बीड: गेवराईच्या सीमा पवारनं शिक्षण आणि शेतीचा व्याप सांभाळून कुस्तीसारख्या खेळातही आपलं कर्तृत्त्व दाखवून दिलं आहे. सीमा पवार ही ऊसतोड कामगाराची लेक. गेवराईच्याच अट्टल महाविद्यालयात शिकणारी सीमा घरच्या खर्चाला हातभार लावण्यासाठी स्वत:ही ऊसतोडणीचं काम करते. घरची रोजची कामं, कॉलेजचं शिक्षण आणि वर ऊस तोडणीचं काम हा सारा व्याप सांभाळून सीमानं अवघ्या गेवराईसाठी अभिमानास्पद कामगिरी बजावलीय. तीही कुस्तीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत सीमानं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याच कामगिरीच्या निकषावर तिची निवड हरयाणातल्या कुरुक्षेत्रावर होणाऱ्या आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी झाली आहे.
सीमा पवार आणि तिच्या कुटुंबियांची एकीकडे जगण्यासाठीची धडपड सुरु असतानाच, त्यातून वेळ काढून सीमा एक वेगळी वाट चोखाळण्याचाही नेटानं प्रयत्न करत आहे. सीमाच्या याच धडपडीचं आणि याच प्रयत्नांचं गेवराईनं होर्डिंग्ज लावून कौतुक केलं आहे.Translate
शुक्रवार, २ जानेवारी, २०१५
गुरुवार, १ जानेवारी, २०१५
नीलपंख
नीलपंख हा नावाप्रमाणे देखणा पक्षी! 'इंडियन रोलर' अशी याची इंग्रजीतील ओळख. जवळजवळ संपूर्ण भारतात आढळणारा कबुतराएवढय़ा आकाराचा हा पक्षी त्याच्या रंगसंगतीने लक्ष वेधून घेतो. डोक्यावर निळसर रंगाची टोपी, साधारण याच रंगातील पोट. तपकिरी-तांबूस रंगाची छाती आणि पाठ. पंखाखाली पुन्हा गडद निळा, फिकट निळा आणि पांढरा अशा तीन रंगांचे पट्टे. एखाद्या जागी स्थिर बसलेला नीलपंख जेवढा प्रेमात पाडतो, याहून तो उडू लागला, की त्याचे हे दडलेले रंग पाहणाऱ्याला थक्क करून टाकतात. असा हा नीलपंख गावा-शिवारापासून ते पाणथळीचे प्रदेश, जंगल-राई सर्वत्र आढळतो. अनेकदा तो तारांवर बसलेला दिसतो. टोळ, सरडे, पाली, अळय़ा, गवतातील कीटक हे त्याचे खाद्य. आपल्याकडील अनेक गडकिल्ल्यांवरही या नीलपंखने आम्हाला आपले हे दुर्मिळ दर्शन घडवले आहे. एखाद्या भटकंतीत त्याचे हे रंगीन दर्शन घडले, की सारी पायपीटच आनंदी, प्रसन्न होऊन जाते.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
