरसाहेबांचा वाढदिवस. त्यामुळे त्या दिवशी असंख्य हितचिंतक अभिष्टचिंतनासाठी गर्दी करत. त्यामुळे याच दिवशी लग्न करण्याचे सोयीचे ठरले नसते. म्हणून दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 एप्रिलला लग्न करण्याचे ठरवले.
'माझ्यानंतर माझ्या शरूचे काय होईल?'
आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे की, लग्नावेळी बाबासाहेबांचं वय 57 वर्षे, तर माईसाहेबांचं वय 36 वर्षे होतं. त्यात आधी उल्लेख केल्याप्रमाणे बाबासाहेब नाना आजारांनी त्रस्त होते.
आपल्या लोकांसाठी जगलं पाहिजे, त्यामुळे आपली काळजी घेणारी सहचारिणीची गरज आहे, असं म्हणत बाबासाहेबांनी माईसाहेबांशी लग्न केलं. मात्र, त्यांना त्यांच्या प्रकृतीची नीट कल्पना होती. त्यामुळेच माईसाहेबांना 21 फेब्रुवारी 1948 रोजी लिहिलेल्या एका पत्रात बाबासाहेब काळजी व्यक्त करतात.
बाबासाहेब त्या पत्रात लिहितात, 'सार्वजनिक कार्यास वाहून घेतल्यामुळे राजाने कसलाच द्रव्यसंग्रह केला नाही. पोटापुरता व्यवसाय या पलिकडे शरूच्या राजाला काही करत आले नाही. शरूच्या राजाला पेन्शन नाही. शरूचा राजा निरोगी असता तर काही विपदा नव्हती. परंतु रोगपीडित असल्यामुळे संशय वाटतो आणि शरूचे काय होईल, याची आठवण झाली म्हणजे मन उद्विग्न होते. भगवान बुद्ध यातून काहीतरी मार्ग काढील, असा शरूच्या राजाला विश्वास आहे.'
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सहवास माईसाहेबांना नऊ वर्षेच लाभला. कारण 6 डिसेंबर 1956
रोजी बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं.
बाबासाहेबांच्या संघर्षात माईसाहेब साथी बनल्या. मात्र, बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरही त्यांना संघर्ष चुकला नाही. किंबहुना, 'माझ्यानंतर माझ्या शरूचे काय होईल?' ही बाबासाहेबांची चिंता खरीच ठरली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या या काळाला माई 'कसोटीपर्व' म्हणायच्या.
बाबासाहेबांच्या निधनानंतर काही दिवसातचं हे 'अग्निदिव्य' सुरू झालं. निमित्त ठरलं बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाचं. परिनिर्वाण झालं की घडवलं गेलं, असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थित केला गेला. आणि या प्रश्नाचा रोख होता माईसाहेब आंबेडकरांकडे. बीबीसी मराठीनं यासंदर्भात विशेष लेख यापूर्वीच प्रकाशित केले आहे. तो इथे वाचू शकता.
म्हणूनच की काय, माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलंय, "डॉ. आंबेडकरांच्या परिनिर्वाणानंतर मला ज्या अग्निदिव्यातून जावे लागले, त्याचा मी विचार करते तेव्हा, माझ्या डोक्यात असा विचार येतो की, मला वैधव्याच्या वणव्यात जो वनवास भोगावा लागला तसाच अन्याय डॉ. आंबेडकरांच्या हयातीत कोणा स्त्रीच्या नशिबी आला असता तर डॉ. आंबेडकर त्या स्त्रीच्या हक्कासाठी धावून गेले असते आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले असते."
शेवटी बाबासाहेबांचंच एक वाक्य इथं नमूद करायला हवं. बाबासाहेब म्हणाले होते :
"The Successful rekindling of this dying
flame is due to the medical skill of my wife and Dr. Malvankar. I am immensely
grateful. They alone have helped me to complete the work." ("माझ्या विझणाऱ्या प्राणज्योतीला हे तेज प्राप्त झालं आहे त्याचं श्रेय माझी पत्नी आणि डॉ. मालवणकरांना जातं. मी त्यांचा ऋणी आहे. माझं कार्य त्यांच्यामुळे पूर्ण होऊ शकलं.")
बाबासाहेबांच्या या उद्गारातूनच माईसाहेबांचं त्यांच्या आयुष्यातील महत्व अधोरेखित होतं.
या लेखासाठी माईसाहेब आंबेडकरांचं 'डॉ. आंबेडकरांच्या सहवासात' हे आत्मचरित्र आणि वैशाली भालेराव यांचं 'डॉ. माईसाहेब आंबेडकरांच्या सहवासात' या पुस्तकाचा संदर्भ म्हणून मदत घेण्यात आली. तसंच, बीबीसी मराठीनं यापूर्वी माईसाहेब आंबेडकरांचं जीवनपट मांडणारा लेख लिहिला होता, त्या लेखाचाही आधार घेण्यात आलाय.)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा