Translate

गुरुवार, १८ जून, २०१५

जगातील सर्वात लहान दिवा

जगातील सर्वात लहान दिवा तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले असून, तो ग्राफिनच्या एका अणूइतक्या जाडीचा आहे. त्यामुळे ग्राफिन आता स्मार्टफोन, संगणक , मोटारी व इमारती तसेच उपग्रह यांचे रूप बदलून टाकणार आहे.

अतिशय पातळ अशा ग्राफिनच्या थरापासून अतितप्त होऊ शकणारे आपल्या नेहमीच्या बल्बमध्ये असते तसे तारेचे वेटोळे तयार करण्यात आले आहे. ते २५०० अंश सेल्सियस तापमानाला प्रकाशमान होते. आण्विक पातळीवर असला तर या बल्बचा प्रकाश नुसत्या डोळ्यांनी दिसतो इतका प्रखर आहे. ज्या सिलिकॉन चिपवर तो बसवलेला असतो तिचे कुठलेही नुकसान या जास्त तापमानामुळे होत नाही. नवीन प्रकारची स्वीच, प्रकाशीय संगणक, डिजिटिल माहितीचे वहन यात त्याचा उपयोग होणार आहे. माहितीचे वहन सिलिकॉन चिपपेक्षा वेगाने होईल असा वैज्ञानिकांचा दावा आहे.
न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातील मेकॅनिकल इंजिनियरिंगचे प्राध्यापक जेम्स होन यांनी सांगितले की, संगणकाच्या चिपवर प्रथमच प्रकाशस्त्रोत तयार करण्यात आला आहे. हे संशोधन 'नेचर नॅनोटेक्नॉलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. होन यांच्या दाव्यानुसार जगातील सर्वात लहान विद्युत बल्ब तयार करण्यात त्यांना यश आले असून, यात नवीन प्रकारचा ब्रॉडबँड प्रकाश उत्सर्जक वापरण्यात आला आहे. त्यामुळे अणुएवढय़ा जाडीच्या लवचिक पदार्थातून प्रकाश मिळवता आला आहे. त्याचा संदेश वहनात मोठा उपयोग होईल. ग्राफिन हा पदार्थ रशियन वैज्ञानिकांनी मँचेस्टर विद्यापीठात शोधून काढला होता व तो कार्बनच्या जाळ्यासारख्या रचनेचा बनलेला असतो. त्याची जाडी एका अणूएवढी असते तो खूपच हलका आणि विजेचा तो पूर्णवाहक असतो.

ग्राफिनचे उपयोग
* पिण्याचे पाणी- खारे पाणी गोडे करण्याच्या तंत्रात ग्राफिनच्या स्फटिकांची जाळी वापली जाते त्यामुळे मीठ गाळून पेय जल बाहेर पडते.
* स्मार्टफोन- ग्राफिन हे पारदर्शक व संवाहक असल्याने त्याचा उपयोग स्मार्टफोनचे टचस्क्रीन तयार करण्यासाठी होतो.
* न गंजणाऱ्या मोटारी- मोटारीत धातू वापरला जातो पण त्या ऐवजी ग्राफिनचा वापर केला तर तो जलरोधक असतो ऑक्सिडेशनची क्रिया रोखली जाते, त्यामुळे गंज चढत नाही.

बुधवार, १७ जून, २०१५

कम्प्युटरच्या अतिवापरामुळे जडणाऱ्या मानसिक व शारीरिक व्याधीची माहिती

मेडिकेशन नव्हे; मेडिटेशनची गरज
कम्प्युटरच्या अतिवापरामुळे जडणाऱ्या मानसिक व शारीरिक व्याधीची आपण माहिती घेत आहोत. बैठ्या जीवनशैलीमुळे जडणा-या मानेच्या व इत व्याधींची माहिती आपण या लेखातून घेऊया...
सतत खुर्चीत बसल्यामुळे मानेचे विकार होतात. आपल्या पाठीचे ३३ मणके असतात. पाठीच्या या मणक्यांना ताणणे, पीळ देणे, दाब देणे म्हणजेच नैसर्गिक हालचाली केल्यामुळे पाठीच्या मणक्यांची लवचिकता चांगली राहाते. पण आपली जीवनशैली बदलली, खुर्चीचा वापर वाढला. डाय‌निंग टेबल आले, वॉशिंग मशिन, कमोडची सुविधा आली, वाहाने आली आणि आपल्याला हे सर्व मिळालेच पाहिजे या महत्वाकांक्षेपोटी अपेक्षांचे ओझेही वाढले.
दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे अनेकजण एसीमध्ये काम करतात. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा संबंधच नसतो. परिणामी डी-३ जीवनसत्वाची कमतरता भासते. त्याचप्रमाणे कॅल्श‌िअमचे प्रमाणही घटते. कॅल्श‌िअमचे प्रमाण घटल्यामुळे हाडे कमकूवत होतात. बदललेल्या जीवनशैलीमुळे एका समस्येतून दुसरी समस्या निर्माण होते. सतत एसीमध्ये बसल्यामुळे फारशी तहान लागत नाही. पाण्याच्या अभावामुळे मलावरोध होते. त्यामुळे मुळव्याध होण्याचा धोका संभवतो. अपूर्ण शौचामुळे पित्त वाढते. याचा झोपेवर परिणाम होऊन निद्रानाशाचा विकार जडू शकतो. पोट जर साफ नसेल तर मन साफ नसते ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे व्यायामाचा अभाव दुसरीकडे बहुतेकजण कँटीन कल्चरला बळी पडतात,. फास्ट फूड, जंक फूड, चहा-कॉफीचे वाढलेले प्रमाण यामुळे पित्त वाढते त्याचबरोबर स्थूलपणाही वाढण्याची शक्यता असते.
ही सर्व जीवनशैली ज्या कम्प्युटरमुळे लागलेली असते त्याच्या मुळाशी पुन्हा गेल्यावर असे लक्षात येते की, कम्प्युटर हा आज्ञाधारक नोकराप्रमाणे वागत असतो. आपल्या प्रत्येक आज्ञेवर तडक कारवाई होते. कम्प्युटरच्या अतिसहवासामुळे माणसांपासून काहीजण दुरावतात. ते ओबिडिअन्ट पीसी सिंड्रोमचे लक्ष्य होतात. प्रत्येक ठिकाणी या व्यक्ती हुकुमशहासारख्या वागू लागतात. काहीसे हेकेखोर, रागीट व चिडचिडे होतात.
या सगळ्यावर नियंत्रण मिळवणे निश्च‌ति शक्य आहे. त्यासाठी दिवसातील चाळीस मिनिटे स्वतःसाठी काढा. व्यायाम किंवा योगासने करा. प्रत्येक वेळेस वाहान वापरण्याची सवय सोडून द्या. चालण्यावर भर द्या. दर तासाला एक ग्लास पाणी पिणे ही सवय जरी स्वतःला लावून घेतली तर त्याचा खूप फायदा होईल. मुख्य म्हणजे कम्प्युटरपासून दूर जाऊन माणसांमध्ये मिसळा. संयमाची आवश्यक्ता असलेले खेळा खेळा, शांत जागी बसून ध्यानधारणा करा. भावनांचे संतुलन करण्यासाठी मेडिकेशन (औषधे) नव्हे तर मेडिटेशनची (ध्यानधारणा) आवश्यक्ता आहे. अखेरीस कम्प्युटरचे फायदे मिळवताना त्याच्या दुष्परिणामांवर नियंत्रण मिळवण्यास शिकणे गरजेचे आहे.